Blunder of the year ! (Student of the Year - Movie Review)

Submitted by रसप on 20 October, 2012 - 01:53

'हसत खेळत शिक्षण' ही संकल्पना मी तरी अनुभवली नाही आणि मला नाही वाटत माझ्या पिढीच्या इतर कुणीही अनुभवली असावी किंवा आजची पिढी अनुभवत असावी. पण करण जोहरने मात्र ती अनुभवली आहे, हे नक्की. तो शिकला आहे हे त्याला इंग्रजी छान येतं ह्यावरून कळतं आणि तो हसत खेळत(च) शिकला आहे हे त्याचा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' पाहून कळावं. (तसं तर ते 'कुछ कुछ होता हैं' मध्येच दिसलं होतं पण तेव्हा तो लहानही होता!)
असो.

सिनेमा पाहाण्याआधी (किंवा हे परीक्षणही वाचण्याआधी) मला सांगा -
"तुम्ही कुछ कुछ होता है, जो जीता वोही सिकंदर,दिल तो पागल हैं, मोहब्बतें, मैं हूं ना,कल हो ना हो, जाने तू या जाने ना हे सिनेमे पाहिले आहेत का ?"
हो? मग 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' मध्ये आणि ह्या परीक्षणातही तुम्हाला नवीन काही मिळणार नाहीये! सेव्ह युअर मनी. सेव्ह युअर टाईम.

सुरुवात होते अत्यंत बंडल, घरी बनविल्यासारख्या अक्षरातील टायटलल्सनी.
मग सिनेमा सुरू होतो. फर्स्ट टेक - 'जाने तू या जाने ना..' चौघे मित्र मिळून कथाकथन करत आहेत.
पुढे सुरु होतो 'मोहब्बतें'. मस्तपैकी कॉलेज.. (त्याला 'स्कूल' म्हणायचं असतं) इतकं जबरदस्त की, मी त्या कॉलेजात गेलो असतो तर आयुष्यभर पास झालोच नसतो.
मग थोडासा - मैं हूं ना.. थोडा 'दिल तो पागल हैं'..थोडा 'कल हो ना हो..' भरपूर 'कुछ कुछ होता है' आणि ''जो जीता वोही सिकंदर' असा सगळा ढापूगिरीचा प्रवास करत 'कभी अलविदा ना कहना..' चा शेवट कसा 'अंत' पाहातो, तसा अंत पाहून सिनेमा संपतो.
कीर्तनाची नांदी आणि शेवटचा गजर कसा जेव्हढ्यास तेव्हढा असायला हवा ना..? जास्त लांबवूनही किंवा अगदी चटकन उरकूनही चालणारं नसतं. तसंच सिनेमाचंही असावं. पण हे करणला कसं कळणार ? तो प्रॉम्स, डिस्कोज इ. ला गेला आहे, कीर्तन? जीजस क्राईस्ट.. व्हॉट इज इट लाईक?

तुम्ही अजून वाचताय ? स्टोरी ऐकायचीच आहे? ओके!

Student-Of-The-Year-Movie-Poster.jpg

एक लै भारी, 'आटपाट' कॉलेज (त्याला 'स्कूल म्हणायचं - हे एकदा सांगूनही समजत नाहीये माझं मलाच!) असतं. (इतकं लै भारी असतं की प्रत्येक मुला/ मुलीच्या बाकावर स्वतंत्र असा टेबल लॅम्प, सेव्हन स्टार हॉटेलचा डायनिंग हॉल फिका पडेल असं कॅन्टीन, दिल्लीचा लाल किल्ला + उदयपूरचा एखादा राजवाडा + मुंबईची नॅशनल लायब्ररी + ताज महाल हॉटेल + आजपर्यंत पाहिलेली सगळी कॉलेजं X ४-५ अशी एकंदरीत इमारत) इथे असतो एक श्रीमंत बापाचा पोरगा रोहन (वरुण धवन) आणि त्याची श्रीमंत गर्लफ्रेंड शनया (आलीया भट्ट). हे दोघं मजेत राज्य करत असतात आणि मग येतो एक मध्यमवर्गीय घरातला अभिमन्यू सिंघ (सिद्धार्थ मल्होत्रा). पुढे जे काही होतं ते आजपर्यंत 'क्ष' वेळा झालेलं आहे. ते तसंच होतं आणि जाम पकवतं.

