स्वातंत्र्य म्हणजे ....

Submitted by Chitra Rajendra... on 15 October, 2012 - 02:33

काही काही व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याचा मोह अनावर होतो तो त्यांच्याविषयीच्या ऐकीव माहितीतून, बातम्यांतून. आणि जर का त्यांचं आत्मचरित्र हाती आलं तर मग अगदी थेटच डोकावता येतं त्यांच्या आयुष्यात!आठेक वर्षांपूर्वी जेव्हा मी नव्याने वाचू लागले, तेव्हा प्रोतिमा बेदीविषयी, तिच्या ‘टाईमपास’विषयी खूप उत्सुकता वाटत होती. तिचं व्यक्तिमत्त्वच मुळी ‘वादळी’! हे पुस्तक वाचल्यानंतर कुतूहल शमलं. प्रोतिमा नावाचं वादळ नेमकं कसं घडलं-बिघडलं ते सविस्तर समजलं. आणि आजवर तिच्याविषयी वाटणार्‍या अचंब्याची जागा घेतली अनुकंपेनं! तिचं पुस्तक वाचेपर्यंत अतिशय सुरक्षित कोषात जगणार्‍या मला ते वाचल्यानंतर हादरायलाच झालं. स्वत: प्रोतिमाने खूप अभिमानाने सांगितलंय -- ‘आपल्या समाजानं बनवलेला प्रत्येक नियम मी मोडला. मी कसलीच बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावसं वाटलं ते ते मी केलं. अगदी सपाटून केलं. कोण काय म्हणेल ह्याला मी काडीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, माझं लैंगिक जीवन, माझी बुध्दिमत्ता -- सारं काही मी दिमाखात मिरवलं. आणि हे सारं मी निलाजरेपणे केलंय. मी खूप जणांवर ओतून प्रेम केलं, आणि माझ्यावरही काहींनी केलं’

वडील हरियाणी व आई बंगाली असणार्‍या ह्या मुलीनं जे असुरक्षित बालपण भोगलं त्याचाच परिपाक असलेलं, तिच्या उमलत्या वयातील अनुभवांतून बनलेल्या तिच्या आयुष्याचं हे सार. जे ती प्रत्यक्ष जगली होती तेही तसं जगावेगळंच! पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच म्हणून आणि शिवाय कुरूप म्हणूनही कुटुंबियांकडून तिच्या वाट्याला लहानपणीच हेटाळणी आली, ज्यामुळे तिच्या अंगात एक प्रकारची बेदरकार वृत्ती तयार झाली असणार, तिच्यात कोडगेपणा आला असणार. अजाणत्या वयात, नवव्या-दहाव्या वर्षी, आतेभावाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार होत राहिले. पण त्याविषयी कोणाकडूनही तिला सहानुभूती मिळाली नाही.

तिच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मनाविरूध्द प्रेमविवाह केला. तिची आई अतिशय सुंदर होती. वडिलांनी आपल्या उद्योग-व्यवसाय वृध्दिसाठी केलेला आईच्या सौंदर्याचा स्वार्थी वापर लहान वयातच तिला बघावा लागला. या सा‍र्‍याचा परिणाम होऊन बहुधा प्रोतिमा बंडखोर बनली. वडिलांनी घातलेल्या बंधनांना तिने अजिबात जुमानलं नाही. हे सारं वाचून वाटलं, बालपणीचा काळ सुखाचा नसला की माणसाची अशी आणि इतकी वाताहत होते? तिने ओडीसी नृत्यशैली आवडल्यानंतर त्यासाठी केलेलं सर्व-समर्पण व स्वत:च्या छंदीपणाला घातलेला आवर, नृत्याच्या वेळी असणारा तिचा समर्पित भाव, नृत्यग्राम वसवण्यासाठी तिने केलेली प्रामाणिक धडपड, प्रसंगी आपल्या गुरूंशी, केलुचरण महापात्रा, यांच्याशी पत्करावं लागलेलं वैर हे सगळं वाचल्यानंतर खरी प्रोतिमा कोणती हे समजायला जरा अवघड गेलं.

त्यानंतर काही दिवसांनी वाचलेल्या ‘एक झाड आणि दोन पक्षी’ ह्या पुस्तकात विल डुरांट ह्या विदेशी लेखकाचा एक परिच्छेद त्यात दिलाय. त्यातील काही भाग असा... ‘सामान्य माणसाला स्वातंत्र्य नकोच असते. त्याला मुभा हवी असते. कुणाची गुलामगिरी पत्करायची याचा निर्णय करण्यापुरतीच! स्वातंत्र्य म्हणजे अस्थिरता, असुरक्षितता आणि जीव वाचवण्यासाठी सदैव जागरूकता. त्याचे ओझे सामान्य माणसांना पेलवत नाही.’

