त्या काळात लोकांना वरली मटक्याचे भारी वेड लागले होते. जर दोन्ही आकडे लागले तर पंधरा पैशाला साडे बारा व पंचवीस पैशाला वीस रुपये, या हिशोबाने पैसे मिळत. काही लोक परेल म्हणजे तीन आकडे लावीत. त्याला जास्त पैसे मिळत. कारण हा आकडा लागणे अत्यंत दुर्मिळ होतं. तीन आकड्याची बेरीज करुन आलेला एक आकडा म्हणजे परेल…!
मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मटक्याची पट्टी फाडत होतो. आकडे घेण्यासाठी एक कार्बन पेपर टाकलेले बूक असायचे. त्याला पट्टी म्हणत. मी लोकांनी सांगितलेले आकडे त्यावर लिहून वरची चिठ्ठीची प्रत फाडून त्यांना देत होतो. खालच्या दुय्यम प्रतिवरुन सर्व आकड्याचा एक तक्ता तयार करुन घेत होतो. ते सर्व पैसे व तक्ता घेऊन भाड्याच्या सायकलने संध्याकाळी शहरात जाऊन वरली मटक्याच्या अड्ड्यावर नेऊन देत होतो.
एखाद्यावेळेस घरुन निघतांना दिवे लागणीचा वेळ होऊन जायचा. तेव्हा रस्त्यात अंधार दाटून यायचा. मग अंधारात झांबलत झांबलत जात होतो.
वाघाडी नदी आली की माझ्या काळजात धडकी भरायची. या नदिबाबत ऐकलेल्या दंतकथा, तिच्या काठावर मसणवटी, खालच्या बाजूचा खोल असा डोह, चकाव्याची गोष्ट हे सारं आठवलं की, माझ्या अंगावर सरसरून काटे उभे राहत.
पण या नदिबाबत अनेक आठवणी जुळल्या होत्या. मग त्या ताज्या होत होत. घडलेल्या घटनांचा एक-एक पदर उकलत जात.
उन्हाळ्यात नद्या, नाले पार सुकून जायच्या. कोरड्याठक पडायच्या. परंतु वाघाडी नदीच्या आजनाच्या व सागाच्या डोहातमात्र पाणी साचलेले राहायचे. तेव्हा आम्ही मुले तासंन तास त्या डोहात माशासारखे सुळसुळ पोहत राहायचो. नदीकाठी दिसलेलं मोहळ झाडून खात होतो. एखाद्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात मासे दिसायचे. तेथील पाणी ढवळून ढवळून गढूळ केलं, की ते पाण्याच्यावर तोंड करायचे. मग त्यांना बाहेर रेतीवर हाताच्या ओंजळीने फेकत होतो. त्या पाण्याबाहेर पडल्यावर टणांण…टण उड्या मारत तडफडत असत. मग आम्ही त्यांना फडक्यात बांधून घरी खायला आणत होतो.
आता या वाघाडी नदीवर धरण होणार असल्याच्या चर्चा गावात जोरात सुरु झाल्या होत्या. ह्या धरणाचं पाणी यवतमाळ शहराला पुरविले जाणार होते. कारण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची त्यावेळी कोणतीही नळ योजना नसल्यामुळे टंचाई होती. उन्हाळ्यात ट्रॅक्टर किंवा ट्रक ने पाण्याचे वाटप केल्या जात होते. आम्ही यवतमाळला गेलो, की हॉटेलवाले काही खाल्ल्याशिवाय पाणी देत नसत. म्हणून वाघाडी नदीचे पाणी शहरवासीय लोकांना पाजणार होते.
एकदा मी सावरगड या गावला रेशनचे धान्य आणण्यासाठी गेलो होतो. तेव्हा वाघाडी नदीच्या काठावर असलेल्या तुकाराम-काकाच्या शेतात बोरींगची मशीन बसवलेली पाहिली होती. ती मशीन धाडधाड आवाज करीत जमिनीतून लोड्यासारखे लांबुळके दगडं काढीत होती. याच ठिकाणी धरणाचा बांध बांधून नदीचे पाणी अडविले जाणार होते. म्हणून ते या ठिकाणी दगडाची तपासणी करीत असल्याचे सांगत होते.
