कलशामधले अमृत सारे
पिऊन ती आली होती
आनंदाच्या सरी बरसल्या
भिजून ती आली होती
प्रकाशमय वास्तू का झाली?
अमावस्या आज असूनी
अंतर्मन का उजळून गेले?
काळोखाचे राज्य असूनी
लक्ष तारकांच्या तेजाने
सजून ती आली होती
आनंदाच्या सरी बरसल्या
भिजून ती आली होती
मंद मंद सुमनांच्या संगे
सौरभ धूपाचा पसरला
राहू केतू लीन जाहले
दुष्ट मनीचा भाव विसरला
इष्ट देवता, नवग्रहाला
पुजून ती आली होती
आनंदाच्या सरी बरसल्या
भिजून ती आली होती
ओली गंधित माती कैसी?
पर्जन्याविन आज जाहली
फुटले अंकूर धरतीवरती
हिरवा पृथ्वी साज ल्यायली
दवबिंदूंच्या शिडकाव्याने
रुजून ती आली होती
आनंदाच्या सरी बरसल्या
भिजून ती आली होती
आनंदाच्या क्षणी आठवण
सहजच आहे येणे
वादळ वारा पावसामधे
अवघड आहे येणे
नाही नाही म्हणत एकदा
फिरून ती आली होती
आनंदाच्या सरी बरसल्या
भिजून ती आली होती
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
छान.....!
छान.....!
छान !!.........पण खूप छान
छान !!.........पण खूप छान नाही वाटली.
काका ; क्षमस्व !!