जे. एस्. एम्.
आमचे कॉलेजचे जीवन तसे खुरटलेलेच होते. एकतर इतर काय करता येत नव्हते, म्हणून कॉमर्स करायचे ठरवले. कॉलेजचे आकर्षण होते पण खिसे रिकामे होते. सायकलने कॉलेज गाठायचे. एकच सायकल दोन भाऊ आलटून पालटून वापरायचो. भाडयाचे खोली खालीच घोडेकरांचे सायकल दुरूस्तीचे दुकान होते. त्यामुळे प्राथमिक ज्ञान होतेच. दुरूस्तीही फुकटात व्हायची.
घरा-शेजारी पावसाळयात विठोबाच्या देवळात मोहन म्हात्रेचा गणपतीचा कारखाना असायचा. चित्रकार बनण्याची आवड होती. पण त्याला मुरूड घातलेली. ती हौस गणपतीच्या कारखान्यात भागवून घ्यायचो. मूर्तीला मदत करता करता वडीलांचाच अर्ध पूतळा बनवला. बरेच वर्षे तो होता.
कॉलेज समुद्र किनारी. तासांना बसण्यापेक्षा दांडयाच जास्त. बरे सर्वच प्राध्यापक ओळखीचे. वातावरण चळवळीचे होते. अभाविप चे वारे होते. राजकारण समजत नव्हते. पण बरेच प्राध्यापक जनता पक्षाला धार्जिणे. कॉंग्रेस विरोधी. त्यांना आमच्या सारख्यांची गरजच असायची. आम्ही प्राध्यापकांशी सुसंवाद साधून त्याचा फायदा घ्यायचो. भेंडी खाली जमायचो. आणीबाणी लागली आणि वातावरण ढवळून निघाले.
आम्ही तयारी करायचो. पोष्टर चिकटवायचो. प्राध्यापकांमध्ये सरळ सरळ दोन गट पडले होते. व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवणारे आम्हाला जवळचे वाटायचे.
आम्हीही आता उठाव करू लागलो होतो. काही प्राध्यापक बरोबर शिकवायचे नाहीत. त्यांच्या विरूद्ध बहिष्कार टाकायचो. त्यांचा तास सुरू झाला की, आख्खा वर्ग उठून जायचा. प्रिन्सीपॉल बोलवायचे. आम्ही मुद्दे मांडायचो. कोलगे नावाच्या क्लार्क बार्इ होत्या. त्यांची मुले सोबतीला होती. त्यांनी वाद विवाद स्पर्धेचा रस्ता दाखविला. मग महाराष्ट्रभर स्पर्धेला जाऊ लागलो. एस.टी. भाडे आणि हातखर्चाला पैसे मिळत. त्यातही काटछाट करून आम्ही आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे फिरून यायचो.
नागेश कुलकण्र्ाी एकदा सोबतीला होता. जळगावला वाद विवाद स्पर्धा होती. श्रीकृष्ण जळूकर नावाचे संपादक आयोजक होते. स्पर्धा संपली. बक्षीसे घेऊन आम्ही परतीचे प्रवासाला निघालो. गाडी चुकली! रेल्वे स्टेशनवर रात्र काढणे जीवावर आले. समोरच जैन यांची कपडा मिल होती. आंदोलन चालू होते. एस.आर.पी.चा पहारा होता. तंबू पडले होते. त्यांना विनंती करून रात्र काढण्याचे ठरवले. सकाळी उठलो तर खांद्याला अडकवलेल्या बॅगा गायब. दोघांचीही पंचार्इत, परत जाणार कसे? श्रीकृष्ण जळूकरांना गाठले. त्यांना विनंती केली त्यांनी एस.टी पासची व्यवस्था केली. बक्षीसाची रक्कम घेतली. औरंगाबाद मार्गे पास तयार केला. येताना अजंठा वेरूळ पाहिलेच. वर प्रत्येकी 20 रूपये वाचवले. एकशे तीस रूपयांचे बील कॉलेजने मंजूर केले. अडचणीतून मार्ग शोधण्याची सवय अशीच लागली.
कॉलेजमध्ये असताना काहीही वात्रटपणा चालायचा. गॅदरींगला फिशपॉण्ड प्रकार होता. एक ‘बिलंदर’ निवड समितीवर होता. स्वत:लाच फिशपॉण्ड टाकून घ्यायचा. सहानभूती मिळवायचा आणि इतरांना जळवायचा. पुढे तो राजकारणात आला. युनियन लिडर झाला.
