प्रवेशिका - ११ ( jo_s - कुणाच्या भावनांशी खेळ.....)

Submitted by kaaryashaaLaa on 1 October, 2008 - 00:02

कुणाच्या भावनांशी खेळ केव्हां मांडला नाही
असे हे हीन स्वार्थाचे व्यसन काही मला नाही

कसा वाहून नेला गाव सारा जीवना तू रे
विखुरले जीव सारे माग सुध्दा सोडला नाही

इथे पाहून झाले सर्व देखावेच मदतीचे
खरा आधार कोठे शोधताही गवसला नाही

"कुठे नाही कसे अन् काय नाही" सांगती सारे
"असे आहे", असे सांगेलसा कोणी भला नाही?

हवा ही गढुळलेली की म्हणावा नियम सृष्टीचा
जरा तो उंच जाता ओळखीचा वाटला नाही

अताशा ओळखीचा चेहरा शोधीत मी फिरतो
तसा तो आरशालाही अजूनी गवसला नाही

असे का रुष्ट व्हावे का चिडावे सांगना मजला
चिडाया कारणांचा आसरा तुज लागला नाही?

वसे रस्ता सदा एका ठिकाणी, या कुठेही जा
ठिकाणी नेमक्या नेई जरी तो हालला नाही

नशीबा सामन्याचा अंत तू आधी ठरवलेला
तुझा हा डाव आधी का कधीही समजला नाही…..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या आणि पाचव्या क्रमांकाचे शेर आवडले.

अताशा ओळखीचा चेहरा शोधीत मी फिरतो
तसा तो आरशालाही अजूनी गवसला नाही

छान....पण संपुर्ण गझलेला एक कवितेचा फील येतोय...असं मला ती वाचताना जाणवलं
४ गुण

अताशा ओळखीचा चेहरा शोधीत मी फिरतो
तसा तो आरशालाही अजूनी गवसला नाही

आवडला...

४ गुण

================मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!

सगळेच शेर प्रभावी... आवडली
-मानस६

नशीबा आणि जरा तो उंच जाता आवडला.. अजून सहज व्हायला हवी होती असे वाटत राहिले. माझ्याकडून ५ गुण.

आवडली. प्रवाही झाली आहे.
६ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

मतला आवडला.
>>जरा तो उंच जाता ओळखीचा वाटला नाही
व्वा!!

४ गुण
----------------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

"असे आहे" आणि रस्ता हे शेर छान!
थोडं लहान वृत्त घेतलं असतं तर आणखी सुटसुटीत झाली असती.
उदा. "स्वार्थाचे व्यसन"हे हीनच असतं; रुष्ट होणे म्हणजेच चिडणे; डावाच्या बाबतीत जर "आधी" झालं तरच त्याला "समजणं" म्हणता येईल. चू.भू.दे.घे.
माझे गुण - ५

वृत्त अवघड वाटलं, वाचताना जरा कसरत करावी लागतेय. Happy रस्त्याचा शेर आवडला

६ गुण..

वृत्त थोडं अवघड आहे बहुतेक. लयबद्ध नाही वाटत आहे..

गुण ४

प्राजु

वृत्ताच्या वेगळेपणामुळे वाचताना लय शोधत किंवा लक्षात घेत वाचावं लागतय.
"कुठे नाही" चा शेर खूप आवडला, किती सहज! चिडण्याचा, रस्त्याचाही मस्त.
माझे ७
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

वेगळं वृत्त आहे.. लगागागा*४
एवढं वृत्त पेलणं हे कौतुकाचं काम आहे....

वसे रस्ता सदा एका ठिकाणी, या कुठेही जा
ठिकाणी नेमक्या नेई जरी तो हालला नाही
अगदी सहज सोपी कल्पना... वा!!

अताशा ओळखीचा चेहरा शोधीत मी फिरतो
तसा तो आरशालाही अजूनी गवसला नाही - छान...

माझे गुण ५
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

वाचताना धाप लागली. लिहीणार्‍याची कमाल आहे. ५ गुण.

'कुठे नाही', 'गढुललेली हवा' आणि 'ओळखीचा चेहरा' हे शेर छान आहेत.
मला वाटतं हे 'लगागा गालगा गागा' असं (कळा ज्या लागल्या जीवा) वृत्त आहे. लयीचा काही प्रश्न वाटला नाही.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

कसा वाहून नेला गाव सारा जीवना तू रे
विखुरले जीव सारे माग सुध्दा सोडला नाही

नशीबा सामन्याचा अंत तू आधी ठरवलेला
तुझा हा डाव आधी का कधीही समजला नाही…..

मस्त. ५ गुण

दाद्सही सहमत.. लय शोधत वाचावं लागलं.. पण आशय उत्तम!
गुण ७

५ आणि ९ आवडले.
४/१०

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

वृत्त वेगळं, कठीण आहे पण त्यामुळे लय हरवल्यासारखी वाटते... ४ गुण

४,५,६ आणि शेवट्चे दोन छानच

७ गुण