"बाबा, आपली फॅमिली हिस्ट्री काय हो? आम्हाला फॅमिली ट्री लिहिण्याचा assignment मिळाला आहे शाळेत - फॅमिली हिस्ट्री for the last 10 generations!"
सोनूचा हा प्रश्न ऐकून मी चांगलाच चक्रावून गेलो होतो. आता ह्या मुलीला मी काय उत्तर देऊ? एकन्दरित काय, तर ज्या प्रश्नाने मला जन्मभर सतावले होते त्या प्रश्नाची झळ आता माझ्या पुढच्या पिढीला पण जाणवू लागली होती तर!
माझे आई-वडील माझ्या लहानपणीच एका अपघातात गेलेले. त्यानंतर माझे संगोपन शारदा आंटी आणि निशी अंकल यांनीच केले. शारदा आंटी आणि निशी अंकल - माझ्या आई-बाबांचे अगदी fast friends! इतके fast friends कि मी आणि त्यांचा मुलगा गंधार दोघेही एकाच हॉस्पिटल मध्ये, एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेस जन्मलेलो! लहानपणी माझे संगोपन शारदा आंटी आणि निशी अंकल यांनीच केले असल्यामुळे माझे आणि गंधारचे बालपण एकत्रच गेले. शारदा आंटी आणि निशी अंकल यांनी सुद्धा आम्हा दोघांमध्ये कधीच फरक केला नाही. मला आठवतंय, आम्हा दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी असल्या मुळे ते एकत्रितच साजरे केले जायचे - आणि तितक्याच दिमाखाने! दोघांचेही ड्रेस एक - इतकंच काय तर प्रेझेंटस पण एकसारखीच! हो, आम्ही दोघे जण - मी रिषभ आणि तो गंधार! स्वर सप्तकातील जणू दोन सूर! आमच्या आवडी-निवडी सारख्या, आमच्या शाळा सारख्या आणि आमचे मित्रही सारखेच! जणू "दो पंछी एक डालके!" मला आठवतंय, इंजिनियरिंगला एकत्र असताना आम्ही दोघांनीही एकाच मुलीवर प्रेम केले - तेही असफल! त्यामुळे प्रेमभंगाच्या यातनासुद्धा आम्ही एकसारख्याच भोगल्या! पण पुढे मात्र आमचे मार्ग वेगळे झाले - तो भारतातच स्थाईक झाला आणि मी परदेशात!
मला आठवतंय - माझ्या २० वर्षाच्या सान्निध्यात मी काही वेळेस आंटी-अंकलना हा प्रश्न केला होता. "माझ्या आई-बाबांचे पूर्वज कोण?" पण त्यांनाही फक्त माझ्या आजी-आजोबा पर्यंतच माहिती होती. त्याच्या आधीच्या पिढ्यांबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे, "माझे पूर्वज कोण, माझी पाळे-मुळे कोठे आहेत?" हे माझ्या जीवनातील अनुत्तरीत प्रश्न मला नेहेमीच सतावित राहिले.
पण आता तोच प्रश्न मला सोनू विचारत होती. सोनू, माझी आठ वर्षाची मुलगी - काय उत्तर देऊ मी तिला?
मला राहविले नाही. मी ताबडतोब निशी अंकलना मुंबईला फोन लावला.
"निशी अंकल, मी रिषभ बोलतोय" मी म्हणालो.
"काय रिषभ बेटा! काय म्हणतोयस? बरेच दिवसांनी फोन झाला." निशी अंकल म्हणाले.
"होय निशी अंकल! शारदा आंटी ठीक आहेत ना? निशी अंकल, मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचं!"
"हं, बोल बेटा!"
"मला माझी फॅमिली history हवी आहे - गेल्या १० पिढ्यांची!" मी सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"फॅमिली history? तुझी? आणि ही माहिती आत्ता कशाला हवी आहे तुला?" निशी अंकलने विचारले.
"निशी अंकल, actually काय झालाय, सोनुने ही गोष्ट मला काल विचारली. तिला गेल्या १० पिढ्यांची फॅमिली tree लिहिण्याचा होम-वर्क मिळालाय शाळेत!" मी म्हणालो.
"बर मग?"
"मी तिला गेल्या १० पिढ्यांची माहिती कशी देणार? आपल्या कडे असलेली माहिती तर फारच तोकडी आहे! केवळ २ पिढ्यांचीच!" मी म्हणालो.
निशी अंकल काहीच बोलेनात - ते बहुतेक उत्तर देण्याचे टाळत असावेत.
मग थोड्या वेळाने निशी अंकल म्हणाले, "रिषभ बेटा, मी तुझ्या भावना समजू शकतो! पण आपल्याकडे जी माहिती नाहीये ती मी तरी तुला कुठून देणार?"
"अंकल, काही झाले तरी ही माहिती मला हवीच आहे, माझ्या करिता नाही तरी सोनू करता तर हवीच हवी!" मी अगतिक झालो होतो.
