=======================================================================
=======================================================================
कंपूचे नाव : उनाडके
ठिकाण: माळशेजघाट परीसर
सहभागी माबोकर:
रोहित मावळा (रोमा) - रोहित निकम,
Yo Rocks (यो)- योगेश कानडे
जिप्सी - योगेश जगताप
सेनापती (सेना) - रोहन चौधरी
इंद्रधनुष्य (इंद्रा) - दत्तराज खताते
=======================================================================
=======================================================================
पर्यटकांचा आकर्षण बिंदू 'अणे माळशेज' घाट म्हणजे महाराष्ट्राचं 'कुलू-मनाली'!!! ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नरला जोडणार्या या घाट रस्त्यावर सह्याद्रीच्या रांगड्या सौदर्यांचा अप्रतिम नजारा पहावयास मिळतो. माळशेजच्या या डोंगर रांगेवर दुर्लक्षित, परंतू सुंदर आणि रमणीय असे अनेक देखावे आपणास पहावयास मिळतात. 'गर्जा महाराष्ट्र माझा!' या गटलेखन स्पर्धेच्या भटकंती विशेषसाठी 'माळशेज' जवळील ठिकाणांची जाहिरात करताना आम्हाला फार आनंद होत आहे.
“माळशेज घाट" परीसरात विसावलेले, चला पाहू हे "माणिकमोती"
चला तर मग... तुम्हीही सामिल व्हा आमच्या सोबत.. आमच्या या स्वर्गीय आठवणीच्या ताफ्यात...
वारकरी जसे सालाबाद प्रमाणे पंढरीची वारी करतात तशीच काहिशी भावना "माळशेज " वारी करताना मनात दाटते. जुलै-ऑगस्ट दरम्यान जणू येथे स्वर्ग अवतरलेला असतो. पावसाळ्यात येथे धबधब्यांची मांदियाळी असते. या घाटाचे पहिले दर्शन होते ते हिरव्यागार डोंगरातून कोसळणार्या शेकडो जलप्रपातांसहीत. कोणत्याही रसिक मनाला मोह पाडणारा तो नजारा असतो. तुम्ही जसजसे घाटातून वर जात रहालं, तस तसे काही धबधबे अगदी तुमच्या जवळ येतील आणि हलकेच कवेत घेतील. उंच डोंगरावरून कोसळणारे काही धबधबे तर सरळ खाली न येता वार्याच्या झोताने परत वर जातात. सृष्टीचे ते अद्भुत सौंदर्य स्तिमित करणारे असते. आपल्याला पाहिजे त्या लांबी, रुंदी, उंचीचा आणि फोर्सचा धबधबा निवडता येईल एवढ्या विविध रूपात धबधबे येथे कोसळत असतात.
एखाद्या शोडषवर्षीय तरूणीला लाजवेल असे सौंदर्य माळशेज घाटाचे पावसाळ्यात असते. वळणावळणाचा रस्ता म्हणजे तिचा कमनीय बांधा, निसर्गात फुललेला हिरवा रंग म्हणजे तिने ल्यायलेला शालुच जणू, क्षणात दाटणारे धुके म्हणजे चेहर्यावर पदर घेऊन लाजणारी नवतरूणी, डोंगरदर्यातुन कोसळणारे धबधबे म्हणजे एखाद्या अवखळ तरूणीचे खळाळते मोहक हास्यच. पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडावे अशी एक रमणीय जागा.
"सॉल्लिड"!!! रो.मा. समोरचा नजारा पाहून थबकलाच.
घाटातला तो एक-दिड किलोमिटरचा आडवा पट्टा तर लाजवाब होता... वरुन धबधब्यांचा अभिषेक आणि खाली दरीत धुक्याचे साम्राज्य!
"अरे एऽ... चहाची टपरी मागे गेली... गाडी थांवबा"... मी आराडाओरडा करताच सेन्याने गाडी थांबवली.
'शेठ... पाच पेशल द्या'... मी ऑर्डर सोडली. "वडे गरम आहेत का?"
"हाईत की... किती देऊ?"
"द्या की पाच पिलेट" :p दुसरी ऑर्डर सुटली.
"बांबेवरना आलात का?" टपरीवाल्याने चौकशी केली.
'होय... तुम्हाला कसं कळलं?' चहाचा ग्लस घेत सेनापतीने विचारलं.
