भुख

Submitted by कौतुक शिरोडकर on 29 September, 2008 - 03:21

शहर......................

अस्तव्यस्त पसरलेलं....आ वासलेल्या अजगरासारखे....येणार्‍या प्रत्येकाला गिळणारं...... पुन्हा एखाद्या उपाशी जनावरासारखं नव्या शिकारीची वाट पहाणारं.... श्रीमंतीच्या बगलेत दबकून अन दबा धरून बसलेली गरिबी..... आकाशाला गवसणी घालण्याच्या गप्पा करणार्‍या इमारती...... गल्ली बोळात बेवारशी कुत्र्यासारख्या चारही पाय पसरून सुस्त पडलेल्या झोपडपट्ट्या..... धुरांडी बनून फिरणार्‍या गाड्या........ प्राणवायूच्या शोधात.... खड्ड्यातला रस्ता शोधत भिनभिनणारी माणसांची वर्दळ...... दोन पायी, तीन पायी, चार पायी यांच्या गराड्यात .... जीवघेण्या शर्यतीत... रांगणारी एखादी बैलगाडी..... काठोकाठ भरलेल्या ट्रेन्स.... उतू जाणारे स्टेशन्स..... लोंबकळणार्‍या बसेस.. आणि माणसं..........माणसं..........माणसं..........

अशाच एका शहरातल्या एका झोपडपट्टीतून एका गर्भवती बाईला घेऊन काहीजण म्युन्सिपल हॉस्पिटलला गेले. एक मरतूकडे म्युन्सिपल हॉस्पिटल....अर्धवट उघडे गेट.... येणार्‍या - जाणार्‍याची बिल्कूल तमा न बाळगणारे राखाडी गणवेशातील पेपरात नाक खुपसलेले वॉचमन.... हॉस्पिटलचा लांबलचक आजारी दिसणारा व्हरांडा.... वेदनेने कण्हणारे रोगी.... बळे बळे सांत्वन करणारे उदास चेहरे... खिडक्यांच्या रांगा........... खिडकीच्या पाठी बसून खेकसणारे सौजन्यसप्ताहातले कर्मचारी.... त्यातही नाईलाजाने हसणारे रांगकर्... आरामात फिरणार्‍या नर्सेस........ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले शिकाऊ डॉक्टर........ तंबाखूच्या पिचकार्‍या भिंतीवर मारून, आपल्याच कलाकारीवर खूश होऊन स्वच्छतेचे धडे देणारे वॉर्डबॉय...... आपल्या थुलथुलीत देहाचा पसारा सावरत भटकणार्‍या आया.... जमिनीवर मळका कपडा घाणेरड्या पाण्यात बूडवून उपकार करणारा स्वीपर.... जन्मापासून मृत्यपर्यंत म्युन्सिपालटीच्या चक्कीत पिसले जाणारे आयुष्य.

मॅटर्निटी वॉर्ड. येणार्‍या मुलाच्या भविष्याची सोनेरी स्वप्ने पहात प्रत्येक कळ आपल्या स्मितहास्यात विरघळवत्...ओठ चावून सहन करणार्‍या गर्भवती बायका.... "कधी मी पण शुभ्र होते" असे एखाद दुसर्‍या कोपर्‍यातून दाखवणार्‍या पिवळ्या चादरी.... 'मुलगा की मुलगी' या विवंचनेत असलेले नातेवाईक.... काही सख्खे... काही शेजारी... मित्रही.... यंत्रवत एक नजर घड्याळ्यावर ठेवून पेशन्टसच्या अवतीभवती फिरणारा स्टाफ... बक्षिसाच्या आशेत एक्स्ट्रा सर्विस देणार्‍या आया व वॉर्डबॉय.... प्रायव्हेट प्रॅक्टीसला लेट होऊ नये म्हणून घाईने कामे आटोपणारे सिनीयर डॉक्टर.

ती गर्भवती ऑपरेशन थियेटरमध्ये.... लाल बत्ती.