"रिषभ, तू मला उद्या परत फोन करशील? कारण माझ्या एका मित्राने त्याच्या पूर्वजांबद्दल नुकतीच माहिती गोळा केली आहे! ती माहिती त्याने कशी गोळा केली ते मी त्याला विचारून उद्या सांगतो. तू उद्या मला परत फोन कर!"
एव्हढे बोलून निशी अंकलनी फोन ठेवून दिला.
मी रात्र भर तळमळत होतो. माझ्या पूर्व पिढी बद्दल असलेल्या भावना इतक्या तीव्र असतील ह्याची माझी मलाच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडताच मी निशी अंकलला फोन लावला आणि विचारले "निशी अंकल, काही माहिती?"
"अरे हो रिषभ, तुझ्या करिता एक चांगली बातमी आहे!" अंकल म्हणाले.
"चांगली बातमी? काय?" मी अधिरतेने विचारले.
"माझ्या एका मित्राने त्याच्या गेल्या १० पिढ्यांची वंशावळ शोधून काढली आहे!"
"शोधून काढली? ते कसे?"
"त्याचे असे आहे रिषभ, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील काही घराण्यांचा हा पिढीजात पेशाच आहे! हे परिवार गेल्या कित्येक पिढ्या अन पिढ्या वंशावळी ठेवण्याचेच काम करीत आले आहेत! कदाचित, तुलाही तुझ्या पूर्वजांची माहिती त्यांच्याकडे मिळेल - कुणी सांगावे? प्रयत्न करून पहायला काहीच हरकत नाही!"
"काय?" मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. "हे असे पण असू शकते?"
"होय बेटा! ही रीत पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि अशा परिवारांकडे पूर्वीच्या पिढ्यांची माहिती जरूर मिळू शकते!" निशी अंकल म्हणाले.
"अरे वा! मग त्या दृष्टीने प्रयत्न करायाला काहीच हरकत नाही!" मी एव्हढे म्हणून फोन ठेवला.
मी त्या दिवशी पहिले काय काम केले असेल तर २ दिवसा नंतरचे, म्हणजे १० ऑगस्टचे मुंबईचे तिकीट बुक केले आणि निशी अंकलना तसे कळवूनही टाकले कि मी येतोय मुंबईला - माझी वंशवेल शोधण्याच्या इराद्याने!
_________________________________________________
मी ११ ऑगस्ट ला मुंबईला पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १२ ऑगस्टला पहाटेच, त्र्यंबकेश्वरचा रस्ता धरला - माझी वंशवेल शोधण्याच्या इराद्याने! जाण्याआधी निशी अंकलनी मला त्र्यंबकेश्वरमध्ये 'धर्माधिकारी गुरुजी' ना भेटण्यास सांगितले होते. बरोबर निशी अंकलनी त्यांच्या आधीच्या ३ पिढ्यांची माहिती आणि पत्रिका दिली होती – त्यानाही त्यांची वंशावळ शोधून काढायची होती म्हणून!
मी साधारण ११ च्या सुमारास त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. गाव तसे लहानच असल्यामुळे धर्माधिकारी गुरुजीना शोधून काढण्यास फारसा वेळ लागला नाही. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर मी आणलेली माहिती आणि माझी पत्रिका ठेवली.
"तुमचे नाव काय? रिषभच ना?" कागदपत्र पाहता पाहता गुरुजी म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे रिषभ? त्र्यंबकेश्वर हे आपले पूर्वापारचे यात्रेचे स्थान! पूर्वी, म्हणजे साधारण १०० वर्षाआधी, येथे घनदाट जंगल होते, हिंस्त्र श्वापदांनी भरलेले! त्यामुळे एकदा का यात्रेस यात्रेकरू येथे आले की परत जिवंत पोहोचू की नाही याची शाश्वती नसायची! त्यामुळे सारे यात्रेकरू आपापली आल्याची नोंद ठराविक परिवारांकडे करून ठेवायचे! त्यातूनच सुरु झाला हा वंशावळीचा व्यवसाय! पुढे त्याला राजाश्रय मिळाला!"
धर्माधिकारी गुरुजींनी आतून वंशावळी काढल्या. अर्धा-पाऊण तास शोध घेतल्यावर गुरुजी म्हणाले, "मी तुमच्या पूर्वजांबद्दल काहीच सांगू शकत नाही - कारण तुमच्याकडे तसे कमीतकमी ३ पिढ्यांचे पूरक दस्तावेज नाहीत. आणि दस्तावेजांशिवाय वंशावळ सांगणे कठीण!"
माझी निराशा झाली - जी माहिती माझ्याकडे कधीच नव्हती, ती मी आणणार तरी कुठून? मी असहाय झालो.
तेव्हढ्यात गुरुजी म्हणाले "एकच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल."
