मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - झटपट बटाटा-सफरचंद खिर - गोड - जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 September, 2012 - 15:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा वाटी तांदूळ
अर्धे सफरचंद
१ छोटा बटाटा
१ मोठी वाटी दुध
पाउण वाटी साखर
थोडे केसर
काजु, बदाम
२ चमचे साजूक तुप
१ छोटा पेला पाणी

क्रमवार पाककृती: 

१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.
२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.
३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.

४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन लगेच वाटलेले तांदूळ परता.

५) त्यात १ पेला पाणी घाला व किसलेला बटाटा टाकुन तांदुळ व बटाटा शिजू द्या. ७-८ मिनिटांत शिजतात.

६) आता त्यात साखर, ड्रायफ्रुट्स घालुन उकळी आणा.

७) नंतर सफरचंदाचा किस घालुन चांगली उकळी येउ द्या.

८) मग सगळ्यात शेवटी दूध टाकुन उकळी आणा आणि त्यावर केसर घाला.

झाली झटपट सफरचंद, बटाटा खिर तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक वाटी
अधिक टिपा: 

तुम्हाला आवडतील ते इतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता.

साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता.

स्वादासाठी वेलची-जायफळ घालू शकता.

कधी कधी सफरचंद आंबट असतो म्हणून दुध घालायच्या आधी सफरचंदाचा किस घालून उकळी येउ द्यायची मग दुध घालायचे.

माहितीचा स्रोत: 
गणेशोत्सव २०१२ मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् स्पर्धेतील टिपा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
रबडी होईल का ह्या प्रमाणाने?
खिरीमध्ये साधारणपणे जे काही घट्ट पदार्थ असेल (शिजलेला भात, गहू, शेवया इ इ ) किमान तेव्हढे दुध वापरले जाते. उदा: ह्या खिरीमध्ये शिजलेला भात ३/४- १ वाटी होईल + १/२-१ वाटी बटाटा आणि सफरचंद यांचा कीस. मी इथे किमान २ वाटी दुध वापरले असते (१ वाटी पाणी हे भात शिजवण्यात जाईल).

जागू, मस्त दिसते तुझी खिर. एक प्रश्न आहे. सफरचंद कधी कधी आंबट असते तर उकळत्या दुधात सफरचंद टाकल्याने दुध फाटत नाही का?

सिमन्तिनी खर तर मी मोठी वाटी घेतली आहे. तेवढे दुध पुरेसे झाले. आणि आपल्या आवडीनुसार आपण अजुन पातळ करण्यासाठी दुध घालू शकतो.

विद्याक खर सांगायच तर ती टिप मी लिहिता लिहीता राहीले. आंबट अ‍ॅप्पल मुळे दुध फाटू नये म्हणून मी दुध घालायच्या आधी अ‍ॅप्पल टाकुन एक उकळी आणायची मग दुध घालायचे.