गाडीच्या मागच्या काचेतून आईचे गोट्याकडे लक्ष होते. गाडीकडे अगतिकपणे पाहणाऱ्या गोट्याकडे पाहून आईचे मन गलबलले, तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या...पुढच धूसर होण्याआधीच तिने स्वतःला सावरल आणि एक मोठा श्वास घेऊन समोरच्या रस्त्यावर नजर स्थिर केली.....रोज तिच्या मनाची अशीच अवस्था होत असे, रोजच्यासारखे आजही तिच्या मनात आले कि गाडी परत फिरवावी आणि मागे जावे....पण मग त्याने काय होणार? गोट्याची शाळा सुरु होईल मग आपण तिथे थांबून काय करणार? तिने मानेला एक हलका झटका देऊन मनातले विचार झटकले , तरी ही तिच्या डोळ्या समोर गोट्याचा रडवेला चेहेरा तरळून गेला, पुन्हा तिने कष्टाने रस्त्यावर लक्ष केंद्रित केले.....रोज तिच्या मनाशी तिची अशी लढाई चालूच असायची....
तिच्या डोळ्यासमोरून गोट्याचा चेहेरा हलत नव्हता, तो लहान आहे अजून अशी ती मनाची समजूत काढत असे पण कुठेतरी त्याने हे सगळ स्विकारायला शिकलं पाहिजे असाही एक विचार तिच्या मनात येऊन गेला...पण मग तिला ते किती अवघड आहे ह्याची जाणीव झाली आणि नकळत ती गंभीर झाली...तिला स्वतःचीच अवस्था आठवली....तिला आणि तिच्या नवऱ्यालाही हे सगळ स्वीकारायला किती जड गेल होत...किती आनंद झाला होता त्या दोघांना गोट्याच्या जन्माचा...त्याच्या बाळलीलानी ते आनंदून गेले होते, दिसामासांनी वाढणाऱ्या गोट्याच्या संगोपनात दोघे रमून गेले होते...पण जेव्हा तो वर्षाचा झाला तरी चालेना तेव्हा डॉक्टरकडे फेऱ्या सुरु झाल्या आणि एक दिवस उजाडला खूप बैचैन करणारा.....डॉक्टर समोर रिपोर्ट पडले होते आणि त्यांचा चेहेरा गंभीर झाला होता...तिच्या काळजात धडधडले..नकळत तिने नवऱ्याचा हात घट्ट धरून ठेवला, त्याने अलगद तिच्या हातावर थोपटले आणि नजरेने तिला दिलासा दिला...डॉक्टरांनी शांतपणे रिपोर्ट सांगायला सुरुवात केली...त्यांचा एक एक शब्द तिच्या हृदयावर घाव घालत होता..."सेरेब्रल पाल्सी" तिच्या डोक्यात तो शब्द घुमू लागला...ते पुढे काय बोलले, तिथून कधी निघाले, गाडी सुरु कधी केली, आणि कुठे चालले होते .....काही काही त्यांना दोघानाही कळले नाही....भानावर आले तेव्हा दोघे गाडीत होते, दोघांच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या....सगळ्यात आधी तो भानावर आला आणि त्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, गाडी थांबल्यावर ती भानावर आली...आपण कुठे आलो आहोत त्याचा त्यांना अंदाजच आला नाही, कळले तेव्हा दोन तास भलत्याच दिशेने निघाल्याचे त्यांना जाणवले..मग पुन्हा मागे फिरून ते कसे बसे घरी पोहोचले...त्यानंतर मग कित्येक दिवस ते दोघे एकमेकांची नजर चुकवून रडून घेत पण एकमेकांना धीर देऊन एक दिवस त्यांनी "ही लढाई आपण लढायचीच" असा पण केला...वाटलं तेव्हढ सोपं नव्हत ते सारं...पण गोट्या साठी हे उसन अवसान आणून त्याला यात मदत करायचीच या बाबतीत ते ठाम झाले...खूप शिस्तबद्ध आयुष्य जगायला त्यांनी सुरुवात केली...दोघांनी सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या, त्यात मुख्य कमावून आणण्याची जबाबदारी नवऱ्याने आणि गोट्याच्या संगोपनाची जबाबदारी तिने....एका अंधाऱ्या बोगद्यात त्यांनी प्रवेश केला होता उजेड केव्हा दिसणार, दिसणार कि नाही, काही अंदाज नव्हता ...
