समजुत घालू कशी ?

Submitted by अजय प्रभाकर on 15 October, 2012 - 02:39

खुळी अडाणी असेन मी पण ऐकुन घ्या न जराशी
नका तुम्ही ना रागावु धनी समजुत घालू कशी ?

अवचित आले किती पाहुणे
मला न सुचले थाप बहाणे
तुम्ही निसटला माडीवर मी अडले जनरीतीशी

उशीर व्हायची पहिलीच वेळ
जाऊ - नको चा मनात खेळ
आईंनी तुमच्याच अडविले कुजबुजल्या कानाशी

सगेसोयरे जन्मभराचे
जपू नये का नाते त्यांचे
तुम्हीच सांगा कर्तव्याची असते ना हो सरशी

शेजेवरती तुम्ही एकले
वाट पाहुनी असाल थकले
शपथ सांगते चित्त सारखे होते तुमच्यापाशी

रोजच असते ना मी तुमची
आज नका हो म्हणू दूरची
अबोल होईल रात्र आपुली भिजेल माझी उशी

पदर पसरते हात जोडिते
पुन्हा पुन्हा मी तेच विनविते
सोडून द्या की झाले गेले घ्या ना मज उराशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users