विषय क्रमांक १ - पिरतिचा उघडला 'पिंजरा' तुमच्यापायी

Submitted by सस्मित on 29 August, 2012 - 09:18

पहाट नुकतीच फुटतेय. दोन बैलगाड्या, गावची वाट आणि गाडीवान गातो....
गंsssssssssssss साजणे
कुन्न्या गावाची कंच्या नावाची
कुन्न्या राजाची तु ग रानी
आली ठुमकत नार लचकत
मान मुरडत हिरव्या रानी
अह्हा काय ठेका गाण्याचा. गाणं ओळ्खीचच नव्हे तर आवडतं. अरे गाडीवान कोण? निळु फुले!!
खटार्‍याला पडदा. आत कोण ते एक कुतुहल. लगेच नामावली सुरु होते- व्ही शांताराम प्रस्तुत - पिंजरा !!!
कलाकार - संध्या - डॉ. श्रीराम लागु
बस्स. आजची दुपार सार्थकी लागणार हे कळुन चुकलं मला.
कॉलेजातुन दुपारी घरी आलं की जेवुन टीव्ही समोर लोळत पडायचं आणि लागलेला कुठलाही पिच्चर झोप येइपर्यंत (झोप येण्यासाठीच) बघायचा. त्या काळात बरेच चित्रपट पाहिले (खरं तर बोलीभाषेतलं 'पिच्चर' च लिहायचयं पण 'चित्रपट' म्हणलं की जरा भारी वाटत ना) तर अगदी नवे -जुने, अर्धनवे-अर्धजुने, काही काळजाचा ठाव घेणारे, काही बराच वेळ मनात रुंजी घालणारे, काही तद्दन बकवास कॅटेगरी, काहींचं गारुड तर अजुनही मनावर आहे असे खुप्पच खुप्प चित्रपट तेव्हा पाहिले. शाहरुख-सलमान-आमिर-सैफ खानावळ ते देव आनंद, राज कपुर, दिलिप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ(अँग्री यंग मॅन वाला हं) अगदी राजेंद्र कुमार सुद्धा - ह्यांच्या प्रेमात पडत गेले. माधुरी-जुही-काजोल बरोबर मधुबाला, वहीदा, नुतन, वैजयंती माला ही होत्या. सिनेमा आवडत होता. सिनेमाच्या प्रेमात पडत होते. काही सिनेमांनी निव्वळ मनोरंजन केले, काहींनी टाइमपास तर काहींनी मनात ठाण मांडलं. मनावर गारुड केलं.
व्ही शांतारामजींचे जे काही थोडेफार चित्रपट मी पाहिले त्यात- दो आंखे बारा हाथ, नवरंग आणि पिंजरा ह्यांची नशा अजुन आहे. तिनही चित्रपट शांताराम बापुंच्या अत्युक्रुष्ट (असा शब्द आहे ना??) कलाकृतीची उदाहरणे.
पिंजरा - उत्कृष्ट कथासुत्र, मांडणी, अत्युक्रुष्ट (परत तेच) अभिनय, जगदीश खेबुडकरांची आशयपुर्ण शब्दरचना असलेली गाणी आणि राम कदमांचे सुमधुर, ठसकेबाज, गाण्याच्या शब्दांतील आशय अधोरेखित करणारे संगीत आणि त्यामुळेच गाजलेलं प्रत्येक गाणं.
220px-Pinjra[1].jpg
गं साजणे पासुन सुरु होतो हा प्रवास. बैलगाड्यांतुन गावात तमाशाचा फड येतो. खटार्‍यातुन उतरते तमाशाची नर्तिका- चंद्रकला. संध्याला ह्या चित्रपटात पहिल्यांदाच पाहिले. डोळ्यांची वेगळीच लकब, भुवई उडवत मानेची हालचाल करत बोलणं आणि खरं तर अतिच सुंदर गाण्यांवर केलेलं संध्याबाईंच नृत्य म्हणजे वेगळंच कैतरीच वाटलेलं त्यावेळी.
"गावात तमाशा लावायचा तर मास्तरांना इचारायला पाहज्ये".कुणीतरी सांगत.
"अस्सं मग इचारु की"
मास्तर - एक आदर्श गाव नी त्या गावातला आदर्श तत्वनिष्ठ मास्तर- श्रीधर पंत. हा मास्तर म्हणजे श्रीराम लागु नी श्रीराम लागु म्हणजे पिंजरातला मास्तर हेच समीकरण अजुनही आहे माझ्यासाठी. श्रीराम लागुंचे नंतर काही सिनेमे पाहिले पण या सम हा. सारा गाव आदर्श, तंटामुक्त, शिक्षित आणि सुसंकृत व्हावा ह्यासाठी झटणारे मास्तर आणि त्यांचा नुसता आदरच नाही तर त्यांच्यावर श्रद्धा - भक्ती असलेला गाव. आपली तत्वे जोपासत, गावाचे भले ह्यात नाही हे ओळखुन मास्तर तमाशाच्या फडाला अपमानित करुन गावाबाहेर हाकलुन लावतात. अपमानित झालेली चंद्रकला सुडाने पेटुन उठते. "नाय ह्या मास्तराला बोर्डावर तुणतुणं घेउन उभा केला तर नावाची चंद्रकला चंद्रावळीकर नाय मी" आणि इथुनच सुरुवात होते आदर्श, तत्वनिष्ठ, गावासाठी विभुती ठरलेल्या श्रीधर मास्तरांच्या अधःपतनाला.
गावाबाहेर नदी पलिकडे तमाशाचा फड उभारला जातो. धोलकीची थाप. घुंगरांच्या आवाजाने गाव बहकते. गावकरी खोटं बोलुन, लपुन छपुन तमाशाला जाउ लागतात. ही चंद्रकलेच्या विजयाची सुरुवात असते. म्हणुन ती म्हणते

