मांजरांचे घर - शशांक पुरंदरे

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:19

ते घर इतर कोणत्याही घरांसारखेच - चौकोनी कुटुंब - सुलभा, सुनील, त्यांच्या दोन मुली - सानीया, स्वराली आणि मुलींची आजी.

पण त्या घराची एक खासियत अशी की तिथे मांजरांचा सततचा राबता. काही अधूनमधून भेट देणारी भटकी मांजर जमात तर कधी काही काळ वस्तीला असलेली मांजरे. पण मांजरे असणारच तिथे.

सुलभाला मांजरांची आवड का मांजरांना तिच्याविषयी ओढ हे सांगणे जरा कठीणच. सुनीलला प्राण्यांविषयी प्रेम पण मांजरासारख्या स्वार्थी प्राण्याची जरा नावडच. मुली सहाजिकच आईच्या बाजूने.

दोन चार घरं पलिकडे एकांनी एक काळी कुळकुळीत मांजरी (ब्लॅकी) आणली होती - मुद्दामून. ती खायची प्यायची मालकाकडे पण दिवसच्या दिवस याच घरात लोळत असायची. त्या घरातील मंडळींनाही ठाउक होते आपली ब्लॅकी कुठे असणार ते. मध्यंतरी दररोज सक्काळीच एक बोका आणि एक भाटी ठराविक वेळेला मागच्या दरवाज्यात उभेच असायचे. दूध प्यायला. हक्काने. आजी गंमतीने म्हणायच्या सुनेला, "बघ, आलं हो तुझं मेहुण..."

सुलभाला मांजरांना नुसते खायला द्यायला, कुरवाळायला आवडायचे नाही तर ती मांजरांशी गप्पा मारायची. मुली व सुनील जाम चिडवायचे तिला, पण ती लक्ष देत नसे. ती बोलत राही मांजरांशी आणि मांजरेही तिच्याशी. हळुहळू त्याच्या, मुलींच्याही लक्षात आले की सुलभाला मांजरांची भाषा नक्कीच समजते आणि मांजरही निर्बुद्ध नसतात, त्यांनाही बाकी कोणाची नाही पण तिची भाषा नक्कीच समजते.

त्या घराला अधूनमधून भेट देणारी एक भाटी. सुलभाने लांबूनच हात न लावता सांगितले ती भाटी गरोदर असल्याचे. मुलींनी व सुनीलने नेहेमीप्रमाणेच हसण्यावारी नेले. पुढे काही दिवसातच ती भाटी लाडात येऊन सुलभाच्या पायाला अंग घासू लागली तेव्हा तिने सहज भाटीच्या पोटाला हात लावला. पिल्लांची हालचाल जाणवल्यावर मुलींना बोलावून सांगितले. "बघ, कशी पिल्लं हालचाल करताहेत..."

पुढे काही दिवसांनी तीच भाटी परत आली. पोट सपाट झालेले. करुण सूर (सुलभाच्यामते). सुलभा विचारत होती, "अगं बाई, केव्हा बाळंत झालीस, पिल्लं कुठेत तुझी?" त्या भाटीपुढे दुधाची वाटी सरकवताना सुलभा म्हणाली, "तीन पिल्लं झालीयेत तिला..."आता मुलींना ठाऊक झालं होतं की आईला नक्कीच मांजरांची भाषा कळते आहे, त्या लगेच आसपासच्या घरात शोध घ्यायला गेल्या. बरोब्बर तीन पिल्लं झाल्याचं कळलं. लगेच त्यांनी घरी येऊन आईला विचारलं, "तुला कसं कळलं ?" सुलभा नुसतीच हसली.