"या रामभावचा जन्म गेला की इथं... कोन कुठलं वळखायला येळ न्हाई लागत".
'हातात आल्याचा कडक चहा आणि समोर धबधब्यांची जत्रा.. बस्सं. आता इथंच थांबाव'. पण नाही, वाफाळत्या चहाचा चुटका घेत रो.मा.ने काडी टाकली. "काय ओ रामभाऊ... नानाचा अंगठा ही काय भानगड आहे? ... आणि हा नाना कोण म्हणायचा?"
"कसयं बाळा... हि भान्गड बिन्गड काय नाय... समदा देवाचा चिमित्कार हाय बग... पण त्यासाठी जरा पाय हलवाव लागतील... ते कातकरी लोक गुरं घेऊन डोंगरात जातात नव्हं, चराया.. तसच ती डोंगरयेडी लोकं पाठीवर धोपटी मारुन आडवाटनं डोंगर-दर्यात कुठं कुठं फिरत असतात... त्यांनीच लावलाय तो शोध".
"कसला शोध?" रो.मा.
"आता कसयं म्हायतीय का? तो एक डोंगुर हाय.. नाना-बिना कोन नाय... आकारान अंगठ्यासारखा दिसतोया... आनी वर जायला जुनाट घाटवाट हाई... तेला 'नाणेघाट' म्हणत्यात... त्याची पन एक कहानी हाय बघ... लय जुन्या म्हंजी बग हजार दोनहजार वर्सान्पुर्वी सातवाहन कालात कोकनातून घाटावर जायला दगडांचा बांधिव घाटमार्ग बांधला... डोंगुर फोडुन व्यापारासाठी घाट रस्ता तयार केला. पयल कल्यान बंदरात जहाजातुन माल यायचा, अन मंग तो माल घोडं नी बैलावर लादून वर घाटात आनला जायचा. तुमी कसं रस्त्याने जाताना टोल भरता... तस त्या येळी व्यापारी लोकं घाटा वर गेल्यावर एका थोरल्या दगडी रांजणाचा जकात भरत... तुमी जर वाट वाकडी करुन वर गेलात तर तुम्हास्नी बी तो भलाथोरला रांजण गावल."
"खरच जायला पाहिजे.." रो.मा.
"घाटात एक गुहा बी हाय.. तीच्यात आकड्याच्या भाशीत दगडावर काय बाय कोरलय... ते भटके लोक त्याला 'शिलालेख' म्हणत्यात... पन वरुन लई झ्याक नजारा दिसतो बगा."
"वरना ज्या दोन डोंगररांगा दिसतील... त्यातला डाव्या बाजुला अजनावले, निमगिरी, हडसर तर उजव्या बाजुला जीवधन, चांवड, शिवनेरी अशा डोंगररांगा पसरलेल्या हाईत.. अन मध्ये कुकडी जलाशय पसरलेला हाई."
"अरे वा रामभाऊ... तुम्हाला बरिच माहिती दिसतेय की..." रो.मा.ने कौतुकाने विचारले.
"हाय खरी... जन्म गेला नव्ह इथंच" रामभाऊची कॉलर टाईट
अरे यो तुला माहितीयं का? आमचा ऑफिसचा गृप पण माळशेजचा प्लॅन बनवत होता... पण मला ना तिकडच्या धबधब्यात भिजून वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी वेगळे करायचेय.. ट्रेकींग करण्याची हौस आहेच तशी.. पण नेहमीची संथ रम्य भटकंती नकोय.. काहीतरी थ्रिलींग हवेय.. बोले तो एकदम चाबूक ट्रेक.... तसे बाईक वरुन बरेच किल्ले पालथे घातलेत.. इकडचे पण डोंगर-किल्ले करेन म्हणतोय... नाणेघाट, हरिश्चंद्रगड वगैरे...
"हरिश्चंद्रगड!!!" यो रॉक्स मनातल्या मनात उडी मारत म्हणाला... "हरिश्चंद्रगड करायचा तर नाळीच्या वाटेने... अगदी चाबूक ट्रेक... घाम फुटलाच म्हणून समज!"
अरे व्वा.. सॉल्लिड तर.. तिकडचे जातो मग.. माझ्यासारखे दोघातिघांना घेउन..
