फाटकी झोळी -१

Submitted by अरुण मनोहर on 11 September, 2012 - 23:46

३० जानेवारी
जुन्या तारखेतले हे पान आज केवळ आठवणीतून लिहीत आहे. इतक्या काळाने ह्या पानावर लिहायची वेळ आली, कारण सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी घडायला ह्या दिवसापासूनच सुरवात झाली असावी. पण अर्थात त्यावेळी मला ते माहित नव्हते. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मला ते चित्र एका फ़कीराने दिले होते. “अल्ला मालिक” असा बुलंद आवाज दारावर येणा-या फ़किराने लावला. मी नुकताच जेवायला बसलो होतो. आईने गरम गरम पोळी भाजी ताटात वाढली होती. मी त्यावर ताव मारायला सुरवात करणार, तेवढ्यात फ़कीराची ती हाक कानावर पडली. त्या आवाजात अशी काही विचित्र पुकार होती, की मला राहवले नाही. पानातली पोळी भाजी गुंडाळून त्या फ़कीराला नेऊन दिली. त्याने ती दारातच बसून खाल्ली. “पाणी पाज” अशी हातानेच खूण केली. मी आणलेल्या गडव्यातले पाणी त्याने ओंजळीत टाकायला सांगून गटागटा प्यायले. “मालिक तेरा खयाल रखेंगा बच्चा. तू यह तसबीर रख. जहां हमेशा तेरी नजर पडती है, वहा रख. मालिककी नजरका आयना तेरी हर मुराद पुरी करेंगा.” त्याने कळकट फ़ाटक्या झोळीतून एका चित्राची पुंगळी काढून माझ्या हातात दिली. आत येऊन मी ते चित्र पाहिले. जाड कागदावर ऒईल पेंटने काढले होते. चित्र बरेच जुने वाटत होते.
फ़कीराच्या झोळीत राहून त्यावर धुळीचे पुटण चढले होते. एक प्रकारचा ऎंटिक फ़ील होती. चित्राच्या मधभागी एखादा मोठा डोळा असावा असा काहिसा लंबगोल काढला होता. त्यातून वेगवेगळ्या रंगांच्या किरणांसारखे फ़र्राटे चारी बाजूला पडत होते. डोळ्याच्या बाहेरची सगळी जागा छोट्या मोठ्या आयताकृती आकारांनी व्यापली होती. त्यातही रंगांची वादळे होती. कुठल्याशा शिकावू मॊडर्न आर्टवाल्या चित्रकाराने एखादी कलाकृती निर्माण करायचा प्रयत्न केला असावा असे ते चित्र होते. चित्रकाराची सही काही वाचता येत नव्हती. पण तसे बरे दिसत होते. आणि फ़कीराने काही शुभेच्छा बोलून ते दिले होते. मी जास्त विचार न करता ते माझ्या अभ्यासाच्या टेबलवर बरोबर समोरच्या भिंतीवर लावले. अभ्यास करतांना कधी कंटाळा आला की नजर बरोबर त्या डोळ्याच्या मध्यावर लावून आत खोल पहाण्याची एक सवयच मला लागून गेली. पुढे कधीतरी त्या चित्राला एक फ़्रेम देखील लावून घेतली.

पुढे जे काही घडत गेले, त्याच्याशी ह्या चित्राची काहीतरी सांगड असावी असा दाट संशय आल्यानंतर हे पहिले पान, आणि डायरीतली पुढची बरीच पाने आठवून आठवून अशीच मी नंतर भरलेली आहेत. माझ्या मनातला संशय पडताळून पहाण्यासाठी हे चित्र मिळाल्यानंतरच्या घटना संगतवार मांडणे आवश्यक आहे.