"कोण, गुरुजी कोण?" मी अधिरतेने विचारले.
"पुरोहित - होय, ते एकच, पुरोहित. त्याना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही!"
"पुरोहित? कुठे भेटतील ते?"
गुरुजी मला त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी घेऊन गेले आणि म्हणाले "समोर तो ब्रम्हगिरी पर्वत दिसतोय? त्याच्याच माथ्यावर, जिथून गोदावरी माता उगम पावते तेथेच, तेथे असलेल्या त्या विशाल वटवृक्षाखाली!"
ती विशाल पर्वतराजी पाहून मी थक्क झालो! हा डोंगर मी कसा काय चढणार होतो? पण पूर्वजांच्या शोधात मी काहीही करायला तयार झालो होतो.
"तिथे जायचे कसे?" मी विचारले.
"आपल्या पूर्वजांचा शोध घ्यायचाय ना तुम्हाला? आपल मूळ शोधायचं ना? मग गोदावरीच्या उगमापर्यंत तर तुम्हाला निश्चितच जावे लागेल! अस करा, उद्या पहाटे उठून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडातील गोदामातेच्या पवित्र पाण्यात स्नान करा आणि निघा चालत! पर्वत चढायला अवघड आहे! पण दक्षिणेकडून चढलात तर आहे काहींसा सोपा! साधारण ३ तास लागतील! ध्यानात घ्या - पुरोहित सकाळी ५ ते ९ ध्यानस्थ असतात. त्यानंतरच त्याना भेटणे उत्तम!"
मी एकच ध्यास घेतला होता - पूर्वजांचा शोध! दुसऱ्या दिवशी मी भल्या पहाटे उठलो, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडात स्नान केले आणि निघालो! एव्हाना उजाडले होते. मी दक्षिणेकडून ब्रम्हगिरी पर्वत चढायला सुरवात केली. पहातो तर काय - पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याचे असंख्य ओहोळ पर्वतमाथ्यावरून भूतलावर उतरत होते. हेच ते गोदावरीचे उगमस्थान! दक्षिणेत जीवसृष्टी निर्माण करणारी दक्षिणगंगा इथेच उगम पावत होती! नकळत माझे हात जोडले गेले, मी नतमस्तक झालो. माझी खात्री पटली होती कि मला या पवित्र स्थानी माझ्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळणार! मी पाय उचलला - माझे उगमस्थान शोधायला!
पर्वत चढता चढता ३ तास कसे निघून गेले कळलेच नाही. मी ब्रम्हगिरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचलो. आणि समोरच होता तो विशाल वटवृक्ष! त्या प्रचंड झाडाला पाहून मी चाटच पडलो. त्या वडाच्या झाडाचा पसारा चोही दिशाना पसरला होता! एका झाडाच्या पारंब्या जमिनीत रुजून त्यातून दुसरे झाड जन्मले होते! अशी असंख्य झाडे - एकमेकाना जोडलेली! म्हणावे तर असंख्य, म्हणावे तर फक्त एकच! जणू तो विशाल वटवृक्ष मला हिणवून विचारत होता, "काय, स्वतःचे मूळ शोधायाचेय ना तुला? बघ माझ्या कडे, अन सांग - माझे मूळ कुठे आहे? सांग, आधी कोण जन्मले आणि नंतर कोण?" मी चक्रावून गेलो. मी तशाच गोंधळलेल्या अवस्थेत चारी दिशांना नजर फिरवली. मला कोणी चिटपाखरूही दिसेना. तसाच काही वेळ पुढे चालत राहिलो - आणि पुढे दिसली ती वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेली मूर्ती! पुरोहित!! मी दुरूनच नमस्कार केला. पुरोहितांचे ध्यान संपेपर्यंत वाट पाहिली.
काही वेळाने पुरोहितांनी डोळे उघडून माझ्याकडे नजर टाकली आणि म्हणाले, "या, तुमचीच वाट पहात होतो!"
मला थोडे आश्चर्य वाटले."माझी? ती कशी काय?"
"कशी? अहो, दिवस बदलले आहेत! मोबाईल वरून मला सारी माहिती धर्माधिकारी गुरुजींनी दिली आहे!"
अरे वा! धर्माधिकारी गुरुजी आणि पुरोहित यांच्याकडे मोबाईल? ऐकून बरे वाटले!
"बरे सांगा पाहू तुमच्याकडे काय काय माहिती आहे ती! स्वतः ची कुंडली पण आणली आहे ना?" पुरोहित म्हणाले.
मी माझ्या कडे असलेली माझी आणि शारदा आण्टी - निशी अंकल यांची सारी माहिती पुरोहितांना दिली. माझी माहिती तरी काय ती? केवळ दोन पिढ्यांची! बरोबर कुंडली पण दिली.
ती माहिती पाहून पुरोहित म्हणाले, "हं, म्हणजे तुमचे पूर्वज आष्ट्याचे तर! आष्ट्याचे करंदीकर म्हणा की!"
