भेटीचे ठिकाण: कलावंतीण सुळका
दिनांक: १३ ऑक्टोबर २०१२
भटके: दोनच. मी स्वतः सपत्नीक.
पहाटे चारचा गजर झाला. आम्ही दोघेही झटकन उठलो...
....कुर्ल्याहून ५.०७ ची पनवेल लोकल पकडली आणि ६ च्या सुमारास पनवेलला पोहचलो. ठाकूरवाडी ला जाणारी बस ६.५५ ला होती. मात्र आम्ही ६.२० ची मोपाडा (मोहोपाडा असावी) ला जाणारी बस पकडून, २० मिनिटांत शेडूंग फाट्याला उतरलो. (रू.८/-एकाचे).
तिथून एका ऑटोवाल्याने आम्हाला पुढच्या दहा मिनिटांत ठाकूरवाडीला पोहोचवले. (रू. ८०/-दोघांचे).
या इथून बरोबर ७.०५ ला आम्ही प्रबळमाची, या कलावंतीण-प्रबळगडाच्या पायथ्याच्या गावाला वाट जाते. हि वाट चांगलीच मळलेली आहे. दुतर्फा झाडोरा आणि पायाखाली हे मोठ्ठाले खेकडे...
सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचे मधाळ कूजन ऐकत या वळणावळणाच्या वाटेने आम्ही ८.३५ च्या सुमारास प्रबळमाचीवर येऊन पोहोचलो. माचीवर आल्यानंतर पहिलेच घर लागते निलेश भूतांबरा या अतिशय उद्यमशील युवकाचे (त्याचा कुठलासा ब्लॉगसुद्धा मी जाण्यापूर्वी वाचला होता. या ब्लॉग मध्ये उल्लेख झालेले एस टी चे वेळपत्रक मात्र आता बदलले आहे). तिथे चौकशी केल्यावर कळले की तो चेन्नईला असतो. मात्र त्याचे कुटुंबीय अतिशय आतिथ्यशील असून जेवणाची उत्तम सोय करतात आणि राहाण्याचीसुद्धा सोय आहे असे कळले. त्यांच्याशी कलावंतीण-प्रबळगडाबद्दल थोडी चर्चा करून, घोटभर चहा आणि बिस्किटे खाऊन ९.१५ च्या सुमारास कलावंतीण सुळक्याकडे प्रयाण केले. कलावंतीण हा लौकिकार्थाने दुर्ग नव्हे. त्यास सुळकाच म्हणायला हवे कारण त्याचा माथा हजार-पाचशे स्क्वेअर फुटांहून जास्त नसावा. टेहळणीसाठीच त्याचा उपयोग होत असावा. असो.
पुढची वाट वाडीतल्या चार दोन घरांसमोरून जाते. पैकी शेवटच्या घरात दोन कुत्रे असून. एक कुत्रा भयंकर भुंकतो. मात्र तो चावत नाही (असे वाडीतल्या लोकांनी सांगितले). मात्र ते खरेच होते. भौंकनेवाले काटते नही चा प्रत्यय आला. या घरानंतर सुळक्याच्या पायथ्यापर्यंतची वाट मळलेली मात्र चढणीची आणि दाट झाडाझुडूपांतून जाणारी आहे. निलेश होम सर्विस पासून पस्तीस मिनिटांत आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथून तो सुळका आणि प्रबळगडाच्या उत्तरेकडील भिंतीचे विराट दर्शन होते. समोर माथेरानचे पठार दिसू लागते. या इथून सुळक्याची खरी चढाई सुरु होते. आम्ही दोघेच इथे असल्याने इथे आम्ही कॅमेरा बंद केला आणि चढाईवर लक्ष केन्द्रीत केलं.
चढाईचा पहिला टप्पा हा कोरीव पायऱ्यांचा आहे. पायऱ्या जरी कोरीव असल्या तरी इथे काही टप्पे लक्ष विचलित केल्यास दगा देऊ शकतात. साधारण पंचवीस एक मिनिटांत आपण शेवटच्या कातळच्या टप्प्यात येतो. खरी कसरत इथे आहे.
