माधव घाईघाईत तयार होउन भेटायचं ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. ठरलेल्या वेळेच्या ५ मिनिटे आधी तो नेहमीप्रमाणे पोहोचला होता. वेळ होऊन १० मिनिटे झाली तरी सुधा आली नव्हती. माधव वाट बघत राहिला आणखी बराच वेळ सुधा आलीच नाही.
कुणीतरी सुधेला आपल्यापासुन लांब घेउन जाणार अशी माधवला कायम भिती वाटत असे त्यामुळेच तो ती जात असलेल्या रिक्षाचा नंबर नेहमी टिपुन घेई. आज पुन्हा तो चिंताग्रस्त झाला.
ते दोघे थोडा वेळ का असेना रोज भेटायचे.
कालच ती त्याला भेटलेली. खुप खुप हसली होती, ते दोघे बालगंधर्व पुलावर बसुन गप्पा मारत होते. उद्या केस धुवायचेत म्हणुन तिने केस बांधलेले होते. हातावर मेंदी काढलेली होती. त्याला तिच्या हातावरची मेंदी खुप आवडायची म्हणुन ती बर्याचदा भेटायला येताना तिच्या डाव्या हातावर मेंदी काढलेली असायची ओलीच. काल ती ज्या रिक्षात आली त्याच रिक्षाने ते दोघे बालगंधर्व पुलावर आले होते. फक्त १५ मिनिटे ते भेटले, नंतर ती गेली.
तिच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध असल्याने, त्याने तिच्या घरी फोन केला असता तिच्या घरचे 'राँग नंबर' असे म्हणुन फोन कट करत त्यामुळे त्याने तिच्या घरी फोन करायचे टाळले. तो खुप निराश झाला. तेव्हा मोबाईल सगळ्यांकडे नसायचे. त्याने विचार केला उद्या परत याच वेळी याच ठिकाणी ती बहुधा येइल. त्याने उद्या परत तिथे यायचे ठरवले पण मनातले विचार त्याला खुप अस्वस्थ करत होते.
दुसर्या दिवशीही त्याने खुप वेळ वाट बघितली. जसजसा एकेक क्षण जात होता तसतसा तो आणखी अस्वस्थ होत होता, त्याच्या मनातली भिती वाढत होती.
शेवटी तो त्याच्या एका मैत्रिणीकडे म्हणजे प्रियाकडे गेला आणि तिला सुधाच्या घरी फोन करायची विनंती केली. प्रियाने तिच्या घरी फोन लावला.
'सुधा आहे का, काकु ?'
'कोण बोलतय?'
'तिची मैत्रिण बोलतेय,प्रिया'
'कुठली मैत्रिण?'
'मी आणि ती एम एस्सीला एकत्र होतो'
'काय काम आहे?'
'सहजच फोन केला, ती घरी नाहीये का?'
'तु तिची मैत्रिण आहेस, आज तिचे लग्न झाले, तुला माहिती नाही?'
हे अविश्वासात्मक बोलुन सुधाच्या आईने फोन ठेवला.
प्रिया माधवच्या एका मैत्रिणीची मैत्रिण होती, त्यांचं फक्त हाय हेलोचं नातं होतं. तिला माधव-सुधाबद्दल सगळं माहिती होतं त्यामुळे ती फोन करायला तयार झाली होती. तिला माधवला काय सांगावं कळेना, ती क्षणभर अबोल झाली. माधवचा ताण वाढत होता. त्याने अधिर होउन विचारलं
'काय म्हणाल्या सुधाच्या आई ?'
प्रिया चटकन बोलुन गेली 'अरे तिचं लग्नं झालं'
माधव जवळ जवळ ओरडलाच 'काय?'
तिने परत तेच सांगितलं.
माधव स्वतःशीच बोलला 'कसं शक्य आहे?'
त्याच्या डोळ्यवर अंधारी येउ लागली, क्षणभर त्याला वाटले की तो खाली कोसळेलच. पण त्याने स्वतःला कसेबसे सावरले. त्याला खुप प्रश्न पडले होते?