पुरोहित आपल्या कुटीत गेले आणि त्यांनी वंशावळ काढली - हजारो पानांची पोथीच म्हणा की! गेल्या ४०० वर्षातल्या पिढ्यातली माहिती त्यात लिहिली होती.
"तुम्हाला माहिती आहे करंदीकर, हि प्रथा प्रथम शिवाजी महाराजांनी चालू केली आणि मग पेशव्यांनी पुढे चालू ठेवली. हा आमचा पिढीजात पेशा! पण आता दिवस बदलले आहेत - आता उपलब्ध असलेल्या शास्त्रीय साधानामुळे ह्या पद्धती आता मागे पडत चालल्या आहेत!"
मग बराच वेळ पुरोहित पोथी चाळत राहिले. मी अधिरतेने पुरोहित कधी बोलतील याचीच वाट पहात होतो. काही वेळा नंतर पुरोहित म्हणाले, "मला वाटले होते की कदाचित तुमची वंशावळ मिळेल म्हणून. हे बघा करंदीकर, वंशावळ काढायची असेल तर कमीतकमी ३ पिढ्यांची तरी पक्की माहिती हवी! आणि ती तुमच्याकडे नाही!!"
मी निराश झालो "खरच नाही सांगता येणार?" मी विनवणीच्या स्वरात म्हणालो.
"नाही, ३ पिढ्यांची जर पक्की माहिती नसेल तर या वंशावळीतील वंशसंग्रहाशी संधान जुळत नाही. आणि मग सुरु होते जर-तर ची भाषा! आणि वंशवेल ही जर-तर च्या भाषेत कधीच सांगितली जात नाही!"
मला काय करावे तेच सुचेना. मी अगतिक झालो होतो. माझ्या समोर मला दिसत होता तो dead-end !
"पण तुमच्या काका-काकूंची सारी वंशावळ मला मिळाली आहे! अगदी मागच्या १० पिढ्यापर्यंत!" पुरोहित म्हणाले.
अन पुरोहितांनी शारदा आण्टी - निशी अंकल यांची १० पिढ्यांची वंशावळ माझ्या समोर ठेवली!
“हं, हे बघा, अशी आहे त्यांची वंशवेल - निशिकांत-श्रीरंग, श्रीरंग-हेरंब, हेरंब-भालचंद्र, भालाचन्द्रांच्या आधी त्यांच्या घराण्याचे आडनाव "दळवी" असे होते. आणि त्या आधीच्या पिढ्या अशा, भालचंद्र-गणेश, गणेश-महादेव ......”
माझा विश्वासच बसेना! हे कसे शक्य आहे?
तेव्हढ्यात माझे लक्ष पुरोहित गुरुजींकडे गेले - ते बहुतेक माझी पत्रिका बघत असावेत.
पुरोहित माझी कुंडली नजरे खाली घालत म्हणाले " रिषभजी, तुम्हाला मला एक सुचना करावीशी वाटते आहे."
"काय?" मी विचारले.
"पुढे येणारे ५ दिवस तुमच्या दृष्टीने फार नाजूक आहेत!"
"म्हणजे?" मी आश्चर्याने विचारले.
"१६ ऑगस्टला होणाऱ्या शनी-मंगळ युती पासून तुम्ही जीवाला फार जपले पाहिजे! तुमच्या कुंडली वरून अस दिसतंय कि तुमच्या आयुष्यात १६ ऑगस्टला काही तरी अघटीत घडण्याची शक्यता आहे!" पुरोहित म्हणाले.
मी हादरलोच! करायला जावे एक आणि व्हावं दुसरंच! हे कसे शक्य आहे? मी काय करायला अमेरिकेहून एव्हढे श्रम करीत येथपर्यंत आलो आणि मला काय ऐकायला मिळतंय! खरे तर माझा ज्योतिष शास्त्रावर अजिबात विश्वास नाही, पण हे अस काहीतरी ऐकायला मिळावे?
मी नाराज झालेला आहे हे बहुतेक पुरोहितांच्या लक्षात आले असावे. ते म्हणाले, "मी तुमच्या भावना समजू शकतो - पण मला जे दिसते आहे ते तुम्हाला सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो!"
मला काय बोलावे तेच सुचेना. मी सारी कागद पत्रे उचलली, पुरोहितांना नमस्कार केला आणि परत निघालो. माझ्या मनात विचार आला, "पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही!" ह्या धर्माधिकारी गुरुजींच्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा मी?
मी दोन पावलेच चाललो असेन, मग का कुणास ठाऊक मी परत फिरलो अन पुरोहितांना विचारलं "पुरोहितजी, तुमचा मोबाईल नंबर मला द्याल?"
"का बर?"
"असू देत, कधी लागला तर!" पुरोहितांनी त्यांचा नंबर मला दिला.
