भेट तुझी माझी

Submitted by abhishruti on 4 October, 2012 - 09:33

कधी मला बरोबर घेऊन गेलास तर कधी माझ्याबरोबर आलास. माझ्या जीवनात आलास तेव्हाही माझं जीवन बदलून टाकलस आणि अचानक गेलास तेंव्हाही सारं काही बदलून गेलं.
तू मला साथ दिली नाहीस, माझं प्रेम स्वीकरलं नाहीस याही पेक्षा जास्त दु:ख झालं, त्रास झाला ते तुझ्या स्वार्थी, व्यवहारी वृत्तीचा! त्या वृत्तीने तुझं प्रेम, तुझे कलासक्त मन, तुझी सद्सद्विवेक बुद्धी सगळ्यावर मात केली. तू क्षणाचाही विचार न करता पुढे निघून गेलास. मी तुला अडवायचा प्रयत्न केला नाही असं नाही, पण मनापासून - पूर्ण शक्तीनिशी नाही केला! कारण मला माझा स्वाभिमान पणाला लावून तुझं प्रेम, तुझी सहनभूती नको होती. त्या पासून अपेक्षित सुखं-समाधान मला कधीच मिळालं नसतं. मला तुला बांधून ठेवायचं नव्हतं. तुला दूर दूर जाताना पाहून माझ्या मनाला काय वाटलं ते मी शब्दात सांगूच शकत नाही. समजूतदारपणा, अ‍ॅडजेस्टमेंट प्रत्येक नात्यात दाखवावी लागतेच. पण त्याग, समर्पण याच गोष्टींचा पाया उभा करुन ज्या नात्याची सुरुवात होते ना, ते नातं समानतेच्या मुळावरचं घाव घालतं. नको होतं मला असं नात! त्याऐवजी मी तुला दुरुन पहाण पसंत केलं. तुला कसही करुन हासिल करण हा माझा उद्देश्य नव्हता, तसं करणं माझ्यासाठी काही फार अवघड नव्हतं.
मी माझं जीवनही पुढे सरकू दिल. शेवटी प्रत्येकाला जीवन जगण्याचा, पुढे जाण्याचा अधिकार आहेच की. मी तुला कधीच विसरले नाही पण तुझ्या दु:खात अडकूनही पडले नाही. असे प्रसंग सर्वांवर येतात. It's a part and parcel of our life! अस समजून चालले. प्रत्येक वेळेला आपल्याला पाहिजे ते, पाहिजे तसं, पाहिजे तेंव्हा घडत नाही. हे सत्य स्विकारायलाच हवं. तू ही ते अनुभवलं असशीलच. उगाच वेड्या हट्टापायी स्वतःच आणि बरोबरीने अख्ख्या कुटुंबाच नुकसान करुन घेण्याएवढे आपण दोघेही वेडे नव्हतो. तू तर नव्हतासच. एक फरक नक्कीच होता आपल्यात, मी माझं प्रेम कधीच लपवलं नाही अगदी आजही लपवत नाही, तू मात्र कधीच तुझं प्रेम उघड केलं नाहीस. मी त्यावेळी दुसरा कसलाही विचार करु शकत नव्हते, तू मात्र पूर्णपणे भानावर होतास. सुरुवातीपासूनच व्यवहार, रितभात, लोक काय म्हणतील याचा विचार तुझ्या मनात आला. तुझी स्वतःची प्रगती, ध्येय तुला स्पष्ट दिसत असावीत. कदाचित माझ्यात गुंतलास तर ते साध्य करता येणार नाही, मी ती साध्य करण्यासाठी तुला साथ देऊ शकणार नाही किंवा कदाचित अडसरच ठरेन असा विचार तुझ्या मनात आला असावा. आज हा सगळा विचार केल्यावर वाटतं झालं ते बरच झालं. कारण एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांचा आधार हीच तर आपली शिदोरी असणार होती आणि तीच आपल्याजवळ तुटपुंजी होती.
तरीसुद्धा तुझ्याबरोबर घालवलेले क्षण वाया गेले, पश्चाताप करण्यासारखं आपण काही केलं असं मला मुळीच वाटत नाही. अजुनही आपल्या गप्पा, गाणी, वादविवाद आठवून मन सुखावतं. तुझी आठवण आजही मला आनंद देते. हीच माझी आणि माझ्या स्वभावाची खासियत आहे. आपल्या मनमुटाईनंतर मोजक्या वेळा आपण भेटलो. त्याही वेळेला मी तितक्याच आत्मीयतेने तुझी विचारपूस केली. तुझी चेष्टामस्करी केली. पण तुझ्यात काही बदल नाही. अजूनही तू हातचं राखून बोलतोस. अजूनही तुला कशाची तरी भीती वाटते. आपण कदाचित कुठल्यातरी क्षणी काहीतरी बोलून जाउ याची .. कसली कोण जाणे! मी तुला चांगलच ओळखते त्यामुळे मला हे जाणवतं.आणि वाईटही वाटतं. ती भीती तुला मोकळं होउ देत नाही.. मला कळतं रे! तुलाही मला भेटल्यावर आनंद होतो, अजूनही तुझ्या चेहेर्‍यावरची रेष न रेष मी वाचू शकते.... पण तुला ते कळत नाही. तू सतत हे सारं लपवण्याची धडपड करतोस, खोटा मुखवटा वागवतोस. ही धडपड मला अस्वस्थ करुन जाते. त्यामुळेच हल्ली मी तुझी भेट टाळते. तुला प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा आठवणीतच भेटणं पसंत करते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे यार मला हे कसं पोस्ट करायचं तेच आधी जमेना आणि मग वाचकवर्ग सिलेक्ट करताना गोंधळ झाला. खूप दिवस न लिहिल्याचा किंवा न पोस्ट केल्याचा परिणाम! धन्यवाद वाचक मित्र-मैत्रिणींनो! बरच काही लिहायला सुचतय पण दिवाळीअंकासाठी हे द्यावं का या विचारात गंडले आहे, पण दिवाळी अंकाच्या कुठल्या कॅटॅगरीत कोणत लेखन बसेल... ठरवता येत नाही आहे. नाहीतर पाठवून देते, त्यांनाच ठरवू दे काया कुठे बसवायचं ते! what is your opinion? जरुर कळवा! परत एकदा धन्यवाद!

Happy छान लिहिलं आहेस.

स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असणारी आणि निर्माण झालेल्या नात्याला मर्यादा सांभाळूनही कॅपॅसिटीनुसार प्रामाणिकपणे १००% न्याय देणारी माणसं फार थोडी असतात. वरच्या परिच्छेदातून तू व्यक्त केलेली 'ती' ची भावना पोहोचली. मनं गुंतलेली असूनही नीटपणे व्यक्त न केल्यामुळे होणारी तडफड छान मांडली आहेस Happy

Thanks all.... खूप दिवसात इकडे फिरकले नव्हते त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आता पहातेय