नेहेमीच्या वळणावर गाडी वळवून ती कार पार्क मध्ये शिरली आणि तिच्या विचारांना ब्रेक लागला. गाडी पार्क करून ती लिफ्ट मध्ये शिरली आणि तिचे विचार पुन्हा धावू लागले...सगळ्यात आधी तिने नोकरी सोडली आणि तिने गोट्या बरोबर पूर्ण वेळ घालवायला सुरुवात केली, त्यातून तिला गोट्या हळूहळू समजत गेला...सगळ्यात आधी लक्षात आली ती गोट्याची आनंदी वृत्ती...एवढासा जीव पण तिच्या संगतीत खूप आनंदी असायचा, त्याची आकलन शक्ती चांगली होती, त्याला सगळ कळत होत...तिचा धीर वाढला..
जागेवर येउन तिने संगणक चालू केला, आजूबाजूच्या सहकाऱ्यांशी नेहेमीचे संभाषण झाले आणि ती कामाकडे वळली...पुढचे काही तास कामाव्यतिरिक्त काहीही डोक्यात नव्हते....आज तिची सहकारी अंजू आली नव्हती त्यामुळे जेवायला ती एकटीच होती..डबा उघडून तिने जेवायला सुरुवात केली...गोट्याचा उजवा हात आणि उजवा पाय खूपच अशक्त होता, त्याला फिजिओथेरपि सुरु झाल्यावर तो आधाराने चालू लागला, पुढे त्याच्या पायासाठी वेगळे बूट बनवले गेले आणि हातात आधारासाठी काठी...तिला तसा गोट्या बघून खूप वाईट वाटले, नवऱ्याच्या नकळत तिने खूप रडून घेतले..तिला माहित होते कि त्यानेही तसेच केले असेल...पण गोट्याच्या उत्साहाला पारावर नव्हता, आपण एकटे चालू शकतो याचा त्याला कोण आनंद झाला आणि त्याच्या त्या आनंदाने ते दोघेही आनंदून गेले..घरभर फिरताना गोट्या भान विसरून जात असे, हळूहळू तो खाली खेळायला जाऊ लागला, त्याला इतर मुलांसारखे धावता येत नसे, बॉल पकडता येत नसे, पण त्याला सगळ्या मुलांबरोबर खेळायला खूप आवडे....एक दिवस मात्र तो घरी आला तोच रडत...काय झाले रे या प्रश्नाला उत्तर न देता तो सरळ देवघरात जाऊन उभा राहिला आणि रडत रडत देवाशी भांडू लागला...तिचे डोळेही घळाघळा वाहू लागले...गोट्याच्या बालमनाला आपण इतर मुलांसारखे नाहीत याची नियतीने निर्दयपणे जाणीव करून दिली होती...तिने त्याला जवळ घेतले आणि खूप काही समजावले, क्लिनिक मध्ये भेटणाऱ्या कित्येक मुलांची उदाहरणे देऊन तू त्यांच्या पेक्षा किती नशीबवान आहेस हे पटवायचा प्रयत्न केला...तिला जाणवत होते कि या तुलनेला अर्थ नाही पण कुठे तरी त्याने स्वतःला स्वीकारायला पाहिजे हे देखील आवश्यक होते...त्याला काय कळले कोण जाणे? पण हळूहळू तो आपल्या कोशात जाऊ लागला, खाली खेळायला जायचा पण एका बाजूला बेंच वर बसून राहायचा, मुलांच्या चिडवण्याची त्याला सवय झाली होती कि त्याने स्वतःला मिटून घेतले होते...तिने डोळ्याच्या कडा टिपल्या आणि ती जागेवर येऊन बसली आणि कामात गढून गेली...
पुढचे काही तास तिला डोके वर काढायलाही सवड झाली नाही...घड्याळात चार वाजले तशी तिने भराभर टेबल आवरले, संगणक बंद केला आणि पर्स व गाडीच्या चाव्या उचलून ती निघाली...