"हा घ्या माझा नंबर" मी त्याना माझा नंबर दिला - त्यांनी न मागताच!
मग मी त्र्यंबकेश्वरला परतलो आणि तिथून मुंबईला!
_______________________________________
१६ ऑगस्ट तर ३ दिवसावरच येऊन ठेपला होता. मी ठरवले, १६ ऑगस्टला बाहेर कुठेच जायचे नाही - म्हणजे काही अघटीत घडण्याची शक्यताच नाही! १४ ऑगस्ट उजाडला! मी कमालीचा अस्वस्थ होतो.
तेव्हढ्यात सकाळी ९ वाजता माझा मोबाईल खणाणला.
"hallo, कोण बोलताय?"
"मी पुरोहित!"
मी दचकलो, "हं, बोला पुरोहितजी"
"तुम्ही परवा तुमची कुंडली येथेच विसरून गेलात! ती पाहताना मला अस लक्षात आले आहे कि तुम्हाला धोकादायक दिवस १६ ऑगस्ट नाही तर १५ ऑगस्ट आहे."
"म्हणजे?" मी दचकून विचारले
"म्हणजे, १५ ऑगस्टलाच तुमच्या जीवनात काही तरी अघटीत घडण्याची दाट शक्यता आहे - १६ ऑगस्टला नाही! त्यानुसार तुम्ही काळजी घ्यावी हे सांगण्याकरिताच फोन केला."
आता मात्र माझी पाचावर धारण बसली! पुरोहितांनी ज्या अधिकार वाणीने ही गोष्ट मला सांगितली त्यावरून माझी पूर्णतयः खात्री पटली कि माझ्या आयुष्यात १५ ऑगस्टला निश्चितच काही तरी अघटीत घडणार आहे! मी ठरविले, आता १५ आणि १६ ऑगस्ट ह्या दोन्ही दिवशी काहीही झाले तरी घराबाहेरच पडायचे नाही!
१५ ऑगस्ट उजाडला. मी पुरोहितांनी वर्तवलेल्या शक्यतेबद्दल कुणाशीच वाच्यता केली नव्हती. दुपारी १२ पर्यंत काहीच घडले नाही. मनात आले, 'घडायचे ते काय? मी तर बाहेर न पडता घरातच बसून आहे!' दुपारचे ४ वाजले, ५ आणि नंतर ६. मी घरात तसाच बसून होतो. जस जशी वेळ पुढे जात होती तस तसं माझ्या मनावरचे ओझे कमी होत होते. आता ६ वाजून गेले होते - ह्याच्या पुढे काही घडेल अस मला वाटेनासे झाले. तेव्हढ्यात, साधारण संध्याकाळी साडे-सहाच्या सुमारास घरचा फोन खणाणला. निशी अंकलनी फोन उचलला.
"काय? हे कसे शक्य आहे?" निशी अंकलच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते. त्यांचा चेहरा पांढरा फट्क पडला होता. 'काही तरी अघटीत घडले होते' हे मी ताडले.
"काय कसा झाला अपघात? गंधारची तब्बेत तर ठीक आहे ना? कुठल्या रुग्णालयात दाखल केले आहे? हो हो आम्ही ताबडतोब निघतोच." निशी अंकल म्हणाले.
मला कळून चुकले कि गंधारला अपघात झाला होता.
निशी अंकलनी फोन ठेवला आणि माझ्याकडे वळून ते म्हणाले, "चल बेटा, तातडीने चल - गंधारला अपघात झाला आहे अन त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याला ताबडतोब तिकडेच गेले पाहिजे!"
शारदा आण्टीचा तर धीरच सुटला. पण रडत बसायलासुद्धा आमच्याकडे वेळ नव्हता. मी पटकन गाडी काढली आणि १५-२० आम्ही मिनिटातच नानावटी रुग्णालयात पोहोचलो.
गंधारला इमरजन्सी वार्ड मधेच दाखल केले होते. अपघात बराच मोठा असावा. तो ऑपरेशन थिएटर मधेच होता - बहुधा काही शत्रक्रिया चालू असावी. त्यामुळे त्याला भेटणे पण शक्य नव्हते. साधारण दीड-दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि आमच्याशी बोलू लागले, "नमस्कार, मी डॉक्टर दिक्षित. गांधारला मोठा अपघात झाला आहे. पण आता काळजीचे कारण नाही - त्याच्या जीवाला अजिबात धोका नाही. त्याचे बरेच रक्त गेले आहे, त्यामुळे त्याला रक्ताची खूपच जरुरी आहे." डॉक्टरनी आमच्या तिघांच्या रक्ताचे sample घेतले. सुदैवाने निशी अंकलचे रक्त गंधारशी match झाले.