एक मोठा श्रीमंत मुलगा होता. त्यावेळी तो गिअरची सायकल आणायचा. त्याला थोडे चढवले की टॉमेटो आम्लेट नाही तर केक मिळायचे. आम्ही त्याची वाटच पहायचो. तो मालक होता. त्याचा विकपॉर्इंट ओळखला होता. पार्टीसाठी एक एक करत सर्व घोळका करायचे. एका चाणाक्ष सोबतीला ध्वजस्तंभ हलवून उपकता येतो हे कळले. झाले. या श्रीमंत मुलाची सायकल आणली गेली. ध्वजस्तंभ उपकून त्यात ती अडकवली. पुन्हा झेंडावंदनाला स्तंभ तयार. थोडया वेळाने श्रीमंत आले. अबब! हे काय झाले म्हणाले? सर्वांनी हात वर केले क्लार्कही जोडीला. ते प्रिन्सीपॉलना रिपोर्ट करतो म्हणाले. प्रिंन्सीपॉल वडीलांचे मित्र, घरी कळले तर राडा होणार. त्यापेक्षा रात्री सायकल खांद्यावरून उचलून काढायची मांडवली झाली. सर्वांना टॉमेटो आम्लेट सोबत कॉफीही मिळाली. पुन्हा सिद्धेÜवरची ट्रीपही पुरस्कृत झाली. संध्याकाळी खांब उपकून सायकल घरपोच झाली. चार पाच वेळा असे घडल्यावर बींग फुटले. आता आमची तक्रार व्हायची वेळ आली पण निभावून नेले.
कॉलेजचे दिवस जात होते. जीमखाना सर्वात आवडीचे ठिकाण. भाऊ जी. एस. झालेला. त्यामुळे दरारा आपोआपच आलेला. त्यात मराठी मंडळ, भित्तीपत्रके आणि सर्व स्पर्धा यात भाग घ्यायचो. त्यामुळे प्राध्यापकांच्या घरी जायचो. गाण्यातले काही कळायचे नाही, पण तरी एका दापंत्याकडे जावून रेकॉर्ड आणायचो. त्या दुसर्याेला ऐकायला द्यायचो. थोडे दिवसांनी परत करायचे. रागाचे नाव तेव्हढे वाचून जायचो. मी गेलो की बार्इ तबला लावायच्या. मी डुलक्या काढायचो. कॉफी पिऊन पळ काढायचो.
भावाने त्रिमूर्ती मंडळ स्थापन केलेले. त्यात एक जज्जचा मुलगा. एक प्राध्यापकाचा. तिघे परिक्षा संपली की सर्वांकडून पुस्तके गोळा करायचे, गार्इड गोळा करायचे. ओळखीच्या प्रेस मध्ये जाऊन बाइंडींग करायचे. त्रिमूर्तीचा शिक्का मारायचे आणि अध्र्या किंमतीत पुस्तके विकायचे. फी सोडवायचे.
वर्गातून सी.आर.ची निवडणूक होती. एका मित्रालाच आव्हान द्यायचे ठरले. तो पोलीसाचा मुलगा. मोठा हुषार आणि खूपच जास्त आव आणणारा. मला सूचक, अनुमोदक मिळत नव्हते. कसा तरी एकदाचा फॉर्म भरला. निवडणूकीत वातावरण तापायचे, हाणामार्याय व्हायच्या, पण आम्ही पळपूटे होतो.
ऐनवेळी पेणहून मुले आणली. त्यांना टेम्पोचे भाडे मित्रांनीच दिले. तेवीस मते मिळाली. या जोरावर सी. आर. झालो. पुढे डोके चालवून विद्यापीठ प्रतिनिधी झालो. सिनेट निवडणूक लढवली आणि राजकारणात चंचू प्रवेश झाला. दिलीप हाटेंचे जवळ आलो. मोहन रावळे तेव्हा भारतीय विद्यार्थि सेना पहायचे. छातीवरचे वार दाखवत फिरायचे. अ.भा.वि.प. चे मदतीने बाजी मारायचो.
कॉलेजच्या गरजा कमी होत्या. एन.एस.एस. ने माणसे जोडायला शिकवले. छोटे छोटे कॅम्प करायचो. रेती उपसायचो. गावकरी कांदापोहे द्यायचे. एकमेकांना रेतीची घमेली द्यायची. त्यातून कुणाला काय फायदा व्हायचा माहित नाही, पण श्रमाची किंमत कळायची. गु्रप लिडरच्या शेतावर एकदा भर दिवाळीत कापणीला गेलो. नाष्टयाला दिवाळीचा फराळ. भाऊबीज चुकली. घरी आरती उतरून झाली. एन.एस.एस. नी समाजात आणले. कॉलेजनी बुजरेपणा घालवला. आयुष्याची तीन वर्षे भुरकन उडून गेली. त्याची आज रूखरूख लागते. कधीतरी कॉलेजला जाणे होते. बदललेल्या इमारती, बदललेले वातवरण गुदमरून टाकते.
गॅदरींग झाल्यावर काही अतरंग शिव्यांच्या भेंडया लावायचे. आज त्यातले बरेच मोठे व्यवसार्इक झालेत. आम्हाला श्रोत्यांचे काम असायचे.