बाहेर उभे कार्यकर्ते घड्याळ्यात पहात एकेक कमी.... दिवा विझला अन उरले सुरलेले एका बाजूस झाले. कपड्यात लपेटलेला एक नवा जीव घेऊन नर्स बाहेर आली. तिच्या पाठोपाठ स्ट्रेचरवर सफेद वाटणार्‍या चादरीतली 'डेड बॉडी'. वॉर्डबॉय उरल्या सुरलेल्यांवर एक नजर मारतो. काही शांत... काही पाणावलेले..... काही टाहो फोडुन... समजवणारे व समजून घेणारे चेहरे.... वॉर्डबॉय कानाची बिडी ओठाला लावून पेटवतो. एक कश घेऊन स्ट्रेचर ढकलत पुढे जातो.

पाच वर्षाचा एक मुलगा स्ट्रेचरकडे पहातो व मग हात जोडलेल्या आपल्या आई वडिलांकडे. देवासमोर रोज हात जोड सांगणारे आज इथे हात जोडायला का सांगत नाही...स्वतःच्या बालसुलभ प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा न बाळगता तो हात जोडतो व आपली रोजची प्रेयर बोलतो.

नर्स त्या नव्या जीवाला पाळ्ण्यात ठेवते. रांगेत पाळणे... त्यात रडणारे नवजात... प्रत्येकाला एक नंबर.....

नर्स पॅसेजमध्ये परतते तेव्हा तिथे कोणीच नसते. थोडं थांबून मग ती ड्युटीवर असलेल्या डॉक्टरला रिपोर्ट करायला जाते. आणखी एक बेवारस......

आईवडिलांचा हात पकडून हॉस्पिटलच्या पायर्‍या उतरणारा मुलगा वळून वळून पाठी पहात होता. त्याचवेळेस हॉस्पिटलच्या गेटला आपल्या छोट्या हातात पकडून उभा एक मुलगा त्याला आशेने पहात होता. तो मुलगा आईवडिलांसह गर्दीचा भाग झाला आणि ते दोन छोटे डोळे एका हाताने गेट धरून अजून त्याचा पाठलाग करत होते.

"क्या बे, क्या देखताय हमेशा ? " वॉचमनने मुलाला विचारलं.
"कालुचाचा बोला के मै इदरिचसे आया था...अकेला......मेरा माँ बाप नै आया| सब लोग अपना माँ बाप के साथ आताय | मेरा माँ बाप आजतक मेरेको देखनेको क्यूं नै आया ? '' मुलाची नजर अजूनही हॉस्पिटलच्या मेन डोरकडे होती.
"कोई नही आयेगा, तू जा | 'कर्म' करणारे करून जातात आणि 'फळ' रस्त्यावर सोडतात." वॉचमनने त्याचा एवढया वर्षाचा अनुभव मुलाला सांगितला, जो त्याला कळलाच नाही.

कडक इस्त्रीच्या गणवेशातली, पाठीवर दप्तराचे ओझे व गळ्यात वॉटरबॅग संभाळून, रस्त्यात समोर दिसणार्‍या व शक्य असेल त्या वस्तुला बुटाने उडवत मुले चालली होती. गेट सोडून मुलगा त्याच्या पाठी चालू लागला. अनवाणी पायाने तोही त्यांनी उडवलेल्या वस्तू उडवत, मळक्या शर्टाने नाक पुसत जणू पाठलागच करत होता.

म्हातारा आंधळा आपल्या नेहमीच्या जागेवर फाटक्य वाकळीस अंगावर ओढून फुटपाथ व भिंतीच्या मध्ये अंग चोरून बसला होता. भटच्या चहा स्टॉलवर स्टॉववर भांड्यात चहा व चहाबाज उकळत होते. चहाच्या किटलीने चहा ग्लासात ओतत भट काम करणार्‍या मुलाच्या 'आई बहिणीची ' आठवण काढत होता. नेहमीचे चणेवाले, केळेवाले, भेलवाले, म्हातारीचे केसवाले, चड्डी बनयानवाले, खेळणीवाले वगैरे.. आपापल्या धंद्याला लागले होते.