त्यानंतर डॉक्टर दिक्षित निघून गेले. गंघारचे निस्तरता निस्तरता रात्र कशी निघून गेली ते समजलंच नाही. पहाटेच्या वेळेला थोडासा मोकळा वेळ मिळाला तेव्हां माझ्या मनात विचारचक्र सुरु झाली. एकीकडे पुरोहितांनी वर्तवलेले माझे भविष्य आणि दुसरीकडे गंधारला झालेला अपघात, हा काय प्रकार आहे?
एक मन म्हणत होते "पुरोहितांनी वर्तवलेले भविष्य तर माझे होते! त्याचा गांधारच्या अपघाताशी काय संबंध? हा तर निव्वळ योगायोग!" तर दुसरे मन म्हणत होते, "पुरोहितांनी तर माझ्या जीवनात काही अघटीत घडण्याची शक्यता वर्तविली होती! मग अपघात गंधारला कसा झाला? हे काय गौडबंगाल आहे?"
मला काही केल्या राहवेना. सकाळचे पाच वाजले असावेत. मला आठवले - सकाळी ५ ते ९ पुरोहितांची ध्यानाची वेळ. मनात विचार आला, 'ते ध्यानाला बसायच्या आधीच त्यांना फोन करावा.' मी सरळ माझा फोन उचलला आणि पुरोहितांचा नंबर लावला.
"नमस्कार पुरोहित गुरुजी! मी रिषभ बोलतोय!" मी म्हणालो. "आपल्याला फार लवकर तर फोन नाही केला ना?"
"नाही, नाही. मी तुमच्या फोनची अपेक्षा करतंच होतो!" पुरोहित म्हणाले.
"गुरुजी, मला तर आत्तापर्यंत काहीच झाले नाहीये - मी तर चांगला धडधाकट आहे!””
"आनंद आहे!" पुरोहित म्हणाले.
"पण, माझा भाऊ गंधार, त्याला अपघात झाला आहे - जीवावर बेतणारा! त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे!" मी म्हणालो. "पुरोहित गुरुजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे."
"बोला ना". पुरोहित म्हणाले.
"तुम्ही वर्तवलेले माझे भविष्य आणि गंघारला झालेला अपघात - यामध्ये काही संबंध आहे का?" मी विचारले.
क्षणभर विचार करून पुरोहित म्हणाले, "कदाचित, मी त्यांचीच पत्रिका बघितली असावी!"
"काय? हे कसे शक्य आहे? तुम्ही जी पत्रिका बघितलीत त्यावर माझच नाव लिहिले आहे!" मी म्हणालो.
त्यावर पुरोहित म्हणाले, "नाव असेल हो! पण कदाचित नाव लिहायच्या आधीच पत्रिकांची अदलाबदल झाली असेल!"
"असेलही कदाचित!" एव्हढे बोलून मी फोन ठेवून दिला.
मला काही केल्या हे कोडे उमगेना. पत्रिकांची अदलाबदल म्हणजे काय? म्हणजे असेच ना, कि पुरोहित माझ्या नावाची पत्रिका बघताना भविष्य मात्र गंधारचे सांगत होते? पण ते कसे शक्य आहे? याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ असा तर होत नाही ना, कि गंधाराच्या जागी मी आणि माझ्या जागी गंधार? माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मी सरळ डॉक्टर दिक्षितना फोन लावला.
"डॉक्टर दिक्षित, मला तुमच्याशी तातडीने भेटायचे आहे!" मी म्हणालो.
"मला आत्ता तर वेळ नाही - पण आपण दुपारी १२ ला भेटू शकतो. कुठल्या संदर्भात?"
"गंधाराच्या संधर्भात." मी म्हणालो. "ठीक आहे - मी १२ ला तुमच्या केबिन मध्ये येतो."
पुढचे २-३ तास मी नुसता एके ठिकाणी बसून विचार करत होतो. वंशावळ, ज्योतिषशास्त्र - मी कशात गुरफटून चाललो होतो? मी ठरवले, हे कोडे सोडविण्यासाठी आधुनिक, शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर करायचा.
मी १२ वाजता डॉक्टर दिक्षित यांच्या केबिन मध्ये पोहोचलो.
"नमस्कार. मला तुमच्याशी तातडीने बोलायचे आहे गंधाराच्या संधर्भात!' मी म्हणालो.
"बोला. गंधार तर आता ठीक आहे. त्याला नॉर्मलला यायला थोडा वेळ लागेल इतकेच !" डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर दिक्षित, मला DNA टेस्ट करायची आहे."
"DNA टेस्ट? कुणाची?"
"आम्हा चौघांची! म्हणजे माझी, गंधारची, निशी अंकलची आणि शारदा आण्टीची." मी म्हणालो.
"ती कशाबद्दल?"