त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष धरणाच्या बांधाचं काम याच ठिकाणी सुरु झाले. जमीन खोदून दगडंमाती काढणारे अजस्त्र असे मशीन तेथे धडधडत होते. मातीगोटे वाहून नेणार्या ट्रक़च्या ताफ्याचे ताफे तेथे दिसत होते. दगडमातीचे काम करणार्या मजूरांची यात्राच जणू काही तेथे भरली होती. त्यांच्या झोपड्यांच एक गावच तेथे वसल्यासारखे दिसत होते.
आता जोरात कामाला सुरुवात झाली होती. बांध झाल्यावर नदीचे पाणी अडविल्या जाणार होते. आता या परिसरात जिकडे तिकडे एखाद्या समुद्रासारखे अथांग पाणी दिसणार होते. हे पाणी बरबडा या गावापासून थोपविले जाणार होते. निळोणा हे गाव पूर्ण पाण्यात बुडणार होते. आम्ही ज्या रस्त्याने निळोणा किंवा यवतमाळला जात होतो; तो रस्ता पण पाण्यात बुडणार होता. मग त्याचं पुसटसं अस्तित्व सुध्दा राहणार नव्हतं.
आता या नदीचा पूर्णत: कायापालट होणार होता. यापुढे या नदीला आलेला पूर, त्यातून वाहत जाणारा पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या, लाकडाचे ओंडके, उसळी मारणारे, भोवर्यात गरगर फिरणारे, संथ, जोरात वाहणारे खळखळ पाणी पाहता येणार नव्हतं. हा पूर कधी कधी नदीकाठच्या वावरातील जमिनीची नक्षा बदलवून शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणत होता, तर कधी कधी त्यांच्या वावरात सकस मातीचा गाळ आणून झालेले नुकसान भरुन देत होता. असा हा बहूगुणी पूर धरण झाल्यानंतर कधीच पाहता येणार नव्हतं.
या वाघाडी नदीला यवतमाळहून उगम पावलेला व निळोणा या गावावरुन वाहत येणारा एक नदीसारखाच दिसणारा नाला येऊन मिळाला होता. तो आमच्या पायवाटेपासून फार जवळ नाही, पण दिसत होता. एखाद्या वेळेस वर यवतमाळकडे पाऊस पडला तर या नाल्याला पूर आलेला दिसायचा. तेव्हा तिचं गढूळ पाणी वाघाडी नदीच्या पाण्याला थोपवून ठेवत असे. जर वाघाडी नदीला पूर असला तर त्या नाल्याचं पाणी थोपलेलं दिसायचं. अशी ती गंमत पाहून आम्हाला आश्चर्य वाटायचं. ‘बळी तो कान पिळी’, ते यालाच म्हणत असावं.
नदीत उतरुन तीचे गोड पाणी पिता येणार नव्हतं. नदीत पोहणारे मासे दिसणार नव्हते. पोहण्याचा डोह दिसणार नव्हता. नदीकाठची गर्द हिरवेगार झाडी दिसणार नव्हती. झाडा-झुडपांच्या फांद्यावर लटकलेलं मोहळ दिसणार नव्हतं. शाळेत जातांना आम्हाला घाबरवणारा नदीकाठची स्मशानभूमीची नामोनिशान मिटणार होते.
कुहूऽऽ कुहूऽऽ असा मंजूळ आवाज करणारी कोकीळा, ‘टिटीव-टिव’ करत आकांत मांडणारी टिटीव, पाण्यात डुबक्या मारुन अंग धुणारे कावळे, पांढर्या शुभ्र रंगाचे ध्यान लाऊन उभे असलेले बगळे, शोधता शोधता थकविणारी पानकोंबडी, नदीच्या पाण्यात सूर मारुन मासे पकडणारे व पाण्यात बुड्या मारणारे असे अनेक पक्षी या नदीच्या घनिष्ट सहवासात राहायचे; ते आता दिसणार नव्हते.
ज्या रस्त्याने आम्ही निळोण्याच्या शाळेत, यवतमाळच्या बाजारहाटाला, शाळा- कॉलेजला जायचो, तो रस्ता आता राहणार नव्हता. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला हिरवेगार पिके उभे असलेले दिसायचे,. ते आता दिसणार नव्हते. भगवानचं, सहदेवचं आंब्याचं वावर, पांडू लभानाचं, चिफसाहेबाच मोहाचं वावर, नदीकाठचं अवधूतचं वावर, नदीपलीकडच्या काठावरची मसनखुटी, नंतरचा गोटाळी-बैलगाडीचा रस्ता, निळोण्याची पांदण, पांदणीला लागून असलेलं केणेपाटलाचं वावर असं काहीही आता दिसणार नव्हतं. उध्दवकाका, धर्माकाका आणि अशाच बर्याच लोकांचे वावरं या धरणात बुडणार होते.