माझ्या पत्नीचा हा पहिलाच ट्रेक. त्यात रोप नव्हते. मला अश्या टप्प्यांचा बऱ्यापैकी अनुभव असल्याने आधी मी संपूर्ण कातळ चढून शक्याशक्यतेचा अंदाज बांधला. पत्नीचे शूज काहीसे आखूड असल्याने पायाची बोटे दुमडली जात होती आणि कातळाच्या बेचक्यामध्ये पाय ठेवताना अंदाज येत नव्हता. शेवटी ऑक्टोबरच्या अश्या रणरणत्या उन्हात सुद्धा तिने शूज काढून तो रॉक पॅच करण्याचा निर्धार केला. थोड्या परिश्रमानंतर आम्ही दोघेहि तो पॅच चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा पावणे अकरा वाजले होते.
त्यादिवशी कलावंतिणीच्या माथा प्रथम गाठणारे आम्ही दोघेचं होतो. माझ्या पत्नीच्या, सुनीताच्या डोळ्यांमधले भाव अवर्णनीय होते. दूर नैऋत्येहून कर्नाळ्याचा अंगठा जणू काही तिला थ्म्ब्स अप करून वेल डन म्हणत होता. वायव्येला मलंग गड आणि ईशान्येच्या चंदेरीचे सुळके शिपायांप्रमाणे मानवंदना देत होते. तश्यात तिचे लक्ष पडलेल्या झेंड्याकडे गेले. तिने आजूबाजूचा दगड गोळा करून तो भगवा ध्वज अतिशय व्यवस्थित पुनर्स्थापित केला.
तिला आजूबाजूचा परिसर समजावून सांगितल्यावर साधारण सव्वा अकराच्या सुमारास आम्ही तो अवघड पॅच उतरू लागलो. उतरताना मात्र त्याने आमची चांगल्यापैकी परीक्षा घेतली. वर आणलेली पाठ्पिशवी मी ओढणीच्या सहाय्याने खाली सोडली आणि स्वतःला थोडे मोकळे केले. या खेपेस सुनीताने दुप्पट धैर्याने आणि चिकाटीने तो पॅच पूर्ण केला. वाढलेला आत्मविश्वास नजरेतून स्पष्ट होता. आम्ही दोघांनी सह्याद्रीच्या या कड्या कपारींना मनोभावे हात जोडले.
मला पदार्थ विज्ञान समजत नाही, मात्र हे कातळ मला कधीच निर्जीव वाटले नाहीत. माझ्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर रुतलेले हे काळे कभिन्न कातळ मला उर्जेचे अखंड स्त्रोत वाटतात. त्याचे काही कण माझ्यात पाझरावे म्हणून त्यांची मी गळा भेट घेतो. शिवछत्रपतींना स्पर्शून गेलेले वाऱ्याचे झोत कधी काळी याच कड्यांमध्ये घुमले असतील हि कल्पनाच देहभर रोमांच उभे करते.
हा रॉक पॅच झाल्यानंतर आम्ही उरलेल्या पायऱ्यांचा टप्पा अतिशय काळजीपूर्वक पार केला. उतरताना आम्हाला सात ट्रेकर मुलांचा शिस्तबद्ध ग्रुप भेटला. तेही इथे प्रथमच आले होते. आमच्याकडून पुढच्या टप्प्यांची व्यवस्थित माहिती करून घेऊन त्यांनी आम्हाला पाणी ऑफर केले. आमच्याकडच्या पाण्याच्या बॉटलने अक्षरशः तळ गाठला होता. घोटभर पाणी पिऊन, त्यांचे आभार मानून आम्ही उरलेला टप्पा सुद्धा तितक्याच शांतचित्ताने पूर्ण केला. एकदा सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर पुन्हा एकदा आमचं प्रवास गर्द झुडूपांतून चालू झाला. साधारण अर्ध्या तासात ते शेवटच (आता पहिलं) घर आणि ते भौकनेवाले कुत्ते दिसले. तिथून पुढे पाच मिनिटांत म्हणजे अंदाजे साडे बारा वाजता निलेशच्या घरी पोहोचलो.
आधी ऑर्डर दिली नसल्याने जेवण चुलीवर जेवण बनवायला दीड तास लागला. तोवर आम्ही तिथल्या मावशींशी मस्त गप्पा मारल्या. गप्पा हा माझं आवडता प्रांत आहे आणि मी मोकळ्या मनाच्या, निष्पाप माणसांशी हसत हसवत भरपूर गप्पा मारू शकतो. दोन वाजता नुकत्याच खुडलेल्या चवळीच्या आणि वांग्याच्या भाजी वर आणि तांदळाच्या भाकरीवर आडवा हात मारला. सोबत लोणचं, भाजलेले पापड आणि कांदा... अहाहा... त्या पाण्याच्या दोन बाटल्यांचे आणि दोघांच्या भरपेट जेवणाचे मिळून दोनशे रुपये घेतले फक्त.