एक भाटी अशीच त्या घराला नियमीत भेट देणारी, सुलभाबरोबर गप्पा मारणारी, लाड करवून घेणारी... एक दिवस जरा विव्हळतंच आली. सुलभाने नेहेमीप्रमाणे विचारलं "काय मने, काय झालं, कुठे लागलं?" मनी सुलभाच्या जवळ येऊन काही सांगू लागली "अगं मने कुणाबरोबर मारामारी केलीस, किती लागलंय तुझ्या डोळ्याला?" ती मनीला विचारत होती. त्या मनीची कोणा मांजराबरोबर झटापट झालेली - डावा डोळ्याच्या वर काही जखमा व त्या डोळ्याची अलाईनमेंट गेलेली... बुब्बुळ एका कोपर्‍यात सरकलेले. मनी सुलभाच्याशेजारी उदास बसून राहिली. ती हळुहळू मनीच्या अंगावरुन हात फिरवत राहिली. डाव्या डोळ्याच्या आसपास हात फिरवताना अचानक तिच्या हाताला काही खुपले. तिने जरा चाचपले व नखाने थोडेसे उकरले तर एक नख (बहुतेक दुसर्‍या मांजराचे) बाहेर पडले.

मनी तत्काळ उठली. सुलभाने मनीकडे निरखून पाहिले. मनीचा डोळा पूर्ववत झाला होती. बहुधा ज्या मसलमुळे डोळा तिरळा झाला होता त्या मसलमधील ते नख निघाल्यामुळे ती डोळ्याची (बुब्बुळाची) अलाईनमेंट परत जागेवर आलेली असावी. वेदना नाहीशा झाल्यामुळे मनीचे करुण म्याँव जाऊन आता नॉर्मल म्याँव झाले आणि सुलभाकडे कृतज्ञापूर्वक कटाक्ष टाकून मनी पसार झाली.

त्या घराच्या मागच्याच घरात मासे-मटण होत असल्याने त्या वासाने अनेक मांजरे तिथे घोटाळत. त्यातलाच एक बोका अचानक सुलभाच्या घराकडे वळला. ती तेव्हा पापड भाजत होती. नेहेमीप्रमाणे तिचे बोक्याशी बोलणे सुरु झाले. बोका तिथेच उभा. "अरेच्या, तुला पापड आवडतो वाटतं?" असं म्हणून तिनं एक पापडाचा तुकडा त्याच्यासमोर टाकला. बोक्यानेही तो तुकडा खाल्ला जेवढ्या आवडीने मासे खावे तेवढया. काही दिवस तो बोका नियमितपणे त्या घराला भेट द्यायचा खास त्याच्याकरता भाजलेला पापड खायला.

एका सरत्या फाल्गुनात एक मनी तिची दोन पिल्लं घेऊन आली त्या घरात. नुकतीच जन्मलेली ती दोन पिल्लं पाहून घरात अगदी आनंदाला उधाण आलेलं. ओली बाळंतीण म्हणून मनीची अगदी यथायोग्य काळजी घेतली जात होती. अचानक मनीला बरे वाटेनासं झालं. ती पिल्लांपासून लांब राहू लागली, उपजत नैसर्गिक जाणीवांमुळे. घरातले सगळे कासावीस. पिल्लांना दूध कसे मिळणार? कसेबसे ड्रॉपरने, बोळ्याने दूध पाजणे सुरु केले. ऐन पाडव्याचा दिवस. पण सगळ्या घरावर सुतकी कळा. मनीच्या नाकातून सारखा स्त्राव सुरु झालेला. बिचारी पारच आजारी झाली. तिला उचलून व्हेट कडे नेले. त्याने अँटिबायोटिकचे इंजेक्शन दिले. तिला घेऊन सगळे घरी आले पण मनीची स्थिती पाहून कोणालाच गोड लागेना. मनी एका कोपर्‍यात मलूल बसलेली तर पिल्लं बिचारी आईविना दुसरीकडे. सगळा दिवस बेचैनीत गेला. रात्र कशी जाणार? सगळ्यांनाच घोर लागलेला... रात्री सगळे अर्धवट झोपेत, अर्धवट जागे... सकाळी पाहिलं तर मनी जागेवर नव्हती. एक ठोका चुकलाच सुलभाचा व सुनीलचा... मुलींना काय सांगायचे दोघे एकमेकांकडे पहात होते...
पण...अर्ध्या एक तासात मनी तिच्या पायांनी घरी आली. पिल्लांच्या जरा जवळही गेली. हुश्श... सर्वांनीच सुस्कारा सोडला... मनीचे नशीब बलवत्तर आणि पिल्लांचेही... पाडवा दुसर्‍या दिवशी साजरा झाला त्या घरात.