प्रियाला काय बोलावे हे सुचत नव्हते, ती काळ्जीने त्याला म्हणाली 'तु..' पण तिचं वाक्य तोडत तो म्हणाला, 'काळ्जी करु नकोस मी सावरेन'.
त्याचं डोकं गरगरु लागलं होतं. तो प्रियाला 'बाय' करुन परतला. हळुहळु बांध फुटु लागला. माधव भर रस्त्यात ओक्साबोक्शी रडू लागला. सुधा त्याच्या आयुष्यातुन गेली हे त्याला सहन होत नव्हतं. अश्रु अगदी अनावर झाले होते.
माधवच्या मित्रांसाठीसुध्दा हा धक्काच होता.
अरुण म्हणाला, 'जी मुलगी असं वागली तिच्यासाठी तु रडतोयेस ?'
माधवला आणखी रडु कोसळले, तो रडता रडता म्हणाला,'तिच्याबद्दल काही वाईट बोललेलं मला सहन होणार नाही. अजुनही माझं तिच्यावर तेवढंच प्रेम आहे '.
अरुणला मंदारने थांबवले,'त्याला आत्ता काहीही बोलु नकोस'
अरुण आणि मंदार त्याला सारसबागेत घेउन गेले. निवांत मोकळ्या ठिकाणी माधवला बरे वाटेल, त्याच्याशी बोलताही येइल असा त्यांचा विचार होता. दोघेही विचार करत होते,'असं झालंच कसं ?'
त्यांना माधवला कसे समजवावे कळत नव्हते.
राहुन राहुन माधवच्या डोळ्यात पाणी येत होते.
संध्याकाळ्ची मेसची वेळ निघुन गेली, बराच उशीर झाला होता. शेवटी ते तिघे सारसबागेतुन बाहेर आले आणि एका हॉटेलात शिरले. मंदारने तीन पावभाजीची ऑर्डर सांगितली. माधव प्रयत्न करुन बोलला,'मी नाही खाणार' आणि परत रडु लागला.
अरुण म्हणाला,'ठिक आहे दोनच सांगुया'.
मंदार माधवला म्हणाला,'अरे उद्या तुला ऑफिसला जायचय, न खाऊन कसं चालेल'.
माधवने त्या परिस्थितीतही मनोमन विचार केला की स्वतःचे रुटीन तसेच चालू ठेवायचे आणि म्हणाला,'ठिक आहे, मी खाईन'. मंदारला खुप समाधान वाटले.
त्यावेळी अरुण आणि मंदारच्या मैत्रिचा माधवला खुप आधार मिळाला.
माधव पहाटे उशीरापर्यंत रडत राहिला. त्याला राहुन राहुन हुंदके येत होते. रडता रडताच त्याला झोप लागली. सकाळी जाग आल्यावरही त्याला रडु येत होते.
तो दिवस त्याने कसाबसा घालवला. दुसर्या दिवशी त्याच्या ऑफिसला सुट्टी होती.
अरुण आणि मंदारला सुट्टी नव्हती. माधवला सुट्टीचा रिकामा वेळ जीवघेणा असेल याची खात्री होती कारण गेले वर्षभर जवळ जवळ सगळे सुट्टीचे दिवस त्याने सुधाच्या सहवासात घालवले होते. त्याला कमालीचा एकटेपणा जाणवत होता. त्याने त्याचा जवळचा मित्र सुदिप याला फोन करुन मुंबईवरुन बोलवुन घेतले. सुदिपसाठी सुध्दा हा धक्का होता. मागच्या वेळी तो पुण्याला आला तेव्हा माधवने सुधाची आणि त्याची ओळख करुन दिली होती. सुदिपला माधवची खुप काळजी वाटत होती. तो एका दिवसाची रजा टाकुन लगेच पुण्यात आला. माधवसाठी तो खुप मोठा आधार होता. 'असे कसे घडले?' हा सगळ्यांप्रमाणे सुदिपसाठीसुध्दा प्रश्नच होता.त्याने माधवला धीर दिला. एक दिवस राहुन सुदिप मुंबईला गेला, माधवचे मन पुन्हा सुधाचा विरह आणि एकटेपणा यामुळे खिन्न झाले.