या रस्त्याची आणखी एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे अर्जूनच्या बापाने त्याला छत्री मोडेस्तव मारलं होतं, ती जागा मिटणार होती. नदी आटल्यावर रेती उकरुन लागणार्या झर्याचं निर्मळ पाणी आता तहानलेल्या जिवाला पिता येणार नव्हतं. या रस्त्यासोबतच्या ज्या ज्या काही आठवणी होत्या; त्या आता सर्व स्मृतीच्या आड लपणार होत्या.
धरणाचे काम दोनक वर्षे तरी चालणार, असे लोक सांगायचे. म्हणजे आता यवतमाळला जायचे म्हणजे पांदणीच्या रस्त्याने बरबडा या गावाला जावे लागेल. तेथून वाघामाईच्या बरडाला वळसा घालून नाहीतर पांढरीवरून अकोलाबाजार रोडने जावे लागणार होते.
बाबा घरी कांदाभजी, आलूभजी व मिरचीची भजी बनवून वाघाडी नदीच्या धरणावर विकायला न्यायचा. तेथे धरणाच्या बांधावर काम करणारे मजूर व बांधकाम करणारे कंपन्याचे लोक ते विकत घेऊन खात असत.
नंतर बाबाने त्या धरणावर किराणा, चहा, नास्ता व खाद्यपदार्थाचे तुकाराम-काकाच्या भागीनदारीत दुकान टाकले होते. तुकाराम-काका बाबाच्या जवळच्या नात्यामध्ये लागत होता. त्याचे घर आमच्या शेजारी होते. त्याचे शेत जेथे वाघाडी नदीवर बांध बांधत होते, त्या नदीच्या काठावर होते. त्याची शेती धरणात गेल्यामुळे त्याला सरकारकडून शेतीचे पैसे मिळाले होते. त्याने पैसे दिल्यामुळे त्याच्या भागीनदारीत बाबाने हा धंदा सुरु केला होता.
आमच्या गावांतील व आजूबाजूच्या गावातील बरेच लोक तेथे दगड-मातीचे काम करण्याकरीता जात असत. त्यांना आता चांगला रोजगार मिळाला होता असेच म्हणावे लागेल.
मी परत भानावर आलो. सायकलचे पायडल मारत चालू लागलो. कधी मी एकटा असायचा तर कधी माझ्यासोबत अर्जुन पण राहायचा. मग त्याला घेऊन मला डबलसीट सायकल चालवावी लागे. त्यावेळी त्याला सायकल चालवता येत नव्हती. चढावावर किंवा ऊलटा वारा असला तर दमछाक व्हायची. कधी कधी तो सायकलच्या मागे कॅरीयरवर बसून पैडल मारत होता. तो नसला की एखाद्यावेळी माझा लहान भाऊ अज्याप सोबतीला राहायचा.
मी सायकलने जात असतांना दमासून गेलो होतो. गोधणीच्या पलिकडे नाल्यानंतर यवतमाळचा घाट लागत होता. आजुबाजूला सागा-पळसाच्या झाडाचा जंगल होता. या घाटात अंधारात जायला भीती वाटायची. हा रस्ता नुसता लहान-मोठ्या दगडाने भरला होता. त्यावर सायकल ओढत नेवून चढायला भारी दम लागायचा. पायात गोळे येत होते. थकून जात होतो.
नाला लागला. तेव्हा मला एक गोष्ट आठवली. एकदा मी व बाबा यवतमाळला जात होतो. दोन मुलं – कॉलेजकुमारच असावेत. कारण त्यांच्या वेषभुषावरुन व चेहर्यावरुन शिकलेले दिसत होते. सायकलीवरुन न उतरता तसेच नाल्यातून अलिकडे येत होते. मध्येच एका मुलाची सायकल दगडावरुन घसरुन धपकन पडला. चांगला पाण्याने भिजला होता. तो ऊठत असतांना बाबा त्याला म्हणाला,
’नाल्यात खाली उतरुन चालावं, माणसानं.’