हा गाव लय न्यारा ह्याचा थंडगार वारा
ह्याला गरम शिणगार सोसना.......
सोंगा ढोंगाचा कारभार इथला साळसूद घालतोय आळिमिळी
सार वरपती रसा भुरकती घरात पोळी आन भाईर नळी

मास्तरांना कुणकुण लागते. ते गावकर्‍यांना रंगेहाथ पकडण्यासाठी व चंद्रकलेला समज देण्यासाठी तिथे जातात. तेव्हाच मास्तर प्रवेश करतात एका पिंजर्‍यात. एका क्षणिक मोहाच्या क्षणी ते ढासळतात आणि मग कोसळतातआणि कोसळतच जातात. अगदी चंद्रकलेने म्हटल्याप्रमाणे जेव्हा बोर्डावर तुणतुणं घेउन उभा राहिलेला नशेतला मास्तर 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' म्हणतो तेव्हा काळजात तुटत जातं. आपल्या दुखावल्या पायाचं निमित्त करुन चंद्रकला त्यांना भुलवु पहातेय - तिचा उघडा पाय - त्या पायाकडे डोळे विस्फारुन बघणारे मास्तर - आणी तेव्हाच पिंजर्‍यातील पोपटाकडे नेलेला कॅमेरा. अतिशय प्रतिकात्मक. जाण्यार्‍या मास्तरांना भुलवण्यासाठी थाम्बवण्यासाठी चंद्रकला म्हणते

लाडेलाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्यापायी
अशीच र्‍हावी रात साजणा
कधी न व्हावी सकाळ

मास्तर बहकतात. आपल्या कार्याचा, मान मरतब्याचा त्यांना विसर पडतो. आदर्श शिक्षक गावासाठी देव असलेल्या मास्तरांचे अस्तित्व एका नाचणारी पायी पतित होते. कलंकीत होते. नितिमुल्ये हरवलेला, वैफल्यग्रस्त मास्तर तमाशात तुणतुणं घेउन उभा रहातो.

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली.....

खुळ्या जीव कळला नाही खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली

इथे आठवतात ते एक निळु फुले. मास्तरांना कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायला देण्याचा सीन. निळू फुलेंनी त्या भुमिकेचं सोनं केलं.

चंद्रकलेचा सुड पुर्ण झाला अस वाटत असतांना जाणीव होते ती तिच्या प्रेमाची. मास्तरांची अवस्था बघुन आपल्याबरोबर तिच्याही काळजात काहीतरी तुटतं. तिला एका सज्जन तत्वनिष्ठ माणसाला आयुष्यातुन उठवल्याची बोचणी लागल्याचे स्पष्ट कळते. ती त्यांच्यावर प्रेम करु लागते. त्यांच्या सारख्या देव माणसाच्या पतनाला आपणच कारणीभुत आहोत याची तिला जाणीव असते.