नेमकी कुठल्या भाटीची पिल्लं होती ती आठवत नाही आता. पण बेरकू -ठिपकूच होते ते. एक खूपच बेरकी असल्याने ते बेरकू व त्याच्या भावंडाच्या पाठीवर विशिष्ट पद्धतीने ठिपके असल्याने तो ठिपकू... सांगायची गोष्ट अशी की ठिपकूला सुलभाचे फारच प्रेम. दिवसातून एकदाही सुलभाने त्याला प्रेमाने कुरवाळले नाही तर हक्काने तिच्या पुढ्यात यायचेच हे महाराज. सुलभाही म्हणायची माझे मागच्या कुठल्या तरी जन्मींचे पोर असणार हे!

एकदा सगळा दिवस खूपच गडबडीत गेला. पण पिल्लांना मात्र खायला-प्यायला तर सगळे मिळाले होते. बेडरुम वरच्या मजल्यावर असल्याने सगळे गाढ झोपी गेले असताना अचानक मध्यरात्री सुलभाला जाग आली ती मांजराच्या आवाजामुळे... करुण आवाजातल्या म्याँवने... तिला पटकन कळेना कुठून आवाज येतोय हा? नीट पाहिल्यावर लक्षात आले. तिच्या बंद खिडकीच्या बाहेर गजाला लोंबकळत ठिपकू ओरडत होता. पटकन खिडकी उघडून सुलभाने ठिपकूला जवळ घेतले. पाहिले तर त्या खिडकीच्या बारला लोंबकळल्यामुळे बिचार्‍याचे पंजे थोडे रक्ताळले होते. "दूध नाही मिळाले का तुला?" सुलभा त्याला विचारत होती. तिने जवळ घेतल्याच्या आनंदात ठिपकू तिच्या कुशीत डोळे मिटून पहुडला होता. त्याला आज दिवसभरात सुलभाचा हात लागला नव्हता म्हणून चिरंजीव मध्यरात्री आले होते लाड करवून घ्यायला...

अशाच कित्येक मांजरी, कित्येक पिल्ले तिथे येऊन गेली. त्यांच्या किती कहाण्या. काही करुण तर काही खूपच गमतीच्या. आजही तिथे मांजरे असतातच.. फक्त तुम्हाला तिथे जावे लागेल... त्या घरी मांजरांच्या घरी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाटच हे मार्जार प्रेम.लेख अगदी वेगळाच अन गोडव्यानं भरलेला आहे.. अशी काही प्राणीमित्र माणसं आपल्याला माणुसकीच्या आपल्या संकुचित अर्थाची जाण देतात..

धन्स शशांकजी या शब्द्चित्रासाठी.

Happy
मी मांजरमाणूस नाही. (मांजरघाणी असा शब्दं नाहीये बहुतेक)... मी कुत्रामाणूस असूनही...
लेख आवडलाच.

लेख आवडला. मलाही प्राण्यांची आवड नाही पण गिरगावात रहात असताना मांजरंच मांजरं पाहिलीत. मजल्यावर एका वेळेस २ तरी मांजरं इकडून तिकडे जाताना दिसत इतकी मांजरं. आणि एक तरी भाटी कायम व्यायलेली असायची वाडीत. त्यामुळे पुढची पीढी कायम चालूच.

माझा भाऊ रांगता होता तेव्हा कायम जाऊन त्या पिल्लांना आवळायचा, त्यांच्याशी खेळायचा. कितीही परत घरात आणला तरी नजर चुकवून त्यांच्यापाशी जायचाच. मग त्याला त्या मांजरांच्या केसांमुळे बाळ दमा जडला. काही वर्षं बिचार्‍याने (साधारण ७-८ वर्षांचा होईपर्यंत) सहन केला आणि मग आपोआप तो दमा गेला.

किती सुंदर लिहीलेत शशांक.
मांजरे म्हणली की मला अगदी पार भरुन येते. पोरं आणि मांजरं अवतीभोवती असली की जगण्याची उमेद येते.