आबुचं कशातच लक्ष लागत नव्हत....गेला अर्धा तास हातातल्या पुस्तकाचे एक पानही तिने उलटले नव्हते...एरव्ही पुस्तक हातात आले कि पूर्ण वाचल्याशिवाय ती ते खाली ठेवत नसे, अगदी नाईलाज झाला तरच ती ते बाजूला ठेवत असे पण आज ती त्या रुममध्ये काय शहरातच नवीन होती, तिथे कुणीही तिच्या ओळखीचं नव्हत, तिच्या कडे वेळच वेळ होता, पुस्तक वाचण्यापासून तिला कुणीही अडवणार नव्हत पण तिचं चित्त दूर कुठेतरी कुणाच्यातरी आठवणीत गेलं होतं....तिला तिचा ऑफिस मधला पहिला दिवस आठवला..मि.विल्सन, तिचे बॉस, त्यांनी आबुची बोर्डरूम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, बहुतेकांनी तिचं स्वागत खूप प्रेमाने केलं. तिच्या टीम मध्ये बार्बारा, निकी, टिमोथी आणि तो खडूस मायकेल...मायकेल वगळता त्या तिघांनी तिला गराडा घातला आणि तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, त्यात पहिल आलं ते तिंच नाव "अबोली" ते कुणाच्याही लक्षात रहाण कठीण, ते सगळेच वेगवेगळ्या देशातून आले होते त्यामुळे तिने त्यांना तिच घरच नाव "आबु" आहे हे सांगितलं आणि त्या सगळ्यांनी तिला आबु म्हणायला सुरुवात केली. त्या सगळ्यांनी तिला नवीन ऑफिस मध्ये रुळायला खूप मदत केली, मि. विल्सन तर खूपच चांगले होते, एक मायकेल वगळता सगळ्यांनी तिला पटकन आपलंस केलं, त्यामुळे आपण घरापासून दूर आहोत याचा तिला त्रास झाला नाही. पहिल्याच आठवड्यात मिटिंग मध्ये तिचा आणि मायकेलचा एका प्रश्नावरून मोठा वाद झाला, दोघंही आपापल्या मुद्द्यांवरून हटायला तयार नव्हते. आबु तशी शांत असली तरी तिला जे योग्य वाटते ते ती दुसऱ्यांना पटवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करायची, समोर कोण आहे याचा तिच्यावर कधीही दबाव यायचा नाही, मायकेल ही तसाच तिच्याच सारखा होता....दोघंही मागे हटायला तयार नाहीत, मि. विल्सन नि बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या कामाला निघून जायला सांगितले आणि त्यांनी या दोघांचा वाद लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली...दोघंही समोरासमोर बसून स्वतःचे मुद्दे पटवून देत होते आणि मि. विल्सन त्यातील महत्वाच्या गोष्टी टिपून घेत होते....साधारण दोन तासानंतर त्यांनी या दोघांना थांबवले आणि स्वतःचा त्या प्रश्नावर निर्णय दिला आणि त्या दोघांना जागेवर जायला सांगितले, एकमेकांकडे रागाचा कटाक्ष टाकून ते दोघे आपापल्या जागेवर गेले.....त्यानंतर हे नित्याचेच झाले, कुठल्याही प्रश्नावर आबु आणि मायकेलचे एकमत होत नसे....सगळ्या टीम ने त्यांच्यातला वाद संपावा या साठी चिकार प्रयत्न केले, इतर वेळी ते दोघे ठीक असत पण मिटिंग मध्ये वाद सुरु झाला कि काही खरे नसे...