९ फ़ेब्रुवारी
मॆथ्स मधला एक अतिशय कठीण प्रॊब्लेम घेऊन त्याच्याशी झगडत बसलो होतो. मी वर्गात काही खूप हुषार वगैरे म्हणून ओळखला जात नाही. मी आपला साधारण मध्यावर असतो. दोनचार हुषार मुलांशी माझी घट्ट मैत्री मात्र आहे. कठीण वगैरे प्रॊब्लेमच्या वाटेला मी जात नाही. आज वर्गात सर्वात हुषार समजल्या जाणा-या दिनेशनी हा प्रॊब्लेम न जाणे कुठून आणला, आणि त्याला तो सोडवता आला आहे असे सांगितले. आम्हा मित्रांमधे त्याने असाही दावा केला की आपल्या वर्गातला कोणीच हा प्रॊब्लेम सोडवू शकणार नाही. तेव्हा एक गंमत म्हणून मी तो लिहून घेतला. घरी त्याच्याशी बरीच झटापट करून काही मार्ग सुधरला नाही. कंटाळून सवयीने समोरच्या चित्रातील डोळ्यावर नजर लावली. त्यातील रंगांच्या कारंज्यात गोल गोल फ़िरून भोवळ यायला लागली आणि अचानक मनात विचार उमटला. “हा प्रॊब्लेम सोडवणे आपल्यासारख्याला केवळ अशक्य आहे. आधीच डिफ़रेन्शीयल इक्वेशन हा विषय बिचकतच आपण हाताळतो. आता दिनेश सारखा अत्यंत हुषार मुलगा म्हणतोय की फ़क्त तोच हा सोडवू शकेल, तर असेलही तसे. माझ्याने हा प्रॊब्लेम सुटणे केवळ अशक्य आहे.” असा विचार केल्यावर मी वही मिटली. पण डोळ्यासमोर मघा लिहीत असलेल्या स्टेप्स येतच राहिल्या. काही केल्या तो प्रॊब्लेम माझा पिछा सोडेना. मी पुन्हा वही उघडली, जुन्या स्टेप्स खोडून नविन विचाराने सुरवात केली. आणि कसे कोण जाणे, पटपटा उत्तर मिळविले. दिनेशने दिलेल्या उत्तराशी ते सही जुळत होते. माझा स्वत:वर विश्वासच बसेना. दुस-या दिवशी दिनेशनेही “तू एखाद्या पुस्तकात शोधून लिहीले असशील” असाच संशय घेतला.

१५ फ़ेब्रुवारी
तीन मुलांची शिक्षणे, वाढती महागाई ह्या सर्वांसाठी सरकारी नोकरीतला तुटपुंजा पगार पुरविणे ह्यात बाबांची ओढाताण होते आहे हे मला दिसते आहे. मी एकदाचा एंजिनियर झालो की निदान बरा पैसा घरी येइल. तोपर्यंत अर्थातच मला माझ्या सगळ्या मागण्या मनातच ठेवल्या पाहिजे. रोज कॊलेजमधे सायकल मारीत जाण्यात किती वेळ खर्च होतो. इतरांसारखी मोटारसायकल असती तर काय बहार झाली असती! मागे एकदा सहजपणे बाबांना म्हणून गेलो होतो. त्यांच्या चेह-यावरच्या असहाय्यतेनेच मला काय ते सांगितले होते. मोटार सायकल आता आपण स्वत:च्याच पैशाने घेणार. इंजिनियर झाल्यावर. असं आत्ता काही दिवसांपुर्वीच म्हटलं, आणि आज बाबा मला डिलरच्या दुकानात घेऊन गेले आणि तीन वर्षे जुनी बाइक माझ्यासाठी घेतली. बाबांचे इन्स्युरंसचे पैसे मिळाले होते, आणि सध्या मोठी अशी दुसरी गरज नव्हती, त्यामुळे त्यांनी आठवणीने माझी इच्छा पूर्ण केली होती.

१८ फ़ेब्रुवारी
प्रगतीच्या शाळेत गॆदरिंगसाठी नाटिका बसवली होती. तिची त्यात भाग घेण्याची खूप इच्छा होती. पण तिला काही चान्स मिळू शकला नव्हता. ती खूपच नाराज होती. “अग जाऊ दे. ह्या वर्षी नाही मिळाला, आता सगळ्यांचे सिलेक्शन झाले आहे. हा विषय विसर आता. ह्या वर्षी हे नाटक तुझ्या वाट्यात नाही.” असा दिलासा मी तिला दिला त्या दिवशीच ती शाळेतून नाचत घरी आली. कोणी एक मुलगी आजारी पडल्यामुळे तिला चान्स दिला होता. हे मी पुढे खूप काळाने लिहीत आहे, पण मी जे म्हणेन, त्याच्या नेमके उलटे परिणाम ते चित्र मला देत असावे अशी शक्यता वाटते.

८ एप्रील
परिक्षा ऐन भरात आल्या आहेत. रोज अभ्यास करतांना त्या चित्रातील रंगांच्या फ़वा-यात गोल गोल फ़िरणेही चालूच आहे. जे पेपर्स खूप कठीण जातील अशी भिती होती, ते चांगले जात आहेत. ह्या उलट जे विषय अगदी सोपे वाटायचे त्यांनी विषेश हात दिलेला नाही. फ़किराने त्या चित्राच्या रुपात काही अगम्य त्राटक माझ्या हातात दिले आहे कां?