"डॉक्टर दिक्षित, तुम्हाला माहितीच आहे, DNA टेस्ट आता बाहेरच्या देशांमध्ये एक रुटीन टेस्ट झाली आहे. त्यायोगे प्रयेकाचे DNA analysis संग्रही ठेवले जाते आणि भविष्यात कधी जरुरी पडली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानुसार आम्हा चौघांची DNA टेस्ट करून त्याचे रिझल्ट्स भविष्या करता संग्रही ठेवावेत असे मला वाटते." मी म्हणालो.
"काहीच हरकत नाही!" डॉक्टर म्हणाले.
"तुमच्या कडे तर आम्हा चौघांची Blood samples आहेतच, काल दिलेली. त्यावरून DNA टेस्ट करता येईल ना?" मी म्हणालो.
"होय, निश्चीतच!"
"आणि DNA टेस्टचे रिझल्ट्स कधी मिळतील?"
"DNA टेस्टला फार वेळ लागत नाही - उद्या सकाळपर्यंत रिझल्ट्स तयार असतील. तुम्ही या उद्या दुपारी १२ वाजता - तुम्हा चौघांच्या DNA टेस्टचे रिझल्ट्स घ्यायला." डॉक्टर म्हणाले.
१६ ऑगस्टची रात्र - माझ्या आयुष्यातली सगळ्यात लांब, संपता न संपणारी रात्र! मी प्रतीक्षा करीत होतो -उद्या येऊ घातलेल्या DNA टेस्ट रिझल्टची! खरच, काय असेल हे गौडबंगाल? वंशावळ, पुरीहीतानी वर्तविलेले भविष्य, गंधारला झालेला अपघात, पत्रिकांची संभाव्य अदलाबदल, DNA टेस्ट आणि त्याचे उद्या येणारे रिझल्ट्स - खरच माझ्या हृदयाचे ठोकेच काय ते थांबायचे राहिले होते! सकाळी उठल्यावर तयार होऊन मी १२ च्या सुमारास डॉक्टर दिक्षित यांच्या केबिन मध्ये त्यांना भेटायला जाऊन पोहोचलो.
डॉक्टर दिक्षितनी DNAटेस्टचे रिझल्ट्स बाहेर काढले अन म्हणाले, "हं, हे बघा तुमच्या चौघांचे DNA रिझल्ट्स. हे निशी अंकल आणि शारदा आण्टी यांचे रिझल्ट्स आणि हे तुम्हा दोघांचे! तुम्हा दोघांचे म्हणजे तुमचे आणि गंधारचे. हा बघा, हा DNA रिझल्ट बरोबर निशी अंकल आणि शारदा आण्टी यांच्या DNA शी जुळतोय - हा गंधारचा DNA रिझल्ट, आणि हा दुसरा, जो जुळत नाहीये, तो तुमचा!"
मी डॉक्टरांनी दाखविलेले रिझल्ट्स निरखून पाहिले. पाहतो तर काय! मी आश्चर्यचकित झालो - कारण जो DNA रिझल्ट निशी अंकल आणि शारदा आण्टी यांच्या DNA रिझल्टशी जुळत होता त्या DNA रिझल्टवर नाव होते -रिषभ! म्हणजे मी!
"पण डॉक्टर, तुम्ही पाहताय त्या DNA रिझल्टवर नाव वेगळेच आहे!" मी म्हटले.
"म्हणजे?" डॉक्टरांनी विचारले.
"म्हणजे, जो DNA रिझल्ट निशी अंकल आणि शारदा आण्टीशी जुळतोय त्यावर नाव माझे आहे!" मी म्हणालो.
डॉक्टरांनी चमकून पाहिले आणि पटकन म्हणाले, "परत आमच्या सेक्रेटरीने चूक केलेली दिसती आहे!"
"कदाचित असेलही! पण आपण पुन्हा तपासून पाहायला काय बिघडलाय?' मी म्हणालो.
डॉक्टरांनी लगेच सेक्रेटरीला बोलावले आणि विचारले. सेक्रेटरीने ताबडतोब Pathology lab ला फोन लावला. आणि १० मिनिटातच उत्तर आले, "जे रिझल्ट्स लिहिले आहेत ते बरोबर आहेत!" मला confirmation मिळाले होते - पुरोहितांचे म्हणणे बरोबर होते. निशी अंकल आणि शारदा आण्टी हेच माझे आई-बाबा होते आणि मी त्यांचा मुलगा! DNA टेस्ट ने ते सिद्ध केले होते!
मी डॉक्टर दिक्षितना म्हणालो, "डॉक्टर, हे असे होऊ शकते?"
"काही तरी कधी तरी चूक झालेली दिसती आहे हे निश्चित! तुमच्या दोघांच्या जन्माबद्दल मला काही माहिती द्याल?' डॉक्टरांनी विचारले.
"आमच्या दोघांचा जन्म एकाच हॉस्पिटल मध्ये, एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेस झाला" मी म्हणालो.
"That's it! कदाचित तुम्हा दोघांची आदलाबदल हॉस्पिटलमध्ये पाळण्यात असतानाच झाली असावी!" डॉक्टर म्हणाले.