प्रबळगड अतिशय विस्तीर्ण असून खरं तर दोन दिवस (किमान एक पूर्ण डे लाईट) पाहाण्याचा विषय आहे. तेव्हा त्यासाठी नंतर येणार होतो म्हणून मग दिवस उतरेपर्यंत बाहेर अंगणात मस्त विश्रांती घेतली. जाताना त्या मावशींनी खूप मायेने सुनीताला ताज्या चवळीची शेंगा आणि वांगी दिली आणि खाऊ घाल सगळ्यांना असं सांगितलं. आम्ही पैसे देऊ केले तेव्हा बिलकुल नकार दिला. आठवण म्हणून घेऊन जा असं म्हटल्या. आम्हाला रायगडावरील विठ्ठल अवकीरकरांची झाप आठवली. या बसक्या लहान घरांमध्ये मोठ्या मनाची माणसं भेटतात.
बरोबर पाऊणे पाच वाजता आम्ही प्रबळ माची उतरू लागलो. आणि ठाकूरवाडीच्या बस थांब्यापाशी ६.०५ ला पोहोचलो. तिथे आम्हाला बोराटे (?) नावाचे वयस्क गृहस्थ भेटले त्यांना आम्ही दोघेच हा ट्रेक करून आलो आणि तेही एव्हढ्या सकाळी याच खूप आश्चर्य वाटलं. परतीची वाट पश्चिमाभिमुख असल्याने सांजेचा पिवळसर सोनेरी रंगाचा तो तेजस्वी संपूर्ण लोहगोल आम्हाला सतत दर्शन देत होता. एस.टी चा लाल डब्बा अचूक सव्वा सहाला अवतरला (मात्र आपण पावणे सहाला पोहोचणे बरे) आणि ती थोडी पुढे गावात जाऊन वळून येईपर्यंत आम्ही कलावंतिणीच्या सुळक्याकडे कडे पाहू लागलो.
...दूर त्या माथ्यावर तो ध्वज आम्हाला अतिशय आवेशाने फडकताना दिसत होता. पश्चिमेकडे कलणाऱ्या सूर्य नारायणाची सोनेरी किरणे त्या केसरी ध्वजाला नवसंजीवनी देत होती...
@ सौमित्र साळुंके
१४.१०.२०१२
छान लिहिले आहे . फोटो पण टाक,
छान लिहिले आहे .
फोटो पण टाक, मजा येईल .
कलावंतीणचा शेवटचा पॅच आणि
कलावंतीणचा शेवटचा पॅच आणि कातळात कोरलेल्या पायर्या ही त्या सुळक्याची खरी शान आहे. आम्ही हाच ट्रेक गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या उन्हात केला होता त्याची आठवण झाली. मात्र प्रबळगडसाठी मुहुर्त अजून सापडलेला नाही.
वर्णन आवडलं... मस्त
छानच लिहिले आहे. त्या
छानच लिहिले आहे. त्या सुळक्यावर नाही, पण प्रबळगडावर जाताना आम्ही बहुतेक तिथेच थांबलो होतो. खुप आपुलकिने वागतात ती माणसे.
वर्णन खासम खास आहे.. मस्तच !
वर्णन खासम खास आहे.. मस्तच ! कलावंतीण सुऴका.. तीन वर्षे लोटली भेटून..
छान लिहिलय. फोटो हवेत. मजा
छान लिहिलय.
फोटो हवेत. मजा द्विगुणित होते.
ट्रेकचा वृत्तांत असा हवा.
ट्रेकचा वृत्तांत असा हवा. परफेक्ट! मस्त!! ट्रेकला लागणारा वेळ, गाड्यांच्या वेळा .. सगळी माहिती उपयोगी.. !
... भटक्याचं बोचकं आणखी उघडा की राव!
अशी माहिती वाचली की सगळ्या
अशी माहिती वाचली की सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होतात , मस्त लेख
वांग्याच्या भाजी ,तांदळाची भाकरी सोबत लोणचं, भाजलेले पापड आणि कांदा..>>> वा क्या बात ,,, इथून थेट आता ताटावरच जाऊन बसाव अस वाटतय