jजागत असतो रात्र रात्र मी

Submitted by निशिकांत on 25 September, 2012 - 01:06

जागत असतो रात्र रात्र मी
(ही कविता फेसबु या विषयावर असल्यामुळे अपरिहार्यपणे इंग्रजी शब्द आले आहेत)

नातू नाती मला शिकवती
शिक्षक ते अन् जणू छात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

तरुणाईला साद घालण्या
तरल भाव गजलेत पेरतो
वेगावेगळ्या समुहावरती
"लाइक" सारे मोजत बसतो
कटुंबियांना यक्षप्रश्न हा
वागत आहे का विचित्र मी?
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

जगात व्हर्च्युअल क्लिक करता
विसरून जातो जहाल वास्तव
फॉर्मॅटिंग दु:खाचे होते
चटके विसरुन जातो विस्तव
तुसडा माझा स्वभाव असुनी
नवे जोडतो रोज मित्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

मार्क झुकेरा! शोध लाव, कट
पेस्ट कसे भाग्यास करावे
चोरुन प्राक्तन मंत्री केंव्हा
योगीबाबा जरा बनावे
फलद्रूप व्हावया आस ही
जगेन असुनी गलितगात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

असो काल्पनिक. वास्तववादी
जीवन सारे बकाल आहे
किती नाटके, रंगरंगोटी !
रंगमंच हा विशाल आहे
माझे कसले? जे लिहिले ते
बडबडणारे एक पात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

गार्‍हाण्याची फाइल माझ्या
पाठवीन मी अटॅच करुनी
जगेन म्हणतो, मला जरासे
माझ्यापासुन डिटॅच करूनी
निकाल देइल देव वॉलवर
बाळगतो ही आस मात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशिकांतजी खूप सुंदर कविता आहे. इंग्रजी शब्दांनी काय बिघडते?

प्रत्येक कडव्यात एक दर्दभरा विचार आला आहे, हे अधिक आवडले.

पण काही वेळा मला असे वाटते की कवीची पार्श्वभूमी प्रत्यक्षात माहीत असल्याचा आपल्या आस्वादावर परिणाम होत असेल का? म्हणजे मला माहीत आहे की तुमचे वय काय आहे, तुम्ही कोणत्या वयात कवितेकडे व एकुणच आंतरजालाकडे वळला आहात आणि तुमचा स्वभाव किती चांगला आहे. हे सर्व माहीत असण्याचा माझ्या कविता आवडण्यावर प्रभाव तर नसेल ना! अर्थात, कवितेचे श्रेय अजिबातच काढून घेऊ शकत नाही व घ्यायचेही नाही आहे. पण हीच कविता एका पंचविशीच्या तरुणाने (काही आवश्यक ते बदल करून) रचलेली असती तर मी तिच्याकडे कसे पाहिले असते वगैरे जरा कुतुहलजनक कल्पना वाटते Happy

>>>जगात व्हर्च्युअल क्लिक करता
विसरून जातो जहाल वास्तव
फॉर्मॅटिंग दु:खाचे होते
चटके विसरुन जातो विस्तव
तुसडा माझा स्वभाव असुनी
नवे जोडतो रोज मित्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी<<<

वा वा वा!

एकदम भारी लिहिलंय काका तुम्ही........ वास्तवपूर्ण आहे अगदी......

असो काल्पनिक. वास्तववादी
जीवन सारे बकाल आहे
किती नाटके, रंगरंगोटी !
रंगमंच हा विशाल आहे
माझे कसले? जे लिहिले ते
बडबडणारे एक पात्र मी >>> हे फारच आवडले ...

काका लै भारी कविता ..............हॅट्स ऑफ टू यू काका !!

बीफीजीन्चा प्रतिसादही खूप वास्तवदर्शी , तितकाच भावूकही ............

खूप छान बेफीजी तुम्हासही हॅट्स ऑफ !!