सिनेमा बघताना/ बघितल्यावर तुम्हाला असे काही प्रश्न पडले तर तुमची सारासारविचारशक्ती शाबूत आहे -
१. हे नक्की कुठल्या अभ्यासक्रमाचं कॉलेज आहे? (स्कूल!!) कारण, रोहन-शनया व कं. तिथे आधीपासून Established आहेत आणि अभिमन्यू नंतर येतो पण सगळे एकत्रच!
२. त्यांना एकदाही काहीही शिकवलं जात नाही! फक्त खेळत असतात नाही तर नाचत असतात नाही तर भांडत असतात.. नक्की शैक्षणिक संस्थाच आहे ना?
३. आई बाप नसलेला, काकांकडे उपऱ्यासारखा राहणारा अभिमन्यू असल्या टकाटक कॉलेजची (स्कूल!!) जिथे करोडपती बापांची पोरंही शिकत(?) आहेत, फी कशी जमवतो?
४. नक्की 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' निवडायचा असतो की ' स्पोर्ट्समन ऑफ द इयर'?

नवीन चेहरे वरुण (डेव्हिडचा पोट्टा), आलिया (महेशरावांची कार्टी) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (सेंट परसेंट 'मॉडेल') दिसायला फ्रेश दिसतात. वरुण धवन लक्षात राहातो. 'आलिया' म्हणजे.. 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागते. सिद्धार्थ मल्होत्रा एका क्षणासाठीही कुमारवयीन वाटत नाही आणि एखादा मॉडेल जितपत अभिनय करू शकतो, तितपतच करतो.
छोट्याश्या भूमिकेतील 'कायोझ इराणी' (सिनेमात 'कायोझ सोडावॉटरबॉटलओपनरवाला' उर्फ 'सुडो') छाप सोडतो. त्याला अखेरीस एका दृश्यात बराच वाव मिळाला आहे. त्या एका दृश्यात तो सिनेमा खाऊन टाकतो. (शेवटी 'बोमन'चा पोरगा आहे!)
करण जोहरच्या सिनेमाची पटकथा इतकी ठिगळं जोडलेली पहिल्या प्रथमच !
संगीत, २-३ पंजाबी गाणी काहीही समजत नाहीत, ती बहुतेक स्वानंदासाठी बनवली असावीत. राधा, रट्टा मार ही गाणी बरी जमली आहेत. (म्हणजे विशाल-शेखर अजून 'रीकव्हरेबल' आहेत.)
ऋषी कपूर, रोनित रॉय, राम कपूर व इतर मंडळी आपापलं काम चोख करतात.

खुसखुशीत संवाद काही ठिकाणी चांगली विनोदनिर्मिती व काही ठिकाणी चांगले 'ठोसे' (Punches) देतात.

एकूण विचार केल्यास हा 'स्ट्यूडन्ट ऑफ द इयर' म्हणजे करण जोहरचं 'ब्लंडर ऑफ द इयर' आहे.

रेटिंग - **

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतका रद्धी सिनेमा बनवण्यासाठी इतके कष्ट का घेत असावेत कलाकार आणि पड्द्यामागचे कलावंत यांची पोटा पाण्याची सोय इतका उद्दात विचार त्यामागे असावा.

तीन ठोकळे पाहुन सुध्दा चित्रपट बघणे ....म्हणजे कहरच .. Happy
एक ठोकळा तर प्रसिध्द ओंडक्या मधुनच तयार झालेला आहे.....बाकीच एक छडी आणि दुसरा प्लायवुड..

सामोपचार,

>> इतका रद्धी सिनेमा बनवण्यासाठी इतके कष्ट का घेत असावेत

मला वेगळीच कारणे दिसतात. सिनेमाचं स्तंभचित्र (पोस्टर) बघा. ते तिघेही विद्यार्थी आहेत. बरोबर? त्यातले दोघे पूर्ण कपड्यांत आहेत. तर मधलीच्या मांड्या उघड्या दिसताहेत, बरोबर?

हा चित्रपट म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांवर ही उत्तान प्रतिमा ठसवण्याचा उद्योग आहे. सोबत दादांच्या हाटीलातली सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची ओली पार्टी डोळ्यासमोर आणा. बघा काय दिसतं ते.

शालेय जीवन म्हणजे मौजमजा करणे हा संदेश अप्रत्यक्षपणे दिला जातोय. शिक्षणपद्धतीची वाट लागलेलीच आहे, तरीही भारतीय विद्यार्थी झगडत उज्ज्वल यश संपादन करतात. जगभरात भारतीय विद्यार्थी नावाजला जातोय. तर अशा भारतीय विद्यार्थ्याचं खच्चीकरण करण्यासाठी एकमेव मार्ग उरतो. त्याच्या मनी उच्छृंखल प्रतिमा घुसडणे, हाच तो.

आ.न.,
-गा.पै.

मी पण हा सिनेमा टिव्हीवर लागला तेव्हा अनेकोवेळेला पाहण्याचा प्रयत्न केला. पण कोणतीच लिंक लागली नाही मला..

टीवीवर हा सिनेमा आणि "मैत्र जीवांचे" कार्यक्रम एकाच वेळेला होते आणि मी त्यातील "हा" सिनेमा पहायचा निवडला. या कृत्याची शिक्षा मला २ तास भोगावी लागली Sad