गोट्याला शाळेत घातले तेव्हा तिला घर खायला उठू लागले म्हणून तिने ही अर्धवेळ नोकरी सुरु केली होती, रोज ती येताना गोट्याला शाळेत सोडत असे आणि घरी जाताना त्याला शाळेतून घेऊन जात असे....कार पार्क मध्ये येऊन तिने गाडी सुरु केली आणि मुख्य रस्त्याला लागली..गाडीच्या वेगाबरोबर तिचे विचार वेगाने धावू लागले...तिला आठवले तिने परवा सहजच गोट्याची वही उचलली आणि उघडली तेव्हा त्याच्या वहिवरचे गोळे गोळे बघून ती चक्रावली...हे काय आहे? ती विचार करू लागली...हळूहळू तिला ते स्पष्ट झाले तसे तिच्या जीवाची घालमेल झाली..ती आता गोट्याला एवढ चांगल ओळखत होती कि तिला जाणवले कि त्याला इतर मुलांसारख लिहायला जमत नाही पण त्याला आपण कमी पडतो ही जाणीव अस्वस्थ करत असावी म्हणून त्याने त्याच्या परीने काढलेला उपाय आहे हा...एकीकडे तिला खूप भरून आले पण तिला त्याचा अभिमानही वाटला कि स्वतःचे प्रश्न तो लक्षात घेतो आहे आणि ते सोडवण्यासाठी पुढाकारही घेतो आहे...तिला लक्षात आले की चला एक नवीन आव्हान समोर उभे ठाकले आहे, भरपूर मेहेनतीचे काम आहे, त्याला लिहायला वाचायला शिकवणे हे नवीन काम हाती घ्यावे लागणार ...यावेळेपर्यंत ती खंबीर झाली होती, तिला माहित होते कि ती हा हि प्रश्न सोडवणार होती, वेळ लागला असता पण ती आणि गोट्या प्रयत्न करणार होते...आता तिला कळून चुकले होते कि आयुष्य हे अशा प्रश्नांनीच भरलेले होते, एखाद्या प्रश्नपत्रिके सारखे...एका प्रश्नाचे उत्तर लिहून झाले कि पुढे अजून एक कठीण प्रश्न तयारच असतो, त्याचे उत्तर शोधून होते तोच नवीन प्रश्न तयार ...तिच्या ओठावर स्मित उमटले...तिला कळेना हा असा विचार करायला आपण गोट्याकडून शिकलो का? हा चिमुकला जीव किती वेगवेगळ्या लढाया खेळतो आहे पण जीवनाकडे पाहण्याचा त्याचा उत्साह आपल्याला जगण्याचे नवीन बळ देतो आहे...यावेळी समोर आलेला हा प्रश्न खरच मोठा आहे पण आपण यातून यशस्वीपणे बाहेर पडणार याची आपल्याला खात्री वाटते आहे याला कारणीभूत गोट्याच आहे......तिला त्याचा खूप अभिमान वाटला.. .शाळेसमोर गाडी थांबेपर्यंत सकाळचा मरगळलेला मूड जाऊन त्याची जागा सळसळत्या उत्साहाने घेतली होती त्याच आवेशात तिने खिडकीतून बाहेर गोट्याकडे पाहिले आणि आश्वासक पावले टाकत येणाऱ्या गोट्याला बघून तिला लढाई जिंकून येणाऱ्या योध्द्याचीच आठवण झाली आणि तिचे मन प्रसन्न हसले.... गोट्याच्या डोळ्यातील आनंद आणि तिच्या मनातील आनंद एक होऊन सगळ वातावरण आनंदाने भरून गेलं....
लढाई भाग २
Submitted by vandana.kembhavi on 5 September, 2012 - 07:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोट्याची लढाई तुमच्यापर्यंत
गोट्याची लढाई तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावी म्हणुन केलेला हा प्रयत्न, आशा आहे तुम्हाला आवडेल...वंदना
छान लिहीतेस ग तू. खूप आवडले.
छान लिहीतेस ग तू. खूप आवडले.
लढाई १ व लढाई २ - दोन्ही
लढाई १ व लढाई २ - दोन्ही आवडल्या. ऊत्तम लिहिले आहे. दोन अशाच मुलीना मी ओळखतो म्हणून अधिकच आवडल्या...
मस्त!!
मस्त!!
आवडली. मस्तच आहे. सकारात्मक
आवडली.
मस्तच आहे.
सकारात्मक दृष्टीकोनातून लिहिलेली गोष्ट!
(No subject)
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा भाग जास्त आवडला.....
हा भाग जास्त आवडला.....
मस्त
मस्त
मस्त कथा....
मस्त कथा....
खुप छान..आवडली कथा .
खुप छान..आवडली कथा .
पुढचा भाग लिहणार असाल तर लवकर येऊ द्या ..