मुले फुटपाथवरून उतरून रस्त्यावर चालायला लागली. पुढे सारा फुटपाथ झोपड्यांनी भरला होता. काही उघडी नागडी मुले खेळत होती..... काही पाय आपटत भोकाड पसरत होती... कोणाची आंघोळ चालू होती तर कोणी मुलांना आंघो़ळ घालत होते. काहींचा कपडे व भांड्याचा कार्यक्रम जोरात चालू होता. कोणाचं जेवण तयार होत होते तर कोणाची अजून मच्छी साफ होत होती. एखादा चारचाकी तराफ्यावर पाण्याचे ड्र्म वाहून नेत होता.

या सार्‍यापासून एका हाताचे अंतर राखून मुले शाळेच्या दिशेने चालली होती. जवळ्च कचर्‍याच्या पेटीत नशेबाज व मुले आपापल्या कामाच्या वस्तु शोधत होते. मध्ये मध्ये येणार्‍या कुत्र्यांना पळवत ते आपल्या थैल्या भरत होते. त्यांना बघताच शाळकरी मुलांचा हात नाकावर गेला आणि पाठून येणारा हसू लागला.

शाळेच्या कॉर्नरला चार पाच मुलगे सिगरेट फुंकत... मावा चघळत... पत्ते कुटत होते.
"क्या बे चिकने..स्कुल को जाता क्या ?" एकाने चिडवले. तसा त्याने त्याच्यावर एक रागाचा कटाक्ष टाकला.
"अबे देखता क्या है.... खा जायेगा क्या ? " दुसरा ओरडला. त्याच्याकडे लक्ष न देता तो समोरच्या बुटपॉलिशवाल्याकडे वळ्ला. त्याला आपले किडलेले दात दाखवत त्याने पटकन गल्ल्यात हात घालून दोन नोटा उचलल्या व तो पळाला.
"साला हरामी" बुटपॉलिशवाला ओरडत उठला. मुलाने धावता-धावता पाठी पाहीलं व पुन्हा आपले किडलेले दात दाखवले.

शाळा समोरच होती. गेटच्या बाहेर लंगड्याने आज "शंकर पार्वती" रंगवली होती. बरीच मुले पहाण्यात दंग होती. येणारे-जाणारे हात जोडून, नाणी फेकून जात होते. शेजारच्या पेपर स्टॉलवर एक हवालदार पेपर वाचत होता. पलिकडे एक बुटपॉलिशवाला आपला लाकडी डबा वाजवत पादचार्‍याचे शुज न्याहाळत होता.

मुलगा शाळेच्या गेटवर पोहोचला. त्याला ती इमारत फार आवडायची. समोर दोन पुतळे होते. ते कोण .. हा प्रश्न बर्‍याच दिवसापासून त्याच्या मनात घोळत होता. त्याने एका मुलाला थांबवले.
"ए सुन."
"क्या ? "
"वो कौन है ? " मुलाने पुतळ्याच्या दिशेला बोट केले.
" वो महात्मा गांधी."
"म्हात्मा बोले तो ?" मुलाचा पुढचा प्रश्न.
"मालुम नही. और वो दुसरे है ना वो चाचा नेहरू. आज उनका जन्म दिन है |"
"इत्ते बडे हो गये फिर भी ? "
"वो कबके मर गये | लेकीन टिचरलोग करते है |" तेवढ्यात घंटी वाजली व त्याचा तास संपला.

"चाचा नेहरू अमर रहे|'' शाळेत आवाज घुमतो आणि बाहेर त्याच्यासारखी इतर मुले त्याच्यासोबत ओरडू लागली.
"चाचा नेहरू अमर रहे|''
वॉचमन धावत आला व मुले पांगली. एकाच्या पाठीवर निसटता दांडा बसला. वॉचमनच्या चेहर्‍यावर जिंकल्याचा भाव आला आणि मुलाच्या तोंडून निघालेला चित्कार चाचा नेहरूच्या चेहर्‍यावर दिसला.