प्रोतिमा बेदी आठवली. तिचं वाचलेलं आयुष्य आठवलं आणि स्वातंत्र्याचा हा अर्थ लक्षात आला. जाणवलं, ती खरोखरीच असामान्य होती. तिचे अनेक पुरूषांशी अति-जवळकीचे संबंध, फक्त स्वत:साठी जगत असल्याने तिच्या मुलांना आलेलं एकटेपण (तिच्या मुलाने आत्महत्या केली), तिच्या जगण्यातील तिने स्वखुशीने पत्करलेली अस्थिरता-असुरक्षितता हे सारं सामान्यांना न पेलणारं हेच खरं!

व्यक्तिस्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला म्हणून पर्यायी शब्दकोश बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत.

प्रोतिमा बेदीच्या निलाजरपणे वागण्याला, स्वातंत्र्याच्या कोणत्या पर्यायी शब्दात बसवायचं? आत्मनिर्भरता? स्वयंपूर्णता? स्वैरता? काही समजेना. तो विषय मनात तसाच अर्धवट राहिला. इरावती कर्वेंच्या ‘गंगाजल’ पुस्तकातील ‘व्यक्तिस्वातंत्र्यता आणि बंधमुक्तता’ हा लेख जेव्हा वाचनात आला तेव्हा प्रोतिमाची आठवण झाली. इरावतीबाईंनी लिहिलंय, ‘व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य ऐकावयाला किंवा उच्चरावयाला जितके गोड आणि सोपे तितकेच आचरणात उतरावयाला दुष्कर आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता व सार्वत्रिक बंधमुक्तता खासच नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने वासनांच्या अमर्याद परिपोषाशिवाय ज्यात कसलाही दुसरा उद्देश नाही, अशा तर्‍हेच्या निर्मितीला मोकळीक देणे कधीही रास्त ठरणार नाही.’ हे वाचल्यावर वाटलं, प्रोतिमाच्या स्वातंत्र्याला स्वैरता हा पर्याय चपखल बसतो का? कारण तिचं नृत्यावरील प्रेम वगळता तिचं जे जगणं होतं ते वासनांच्या अमर्याद परिपोषाचंच होतं ना! कोवळ्या वयातील ‘त्या’ अनुभवांनी तिच्यातील ‘त्या’ गोष्टीविषयीची उत्सुकता, कुतूहल, भिती, संयम पार नाहीसा झाला असावा की त्यामुळे तिचं वागणं अनिर्बंधच झालं. स्वत:च्या वडिलांना आणि त्यांनी घातलेल्या निर्बंधांना तिच्या लेखी काडीचीही किंमत उरली नाही. कशी उरावी म्हणा!

सर्वस्वी आपल्या मनाप्रमाणे वागणं म्हणजेच स्वातंत्र्य का? व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? पुन्हा एकदा विचारांचा पिंगा सुरू झाला. न राहवून शेवटी ‘महर्षी ते गौरी’ हे मंगला आठलेकरांचं पुस्तक बाहेर काढलं. त्याच्या पहिल्या वाचनातून महर्षी कर्वे, त्यांचा मुलगा रघुनाथ कर्वे आणि त्यांची नात गौरी देशपांडे ह्या तीन पिढ्यांची ओळख झाली होती. तरीही स्वातंत्र्याविषयी पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी हेच पुस्तक आठवलं. का बरं? त्याच्या ब्लर्बवर एक वाक्य आहे... ’
‘समाजानं घालून दिलेल्या रूढ परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं! स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे.’

महर्षी कर्वे, रघुनाथ कर्वे आणि गौरी देशपांडे ह्या एकाच घरातील तिघांची मानसिक जडण-घडण, त्यांची विचारसरणी, त्याचा त्यांनी समाजासाठी केलेला उपयोग सविस्तर वाचल्यानंतर त्यांचं वेगळेपण नेमकं काय आहे हे ध्यानात आलं. नकळतच पुन्हा एकदा मनात लपलेली प्रोतिमा बेदी अलगद वर आली. शिक्षणाने सुसंस्कारित(!) कर्वे घराण्यातील व्यकी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा त्यांनी केलेला वापर व प्रोतिमासारखी (तिच्या दुर्दैवाने घडलेली) कुसंस्कारित(!) व्यक्ती आणि तिच्या स्वातंत्र्याचा तिने केलेला वापर. जमिन-अस्मानाचा फरक! आता हे वाचून कुणाला वाटेल की ज्यांची एकमेकांशी तुलना होऊच शकत अशा माणसांना असं एका ठिकाणी आणण्याचा मूर्खपणा कशासाठी? त्याचं कारण व्यक्तीस्वातंत्र्य, विचार-स्वातंत्र्य आणि स्त्री-स्वातंत्र्य अशा स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पना ‘महर्षी ते गौरी’ वाचून सोदाहरण स्पष्ट झाल्या.