अर्थात दोघेही प्रचंड हुशार होते त्यामुळे तो वाद खरोखरच ऐकणाऱ्याच्या ज्ञानात भर टाकत असे त्यामुळे मि. विल्सन खूप खुश होते, या दोघांच्या वादामुळे त्यांना कंपनीचा भरपूर फायदा करून देता येत होता...तिला आठवलं त्या दिवशी शुक्रवार होता, नेहेमीच्या शिरस्त्यानुसार सगळी टीम जवळच्या बार मध्ये एक ड्रिंक घ्यायला जाऊन पोहोचली, बार्बारा आणि टिमोथी नी वातावरणातला ताण कमी करायचा प्रयत्न केला कारण त्या दिवशी आबु आणि मायकेल तीन तास भांडत होते, कहरच झाला होता, कधी नव्हे ते मि विल्सन वैतागले होते...निकीने मायकेलला आणि बार्बारा, टिमोथी ने आबुला समजवायला सुरुवात केली...गंभीर पणे त्यांचे बोलणे ऐकणाऱ्या आबुची आणि मायकेलची एका क्षणी नजरानजर झाली आणि आबुच्या हृदयाचा ठोका चुकला...पटकन तिची नजर खाली झुकली, गाल गरम झाले, अस्वस्थपणे तिने गाल चोळले आणि मान झटकून तिने तो विचार झटकून टाकला आणि मोकळ हसून मायकेलची चक्क माफी मागितली...सगळे पहातच राहिले आणि लक्षात आल्यावर एकच जल्लोष केला आणि मग त्या सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या...तिथून निघाल्यावर मात्र आबु आपण माघार का घेतली त्याचा विचार करू लागली पण मग उगाच ऑफिस चे वातावरण का बिघडवायचे? त्यामुळे आपला निर्णय योग्य होता हे तिने स्वतःला बजावले...आणि तिला खूप हलक वाटत आहे हे तिलाही जाणवलं, मनावरचा ताण कमी झाल्यामुळे असेल कदाचित...असं तिने मनाशी म्हटलं खर...पण मायकेल शी झालेली नजरानजर तिला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली...काय होत बरं त्या नजरेत? तिच्याही नकळत ती विचार करू लागली..काहीतरी आश्वासक होतं, आत कुठेतरी खूप सुखावून त्या क्षणी तिला तरंगल्या सारख वाटलं होत...नसेल कदाचित भांडून थकलेल्या मनाला त्या वातावरणात मोकळ झाल्यासारख वाटलं असेल...मग निघताना निरोप घेताना मायकेलने पण सगळ्यांसमोर तिची माफी मागितली आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हाही तिला तिचे गाल गरम झाल्याचे जाणवले होते आणि तिने त्याची नजर हसून टाळली...तिने पुन्हा गाल खसा खसा चोळले आणि ती ट्रेन मधून खाली उतरली...पुढचे दोन दिवस ती याच गोष्टींचा विचार करत होती......
सोमवारी आबु ऑफिस मध्ये आली तेव्हा तिच्या नजरेने मायकेल ला शोधलं पण तिला तो कुठेही दिसला नाही, तेवढ्यात मि. विल्सन नी तिला हाक मारली आणि आजच्या आज तिला ब्रिस्बेन ऑफिसला जायला सांगितलं, दहा दिवस तिथे राहून तिथलं काम संपवून परत ये म्हणून तिच्या हातात तिकीट ठेवलं..आबु गडबडीने घरी आली आणि सामान आवरून ती एअरपोर्टला निघाली...त्या सगळ्या गडबडीत ती मायकेलला विसरूनच गेली पण ब्रिस्बेनच्या हॉटेल रूमवर जेव्हा ती हातात पुस्तक घेऊन बसली तेव्हा एखाद्या विजेसारखी मायकेलची ती नजर चमकून गेली आणि आबु एका वेगळ्याच उदासीने घेरली गेली.....
मायकेल जरा आज थोडा उशीराच ऑफिसला पोहोचला, सकाळीच मि.विल्सन नी त्याला फोन करून येताना एक काम आटपून यायला सांगितले ते करूनच तो ऑफिसला आला, नकळत त्याची नजर आबुच्या जागेवर गेली, सीट रिकामी पाहून त्याला काळजी वाटली, कुठे बरं गेली ही? उशिरा तर येत नाही कधी, का तिलाही काही काम दिलं असेल मि विल्सन नी? पण मग टिमोथी म्हणाला कि आबु आजच ब्रिस्बेन ला गेली तेव्हा मायकेल उगाच अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याच मनच ऑफिस मध्ये लागेना...गेले दोन दिवस तो आबुचाच विचार करत होता..परवा जेव्हा त्यांची नजरानजर झाली तेव्हा तिचे लाल झालेले गाल त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याच्याही नकळत त्याच हृदय हवेत तरंगलं होत...आजही मायकेलला ती भावना हवीहवीशी वाटून गेली...नंतर मिटिंग मध्ये मि विल्सन जेव्हा मायकेल कडे रोखून पाहत म्हणाले कि आबु दहा दिवस ब्रिस्बेन ला राहणार आहे तेव्हा त्याच्याही नकळत मायकेलचा चेहेरा कसानुसा झाला...तुला काही प्रोब्लेम नाही न मायकेल? या मि विल्सनच्या प्रश्नाला मायकेलने यांत्रिक पणे नकारार्थी मान हलवली खरी पण त्याचे मन खोल खोल उदासीत बुडून गेले...पुढच्या मिटिंग मध्ये त्याचे लक्षच लागेना पण मि. विल्सन काही सोडायला तयार नव्हते, ते मायकेलला हजार प्रश्न विचारून भंडावून सोडत होते, थोड्याच वेळात मायकेल हिरीरीने वाद घालू लागला पण मग त्याला परत जाणवले "आबु नाही तर वाद घालण्यात काहीच मजा नाही...."आबु नाही तर वाद घालण्यात काही मजा नाही न?" या मि.विल्सनच्या प्रश्नावर मायकेल एकदम दचकला, त्याने मि. विल्सन कडे रोखून पहिले, यांना माझ्या मनातलं कसं कळलं? त्याने संशयाने मि. विल्सन कडे पहिले, मिश्कीलपणे हसणाऱ्या मि.विल्सनना पाहून मायकेल अजूनच बुचकळ्यात पडला. हे आपल्याला काय होत आहे? आजपर्यंत आबु दिसली कि रागाने तिच्याकडे पाहणारा मी ती नाही तर इतका बेचैन का होतो आहे? तेव्हा राग येणारे तिचे सगळे मुद्दे आज अचानक मला पटायला लागले आहेत अस का वाटत आहे? संध्याकाळपर्यंत मायकेल खूपच उदास झाला...अजून नऊ दिवस....एक सुस्कारा टाकून मायकेल ऑफिस मधून निघाला.....
आपल्या केबिन मधून मायकेल कडे पाहणाऱ्या मि.विल्सन ना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या...आबु आणि मायकेल हुशार होते, त्यांच्या वादातून त्यांना खूप चांगले मुद्दे मिळत होते, त्याचा कंपनीला फायदा पण होत होता,पण यांच्या भांडणावर काहीतरी उपाय काढायलाच हवा होता हे मि. विल्सन ना सारख जाणवत होतं. ते एक हुशार संचालक होते, त्यामुळे आपल्या स्टाफ ने ऑफिसच वातावरण चांगल राखायला हवं असं त्यांना नेहेमी वाटे...मायकेल आणि आबु बद्दल त्यांना ममत्व वाटे....पण त्यांचे वाद कमी कसे करावेत हेच त्यांना कळत नव्हते..शुक्रवारी तर कहर झाला होता, आबु आणि मायकेल कडे हताश पणे बघत बसलेल्या मि. विल्सन ना अचानक राग आला, आधीच त्यांचं सकाळीच त्यांच्या बायकोशी भांडण झाल होतं, वैतागूनच ते ऑफिस ला आले होते आणि आता गेले ३ तास चालू असलेल्या त्या दोघांच्या वादाने त्यांच्या कपाळावरची शीर उडू लागली, रागाने ते काही बोलणार इतक्यात त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला, त्यांनी मेसेज उघडला,"जाऊ दे रे, नवरा बायको नाही भांडणार तर कोण भांडणार, हो कि नाही?" बायकोचा तो मेसेज बघून मि.विल्सनच्या चेहेऱ्यावर हसू फुलल आणि त्याच वेळी त्याचं लक्ष भांडणाऱ्या त्या दोघांकडे गेलं आणि त्यांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली...ते त्या दोघांना खूप रागावले, मि.विल्सन ना चिडलेले पाहून आबु आणि मायकेल एकमेकांकडे अपराधी नजरेने पाहू लागले, आणि शांत होत त्या दोघांनी मि विल्सनची माफी मागितली, एकमेकांकडे सौम्य कटाक्ष टाकून ते आपापल्या जागेवर गेले ...आज पहिल्यांदाच एकमेकांबद्दल रागा व्यतिरिक्त वेगळी भावना जागृत झालेली मि. विल्सन ना जाणवली आणि "लोहा गरम है, हातोडा मार लो" त्यांच्या मनात विचाराची चक्रे वेगाने फिरली....त्यांनी आबुला सोमवारीच ब्रिस्बेन ऑफिसला पाठवायचे ठरवले आणि त्यांना दोघांना भेटता येऊ नये म्हणून मायकेल ला आबु जाईपर्यंत ऑफिस च्या बाहेर पाठवले....विरह आपले काम चोख बजावणार याची त्यांना खात्री होती...आबूचा गोंधळलेला चेहेरा आणि मायकेलची ही हरवलेली मनःस्थिती.... मि. विल्सन ना खडा बरोबर बसल्याची जाणीव झाली आणि त्यांनी स्वतःची पाठ थोपटली....आता फक्त आगीत तेल ओतत राहायचे....
चार दिवस झाले, मायकेल कडे मि विल्सन ना पाहवेना, आबु शी ते रोज फोन वर बोलत होते आणि तिचीही अवस्था त्यांना कळून चुकली होती....आता दुसरा वार करायला हवा होता...त्यांनी मायकेलला अचानक ब्रिस्बेन ला जायला सांगितले, मनातला आनंद मायकेलला लपवता आला नाही...सिडनी ते ब्रिस्बेन अंतर कसे पार पडले ते त्याला कळलेच नाही...तिथल्या ऑफिस मध्ये तो पोहोचला तेव्हा साडे चार वाजून गेले होते, बरचसं ऑफिस रिकाम होत आल होतं...त्याला समोरच बसलेली आबु दिसली आणि स्वतःवर ताबा मिळवत तो तिच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला, समोर अचानक मायकेल ला बघून आबु ताडकन उभी राहिली आणि भान विसरून त्याच्या मिठीत शिरली....रोज इतक्या शब्दांनी एकमेकांवर वार करणाऱ्या मायकेल आणि आबु कडचे सगळे शब्द आज संपले होते...आबू भानावर आली आणि चटकन मिठीतून बाजूला होत तिने मायकेल ची नजर चुकवली, ऑफिस मधल्याना मायकेलची ओळख करून देत तिने कामाला सुरुवात केली, मायकेल गोंधळला पण स्वतःला सावरून त्याने कामात लक्ष घातले, संध्याकाळी ते दोघे हॉटेल वर परत आले, डिनरला भेटू असं ओझरत म्हणून मायकेल कडे न बघताच आबू तिच्या रूमवर निघून गेली....एवढा वेळ तिचा उडालेला गोंधळ मायकेलच्या नजरेतून सुटला नव्हता आणि आपण तिला ती आवडते हे सांगितलेच नाही हे त्याच्या पहिल्यांदाच लक्षात आले आणि मग तिचा तो उडालेला गोंधळ त्याच्या लक्षात आला. थोड्या वेळाने तयार होऊन तो डिनर टेबल पाशी आबुची वाट पाहत बसला..निळ्याशार ड्रेस मधली आबू खूपच गोड दिसत होती, तिला पाहताच मायकेल आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तिचं स्वागत केलं. "तू खूप सुंदर आहेस आणि मला तू खूप आवडतेस," मायकेलच्या त्या वाक्याने आबू भानावर आली, तिने चटकन मान वर करून मायकेल कडे पाहिले आणि हसून तिच्या डोळ्यात रोखून पाहणाऱ्या त्या तपकिरी डोळ्यांमध्ये ती हरवून गेली..मायकेलने हलकेच तिचे हात हातात घेतले आणि हलकेच तिला "आय लव्ह यु!" म्हटले, आबुने लाजून मान खाली घातली आणि डोळे मिटून "मी टू" म्हटले...नंतर मात्र त्यांच्या युगायुगांच्या राहिलेल्या गप्पा सुरु झाल्या...गप्पा मारताना तिने सहज त्याला इथे येण्याचे कारण विचारले, आणि कारण शोधताना त्यांच्या लक्षात आले कि इथे तर काही महत्वाचे काम नव्हते मग आपल्याला दोघानाही इथे पाठवायचे कारण काय? मि.विल्सनचा डाव त्या दोघांच्याही लक्षात आला आणि आपल्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट पाहून त्यांना फार आनंद झाला...