आसपास शुटींग असले की, कॉलेज ओस पडायचे. ‘राम बलराम!’ च्या वेळी अमिताभ बच्चन, धमेंद्रसाठी दिवस दिवस फूकट घालवायचो. किल्ल्यात शुटींग असायचे. गावात धड हॉटेल नव्हते. सरकारी गेस्ट हाऊसवर मुक्काम असायचा. गर्दी व्हायची. आम्ही धिटार्इ करून त्यांना बाहेर बोलवायचो. सह्या घ्यायचो. ‘आक्रोश’ चे शुटींग होते. ओम पुरी आणि शाम बेनेगल ची पुरी टिम गावात सायकलवर फिरायची. कोर्टात, वकिलांकडे येऊन बसायची आम्ही त्यांचे फंटर व्हायचो. पाहुणे आले की शुटींग स्पॉट दाखवायचो. यशोदा, आंगनकी कली असे किती तरी चित्रपट आम्ही जिवंतपणे असे अनुभवले. प्रत्यक्ष टॉकीज मध्ये त्यापेक्षा वेगळेच दिसायचे. पोरे जमवायची कला आता जमू लागली होती. घळवली नुकत्याच कुठे सुरू झाल्या होत्या.
मृणाल गोरेंची सभा होती. सभा उधळली गेली. आम्ही कार्यकर्ते पहातच राहिलो. त्यावेळी निवडणूकीत वातावरण खूपच तापायचे. खिंडीतून गाडया येताना दगडफेक व्हायची. पोलिसांच्या लाठया बसणार नाहीत अशा बेतात आम्ही असायचो. प्राध्यापक नेहमी हरायचे पण त्यांच्या सभा ऐकण्यासारख्या असायच्या. गर्दी मात्र शिवराळ आणि मोठया मोठयाने भाषणे ठोकणार्यास नेत्यांच्याच सभेला व्हायची. ते समोरच्याची साफ काढायचे. वाद घरच्या खाजगी भानगडीपर्यंत यायचा. गावात तेव्हा कोळीवाडयात बी.वाय.टी. नंबरचे वहातुकीचे डबे असायचे. त्या प्रवासी गाडीतून मोठयामोठयाने स्पीकर लावून कला पथक फिरायचे. त्यात नरडीच्या देठापासून ओरडणारे पुढे जिह्याचे भाग्यविधाते झाले. शिस्तीने सोज्वळ, प्रचार करणारे, खांद्याला शबनम अडकवून पुणे मुक्कामी स्थार्इक झाले. परागंदा झाले. प्राध्यापकाना साथ देणारे काळाच्या ओघात मुख्य प्रवाहात सामिल झाले आणि वाहूनही गेले.
कॉलेजला हॉस्टेल होते. काही प्राध्यापक फारच फ्रेन्डली होते. त्यांचा मुक्काम होस्टेलवर असायचा. वर्षातून एकदा हॉस्टेल डे असायचा. त्या दिवशी हिशेब चुकते व्हायचे. वसुली व्हायची शिक्षक विद्याथ्र्यांतील अंतर संपायचे.
तुम्हा आमचे कॉलेज जीवन खास कप्यात जपून ठेवण्यातले. आमचे तर दिशाहिन फक्त मौज मजा आणि खर्याे अर्थाने ‘आनंदवन’. आम्ही कॉलेजलाच आमचे घर मानलेले. दिवस रात्र तेथेच पडलेले असायचो. मग शिपार्इ साथीदार बनायचे.
पण त्या वास्तूने आणि प्रभूतीनी आम्हाला व्यसनापासून लांब ठेवले. कधी सिगारेट हातात घ्यावीशी वाटली नाही की बियर फोडावीशी वाटली नाही. वात्रट होतो पण तरीही कॉलेजला देवघर समजत होतो. खूप खेळलो, बागडलो पण प्रतारणा नाही केली असे कॉलेज होणे नाही. जीव ओतून मुलांच्यात मिसळणारे शिक्षक-प्राध्यापक होणे नाही.
ते दिवसही फिरून येणे नाही.
जे एस एम कोव्लेज
Submitted by vilas naik on 14 September, 2012 - 21:37
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा विस्कळित झाले आहे लिखाण
जरा विस्कळित झाले आहे लिखाण पण आवडले.
आवडलं !
आवडलं !
छान लिहिलय
छान लिहिलय
जरा विस्कळित झाले आहे लिखाण
जरा विस्कळित झाले आहे लिखाण पण आवडले. >>>> हळूहळू जमेल मांडणी माबोकर शिकवतील
ऐनवेळी पेणहून मुले आणली. >>>>> ??????
छान लिहीले आहे, जुन्या
छान लिहीले आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
पु.ले.शु.
जे एस एम अलिबागचं कॉलेज
जे एस एम अलिबागचं कॉलेज का????