निघोज येथील रांजण खळगे : भौगोलिक चमत्कार
गेली ३२/३३ वर्षं नगरलाच रहात असूनही निघोजला कधीच जाणं झालं नाही. निघोजबद्दल एकलं होतं खूप! पण शेवटी ऑगस्टमधल्या एका रविवारी मात्र सहकुटुंब निघोजला जाणं झालं. आणि इथे यायला आपण इतका उशीर का केला असंच वाटलं.
अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. वाटेत झेंडूची नयनरम्य फ़ुलशेती लागते.
या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
दर्शनानंतर सगळेच रांजण खळग्यांना भेट देण्यासाठी उत्सुक होते. हे गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रद्न्य भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वहात जाते. आम्ही बरंच अंतर चालून पुढे गेलो तेव्हा "क्लीप् स्वॅलो" पक्षांचे थवे अत्यंत लगबगीने पाण्याच्या पृष्ठभागावरून ये जा करत उडत होते. पाण्यावरून ते कडेच्या खडकात अदृश्य होत होते. तेव्हा कळलं की या पक्ष्यांची या खडकांमधे चिखल आणि लाळेनी बनवलेली असंख्य घरटी आहेत. माझा लेक मात्र येथे दोन तीनदा येऊन गेलेला असल्याने त्याला बराच माहिती होती.
तो या नदीकाठच्या खडकांवरून उतरून बराच खाली आपल्या कॅमेऱ्यासह स्थानापन्न झालेला होता. या पक्ष्यांच्या फ़ोटोसाठी! पण म्हणावे तसे स्पष्ट फ़ोटो मिळाले नाहीत.
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
फ़क्त एकच गोष्ट जाणवली म्हणजे परिसरातला प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्रचंड कचरा.
पर्यटकांनी जेवण झाल्यावर चक्क रांजण खळग्यातच थर्माकोलच्या पत्रावळ्या अक्षरश: दाबून बसवल्या होत्या. आणि इतरत्रही बराच कचरा होता.
इथे पर्यटकांसाठी "परिसरात प्लॅस्टिक/थर्माकोलचा कचरा टाकू नये" अश्यासारख्या पाट्या लावण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर जागोजागी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था व्हायला हवी आहे.
आम्ही गावातल्या मंदिरात जेव्हा ट्रस्टींना भेटलो तेव्हा या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आणि या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या.
पण संध्याकाळी परतीच्या प्रवासात "पुन्हा अकदा तरी निघोजला यायचंच" असं सर्वानुमते ठरलंच!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाटेतली फुलशेती
रांजणखळग्यांचे विविध प्रकार
परिसरातलं मंदिर
मळगंगा देवीचं मुख्य मंदिर
झुलता पूल
रांजणखळग्यांच्या पुढ्चा कुकडी नदीचा प्रवाह
रांजणखळग्यांच्या बाजूने लांब दिसणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा
निघोज गावातले मळगंगा देवीचं संगमरवरी मंदिर
याच मंदिरातला देवीचा मुखवटा
मस्त माहिती..
मस्त माहिती..
निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी
निघोजजवळच एक दर्याबाई पाडळी नावाचे गाव आहे, तेही रान्जणखळग्यासाठी प्रसिद्ध आहे. >>> चिक चिक तेथे रांजण खळगे नव्हे तर लवण स्तंभ आहे
लवकरच माहिती टाकतो
धन्यवाद वरदा आणि मानुषि!
धन्यवाद वरदा आणि मानुषि!
आपल्या महाराष्ट्रातील अजुनी एक आश्चर्य म्हणजे लोणारचे सरोवर! हे सरोवर साधारण ५०,००० वर्षापूर्वी उल्का-पातातून तयार झाले.
लोणार सरोवराबद्दल माहिती माबोवर 'भटकंती' या सदरात मागे प्रसिद्ध झाली आहे (http://www.maayboli.com/node/35573).
गुगलवर शोध केल्यास भरपूर माहिती मिळू शकते.
तसेच, YouTube वरही लोणार सरोवराबद्दल एक छान क्लीप आहे:(http://www.youtube.com/watch?v=v6AgrzDh2kw).
लोणार सरोवराबद्दल शास्त्रीय माहिती पुढील लिंक वर मिळू शकेल: http://wldb.ilec.or.jp/data/ilec/wlc12/P%20-%20World%20Case%20Studies/P-...
छान माहिती मिळाली. आजवर
छान माहिती मिळाली. आजवर पेपर्समधेच वाचलं होतं या खळग्यांबद्दल पण आता नक्की जायला पाहिजे प्रत्यक्ष बघायला..
बिनधास्त
बिनधास्त ..................
लोणार सरोवरही पहायचं आहे.खूप उत्सुकता आहे!
गुगलून असेही फोटो मिळाले त्या
गुगलून असेही फोटो मिळाले त्या रांजणखळग्याचे .....
Pages