’असं काही झालं की, मोठ्या माणसांना मोठा उपदेश सुचते.’ असं तो मुलगा पुटपुटला. बाबा नाल्याच्या पलीकडे निघून गेल्याने त्यांना ऐकू आले नसावे. पण मी मात्र ऐकले. नविन पिढितल्या मुलांना उपदेश सहन होत नाही की काय, असा विचार माझ्या मनात येवून गेला होता.
कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री साडेआठ-पावणेनवच्या आधी ही पट्टी यवतमाळला अड्ड्यावर नेऊन द्यावी लागत असे. कमिशन कापून पैसे व आकड्याचा तक्ता देऊन नऊ वाजेपर्यंत ओपण आकडा येण्याची वाट पाहत बसावे लागे. श्याम टॉकीज जवळच हा वरली मटक्याचा अड्डा होता.
मला त्यावेळी सिनेमा पाहायची भारी हौस होती. त्यावेळेस नवीन सिनेमा लागला की, नऊ नंतर सुरु होणारा सेकंड शो पाहून मटक्याचा क्लोजचा आकडा पाहता येत होता. रात्री बाराला क्लोजचा आकडा येत होता. दादाने घेतलेल्या कळंब रोडच्या चंदूशेठच्या बगीच्यात जाऊन जेवण असलं तर खात होतो, नसलं तर पोटाला चिमटा घेऊन झोपावे लागत असे.
दुसर्या दिवशी सकाळी त्या तक्त्यापैकी ज्यांचा आकडा लागला त्याचे पैसे घेऊन गावला जात होतो. या सर्व प्रक्रीयेला पट्टी घेणे असे म्हणत असत.
एकदा शहरात एक गारुडी एका रुपयाला एक अशी खड्याची अंगठी विकत होता. तो एका मुलाला त्याच्या डोळ्याजवळ अंगठी धरून एकटक पाहायला सांगायचा. नंतर त्याला म्हणायचा की तू असं म्हण.
‘या खड्यात मला एक बगीचा दिसत आहे. तेथे एक टेबल व खुर्ची ठेवली आहे. त्या टेबलावर लिहिण्याची पाटी व लेखणी ठेवलेली आहे. ऎक माणूस येत आहे. तो खुर्चीवर बसत आहे. हातात पाटी व लेखणी घेत आहे.’
नंतर त्याला म्हणायचा, ‘त्याला विचार की आज वरली मटक्याचा कोणता आकडा येणार आहे, ते मला पाटीवर लिहून दाखव.’
मग तो माणूस हातात पाटी व लेखणी घेऊन तो आकडा लिहीत असल्याचे तो मुलगा सांगत असे.
‘त्याने कोणता आकडा लिहिला ते वाचून दाखव.’ असे त्या मुलाला तो गारुडी म्हणायचा. त्या माणसाने काय लिहिले ते तो मुलगा वाचून दाखवत असे. खरं तर हा संमोहणाचा प्रकार होता. लोक या प्रकाराला भारावून जात व ती आंगठी विकत घेत. मी सुध्दा ती आंगठी विकत घेतली होती.
त्यावर्षी दादाने वाल्ह्याचे शेतातील आंबे विकत घेतले होते. आंबे राखता राखता मी मटक्याची पट्टी फाडण्याचे काम करीत होतो. म्हणून गावला गेल्यावर त्या आंगठीचा प्रयोग लोकांच्या समोर करीत होतो. लोक त्या प्रमाणे आकडे लावीत असत. परंतु त्याप्रमाणे कधी आकडे लागले नाहीत. दुसर्या दिवशी ती आंगठी चोरीला गेली.
एकदा मी व अर्जुनने आंबे तोडून विकले. त्या पैशातून मामाढोंगेची सायकल भाड्याने घेऊन पिंप्री या गावच्या लंकेश्वर महाराजाच्या मठावर गेलो. तेथे बरेच लोक होते. पण आम्हा दोघांना बोलावून साधुबुवाने गणित सोडवायला सांगितले. कदाचित आम्ही त्याला शिकल्या-सवरल्यासारखे दिसलो असेल. त्याचं गणित असं होतं,
‘नदीत नवदुर्गामाता आरती करत आहे. सांगा कोणता आकडा ?’ आम्हाला काही सांगता आले नाही.