मुलांचा कोलाहल ऐकून तेथून जाणारे फॉरेनर्स थांबले. त्यांनी कॅमेरे सरसावून इथल्या भविष्याचॅ सुरेख फोटो घेतले. त्यांना पहाताच मुलांनी हात पसरले. काही मुले सरळ पाया पडायला लागली. गोंधळलेले गोरे त्यांना हाकलू लागले. कचर्‍यावर भिनभिनणार्‍या माशांसारखी मुले त्याच्याभोवती नाचू लागली. गोर्‍यांनी त्रासातून जीव वाचवायला थोडी चिल्लर फेकली व एकच हंगामा झाला. एवढा वेळ तो मात्र तमाशा बघत उभा होता. चिल्लरसाठी तोही त्या गदारोळात सामिल झाला. ज्यांना मिळाले ते खुश झाले. ज्यांना नाही त्यानी गोर्‍यांच्या खानदानाची वरात काढली.

हा सारा तमाशा उघड्या डोळ्यानी पाहणारा हवालदार पेपर खाकेला मारून निघाला.
"साब....... दो रुपया .." पेपरवाला हळूच बोलला.
"पळून नाय जात. देतो वाचून." हवालदार गुरगुरला. "चल रे पॉलिश मार्....कलर लाव" बुटाला त्याच्या लाकडी फळीवर टेकवत हवालदारने फर्मावलं. बुटपॉलिशवाल्याने त्या जीर्ण बुटांकडे पाहील व मग गपगुमान फडका मारून ब्रश फिरवायला लागला. हवालदार पुन्हा पेपरात बुडाला.

बुटांवर शेवटचा हात मारून बुटपॉलिशवाल्याने गल्ल्यातली नोट हवालदाराच्या हातात सरकवली. हवालदार वळताच पेपरवाला चपळाईने सरसावला.
"साब, पेपर ?'' हवालदाराने उपकार केल्यागत पेपर भिरकावला. दांडा फिरवत तो निघाला. समोर लंगड्याने काढलेल्या चित्रावर जमलेली चिल्लर हवालदाराच्या नजरेत खणखणली.
"कोणा ****ने केलेयं हे ? " हवालदार किंचाळला.
"सलाम साब." लंगड आपली एकूलती एक टांग व काठी संभाळत पुढे आला.
"काय रे, फुटपाथ तुझ्या बापाचा आहे काय ? चल साफ कर. चुकून कुणाचा पाय पडला तर दंगल उसळेल इथे." हवालदारने दांडा जमिनीवर आपटत आपल्या अधिकाराची व पुसटत्या भविष्याची जाणिव करून दिली. लंगडने शर्टाच्या बाहीतली पन्नासची नोट पुढे केली.
"*** **, एवढे कमवतो, ते फुंकतो आणि द्यायची वेळ आली ....****" नोट झपटून हवालदाराने दांडा फिरवला आणि एका अस्पष्ट आवाजासह लंगड तिथेच बसला. हवालदार पानवाल्याच्या दिशेला वळला. त्या मुलाने लंगडला सावरलं.
"चल मावा लाव. भोला ..कच्चा पक्का..सौंफ.." हुकूम ठोकून हवालदाराने पलिकडील वडापाववाल्यावर नजर टाकली. त्याने तेथूनच सलाम ठो़कून नोंद घेतल्याची जाणिव करून दिली.
"स्टार मारला काय रे ? " पानवाल्याने मान होकारार्थी हलवली. तरीही मावा नीट चेक करून हवालदाराने तो तोंडात टाकला व मग विल्स एक पाकीट उचलून तो वडापाववाल्याकडे वळला.

