चुक

Submitted by कौतुक शिरोडकर on 25 September, 2008 - 06:36

काल काळ भेटला.
मी म्हटलं,"काय रे इथे कसा ?''
"सहज" तो बोलला.
"आलासच आहेस तर सांग, माझ्या मरणाला कारणीभूत काय होईल ?" मी थोडा शहाणपणा केला.
"हार्ट अटॅक" तो शांतपणे बोलला.
"माझं हार्ट एकदम ओ.के. आहे" मी ठामपणे बोललो. तो हसलो.
"नंतर भेटू. तळ्मजल्याच्या गोखलेंना भेटून येतो." तो गेला.
'गोखले... वय वर्षे सत्तर - पंच्याहत्तर. ठिक आहे. मी अजून चाळीशी कुठे गाठलीय. माझं हार्ट एकदम ओ.के. आहे.' मी स्वतःलाच सांगितलं.

रात्री जेवलो. बेतानेच. हार्ट सांभाळायला हवं. ही बडीशेप घेऊन आली तोच छातीत एक कळ आली आणि कोसळलो. सामंतांनी गाडी काढली. थेट संजीवनी.

सकाळी जाग आली तेव्हा डॉक्टर समोर.
"काही घाबरायचं कारण नाही. पहिलाच होता. रिलॅक्स."
'हार्ट अटॅक.. तरी मी जिवंत. विश्वास बसत नव्हता. मी मरणाला हरवलं.'
ही डॉक्टरांबरोबर गेली. रुममध्ये मी एकटाच. माझ्या जिंकण्याचा विजयोत्सव साजरा करत. तेवढ्यात तो आला.
"तू हरलास. तू हरलास. " माझा आनंद हसण्यात परावर्तित झाला. तो शांतच. माझे हसणे वाढले आणि श्वास कोंड्ला. सोबत त्याच्याशिवाय कोणी नव्हतं. त्याच्याकडून मदतीची अपेक्षाही नव्हती. श्वास पुर्ण कोंडला आणि मी कोसळलो.

"चल." तो समोर हात देत उभा.
"खोटे का बोललास ? " त्याचा हात धरत मी उठलो.
"मी कुठे खोटे बोललो .. तू विचारलसं कारणीभूत काय ? मी सांगितलं. कशामूळे किंवा कसा हे कुठे विचारलसं ?" तो निर्विकार.
चुकलं माझचं. कारण विचारायला हवं होतं. म्हणजे हसलोच नसतो. उगाच त्याला हसलो. मेलो. पुन्हा ही चुक व्हायला नको.

गुलमोहर: 

छान लिहितोस. एकामागोमाग एवढ्या कथा....? कारखाना आहे का तुझा? Happy
पण छान आहेत सगळ्या कथा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश..