तो अस्साच आहे!

Submitted by आर.ए.के. on 8 October, 2012 - 06:32

आभाळ भरून आलयं.....आज पाऊस पडणार बहुतेक!
ऑफिसच्या खिडकीतून टीचभर दिसणार्‍या आभाळाकडे पाहून मी अंदाज बांधला. खरं तर मला एकटक आभाळाकडे पाहायला खूप आवडत्....ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके, त्यातून तयार होणारे वेगवेगळे आकार....त्यांचे अर्थ लावणं माझ आवडतं काम आहे. पण आजकाल असल्या गोष्टी करायला वेळ मिळतोच कुठे? आजकाल ऊन ,वारा, पाऊस ह्या गोष्टी ऑफिसला जाता-येतानाच अनुभवायला मिळतात! त्यात ऑफिसला येता-जाता पाऊस नको नको वाटतो.... एरवी हवीहवीशी वाटणारी थंडी गाडीवर अगदी अंगालाच झोंबते म्हणून नको वाटते.... उन्हाचा तर कवडसा सुद्धा अंगावर पडणार नाही ह्याची काळजी सनकोट, हेल्मेट, स्कार्फ तत्सम गोष्टी वापरुन मी स्वतःच घेतलेली असते. तर हे असं एकंदरीतच निरस असं आयुष्य मी स्वतःच निवडलेलं आहे.
पी.ओ.पी ची लाईट कोवळ्या ऊन्हाचा फील नाही देऊ शकत , ए.सी चं वारं खर्‍या वार्‍याची तुलना नाही करु शकतं हे सगळं काही माहीती असूनही मी हे आयुष्य निवडलयं! का ते मलाही माहीत नाही!
या आय्.टी. क्षेत्राचं सुरुवातीला मला खूपच आकर्षण होतं..! भरपूर पगार, आलिशान ऑफिस, सगळ्या सुख-सुविधा.... पण आता मात्र या सो कॉल्ड आय्.टी कल्चरचा मला भयंकर कंटाळा आला आहे. कामाचा प्रचंड ताण , ऊशिरा पर्यंत थांबून कामं उरकणं, सदैव एक खोटा मुखवटा पांघरुन वावरणं, प्रमोशन्-अप्रेसल साठी मॅनेजरला इम्प्रेस करणं...सगळच कसं नाट्की, वरवरचं! थोड्या फार फरकाने सगळ्याच क्षेत्रात हे असच असणार म्हणा..जो तो आपापल्या क्षेत्रातल्या कामांनी जाजावून गेलेला! पण का कुणास ठाउक आज मला प्रचंड कंटाळा आला आहे. कधी कधी असं वाटतं की ऑफिसमुळे मी आयुष्यातल्या किती लहान मोठ्या आनंदांना मुकत आहे, जगात किती तरी गोष्टी कीबोर्ड बडवण्यापेक्षा इंटरेस्टींग असू शकतात किंवा थकवा जाणवला म्हणून नुसतचं खुर्चिवर रेलून बसण्यापेक्षा आरामदायी असु शकतात किंवा बोअर झालं म्हणून एख्याद्या ई-पेपरची लिंक वाचण्यापेक्षा करमणूक करणार्‍या असू शकतात..!
सांगायचचं झालं तर एखाद्या शांत ठिकाणी "त्याला" भेटणं...! आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की, गेले आठ दिवस मी "त्याला" भेटलेले नाही किंवा तो मला भेटला नाही असं म्हणलं तरी चालेल! शेवटी तो पण "आय्.टी" मधलाच ...माझ्यासारखाचं...कामांनी वैतागलेला!
माझे विचार कुठून कुठे पोहोचले. मनात नसताना सुद्धा मी CLT+ALT+DEL प्रेस केलं! दिवसभरच्या कामांनी माझं डोकं पार भंडावून गेलयं! आत्ता कुठे ५ वाजले आहेत. अजून १:३० तास आहे सुटका व्हायला! घरी लवकर जाण्यातही काही अर्थ नाही...कारण नसताना...! Outlook मध्ये बरेच unread मेल्स आहेत. त्यात एक त्याचा पण आहे.
"मी आज तुला भेटायला येणार आहे ६ वाजता :)"
बास्...पाहिली तर एकच ओळयं...पण मला प्रचंड आनंद देऊन गेली! आत्तापर्यंत मनावर साचलेलं मळभ अचानक दूर झाल्यासारखं वाटतयं...मी आनंदात येवून १/२ तास लवकर जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी पण काढून टाकली. उगाच परत कट्कट नको. मग Pantry मध्ये जावून मी मस्त पैकी कॉफी बनवून आणली. फेसाळत्या कॉफीचा कप हातात घेवून मी पुन्हा डेस्कवर आले. पुन्हा त्याचा १ मेल दिसतोयं....
"इकडे खूप आभाळ आलयं गं , आज भेटायला येणं जमणार नाही बहुतेक... :("
मला जाम राग आला....हे काय? आज भेटायला येतो म्ह्णाला.....ते पण एव्हढ्या दिवसांनी...आणि फक्त आभाळ आलयं म्हणून आधिच घाबरुन येणं cancel करतोयं...कदाचित पाऊस पडणार पण नाही! श्शी...कसायं हा...? बाकीची लोकं बघा ऊन पावसाची पर्वा न करता एक्मेकांना भेटायला जातात्...ह्याच्याकडे तर स्वतःची बाईक पण आहे...तरी पण हा भेटायला नाही येत्.....आणि यायचंच नसतं तर आधि मेल वगैरे कशाला पाठवतो कुणास ठाउक? माझ्या होप्स उगाच वाढतात...आणि मग हा असा भ्रमनिरास होतो!
मी पण मग त्याला मेल पाठवला.
"तुला जेंव्हा यावसं वाटेल तेंव्हा ये...म्हणजे ज्यादिवशी पाऊस नाहिये, वारा जोरात वाहत नाहिये , ऊन जास्ती नाहिये , उकाडा कमी आहे त्यादिवशी....."
यावरुन तो काय समजायच असेल ते समजला असणारं!
मी भयंकर चिडले होते...माझ्या मनात खळ्बळ माजून देण्याची त्याच्या कडे जशी आर्ट्च आहे. मी आधी चिडलेली असेन, उदास असेन्,वैतागलेलि असेन , ते सगळ माझ्या पुरतं मर्यादित असतं. पण हे असं काही झालं की त्याचा कडेलोट होवून त्याचा परिणाम माझ्या आजुबाजुच्या लोकांनाही भोगावा लागतो.
श्शी....कसला आहे हा? मघाशी पुसट होतं चाललेलं मळभ पुन्हा माझ्या मनावर साचू लागलं!
१/२ तास लवकर घरी जाण्याची परवानगी घेतलीच होती म्हणुन मी लवकर घरी निघाले.
बाहेर आले तशी दचकलेचं! ऑफिसच्या खिडकीतून दिसणार्‍या आभाळापेक्षा बाहेर आभाळ जास्त गडद होतं. काळ्या मिट्ट ढगांमुळे सगळं कसं अंधारुन आलं होतं...! मनात वाट्लं...बर झालं तो नाही येत ते...उगाच भिजला असता बाईक वर...!
आणि हे कायं तो समोर उभा आहे! माझी वाट पाहत..क्षणभर माझा विश्वासच बसेना.
तसा तो ओरडला, "बावळट , पाहू नकोस नुसती! चल लवकर, पावसाला सुरुवात होईलच आता!"
तशी मी भानावर आले. मला प्रचंड आनंद झाला. आज आम्ही आठवड्यानंतर भेटत होतो. मला त्याला नीट डोळेभरुन पाहायच आहे...पण त्याची गडबड चालू आहे. त्याने डोक्यावरचं हेल्मेट सुद्धा काढलेलं नाही! मी त्याच्यामागे गाडीवर बसले तसे २ टपोरे पावसाचे थेंब माझ्या हातावर पडले आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली. तसा पाऊस जोरात नव्हता पण भिजण्यासारखा होता. त्याने जॅकेट घातल आहे. माझ्याकडे जॅकेट काय साधी छत्री पण नाहीये... पण मी अशीच भिजत जायला तयार आहे त्याच्या सोबत.पण हे काय त्याने गाडी बस स्टॉप पाशी थांबवली. मला वाटलं आडोश्यासाठी म्हणून थांबवली असेल , तर तो म्हणाला,
"तू बसने घरी जा. मी पण लगेच निघतो. नाहीतर मला पण पाऊस लागेल!"
