सातासमुद्रापार असलेल्या मराठीजनांचे व्यासपीठ असणा-या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६व्या अधिवेशनानिमित्त बोस्टन येथे " बी.एम.एम.-सारेगम-२०१३" या स्पर्ध्येची नांदी झडली आहे. अमेरिकेतल्या १३ ठिकाणी होणा-या प्राथमिक फेरीनंतर जुलै २०१३ मध्ये या स्पर्धेचा अंतिम सोहळा होईल.
' गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात बोस्टनमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत मॅसॅच्युसेट्स , र्होड आयलंड , कनेटिकट , आणि वॉशिंग्टन या चार राज्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे मराठी गाण्यांच्या या स्पर्धेत अमराठी गायक-गायिकाही हिरिरीने सहभागी झाले होते.
कनेटिक्ट राज्य पल्लवी जोशीने या फेरीत पहिला क्रमांक पटकावला. वॉशिंग्टनमधील नलिनी कृष्णनने दुसरा, तर मॅसॅच्युसेट्समधील श्रध्दा अग्रवाल आणि निधी तारे यांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला. अनुराधा पालाकुर्ती , नीलिमा चतुर्वेदी , आणि प्रदीप शुक्ला हे बोस्टनमधील संगीततज्ज्ञ या फेरीचे परीक्षक होते.
या स्पर्धेद्वारे तुमच्या-आमच्या ओठांवर रेंगाळणारी सदाबहार मराठी गाणी पुढच्या वर्षभरात अमेरिकेतल्या शेकडो मराठी तसेच अमराठी गायक-गायिकांकडून ठिकठिकाणच्या रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. रॅले (नॉर्थ कॅरोलिना) , सिअॅटल (वॉशिंग्टन) , आणि सेंट लुईस (मिसोरी) इथे १३ ऑक्टोबरला या पुढच्या प्राथमिक फेर्या होणार आहेत.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची इतर ठिकाणे , स्पर्धेच्या तारखा तसेच नावनोंदणी याविषयी अधिक माहिती http://saregama.bmm2013.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही स्पर्धा जसजशी पुढच्या टप्प्यावर जाईल , तशी बी.एम.एम. २०१३ च्या https://www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजद्वारेही , रसिकांना या ठिकठिकाणच्या विजेत्यांची गीते ऐकता येतील.
जुलै २०१३ मध्ये बी.एम.एम. च्या अधिवेशनात होणार्या या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात , परिक्षकांसह रसिक-प्रेक्षकही मतदानाद्वारे मिळालेल्या गुणांनी अंतिम विजेता ठरविण्यात येईल.
मटा ऑनलाइन वृत्त । बोस्टन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16701381.cms