रस्ता क्रॉस करून मुलगा सिग्नलला आला. सिग्नल लाल झाला आणि गाड्या करकचून थांबल्या. एक दोघांनी तरीही पुढे दामटल्याचं. सावलीतल्या ट्रॅफिक हवालदाराने नंबर नोट केले व वॉकीटॉकीवर सुरू झाला. उनाड मुलांसारख्या एक-दोन मोटारसायकली दोन कारमधल्या रिकाम्या जागेत कडमडल्या. मळका कपडा उडवत दोन मुले गाड्यांकडे धावली. गुलाबांचे गुच्छ व गजरे घेऊन मुली गाड्यांच्या खिडकीतून डोकावू लागल्या. एक दोघांनी तत्परतेने काचा चढवल्या. पेपरवाले, डस्टरवाले व फळवाले आवाज देऊ लागले. बोंबलणार्‍या गाडीवाल्यांकडे लक्ष न देता मुलं गाडीवर फडका मारत होती. एकाने कारवाल्याचे लक्ष दुसरीकडे जाताच काचेवर थुकून जोर जोरात कपडा फिरवला. बरेच तत्पर लंगडे भिखारी कुबड्या संभाळून तर बायका कमरेवरच्या मुलांना चिमटा काढून हात पसरू लागल्या. सिग्नल हिरवा झाला. गाड्या निघाल्या. फडके मारणारी मुले गाडीवाल्यामागे पैशासाठी धावली. दुसर्‍या बाजूस गाड्या थांबल्या व सारे प्रॉशेनल्स त्या दिशेला वळले.

हवालदार आता नजरेआड झाला होता. मुलगा वडापाववाल्याकडे पोहोचला. तिथे आधीच एक मुलगा हात पसरून उभा होता. मुलाने खिशात एक हात घालून चिल्लर तपासली. स्वतःही त्या मुलाशेजारी हात पसरून उभा राहीला. आधीच्या मुलाने त्याला धक्का मारून दूर सारण्याचा प्रयत्न केला. तसा तो सराईतपणे हातघाईवर आला. धंदयाच्या वेळेस दोघांची हाणामारी पाहून वडापाववाल्याने दोन पाव त्याना आवाज देत त्यांच्या दिशेने फेकले.
"ये ..येलो और भागो इधरसे | " पहल्या मुलाने एखाद्या सराईत विकेट कीपरसारखे ते झेलले व तो पळाला.
"पकड हरामीको, तेरा पाव लेकर भागा..." वडापाववाला अंपायरच्या थाटात ओरडला आणि आपल्या हक्काचा पाव घेण्यास तो त्याच्या मागे धावला.

गर्दी चिरत पहिला मुलगा रेल्वेलाईनच्या दिशेने धावला. गाड्यांची ये-जा चालू होती. दोघेही फिल्मी स्टाईलने रेल्वे रूळातून धावत होते. रेल्वेलाईनच्या बाजूस असलेल्या झोपडीवासीयांचा दैनंदिन कार्यक्रम बहारदारपणे चालू होता. रूळांचे काम चालू होते. गाढवं माल वाहत होती. उघडे कामगार पुर्ण ताकत लावून खेचाखेची करत होते. बायका पाठीवर मुलं व डोक्यावर घमेलं हा कसरतीचा प्रकार
सहज सांभाळत होती.

ते दोघे एव्हाना रेल्वे प्लॅट्फॉर्मवर पोहोचले. टॉयलेटच्या भिंतीला चिटकून पहिला मुलगा धापा टाकू लागला. दुसरा तोपर्यंत तेथे पोहोचला. पहिल्याने पाव पुढे केला व विजयी मुद्रेने दुसर्‍याने तो हस्तगत केला. दोघे पाव चावत बसले.

प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागली. मुलगा स्टॉलवाल्याकडे पोहोचला.
"पानी ? "
स्टॉलवाल्या भय्याने प्लास्टिकचा ग्लास पुढे केला. पाण्याचा ग्लास घेऊन तो शेजारीच चहा-बिस्कीट हादडणार्‍या माणसाकडे रोखून पाहू लागला. त्या माणसाने एक बिस्कीट पुढे केले. बिस्कीट घेऊन आता तो त्याच्या हातातल्या पुड्याकडे पाहू लागला. माणूस हसला व त्याने दोन बिस्किटे त्याला दिली. बिस्कीट पाण्यात बुड्वून तो पटापट खाऊ लागला. तोपर्यंत स्टेशनवरची बाकी मुले जमा झाली. त्यानी त्या माणसाला घेरले. कोणी पॅन्ट तर कोणी शर्ट खेचू लागले. वैतागून तो चहा सोडून ट्रेनकडे वळला.