दुसऱ्या दिवशी मिटिंग रूम मध्ये शिरणाऱ्या आबू आणि मायकेल कडे बार्बारा, टिमोथी, निकी आणि मि. विल्सन अगदी टक लावून पाहत होते, स्वतःच्या करामती बद्दल मि विल्सन नि सगळ्यांना सांगितलं होतं. आबू आणि मायकेल काही न बोलता आपापल्या जागेवर बसले आणि मिटिंग ला सुरुवात झाली....गाडी एका प्रश्नाकडे वळली आणि आबू आणि मायकेलचे जोरजोरात वाद सुरु झाले, सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले, काय होतं आहे हे कुणालाही कळेना, सगळे डोक्याला हात लावून बसले, त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतंच काही घडत होतं...मि. विल्सनचा चेहेरा पडला, त्यांनी सहकाऱ्यांची नजर टाळली आणि त्यांचा चेहेरा दुःखाने भरून गेला....मग मात्र मायकेल आणि आबुला राहवेना, ते दोघे जोरजोरात हसू लागले, सगळे माना वर करून आश्चर्याने पाहू लागले...त्यांचे नाटक लक्षात येताच मात्र सगळे त्यांच्या हसण्यात सामील झाले..... .वातावरण एकदम मोकळं होऊन गेलं................
आबु चं अॅबी करा!! फारच कसं
आबु चं अॅबी करा!! फारच कसं तरी वाटतय आबु
अलादिन चा बंदर आठवतो.
(माझं नाव अबोली अस्ल्याने असेल.. मला आबु जमलं च नाही :))
मग?? बदल्ताय ना??
छान
छान
कथा खरंच छान आहे.
कथा खरंच छान आहे. आवड्ली.
इन्द्रधनु, अलादिन चा बंदर आठवतो
बघा हो खरंच बदलता येत असेल तर...आपल्या माबो मैत्रिणीसाठी ....:)
कथा आवडली. सुरुवातीला आबु
कथा आवडली.
सुरुवातीला आबु वाचुन "बेफिकीर" यांचा अबु बकर वाटला
मस्त हलकीफुलकी कथा. आवड्ली.
मस्त हलकीफुलकी कथा. आवड्ली.
छान आहे..
छान आहे..
छान आहे कथा
छान आहे कथा
कथा गंमतशीर आहे, आवडली. पण
कथा गंमतशीर आहे, आवडली. पण जरा छोटे छोटे paragraph पाडा की. निबंध वाचल्यासारखी वाटते नाहीतर.
थोडक्यात गोडी, छान जमली आहे
थोडक्यात गोडी, छान जमली आहे कथा
पु.ले.शु.
छान आणि वेगळी कथा.पु ले शु...
छान आणि वेगळी कथा.पु ले शु...
छान आहे. टिपिकल M&B स्टोरी.
छान आहे. टिपिकल M&B स्टोरी.