गेले वर्षभर माधव आणि सुधा जवळ जवळ रोज भेटत होते. त्याने तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच केली नव्हती.
त्याला खुप प्रश्न पडले होते.
'तिच्या मनाविरुध्द बळजबरीने घाईघाईत तिचे लग्न झाले असेल का? की आधिच ठरले असेल?'
'तिने आपल्याला परवाच्या भेटीत किंवा आधी याबद्दल का सांगितले नाही?'
'ती माझ्याशिवाय कुणाशीतरी लग्न करायला तयार कशी झाली ?'
'तिने माझे काय होईल याचा विचार कसा केला नाही?'
त्याला एकाही प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. गळा दाटल्याने गळ्यात दुखत होते. आता अश्रु जरा थांबुन थांबुन येत होते. काही वेळाने त्याने मन घट्ट केले.
माधवचे आईबाबा अमरावतीजवळ एका छोट्या गावात रहात असत, तिथे त्यांचे घर होते शिवाय बाबा तिथेच नोकरी करत, आई गृहिणी होती. माधव थोरला मुलगा असल्याने सर्व मुलांमध्ये माधववर आईबाबांचा जास्तच जीव होता. त्यांनी माधव-सुधाच्या आंतरजातिय विवाहाला मनाविरुध्द परवानगी दिली होती कारण अन्यथा माधव जिवाचे बरेवाईट करुन घेइल अशी त्यांना भिती होती. माधवच्या सुधावरच्या असिम प्रेमाचीही त्यांना कल्पना होती.
माधवने आईबाबांना कळवले तेव्हा त्यांच्यासाठीसुध्दा हा खुप मोठा धक्का होता. माधवने फोनवर सांगितले,'तुम्ही काळजी करु नका, मी ठिक आहे'. पण त्या दोघांच्या जीवात जीव नव्हता. ते दोघे लगेचच पुण्याला यायला निघाले. प्रवासाच्या वाटेत कुठे लग्नाचा मांडव दिसला तर माधवची खुप आठवण येउन आईच्या डोळ्याला धार लागे. माधवला आईबाबांना बघुन आनंद झाला. तो आईबाबांना ३-४ महिन्यांनी भेटत असे. आईने माधवचा हात हातात घेतला, मायेने त्याचा गालावर हात लावला, ती जरा ओरडलीच्,'तुला ताप आहे'. माधवला ताप आहे हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. तो म्हणाला ,'मी क्रोसिन घेइन, तु काळजी करु नकोस'.
'सुधाचे लग्न झाले आणि माधवला कळले सुध्दा नाही, असे कसे घडले?' हा आईबाबांना प्रश्न होता.
माधवकडे त्याचे उत्तर नव्हते. आईबाबांनी विचार बोलुन दाखवला की एखादेवेळी सुधाला तिच्या आईबाबांनी माधवचे बरेवाईट करण्याची धमकी दिली असेल त्यामुळे ती माधवला तिच्या लग्नाबद्दल काही बोलु शकली नसेल.
माधवच्या आयुष्यात ही अतिशय अनपेक्षित घटना घडली तरी त्याने जीवाचे काही बरेवाईट करुन घेतले नाही, शिवाय अन्य विचार करुन काही वाईट निर्णयही घेतला नाही याला कारण म्हणजे त्याच्या आईबाबांची पुण्याई आणि संस्कार होते.
एक्-दोन दिवसांनी माधव जरा सावरल्यासारखा दिसत होता पण त्याच्या अंतर्मनाची कल्पना त्यालाच होती. चार दिवस राहुन आईबाबा गावाला परतले.
अरुण आणि मंदारला सुध्दा काही दिवसांनी वाटु लागले की माधव यातनं बाहेर पडला, पण तसे झाले नव्हते. विशेषतः तो एकटा असताना त्याला खुप त्रास व्हायचा, कंठ दाटुन यायचा, डोळे भरुन यायचे.
माधवने आपले दैनंदिन जीवन चालुच ठेवले.
तो खुप उदास असे, ऑफिसमधले सहकारी त्याला खोदुन खोदुन काय झाले असे विचारत. त्याच्या डोळ्यात बर्याचदा पाणी बघुन सगळ्यांना वाईट वाटे, प्रश्नही पडे.