शेवटचा तुकडा तोंडात टाकून मुलगा पायर्‍याकडे वळला. वर जाऊन तो रेलिंगला टेकून येणार्‍या-जाणार्‍या गाड्या व लोकांना न्याहाळू लागला. कुणी आंधळा लॉटरीची तिकीटे विकत होता, कुणी अगरबत्ती तर कुणी वह्या व पासकवर. एक मुलगा लिंबूसाठी तर दुसरा फिनेलच्या गोळ्यासाठी आवाज देत होता. एक थोटा तिथेच आडवा पडून "या अल्ला" अशी दुहाई देत होता. कोपर्‍यात एका फाटक्या कपड्यावर एक लहान मुल झोपून होतं. त्याच्या समोर थाळीत एक ब्रेडचे अर्धे पाकीट व बरीच नाणी पडली होती. एक जैन म्हातारी जाता-जाता थाळीत दोन केळी टाकून गेली. मुलाची नजर त्या केळ्यांवर अडकली. तेवढ्यात लक्तरांत असलेली एक बाई तिथे आली. तिने ब्रेडचे अर्धे पाकीट, नाणी व केळी आपल्या झोळीत टाकून रिकामी थाळी परत ठेवली. काहीतरी आठव्ल्यागत तिने दोन-चार नाणी परत थाळीत टाकली. झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून ती निघून गेली. मुलगा स्टेशनच्या बाहेर जाण्यास जिन्याकडे धावला.

धावता-धावता थबकला. नुसत्या अर्ध्या चड्डीतला एक मुलगा बेंबीच्या देठापासून आवाज काढून रडत होता...
"....या अल्ला..मेरी माँ बीमार है...अस्पतालमे है... दवा के लिए पैसे नही ...भुख लगी है... खानेके लिए पैसे नही..... या अल्ला...क्या करू...मदद ....या अल्ला...."
त्याच्या रडण्यातही एकेक शब्द स्पष्ट ऐकू येत होता. डोळ्यात मात्र टिपूस नव्हता. मुलाला ही पैसा कमवण्याची नवी आयडीया आवडली. त्या नादात तो धावला आणि एका कुणालातरी आपटला. दुसर्‍या क्षणाला मुलगा, फळांची टोपली व भय्या .. तिघेही जमीनीवर होते. भैय्या भोजपूरीत चालू झाला. शिव्या देता-देता तो टोपली भरू लागला. भेदरलेला मुलगा त्याला चार फळे उचलून देऊ लागला.
"साला हरामी.." भय्या त्याच्या नजरेला नजर भिडवून ओकला. फळांचे हात थांबले. मागे सरले. आपल्या शब्दकोशातील एक दर्जेदार शिवी हासडून मुलगा पळाला.
"चोर.... चोर...." भैय्या तिथल्या तिथून ओरडला. एक दोघे मुलाच्या मागे धावले. मुलगा धावता-धावता मेन रोडला पोहोचला. त्यातही त्याने मागे कोण आहे ते पहाण्यास मान वळवली आणि समोरून येणारा ट्र्क त्याच्या नजरेतून चुकला. दुसर्‍या क्षणाला एक किंकाळी आसपासचा सारा परिसर स्तब्ध करून गेली. फांदीपासून विलग झालेल्या पानासारखे ते शरीर वार्‍यावर लहरलं आणि क्षणार्धात रक्ताने माखून रस्त्यावरच विसावलं. फळं विखरली. एक मात्र त्याच्या हातातचं राहीलं.

गर्दी जमा झाली. दोन हवालदार आवाज देत आले. लोकांचा घोळका किंचीत पांगला. गर्दीतल्या एका मुलाची नजर त्या हातातल्या फळावर होती. तो मुलगा गर्दीतून बाहेर आला. त्याचे लक्ष समोर पडलेल्या सफरचंदावर गेले. त्याचा चेहरा खुलला. त्याने फळ उचलून शर्टाने पुसले. गर्दीवर एक नजर टा़कून फुटपाथवरच्या खाली बसस्टॉपवर बसला. एक घास खाताच तो स्थिरावला. पटापट सफरचंद खाऊ लागला.

गर्दी वाढू लागली. ट्रॅफीक जाम झालं. एक टॅक्सी समोर येऊन अडकली. आत एक गर्भवती कण्हत होती.

शहर............. अस्तव्यस्त पसरलेलं....आ वासलेल्या अजगरासारखे....

गुलमोहर: 

रोज हेच पहातो, अनुभवतो आपण ..गेंड्याच्या कातडीनं.. पण तरिही वाचताना काटा आला अंगावर.. सुन्न वाटतंय.. बाकी काही प्रतिक्रिया देणं शक्यच नाही मला..

"मै इदरिचसे आया था...अकेला......मेरा माँ बाप नै आया| सब लोग अपना माँ बाप के साथ आताय | मेरा माँ बाप आजतक मेरेको देखनेको क्यूं नै आया ? ''>>>> सुन्न वाटलं.
----------------------------------

If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

बोचरं सत्य कौतुक!! Sad बोचतं रोज, पण रोज दुखत नाही, हे खरं दुखणं!!
'झिपर्‍या' आठवलं!! त्यातही झिपर्‍या आणि त्याच्या मित्रांची जगण्यासाठीची लढाई वाचुन खुप त्रास होतो.

वर्णन जबरा केलय सगळ.
सुन्न झालो. Sad

मी पण सुन्न Sad

कौतुक... तुझी कथा वाचताना कथा वाचतोय अस वाटतच नाही.. ती डोळ्यासमोर घडतेय व आपण ती बघतोय असच वाटत... आज बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर आलो व तुझ्याच २ कथा वाचल्या.. एक ही व दुसरी शक्य.. अशक्य.. दोन्ही गोष्टी मस्तच!. तु सुद्धा बो- विश,दाद,चाफ्फा,पूनम्, नंदिनी यासारख्या मायबोलीवरच्या प्रथितयश कथा लेखकांच्या पंगतीत शोभुन दिसतोस....

ही कथा वाचताना मिरा नारायणचा सलाम बाँबे हा चित्रपट आठवला...

आभार. सर्वाचे. मुकूंद, 'प्रथितयश ' म्हणजे फार झालं. हा सारा लेखाजोखा आहे भोवतालचा. टिपण्याचा एक प्रयत्न. लिखाणात त्रूटी आढळ्ल्यास नक्की कळवा. व्याकरणाची जरा बोंब आहेच.

कौतुक, काय लिहीतोस रे !! मुकुंद ना अनुमोदन.
शेवटचे ३ परिच्छेद हे अजब वर्तुळ पुर्ण करतात.

कौतुक, आता काय कौतुक करु तुझे?
अक्षरशः खिळवुन ठेवलेस.........

अप्रतीम लिहील आहेस दोस्ता Happy

सुन्न.. Sad
प्रत्यक्ष अनुभवल्यासारखे वाटले.. तुमच्या लिखाणाची कमाल.. !

कौतुक, मस्त लिहिलंय.... मला सुरुवातीला केलेलं शहराचं वर्णन खूप आवडलं...
वर मुकुंदने म्हटल्याप्रमाणे सगळं डोळ्यांसमोर घडतंय असं वाटतं...

कौतुक ने आधी लिहीलेले काही आवडल्याने सहज उघडले आणि या वर्णनाने पूर्ण खिळवून ठेवले. काय जबरदस्त लिहीले आहे. मुकुंद शी एकदम सहमत!

छान लिहितोस कौतुक.
शिर्षक मात्र 'भूक' असंच वाचलं बर्का!

अतीव वेदनादायी आहे.... कौतुक. ह्यातच सारं आलं.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया