गझल
मोजून पाहू, मापून पाहू!
स्वप्ने गुलाबी बेतून पाहू!!
कोठून आणू धागे सुखाचे?
दु:खेच आता कातून पाहू!
येतील ओठी ओतीव ओळी;
काळीज अवघे ओतून पाहू!
त्यांना करू दे चर्चा चवीची!
प्राशून पाहू, झिंगून पाहू!!
खारे असो वा गोडे असू द्या;
पाणी तळ्याचे चाखून पाहू!
झाली अरेरावी खूप वेळा...
हे हात आता जोडून पाहू!
येवो, न येवो पाऊस यंदा;
ये! स्वेदधारा बरसून पाहू!
हे पोपडे! या भेगा चुकांच्या!
आयुष्य थोडे लिंपून पाहू!
प्रतिसाद सारे वाचून पाहू!
एकेक हेतू तोलून पाहू!!
जे काल काही चुकले, चुकू दे....
जे काल शिकलो, ताडून पाहू!
प्रासाद नाही झेपायचा, पण
घर एक छोटे बांधून पाहू!
हातात येते व्यामिश्र छाया
शब्दांत आत्मा मिसळून पाहू!
पोहायलाही अपसूक येते!
दररोज थोडे डुंबून पाहू!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
मस्त गजल!!
मस्त गजल!!
एक शेर माझ्याकडून सप्रेम भेट
एक शेर माझ्याकडून सप्रेम भेट सर .........................
हररोज गझला केल्या ..पुरे ना !!
आता जरासे थाम्बून पाहू !!
_____________________
मस्त गझल सर
छानय आवडली
धन्यवाद