आता मात्र मला भयंकर राग आला. ही काय पद्धत आहे? भर पावसात मला एकटीला सोडून हा निघून जातोयं....मग आला कशाला? पावसाळ्यात बसेसचा काय भरवसा? आणि हा खुशाल मला म्हणतोय बसने जा म्हणून! आणि आल्यापासून तो एक शब्दही माझ्याशी बोललेला नाहिये...उलट पावसाच टेन्शन घेऊन बसलायं... ८ दिवसांनंतर भेटणारे एक्मेकांना काय सांगू आणि काय नाही असं करून सोडतात्...आणि हा घरी पळायचं बघतोय , ते पण मला एका बस स्टॉप वर सोडून..! माझा प्रचंड संताप झाला! मी गाडीवरुन उतरून त्याच्यापासून लांब जावून उभी राहिले....एक शब्दही न बोलता...ज्याला बोलून उपयोग आहे अशांशी बोलाव्...जिथे उपयोग नाही तिथे तोंडाची वाफ दवडून काय फायदा? आणि तो चक्क निघून गेला....
मला भयंकर राग आला होता...ह्या माणसावर मी प्रेम कशी काय करु शकते? ह्याला माझी पर्वा नाहिये...मी भेटले काय न भेटले काय याला काहिही फरक पडत नाही.. ना भेटण्याची excitement, ना भेटीनंतरचा उत्साह्.. याला कशाचचं सोयरसुतक नाही! भर पावसात माझ डोकं अक्षरशः तापलं होतं.
आणि परत समोर तो दिसला , हातात छत्री घेवून उभा होता.
माझ्याकडे बघून परत तसचं गोड हसला, जसं की काहीचं घडलेलं नाही!
माझ्या जवळ येवून तो कानात पुटपुटला..."बाईक वर गेलो तर दोघही भिजून जावू, त्यापेक्षा तू बस ने व्यवस्थित न भिजता घरी पोहोचशील! मला लागेल थोडा पाऊस पण तू लवकर हासून मला जावू दिलसं तर मी कमी भिजेन! आणि मला माहीतच होतं तू नाहीतरी वेंधळीच आहेस, छत्री घरी विसरली असशील म्हणून ही छत्री आणायला गेलो होतो. जवळ कुठे मिळालीच नाही. म्हणून उशीर झाला !
पावसात भिजून तू आजारी पडलेलं परवडणारं नाही आपल्याला.... लग्नाची तारीख जवळ आली आहे आपल्या! "
झालं नेहमी प्रमाणे तो जिंकला होता...मला गिल्टी फीलिंग कसं द्यावं हे त्याला बरोबर कळतं...परत माझी मलाच वाटायला लागलं.. हा बिचारा एव्हढ्या लांबून, एव्हढ्या पावसात मला भेटायला आला...आणि पाऊस कोसळेल म्हणून जाण्याची गडबड दाखवली खरी पण तो मला छत्री आणायला गेला होता... आणि मी काय काय विचार करत होते....आणि हा आता भिजणार्...माझ्यामुळे!
त्याने छत्री माझ्या हातात दिली. आणि बाईकला किक मारुन तो निघून गेला..
माझ्या मनावरचा ताण क्षणात घालवून देवून आणि मला परत विचार करायला भाग पाडून.... ! "तो" अस्साच आहे.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच.........
असेच असतात काही प्रेम वेडे. आपण कितीही जिंकलो तरी नेहमी हरतच असतो.
हरलो हरलो म्हणत नेहमी आपण नव्याने डाव मांडत असतो, नव्याने हरण्यासाठी. पण हे हरण पण खुप सुख देवुन जात..................

खुप आवडली.. तुमची मागची पण कथा मस्त होती. .आनि ही पण .. असेच लिहीत राहा आणि आम्हाला वाचनाचा आनंद देत राहा... पुलेशु.. Happy