जसं की, महर्षी कर्व्यांनी स्त्री-शिक्षण, विधवांचं शिक्षण ह्याला प्राधान्य दिलं. का? त्यांच्या मते, ‘शिक्षण मिळालं की आपोआपच प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बनते. तशीच स्त्रीही शिक्षणानं स्वावलंबी बनेल आणि आर्थिक स्वावलंबन ज्याला लाभतं त्याच्यावर इतरांना फारसा अन्याय करता येत नाही. शिवाय निर्णयाचं स्वातंत्र्यही त्याला हळूहळू मिळू लागतं. स्वत:च्या भविष्याचा विचार करता येतो.’ ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी केलेली स्त्री-शिक्षण योजना!

र. धों कर्वे ह्यांनी संततिनियमनाचं प्रचारकार्य हे जीवनाचं एकमेव ध्येत मानलं. ह्याच कामासाठी जगायचं आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवायचं. ते समागम स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. ‘माणसाला खाण्यापिण्याचं जसं स्वातंत्र्य असतं आणि ते घेताना त्याला जशी इतरांची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा इतरांच्या आक्षेपांचं अथवा वाळीत टाकलं जाण्याचं भय नसतं, त्याचप्रमाणे समागमस्वातंत्र्य हाही माणसाचा हक्क आहे. आणि त्यासाठीचे नैतिक नियम स्त्री-पुरूष दोघांनाही सारखेच असणं गरजेचं आहे. म्हणून दोघांनाही बंधमुक्त होऊ द्या.’

गौरी देशपांडे, लोकप्रिय लेखिका. सुशिक्षित स्त्रीनं मनानं स्वतंत्र कसं बनायचं ह्याचे जणू धडेच आपल्या कथा-कादंबर्‍यांतून त्यांनी दिले. ह्या पुस्तकात त्यांची सविस्तर मुलाखत आहे. त्या म्हणतात, ‘स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-मुक्ती हा एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. ती काही पाकक्रिया नाही. प्रत्येक बाईनं इथं स्वत:बद्दल विचार केला पाहिजे. मुक्ती म्हणजे, काय करायचं आणि काय करायचं नाही, हे स्वत:च्या बाबतीत ठरवण्याची मुभा स्वत:ला असणं.’

कविता महाजन त्यांच्या एका लेखात लिहितात, ‘निव्वळ जिवंत राहण्याचं, आपल्या मनातल्या स्व-प्रतिमेनुसार जगण्याच्या आणि जे लिहावंव वाटतं ते प्रामाणिकपणानं लिहिण्याच्या स्वातंत्र्यासाठी मी किंमत मोजली, त्या स्वातंत्र्याने मला काय दिलं आणि किती, काय नष्ट केलं याचा हिशेब मला अजून लागत नव्हता.’ स्वातंत्र्याची किंमत ... हा एक नवीन कंगोरा सामोरा आला.

स्वातंत्र्य म्हणजे .... अनेक कंगोरे अनेक पैलू!

  • स्त्रीच्या असण्याचा वापर किती तर्‍हांनी होत असतो हे ह्यातून अधोरेखित झाले . वडिलांनी आईच्या सौंदर्याचा केलेला, भावाने बहिणीच्या शरीराचा, तिने स्वत:च्या सुखासाठी....
  • कर्वे घरातल्या व्यक्तींनी एकंदरीत स्त्री म्हणून तिचे उन्नयन व्हावे म्हणून केलेला विचार अन कार्य..
  • स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, आपले आपण पत्करलेले उत्तरदायित्व, त्यासाठी किंमत मोजणे हेही ह्यातून अधोरेखित होते... जे स्त्री-पुरूष सर्वांना सारखेच लागू आहेत

‘आपले जगणे आपल्या पध्दतीने पुढे नेणे’ अशी आयुष्ये एकत्रित वाचण्याने मला काय दिलं असा विचार करताना जाणवतं, जो तो आपापल्या परिने जगत असतो, त्याचे मूल्यमापन करणारे आपण कोण? कुणी कुणाला चांगले-वाईट म्हणण्यात अर्थ नाही -- हेच खरे!

‘टाईमपास’, ‘महर्षी ते गौरी’ यांसारख्या पुस्तकांच्या वाचनाने स्वतंत्र विचार-आचारांनी जगण्याची दृष्टी देणारी नवी नजर लाभली. मीही नकळत विचार-प्रवृत्त बनले. गौरी देशपांडेंच्याच भाषेत सांगायचं तर ‘विचार करणं हा प्रगल्भतेकडे जाणारा रस्ता आहे.’
आणि
माझ्या मते, ह्या रस्त्यावरील ‘टाईमपास’, ‘महर्षी ते गौरी’ अशी पुस्तके मैलाचे दगड आहेत.

चित्रा राजेन्द्र जोशी.
(मूळ लेख : वाचू आनंदे - वाचकघर -१३.०९.२००६)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users