इकडे गावासाठी मास्तर मरुन गेलेले असतात. त्यांचा खुन करणारा फरारी असतो. गावकर्‍यांनी त्या देवमाणसाचा पुतळा उभारलेला असतो. आपलाच जिवंतपणी उभारलेला पुतळा पाहुन मास्तर शरमिंदा होतात. तेव्हा आठवतं

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणे त्याला कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली

आणि शेवटी नियतीचा तमाशा कसा ते ह्या चित्रपटात कळते. मास्तरांना स्वत:च्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक होते. खटला चालु होतो. ह्या भोळ्या सज्जन माणसावर ही वेळ आपल्यामुळे आलीये ह्याची चंद्रकलेला जाणीव असते. ती तमाशा, ते आयुष्य सोडुन मास्तरांसोबत निघते. खटला चालु असतांना ती ' हेच मास्तर आहेत' असं सांगण्याचा प्रयत्न करते पण तिची वाचा जाते. मास्तरांना त्यांच्याच खुनाच्या आरोपात फाशीची शिक्षा होते. हे ऐकुन बाहेर असलेली चंद्रकला जीव सोडते.

सुन्न. अगदी सुरुवातीपासुन शेवटापर्यंत सुन्न होते मी. चित्रपट संपल्यावर एक उदासपण आलेलं. चुटपुट लागलेली.
असा पिंजरा. माझ्या निवडक दहात नेहमीच राहिल!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप पुर्वी हा सिनेमा बघितला होता. त्यातल्या कारुण्याच्या झाकेमुळे फारसा भावला नव्हता पण गाणी लक्षात राहिली. परत एकदा निवांतपणे बघते

शिर्षकात 'विषय' ऐवजी 'पिषय' झालय!>> +१
प्रूफरीड करायला हवा आहे. ह्रस्व दीर्घ जाम चुकलेत.

बाकी एकदम छान!

सस्मित ह्या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांनी छान छान चित्रपटांबद्दल लिहिलय. तुम्हीही मस्त सिनेमाची आठवण करुन दिलीत. माझा ऑल टाइम फेवरेट....

त्या काळची एक आठवण आहे. की अनंत माने वगैरे तमाशा पट बनवणारे नेहेमी खाजगीत बोलताना शांताराम बापुंच्या सामाजिक चित्रपटांवर टीका करत. त्यांनी बापुंना आव्हान दिले की तमाशा पट बनवुन फेमस करुन दाखवा. बापुंनी आव्हान स्विकारले आणि असा तमाशापट बनवला की तो मराठी सिनेमाचा मैलाचा दगड बनला. हे बापुच करु जाणेत.......

हा सिनेमा एका जर्मन सिनेमावरुन बेतलेला आहे त्याचे नाव " द ब्लु एंजल". म्हणजे थीम त्याची आहे. बाकी बापुंनी त्याचे पुर्ण भारतिय करण फार यशस्वी पणे केलेले आहे. त्याचे संगीतकार राम कदम ह्यांनी एकदा आठवण सांगितली की ते एका गाण्याच्या ४-५ चाली तयार ठेवत. बापु त्यातली एक सिलेक्ट करत. जगदिश खेबुडकरांनी ह्या सिनेमाची गाणी लिहिली. त्यांना एकदा मेंटल ब्लॉक ( म्हणजे पुढे काहीही न सुचणे) झाला होता. बापुंनी त्यांना अल्टीमेट दिला की सकाळ पर्यंत गाणे झाले नसेल तर परत जा. ते बिचारे परत निघाले. परती च्या प्रवासात गाणे सुचले ते " तुम्हा वर केली मी मर्जी बहाल" ते उलट्या गाडीने परत बापुंकडे गेले. राम कदमांनी बसल्या बसल्या चाल लावली. ३ दिवसात गाण्याचे रेकॉर्डींग झाले. गाणे अजरामर झाले.( ही आर्थात कुठे कुठे वाचलेली बातमी आहे)

ह्याचे न्रुत्य दिग्दर्शन हा एक चर्चे चा मुद्दा आहे. न्रुत्य दिग्दर्शक म्हणुन " गोपी' असे नाव आहे. हा गोपी दुसरा तिसरा कोणी नसुन स्वतः बापु आहेत !!! त्यांनीच ह्या सिनेमातल्या गाण्यां वरची न्रुत्य बसवली. संध्या बाईंना त्या वेळेस स्लीप डिस्क चा प्रचंड त्रास होत असे. शॉट च्या मधल्या काळातही त्या आडव्या पडुन असत. तरीही त्यांनी ह्यातली न्रुत्ये केली. ह्या सिनेमात बघीतले तर मागच्या मुली जास्त नाचतात व संध्या बाई कमी. पण फ्रेम ला कुठेही धक्का लागत नसे.

ह्या सिनेमाचे कलादिग्दर्शन हा एक स्वतंत्र विषय आहे. असे म्हणतात की प्रत्येक शॉट च्या आधी त्या शॉट चे ( मुख्य करुन गाण्यां च्या) स्केच बापुं कडे तयार असे. बॅकग्राउंड चा कलर, नर्तकींच्या साडीचा रंग, संध्या बाईंच्या साडीचा रंग ह्या सगळ्यावर चर्चा होत असे, मगच त्या शॉट ची तयारी.

ह्या सिनेमाने डॉ. लागुंना चाळीशीत नायक केले आणि मराठी चित्रपट स्रुष्टीला संयत अभिनय म्हणजे काय ह्याचा प्रत्यय दिला. एक नवा प्रग्ल्भ आणि विचारी नायक सिनेमात आला. डॉ. आधी नाटकांचे राजा होतेच, ते सिनेमातही आले.

ह्यासिनेमाने तमाशापटांचे सगळे संकेत धुडकावुन लावले. तेच ते पाटिल आणि "तमास्गीरीण" ह्या चक्रात अडकलेल्या तमाशाला सामाजिक डुब दिली. लावण्या कशा असतात, त्यांचे चित्रीकरण कसे करायचे ह्याचे मापदंड
पार बदलुन टाकले. आजही ती गाणी प्रसिध्ध आहेत. ही सगळी गाणी ( दे रे कान्हा सोडुन) उषा मंगेशकरांनी गायली. जीव तोडुन गायली. आणि त्या एकदम प्रकाशात आल्या. त्यांना त्यांचा बाज सापडला.

आजही मी पिंजरा पहायला कधीही तयार असते......

सस्मित छान लिहिलयं...
मोकिमी... आठवणी मस्तच

मागे नाचणार्‍या मुलीं मध्ये माया जाधव आणि उषा नाईक आहेत. त्या दोघीही पुढे चांगल्या न्रुत्यांगना म्हणुन प्रसिध्द झाल्या.

हा मास्तर म्हणजे श्रीराम लागु नी श्रीराम लागु म्हणजे पिंजरातला मास्तर हेच समीकरण अजुनही आहे माझ्यासाठी.>>> + १००

जेव्हा बोर्डावर तुणतुणं घेउन उभा राहिलेला नशेतला मास्तर 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' म्हणतो तेव्हा काळजात तुटत जातं.>>> + १००

मास्तरांना कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायला देण्याचा सीन. निळू फुलेंनी त्या भुमिकेचं सोनं केलं.>>> + १००

आजही मी पिंजरा पहायला कधीही तयार असते......>>> मोकिमी मी सुद्धा

सस्मित, छान लेख. मला अगदी कधीच न आवडलेला सिनेमा. गाणी फारच सुंदर आहेत. मला वाटतं, संध्या ही अभिनेत्री ( जे फॅन आहेत त्यांच्या भावनांचा आदर आहे) फार लाउड अ‍ॅक्टिंग करायची. तिच्या नृत्याची स्वतःची एक शैली होती, जी मला कधीच आवडली नाही. काही तरी wierd शी कोरियोग्राफी आणि फेशिअल एक्सप्रेशन्स असायची. पण गाणी आणि व्ही. शांताराम या कॉम्बीनेशनसाठी कष्टाने मिळवुन हा सिनेमा पाहिला होता. Happy

(अत्युक्रुष्ट याचं स्पेलिंग उच्चाराप्रमाणे लिहिलं तर असं असावं का - अत्युत्कृष्ट ( खात्री नाही. )
तुझ्या स्पेलिंगमधे अत्यु+क्रुष्ट एक 'त' मिसिंग आहे. )

नको नको. मी उच्चाराप्रमाणे लिहिलं फक्त. खात्री नाही. आगावुपणा केला. Happy कोणातरी अ‍ॅथॉरिटीलाच करेक्शन करु देत.

संध्या ही अभिनेत्री ( जे फॅन आहेत त्यांच्या भावनांचा आदर आहे) फार लाउड अ‍ॅक्टिंग करायची>>>

एकदम मान्य!!!! फक्त पिंजरा मध्ये तिची एक दोन द्रुष्ये आहेत ज्यात तिचा परफॉर्मन्स एकदम मस्त. उदा: जेंव्ह गुरुजी तिच्या वर रागावतात की नाचताना एक माणुस तिचा हात पकडतो आणि ते त्यांना आवडत नाहीत. ते तिची खुप निर्भत्सना करतात. तेंव्हा तिचा डायलॉग आणि चेहेर्‍या वरचे भाव खुपच छान " ज्या हाताला मन नाही तो धरला काय आणि सोडला काय त्याला काय त्याचं. " ह्या आशयाचे डायलॉग आहेत. तसाच शेवटी गुरुजींना पाठीशी घालताना ती बहिणी बरोबर ( वत्सला देशमुख) जे भांडते ते तर एकदम खरच वाटतं. ( प्रत्यक्ष आयुष्यातही वत्सला देशमुख संध्याची मोठी बहिण. रंजनाची आई)

बाकी त्यांच्या पुर्वीच्या नाचाची ( सेहेरा, नवरंग, झनक झनक पायल बाजे) आणि पिंजरा मधील नाचाची तुलना होउ शकत नाही. पिंजरा मध्ये त्यांचे वय जवळ जवळ ४० पर्यंत असावे. तसेच स्लीप डिस्क च्या असाध्य आजाराने त्यांना ग्रासले होते. ( हा स्लीप डिस्क चा आजार त्यांना झनक झनक पायल बाजे पासुन आहे. त्या चित्रपटात गोपी क्रुष्ण बरोबर नाचतानाच त्यांना अपघात झाला होता.) त्यांचे वय कळु नये म्हणुनच तर त्यांचे क्लोज अप्स बहुतेक सॉफ्ट लेन्स मध्येच चित्रित केलेले आहेत.

ह्या सिनेमाच्या वेळी त्यांनी बापुंना आग्रह केला होता की इतर कोणी तरी नायिका घ्या. पण ती सुचना त्यांनी आर्थातच मान्य केली नाही.

मनीच्या संपुर्ण पोस्टीला माझं अनुमोदन
मलाही पिंजरा कधी आवडला नाही. पण गाणी आवडली Happy

हा मास्तर म्हणजे श्रीराम लागु नी श्रीराम लागु म्हणजे पिंजरातला मास्तर हेच समीकरण अजुनही आहे माझ्यासाठी.>>> + १००

मोकीमी ह्यांनी लिहिलेल्या दोन्ही पोस्टींना +१०००१

हा चित्रपट जर्मन चित्रपट Der Blaue Angel [The Blue Angle] वरुन घेतला आहे.
१९३२ च्या सुमारास आलेल्या Der Blaue Angel ची भ्रष्ट नक्कल न करता बापूंनी त्याचे सही सही भारतियकरण केले आहे. मुळ जर्मन चित्रपट Der Blaue Angel मी Max Mueller Bhavan मधे जर्मन शिकत असताना पाहिला होता....तो आवडला होताच, पण कदाचित शांताराम बापू आपले असल्याने असेल, पण पिंजरा जास्त भावला होता. Happy

माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांपैकी एक.
आत्ता परत जेव्हा थेटरात आला तेव्हा अगदी आठवणीने पहिल्या दिवशी मी आणि मैत्रीण जाऊन आली..
कान डोळे तृप्त झाले..

पिंजरा आवडतोच.
त्यातले कारूण्य भिन्न जातकुळीचे आहे. सज्जन माणसाचे मोहामुळे पतन हा वरवर वाटणारा विषय मात्र अनेक पोत, पदर त्याला आहेत. संध्याचे मास्तरवर प्रेम जडणे हेदेखिल माझ्यामते महत्वाचे सूत्र.
संध्याबाईंना नावे अनेक जण ठेवतात मात्र माझ्या मते पिंजरात दुसरं कुणी शोभलं नसतं. त्यांच्या अभिनयाच्या लाऊडपणाविषयी सहमत पण मला वाटते त्या मुकपटांपासून चित्रसृष्टीत होत्या त्याचा परिणाम झाला असावा.
पिंजराच्या भव्य यशाचे मुख्य शिलेदार माझ्या मते तरी केवळ आणि केवळ खेबूडकर- राम- लक्ष्मण हे आहेत.

'पिंजरा' search करताना हा धागा सापडला.....
पिंजरा मुव्ही प्रमानेच छान लिहिलयं ह.
all time favorite मुव्ही आहे , शेवट मनाला फार चटका लावुन जातो.