"ओय वेडा की खूळा तू.. जरा पावसाळा जाऊ दे, मग जा.. तशी काही ट्रेकने झपाटलेली मंडळी करतात तो ट्रेक पावसात.. पण तुम्ही नवख्यांनी जरा सांभाळूनच.. ती वाट नेहमीसारखीची पायाखालची वाट नाही... फक्त सॅक पाठीवर घेतली की संपत नाही... रोप बाळगलेला बरा.. चढाईचा पक्का अनुभव हवा.. शक्यतो नियमित जाणार्या ट्रेकींग ग्रुपसंगे गेलात तर उत्तम"
असे आहे का ? आणि काय काय?
"नाळीची वाट ही हरिश्चंद्रगडावर जाणार्या अवघड वाटांपैंकी एक. थेट कोकणकडयाला आलिंगन देतेय असे वाटणारी ही वाट.. एकदा चढण सुरु झाले की सातत्याने अंदाजे ८० कोनात चढणारी वाट.. वाटेत भेटते ती फक्त दगड-खडकांची फॅमिली.. त्यातही कुठला दगड विश्वासघात करेल याचा अंदाज हवा.. वाटेत पाण्याचा स्त्रोत अगदी सुरवातीलाच .. नंतर तुमची कसोटीच! वाटेत लागणारे १०-१५ फूटांचे असे 'रॉक पॅच'.. हळुहळू अरुंद होत जाणार्या घळीतून जाणारी ही खडतर वाट म्हणजेच नळीची वाट.. ह्या नळीच्या वाटेतून वरती आलो की सुप्रसिद्ध कोकणकडा स्वागतासाठी सज्ज असतो.. तर एका बाजूस तारामतीचे शिखर आभाळाला स्पर्श करताना दिसते.. चढाईला सकाळी सुरवात केली की वर पोहोचेस्तोवर संध्याकाळ होते.. मग काय आपले अस्तित्व विसरुन कडयावरूनच 'सुर्यास्तसोहळा' बघत रमायचे!"
खरच या वाटेबद्दल ऐकून कुतूहल वाढलेय.. योग्य संधी मिळताच पुर्वतयारीने जाईन म्हणतो, पण सुरवात कुठून कशी करायची?
''अरे इथे जायचे तर हाती दोन दिवस हवेत.. हिवाळ्यात कधीही जाण्यास योग्य.. कल्याण ते सावर्णे बस (वेळ अंदाजे- दिडदोन तास, अंतर - ९०किमी) पकडायची.. सावरण्याहून बैलपाडा (वल्हिवरे) हे पायथ्याचे गाव गाठायचे.. गाडीरस्ता आहे तसा पण नियमित ट्रेकर्स चालतच (अंदाजे दोन-अडीच तास) जातात.. रात्रीची वेळ निवडलीत तर भरचांदण्यात पदभ्रमंती हा एक सुखावह अनुभव घेता येतो.. बैलपाडा गाव तसे छोटे.. विनंती करून घरच्या अंगणात झोपण्याची सोय होउ शकते.. सोबत चहापाणीदेखील.. गावाच्यामागूनच वाटेला सुरवात होते.. ज्यांना वाट झेपणारे नाही वा नाहीच जमले तर खालूनच कोकणकडा न्याहाळून माघारी फिरायचे.. तेही नसे थोडके"
सहीच रे!!!.. मी छाती फुगवत म्हणालो... ह्या नळीच्या वाटेने एकदा गेलं म्हणजे स्वतःला 'पट्टीचा ट्रेकर' अशी पदवी तरी जोडून घेता येईल.. आत्तापासूनच तयारीला लागतो.
"हो हो... खरयं ते... पण धाडसी वृत्तीखेरीज संयम व सुरक्षितता सोबत राहूदे, म्हणजे नक्कीच पदवी मिळेल बघ".. यो रॉक्सने सुरक्षेचा मुद्दा मांडला.
नक्कीच... तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदैव पाठिशी असताना भीती कशाची?
"ते तर आहेच रे... पण हरिश्चंद्रगडावर नळीच्या वाटेने जाणं हे एक धाडसच आहे. त्या वाटेची यशस्वी चढाई केल्यावर पाहण्यासारखे खूप काही.. श्री गणेशांची पाषाणातील मुर्ती असलेली गणेशगुंफा, हेमाडपंती बांधणीचे सुरेख असे हरिश्चंद्रेश्वर मंदीर व त्याच बाजूस असणारा पुष्करणी तलाव.. तर एका बाजूस केदारेश्वर गुहा आहे, जिथे चोहोबाजूंनी वेढलेल्या थंडगार पाण्यामध्ये भल्यामोठया आकाराचे शिवलिंग आहे. सारे काही अचंबित करणारे.. न चुकवण्यासारखे.. मुक्काम करायचा तर हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या परिसरात किंवा गुहेत.. सुट्टी वा सप्ताहांताच्या दिवशी गेलात तर जेवणासाठी 'बद्री'नावाचा आचारी असतोच पिठलाभाकर बनवायला.. आणि पिण्याच्या पाण्यासाठी हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या आवारातील पाण्याच्या टाक्या आहेतच.. हे सारी काही तुम्ही अनुभवता ते तब्बल ४५०० फूट उंचीवर.. गेलात तर एक अविस्मरणीय आठवण नक्कीच घेउन याल याची १००% खात्री देतो".
"अगदी खरयं"... इंद्राने मौन सोडले. "तो कोकणकडा म्हणजे नागाचा फणाच जणू! कड्याच्या डोक्या खालचा तो दिडदोन हजार फुटांचा ओव्हरहँग बघताना वेड लागत".
इंद्रा हाताचा फणा करत सांगत होता... ते वर्णन ऐकून माझ्या पोटात गोळाच आला..
इंद्रा बोलत होता "आमची तर बोलतीच बंद झाली होती ते रौद्रभीषण पहाताना.. अंदाजे पाचशे ते सातशे मिटर परिघ व्यापलेला त्या अर्धगोल कड्याने पोटाच्या भागात दोन हजार फुटांची खोलगट पोकळी बाळगली आहे. त्या काळाकभिन्न कातळ कड्यावरुन सह्याद्रीचे साहसविर रॅपलिंगच्या सहाय्याने ती १८०० फुटांची पोकळी अंधातरी उतरतात बरे... त्या पोकळीत घारींचा आणि गिधाडांचा मुक्त वावर असतो. काय ते धाडस... डोळ्यांवर विश्वास बसेल तर... शपथ!" मला तर ते इम्याजीन करुन गरगरायला लागलं.
इंद्रा पुढे सांगू लागला... "पावसाळ्यात या बेलाग कड्यावरुन दिसणार्या 'इंद्रवज्र'च्या दर्शनासाठी भटके लोक आठवडा भर गडावर मुक्काम करतात. पावसाळा ओसरल्यावर मात्र माळशेज घाटातूनही कोकणकड्याचे विलोभनीय दृष्य दिसते. पण कोकणकड्याचे खरे रौद्ररुप अनुभवायचे असेल तर पायथ्याच्या 'बेलपाडा' गावातच जावे".
'जबरीच रे'... गरमा गरम वडा तोंडात टाकत म्हणालो... 'अरे पण या अनघड वाटां व्यतिरिक्त सोप्या रुळलेल्या पायवाटा ही असतीलच की?'
"आहेत ना"... इंद्राने पुस्ती दिली... "सगळ्यात सोपी म्हणजे पाचनईची वाट आणि दुसरी वाट म्हणजे 'टोलार खिंडी'चा मार्ग... जी खिरेश्वर गावातून जाते. या मार्गात अकराव्या शतकातील यादव कालिन शिवमंदिर आहे. माळशेज घाटा नंतर येणार्या खुबी फाट्या पासून ५ कि.मी. अंतरावर 'नागेश्वराचे' सुंदर मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या बाहेर असलेल्या सभामंडपाच्या छताला शिल्प पट्टीका बसविलेली आहे. गाभार्याच्या आत दाराच्या चौकटीवर शेषशायी विष्णू व परिवाराचे कोरिव शिल्प आहे. मंदिरातील पाषाणावर अनेक कोरिव प्रतिमा आढळतात. त्यात मयूरवाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेर, हंसवाहन ब्रम्हा सरस्वती, मूषकवाहन गणेश, वृषभवाहक शंकरपार्वतीचे दर्शन होते."
'अरे पण तिथ जायच कसं?' दोन वड्याने भूक भागल्यावर मला चिंता करण रास्तच होतं.
"खुबी फाट्याला उतरल की पिंपळगाव धरणाच्या रस्त्यावरुन चालत किंवा गाडीने खिरेश्वर गावा पर्यंत पोहचता येतं". इंद्राने चिंतेच निरसन केलं.
अरे वा... पिंपळगाव धरण! मी तर ऐकलयं की, सप्टेंबर दरम्यान तिथे रोहित पक्षी येतात.. आपण जाऊया का आज???
"उताविळ जिप्सी, कॅमेर्याला लेन्स लावी"... इंद्राने बाण सोडला
"जाऊया ना... खिरेश्वर गावात जेवणाची चांगली सोय आहे... दुपारच जेवण तिथेच करु आणि हडसर्-निमगिरीला जाऊ"... आता सेन्याने पुढाकार घेतला.
'अरे पण जायच कसं? रस्ता माहित आहे का?' मी सेन्याला प्रश्न टाकला.
"हे काय गणेश खिंड उतरल्यावर उजव्या बाजुचा रस्ता पकडायचा... की सरळ गावात अन मग विहिरीकडुन वाटेला लागायच. हा पन हडसरास जायचे तर पुन्हा गावात येऊन थेट हडसरवाडीला जाव लागेल... निमगिरी आणि हडसरास कोरीव पायर्या अगदी सुबक आहेत" सेना त्याच्या ट्रेकचा अनुभव सांगू लागला.
"दोन्ही किल्ले बघुन आल्यावर माझे डोळे खरेच दिपलेले होते. माणिकडोह जलाशयाच्या परिसरात आणि थोडे आडवाटेला असणारे हे २ अप्रतिम दुर्ग. खरोखर दुर्गम दुर्ग".
आम्ही मन लाऊन सेनापतीच बोलणं ऐकतं होतो...
"निमगिरीचा किल्ला हा जोड़किल्ला आहे. गावातून निघाल की शेता-बांधाच्या मधून थेट खिंडीच्या दिशेने जायला लागले की वाट बाजरीच्या शेतामधून जाते. उजवीकड़े दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. निमगिरी चढ़ताना पाठीमागे शहाजीसागर जलाशयाचे म्हणजेच माणिकडोहचे विहंगम दृश्य दिसत राहते. हडसरच्या बांधीव पायऱ्या खुपच सुंदर आहेत. आणि त्या अश्या बांधल्या आहेत की समोर येईपर्यंत काही दिसत नाहीत. साधारण १००-१५० पायऱ्या चढून गेलो की समोर तटबंदीची भिंत लागते. दरवाजा एकसंध व कोरीव आहे आणि वरच्या बाजूला डावीकड़े लपलेला आहे. तिकडून आत गेल की आतली तटबंदी लागते. एकसंध पाषाणामधून कोरुन काढलेल्या ह्या पायऱ्या म्हणजे दुर्गबांधणीमधला एक उत्तम नमूना आहे. ती कारागिरी पाहून डोळे खरच दिपतात".
माझ्या काही पुण्यातील मित्रांनाही घेऊन येईन म्हणतो.. पण त्याना इथं येण तस सोईच पडेल का?
"अर्थातच... पुणेकरांनी 'खुबी' पार करुन 'जुन्नर मार्ग' सोडावा आणि 'निमगिरी' गावात शिरावे. निमगिरी किल्ला गावाबाहेरच उभा आहे. इथुन थोड्या अंतरावर 'हडसर किल्ला' आहे. निमगिरीवरुन वाहनाने इथपर्यंत पोहोचता येते. पुण्याकडुन जुन्नर मार्गे आत आल्यास आधी हडसर लागेल आणि मग निमगिरी. ही ठिकाणे जरा आडवाटेला आहेत... इतर वेळी यायचा प्लॅन केलास तर स्वतःचे वाहन असल्यास उत्तम".. इती सेनापती.
धो-धो धबधब्यांनी, मन भरेल काठोकाठ
सात टेकड्या ओलांडुन बघा, हरिश्चंद्रगडावरची पहाट
रांगडा कोकणकडा पाहुन, पडाल तुम्ही चाट
दगडी रांजण पाहुन, टाका आणे आठ
कोरीव पायर्या बघुन, डोळ्यांसमोर होईल लखलखाट
व्हा उनाडके, आणि भरू द्या तुमच्या आनंदाचा माठ
=======================================================================
=======================================================================
म्हणतात ना भटकंती करायला अख्खे आयुष्य अपुरे पडते आणि केवळ महाराष्ट्राच्या भटकंती विषयी बोलायचे झाले, तरिही वेळ-काळचे बंधन झुगारुन चालणार नाही. आम्ही अनुभवलेल्या या संस्मरणीय भटकंती दरम्यानच्या ठिकाणांची माहिती आपणा समोर सादर करण्याची संधी मायबोली गणेशोत्सव संयोजकांनी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव आभारी राहू.
व्वा वा!!! अजुन वाचले नाहिये
व्वा वा!!!
अजुन वाचले नाहिये पण या 'उनाडक्यां'ची नांव वाचुनच बेस्ट लेख असणार याची खात्री आहे
वाचुन परत प्रतिक्रिया देते.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
(No subject)
मस्त लिहिलयस!
मस्त लिहिलयस!
जिप्स्या, जबरी लिहिले आहेस.
जिप्स्या, जबरी लिहिले आहेस. जाम आवडेश
वा जिप्सी - यावेळेस कॅमेरा
वा जिप्सी - यावेळेस कॅमेरा सोडून चक्क लेखणी चालवलीस - वा वा.... लेखनशैली सुंदर आहे रे बाबा तुझी.... मस्त, मस्त......
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
वरील संपूर्ण लिखाण हे आम्ही "पाच उनाडक्यांनी" मिळुन लिहिलंय.
So credit goes to all of us
शेवट छान झालायं.
शेवट छान झालायं.
मस्त लेख!! ग्रुपचं नाव एकदम
मस्त लेख!! ग्रुपचं नाव एकदम पर्फेक्ट
एक नंबर!
एक नंबर!
मस्त लिहलेय उनाडके सगळे
मस्त लिहलेय
उनाडके सगळे मस्तच
क्या बात है,
क्या बात है, रस्ता-वर्णन्-फोटू आणि वरताण म्हणजे ही कविता. झक्कास!
मस्तच...
मस्तच...
मस्त... मला एकदा सोप्या
मस्त... मला एकदा सोप्या वाटेने जायचे आहे रे, हरिश्चंद्रगडावर.
अर्रे! मस्तच! कस्सल्या
अर्रे! मस्तच! कस्सल्या सॉल्लेट उनाडक्या करता रे तुम्ही!
फोटो छानच नंतर पुर्ण वाचेन.
फोटो छानच नंतर पुर्ण वाचेन.
व्वा.. जबरी
व्वा.. जबरी
मस्त
मस्त
जिप्स्या तु मला विसरला....
जिप्स्या तु मला विसरला....:-(
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
सर्व उनाडक्यांचे भारी भारी
सर्व उनाडक्यांचे भारी भारी कौतुक!!!
मस्त लिहिलंय. खरंच सगळ्या
मस्त लिहिलंय. खरंच सगळ्या उनाडक्यांचं खूप कौतुक (आणि हेवा :डोमा:) वाटतो.
गिरी... कोणीकोणाला विसरलेले
गिरी... कोणीकोणाला विसरलेले नाहिये. आकडा ५ असल्याने मर्यादा आली.
५ मधून २ ग्रुप करावे आणि त्यात अजुन ५ जणांना सामील करावे असे माझ्या डोक्यात आले होते. जेणेकरून अधिक जागांबद्दल लिखाण करता यावे.
लई भारी उनाडके
लई भारी उनाडके
अफलातुन आहे.........
अफलातुन आहे.........:)
वा, मस्त जमलयं उनाडके लई
वा, मस्त जमलयं
उनाडके लई भारी आहे.
हाताने काढलेलं स्केच पण मस्त झालयं! आणि कवीता पण.
जबरी.. महान....
जबरी.. महान....
अरे... ह्या स्पर्धेत अजुन
अरे... ह्या स्पर्धेत अजुन कोणी भाग घेतय की नाही??? आम्ही नैतर बिन विरोध निवडून येउ हा..
लेखनशैली खरच सुंदर आहे आणि
लेखनशैली खरच सुंदर आहे आणि प्रचि नेहमी प्रमाणे मस्तच.
उताविळ जिप्सी, कॅमेर्याला
उताविळ जिप्सी, कॅमेर्याला लेन्स लावी"... इंद्राने बाण सोडला >>
जबरी लिखान दोस्तानो
उनाडके रॉक्स...
उनाडके रॉक्स...
Pages