३ जुलै
शेवटी एकदाचा रिझल्ट जाहीर झाला. मी इंजीनियर व्हावे हे बाबांचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या बॆचपैकी कितीतरी जणांनी कॆंपस इंटरव्ह्यूमधेच जॊब पटकावले. सिमेन्स, टाटा, बी एच ई एल, किती मोठमोठ्या कंपन्यांनी कॊलेजांमधून जाळी टाकली होती आणि परिक्षेच्या निकालाच्या आधीच निवड जाहीर देखील केली. मला मात्र कोठूनच निवड झाल्याचे पत्र आले नाही. इतके इंटरव्ह्यू दिले! एकदोन तरे ब-यापैकी छान झाले होते. मनात आशा उमटली होती की कुठेतरी नक्की चान्स लागेल. पण आता लक्षात येते आहे की अशी आशा मनात उमलली तेव्हाच मला कळायला हवे होते, की हे होणारच नाही. आता पेपरस चाळून वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज टाकायला सुरवात केली आहे. मनासारखी एकदेखील जाहिरात पहाण्यात येत नाही. तरी दिसेल त्या जाहिरातीलाच अर्ज पाठविले आहेत. पण त्यांचे कोणाचेच उत्तर नाही. माझ्यातच काहीतरी उणे आहे, की मला कोणी सिलेक्ट करणारच नाही. अगदी ७०% मार्क्स मिळवले आहेत तरीही. मी एकसारखे स्वत:ला बजावित आहे की मला कुठेच चांगली नोकरी मिळणार नाही. पण हे असे बजावून काही मला अपेक्षित असणारा परिणाम होणार नाहीये. चांगली नोकरी मिळणारच नाही हे अगदी सहजपणे मनात उमटले पाहिजे. इतके सहजपणे की, त्या त्राटकाची पुसटशी देखील आठवण त्या विचाराशी जोडलेली नको. पण असे काही झाले नाही. प्रत्येक वेळी मनात मीच ठरवून केलेला विचार असतो की मला नोकरी मिळणारच नाही. आणि त्याचा काहीच उपयोग नाही. हे सगळे आपोआप होण्याऐवजी माझ्या कंट्रोलमधे असते तर किती छान झाले असते! पण मला अनाहूतपणे चिकटलेले ते त्राटक माझ्या ताब्यात कधीच येणार नाही. (मी ठरवून असे म्हटले आहे त्यामुळे त्राटकाचा परिणाम इथे देखील नाहीच.)

१५ जुलै
बाबांनी आज पाचव्यांदा विनयच्या नोकरीचा विषय चघळला. विनय माझ्याहून दोनच वर्षांनी लहान, पण ग्रॆजुएट होऊन माझ्याआधी नोकरीला देखील लागला. आज तो एकटा बाहेरगावी राहून चांगल्या कंपनीत जॊब करीत आहे. आणि मी त्याचा मोठा भाऊ, अजूनही अर्ज खरडीत बसलो आहे. हे आतापर्यंत किती वेगवेगळ्या संदर्भांत त्यांनी मला आणि घरातल्या सगळ्यांना ऐकविले आहे. विनयचे तर इंजीनियरिंग देखील नाही. साधी कॊमर्सची डिग्री. मार्क्स देखील काही खास नव्हते. मला तर वाटलेच नव्हते की ह्याला कुठे लगेच नोकरी मिळेल. म्हणून त्यावेळी मी त्याच्या मागे लागलो होतो, की तू मास्टर्स कर. पण त्याला पडली पैसे कमाविण्याची आग! कोणाचे न ऐकता त्याने नोकरी शोधायला सुरवात केली. म्हटले शोध! नाही मिळाली की आपसूकच मास्टर्ससाठी ऎडमिशन घेशील. पण हेच चुकले. मला असे प्रकर्षाने वाटले, अन पंधरा दिवसातच त्याला इंटरव्ह्यूचे बोलावणे आले. तिथे तो सिलेक्टपण झाला. ते गाव आमच्यापासून सहा तासांच्या अंतरावर होते. सिलेक्ट झाल्यावर तिथून लगेच मिठाईचा डब्बा घेऊन आला होता. मी तोंडदेखली थोडी चाखल्यासारखे केले. मुळीच गोड चव लागली नाही. त्यावेळीस माहित नव्हते, आता लक्षात येते आहे, विनयचे सिलेक्शन होणार नाही असे मला प्रकर्षाने जाणवले हीच त्याच्या जॊबची सुरवात होती.

आणि हां, बाबा नेहमी आम्हा मुलांना सांगतात, आपली सगळी कामे आपण स्वत:च्या हिमतीवर करायची. लहानपणापासून आम्हा भावांबहिणींना त्यांनी अशीच सवय लावली आहे. आणि त्यात वाईट काहिच नाही! आम्ही कधीच आईवडिलांकडे सपोर्टसाठी पाहिले नाही. विनयला जॊब लागला, तेव्हा बाबांच्या शिकवणीनुसार नोकरीच्या त्याच्या गावाला त्याने एकट्यानेच जायला हवे होते. मला तर अगदी खात्रीच होती. पण कां कोण जाणे, नोकरी जॊईन करायला गेला तेव्हा बाबा अगदी त्याने न म्हणता त्याच्याबरोबर गेले. त्याला सेटल करून देण्यासाठी म्हणून! तो एकटाच जाईल असे मला जे जाणवले, त्यामुळेच बाबांना त्याच्याबरोबर जावे असे वाटले, असे नाही तर दुसरे काय म्हणू?

**********

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users