काही दिवसांनी माधवने सुधाच्या घरी फोन केला. फोन तिच्या आईने घेतला.
'हलो'
'माधव बोलतोय'
'काय काम आहे?'
'माझ्या कवितेच्या वह्या हव्यात'
'कुठे आहेत?'
'तिच्या कप्प्यात'
'कुठे भेटणार?'
'घरी येऊ?'
'कधी येणार?'
'लगेच'
'ये'
त्याचे मन म्हणत होते, 'मी काही चुक केली नाही मग घाबरायचे कशाला?'
तरीही, तिच्या घराचे जिने चढताना त्याला धडधडत होते.
तो सुधाच्या घरी पोहोचला. दिवे गेले होते. मेणबत्तीच्या प्रकाशात सुधाचे आईबाबा तिच्या कप्प्यातल्या वस्तू बाहेर काढत होते.
हॉलमध्ये माधवने तिला दिलेली गिफ्ट्स पसरलेली होती, ते बघुन त्याला गलबलुन आले, सुधाच्या आठवणीने तो व्याकुळ झाला.
तिच्या बाबांनी वह्या हातात देत दोन मिनिटे बसायला सांगितलं.
तिची आई म्हणाली,
'मला ह्रुदयविकाराचा झटका तेवढा यायचा राहिलाय, तिने तुला ऑफिसमध्ये फोन केला तरि तू तिच्याशी बोलू नकोस, ती मुर्ख मुलगी आहे, तू तुझ्यातरी आयुष्याचा विचार कर'
माधव मनात म्हणाला,'आता आयुष्य कुठे उरलय?'
तिची आई पुढे म्हणाली,'हवे तर आम्ही तुझे पाय धरतो'
माधवच्या मनात एक प्रश्न पडला,'मी इतका वाईट आहे का? ह्यांना माझे पाय धरायची वेळ यावी, ह्यांना का असे वाटते की मी सुधाला त्रास होइल असे वागेन?'
माधव म्हणाला,'मी तिच्या आयुष्यात कधीही डोकावणार नाही'
तो उठला आणि निघताना म्हणाला,'तिच्या आठवणी पुरे आहेत, मला जगण्यासाठी...'
जिने उतरताना त्याची थरथर होत होती, खुप रडू येत होतं तो स्वतःला आवरायचा प्रयत्न करत होता.
घरी आल्यावर माधवने कवितांच्या वह्या उघडल्या, त्याचे मन उचंबळुन आले. त्याचे शुध्दलेखन चांगले नसल्याने त्याच्या कविता पुर्ण झाल्यावर सुधा वहीत लिहुन ठेवायची. सुधा म्हणायची ह्या वह्या माझ्या आहेत. त्यातली एकतरी वही नेहमी सुधाच्या पर्समध्ये असायची, माधवची आठवण झाली की ती वही काढुन माधवच्या कविता वाचायची. माधवच्या कवितांची ती पहिली आस्वादक आणि चाहती असायची. माधव सुधाच्या आठवणींमध्ये बुडुन गेला. काही वेळाने तो भानावर आला आणि वास्तवाची जाणीव झाल्यावर त्याला पुन्हा दाटुन आले.
काही दिवसानंतर, माधवला सुधाच्या एका मैत्रिणीकडुन कळले की तिचा साखरपुडा तिन महिन्यांपुर्वीच झाला होता.
माधवचे प्रश्न आणखी वाढले.
'तिने असे का केले?लग्न ठरल्यावर सांगितले नाही,साखरपुड्यानंतरही ती त्याला का भेटत राहिली?' त्याचे मन खुप दु:खी झाले.
काही दिवसांनी सुधाचे माधवला त्याच्या ऑफिसमध्ये खुपदा फोन येवू लागले. तो फोनवर आल्यावर मात्र तिला बोलायचा धीर होत नसायचा. ते फोन सुधाचेच असणार हे माधवला माहिती होते.
तिचे फोनवर अबोल रहाणे त्याच्या मनाला त्रास देत होते.
एकदा कसाबसा धीर करुन ती बोलली,'मला भेटायचय तुला'.
ती माधवला भेटायला आली.
तिच्या गळ्यात मंगळ्सुत्र बघुन माधवच्या ह्रुदयाच्या ठिकर्या झाल्या.
त्याने तिला विचारले ,'तु असं का केलंस?'
ती म्हणाली,'तू लग्नाच्या आड आला असतास तर तुझे बरेवाईट करण्याची व्यवस्था
आईबाबांनी गल्लीतल्या गुंडमुलांकडे करुन ठेवली होती '.
त्याने विचारले,'पण तू लग्न ठरल्यावर मला का सांगितलं नाहीस? मला अंधारात का ठेवलस?'
ती रडत पुढे म्हणाली,'मी माझ्याशीच खोटं वागले रे..'
'लग्नाच्या आदल्या रात्री झोपेच्या होत्या तेवढ्या ३-४ गोळ्या घेतल्या पण मला काहीच झाले नाही'.
बराच वेळ काही न बोलता रडत राहिली.
रडत असतानाच ती परत जायला निघाली, त्याच्याही डोळ्यात पाणी होते.
ती गेली.
माधव हुंदके देत बसुन राहिला.
नंतर काही दिवसांनी परत सुधाचा फोन आला. ती म्हणाली,'मला तुला भेटायचय, तुला मला भेटावसं वाटत नाही का?'
माधव म्हणाला,'तुला कुणी वाईट म्हणू नये असं मला वाटतं'
त्याचे अजुनही तिच्यावर खुप प्रेम होते म्हणुनच लग्नानंतरही ती त्याला भेटत राहिली तर जग तिला चारित्र्यहीन म्हणेल त्यामुळे त्याने भेटायला नकार दिला.
शक्यतो फोन करु नकोस असे सांगितले.
माधवने स्वतःच्या मनाशी ठरवले,'ज्या क्षणी सुधाने कुणाशीतरी लग्नाचा निर्णय घेतला त्या क्षणापासुन ती माझी राहिली नाही'.
नंतर खुप दिवस सुधाचा फोन आला नाही. काही दिवसांनी माधवला कुणाकडुनतरी कळले की तिला मुलगी झाली.
उमलत्या वयात माधवच्या आयुष्यात आलेलं प्रेम हे एखाद्या दवभरल्या सकाळी धुक्यात फुलणार्या प्राजक्तासारखं होतं.
त्या प्रेमात मिळालेलं अपयश हे एक जळजळीत वास्तव होतं उन्ह पडल्यावर ओघळुन कोमेजलेल्या प्राजक्तासारखं.
अजुनही माधवला जेव्हा सुधाची, त्या दिवसांची आठवण होते तेव्हा त्याच्या मनातल्या धुक्यात पारिजात फुलतो आणि त्याच्या ह्रुदयातिल सलही जागा होतो.
पण माधवने त्याच्या मनाच्या कप्प्यात तो 'धुक्यातला प्राजक्त' जपुन ठेवला, जे त्याचं निरपेक्ष, निस्सिम्, निखळ, पवित्र प्रेम होतं.
त्याने सुधाला मनोमन क्षमाही केली...
गणेश, कथा
गणेश,
कथा थोडी अपूर्ण वाटते.
अन्यथा मांड्णी छान आहे, शेवट वाचून माधवचं वाईट वाटलं
छान
छान आहे
वास्तववादी वटतेय
स्वप्नातल
स्वप्नातल्या सार्या कळ्या उमलतात असं नाही. पण प्रेम करणार्याने निर्भय असावं. उचलून आणण्याची ज्याच्यात धमक आहे त्यानेच करावं अन्यथा आधीच रडण्याची तयारी ठेवावी. असं माझं वास्तववादी मत.
आता बरीच
आता बरीच चांगली वाटतेय.
कथा छान
कथा छान आहे. !!! बरिचशि वास्ववादि आहे.
शुभान्गी क
शुभान्गी
कथा ठीक आहे. वास्तवात असे माफ करणारे कमीच असतात.
न उमललेली
न उमललेली कळी
न उमललेल प्रेम
दोन्ही छान .
कौतुकला
कौतुकला अनुमोदन..
कथा
कथा आवडली.........