मी आश्चर्यचकित झालो - मला काय बोलावे तेच समजेना!
मी बऱ्याच विचाराअंती म्हणालो, "डॉक्टर, तुम्हाला एक विनंती आहे - या गोष्टीची तुम्ही कुणाजवळही चुकूनसुद्धा वाच्यता करु नका!"
माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माझ्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला होता! एका बाजूला माझे आई-बाबा होते तर दुसऱ्या बाजूला अपघातात सापडलेला माझा भाऊ! माझ्या गंधारबरोबर असणारे माझे नाते रक्तापेक्षा कितीतरी दाट होते! माझ्या मनात विचारचक्र चालू होती -"आज खरी आई-बाबांची गरज कुणाला आहे? अपघातात दुखापत झालेल्या गंधारला कि मला? निशी अंकल आणि शारदा आण्टीने तर मला नेहेमीच आई-बाबांचे प्रेम दिले! खरे तर मीच त्याना अंकल-आण्टी म्हणत आलो आहे! आत्ता फक्त एव्हढाच सिद्ध झाले आहे कि, They are my biological parents! पण मनाने ते नेहमी माझे आई-बाबाच होते आणि पुढे अर्थातच राहतील! मग आत्ता हे सत्य मी त्यांच्या समोर उघड करावे कि नाही?"
नंतर माझ्या मनात विचार आला, "आत्ता ही गोष्ट सर्वांसमोर उघडी करून तरी काय फायदा? सध्यपरिस्थिती इतकी विचित्र आहे कि हे सत्य जरी आत्ता बाहेर पडले तरी ते सर्वाना क्लेशकारकच ठरणार आहे! काय, ही गोष्ट मी माझ्या भावाकरिता, गंधार करिता लपवून ठेऊ शकत नाही?" मग मी ठरविले की DNA टेस्टच्या रिझल्ट्स बद्दल कुणाजवळही वाच्यता करायची नाही.
मी गंधारच्या रूम मध्ये आलो. आई-बाबा तेथेच होते. वाटल, आई-बाबांना कडकडून मिठी मारावी! पण मी माझे मन आवरते घेतले आणि गंधारचा निरोप घेऊन परत आलो.
दुसऱ्या दिवशी माझी परतीची फ्लाईट होती. मला निरोप द्यायला आई-बाबा अएरपोर्टवर आले होते. मी निशब्द झालो होतो. मला राहवले नाही - मी आई-बाबांना कडकडून मिठी मारली.
"नाही बाळा, नाही. रडायचे नाही! गंधारपण आता ठीकच आहे!"
"मी आज पासून तुम्हाला आण्टी - अंकल म्हणणार नाही! आई - बाबाच म्हणणार!" मी म्हणालो.
"होय बेटा, होय! आम्हाला जसा गंधार, तसाच तू!" आई-बाबा उत्तरले.
मी आई-बाबांचा निरोप घेतला. मी गंधारच्या अपघातामुळे काहींसा दुःखी होतो. पण दुसरीकडे, मला माझे आई-बाबा मिळाले होते! मला माझ्या वंशवेलेची ओळख पटली होती! माझी त्र्यंबकेश्वरची यात्रा सफल झाली होती! गुरुजींचे ते शब्द माझ्या मनात सारखे घोटाळत होते, "पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही!" न कळत मी नतमस्तक झालो - त्या महान व्यक्तीला, त्या विशाल पर्वतराजीला अन त्या गोदामातेच्या उगमस्थानाला!
_____________________________________
मला receive करायला सुमा आणि सोनू दोघीही airport वर आल्या होत्या.
सोनूने माझ्या गळ्यात पडून प्रश्न विचारला, "काय बाबा, आणली का आपली family history? आमचा होम-वर्क उद्या due आहे!"
मी उत्तरलो, "होय राजा, होय! मी तुला वचन देऊन पाळले नाही असे कधी झाले आहे? हं, ही बघ आपली वंशवेल! लिही! निशिकांत-श्रीरंग, श्रीरंग-हेरंब, हेरंब-भालचंद्र, भालाचन्द्रांच्या आधी आपल्या घराण्याचे आडनाव "दळवी" असे होते. आणि त्या आधीच्या पिढ्या अशा, भालचंद्र-गणेश, गणेश-महादेव ......”
सुंदर गोष्ट ! शेवट विशेष
सुंदर गोष्ट ! शेवट विशेष आवडला .
आवडली
आवडली
सुरवात थोडीशी कंटाळवाणी वाटली
सुरवात थोडीशी कंटाळवाणी वाटली पण नंतर कथेने मस्त वेग पकडला ...
आवडली .
मस्त कथा
मस्त कथा
प्रिय श्यामराव, shilpa
प्रिय श्यामराव, shilpa mahajan, Ic, लिंबू मिरची आणि मयी: आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
Pages