‘बरं दुसरं गणित सांगतो. आतातरी बरोबर सांगा ?’ असं तो दरडावून म्हणाला,
‘नारळाच्या झाडामागे दोन शिंदीचे झाडं, दोन हत्ती व दोन उंट आहेत. सांगा…?’ हे पण गणित आम्हाला काही जमले नाही. कारण यात अनेक आकडे होते. दोन… दोन… दोन असे तीनवेळा म्हणजे दोनची परेल पण होऊ शकते. आता नारळ, हत्ती, उंट व झाड यांचा कोणता आकडा धरावा ते काही कळत नव्हते. त्याच्या गणितात अनेक आकडे असल्याने नेमका कोणता आकडा धरावा ते काही समजत नव्हते. त्यामुळे आम्ही दोघेही चूप होतो.
‘एवढूसं गणित येत नाही…? आणा… रे टेम्प…’ असं तो साधुबुवा चिडून म्हणताच आम्ही सायकल घेऊन धूम पळत सुटलो. साधुबुवाने सांगितलेले वरली-मटक्याचे गणित आम्हाला कळले असेल, म्हणून काही लोकं आमच्या मागेमागे येऊन आम्हाला आकडा विचारीत होते. खरं म्हणजे आम्हाला काही कळले नसल्याने निश्चित असे काही सांगता येत नव्हते. लोकं वेगवेगळ्या आकड्याचा अंदाज बांधत होते. साधुबुवाच असंच असते, काहीतरी विचित्रपणे सांगून लोकांना संभ्रमात टाकणे ! लोकं आपापल्या परीने अंदाज बांधून आकडा लावतात. मग कुणाचा दगड लागतो, कुणाचा लागत नाही. ‘चित भी मेरी, पट भी मेरी.’ असा तो प्रकार होता.
त्यापूर्वी मी कॉलेजमध्ये असतांना असाच पैशाच्या हव्यासापोटी आमच्या होस्टेलच्या मुलांना वरली मटक्याचा नाद लागला होता
एक बाबा मटक्याचा आकडा सांगतो म्हणून, मी व बोंद्रे सायकलने अमरावती रोडवरील एका गांवाजवळील कोणत्यातरी बाबाच्या मठावर गेलो होतो. तेथे गेल्यावर त्या मठात, तो दाढीधारी, भगव्या रंगाचं झगला व डोक्याला बुचडा बांधलेला बुवा-बाबा, त्याच्या सोबत दोन-तीन बायका व काही माणसे चिलीम ओढत बसलेले दिसले. आम्ही पण तेथे जाऊन बसलो. बाजूला अर्धवट जळलेल्या लाकडाचा धूर निघत होता. बाबा सांगत असलेल्या असंबंध गोष्टी सारेजण कान टवकारून ऎकत होते. त्यावरुन प्रत्येकजण आपापल्या आकड्याचा अंदाज बांधत होते. कुणाचा दगड लागायचा तर कुणाचा हुकायचा. असा तो बाबाचा खेळ होता. आम्हाला त्याचं गणित काही केल्या जमलं नाही. मग बाबाचा फालतुपणा, आमच्या लक्षात आल्यावर पुन्हा तेथे पाय ठेवला नाही.
असाच प्रकार झोपेत पडलेल्या स्वप्नांचा होता. स्वप्नात जे दिसलं त्यावरुन गणित बांधून आकडा लावायचा. प्रत्येकांचं स्वप्न वेगळं, त्यामुळे आकडाही वेगळाच ! शंभरातून एखाद्याचं तरी जुळायचं !. अशी ती गंमत होती. लोक भुरळून गेले होते. वेडेपिसे झाले होते. आमच्या सारखे शिकणारे गरीब मुलं ज्यांना पैशाची गरज होती, असे या मोहाला सर्रास बळी पडत होते.
एके दिवशी मात्र आझाद मैदानाजवळील गणपती मंदिराच्या पिंपळाच्या झाडाखाली एक ठुसका बाबा बसत असल्याचे आमच्या कानावर आले. तो मटक्याचा खट आकडा सांगतो, असे ऎकले होते. म्हणून आम्ही संध्याकाळी तेथे गेलो.
तो बाबा अगदी एक-दिड फुट उंचीचा होता. वयाने मोठा होता; पण त्याची उंची वाढली नव्हती. म्हणून त्याच्या मोठ्या भावाने त्याला बाबा बनवून पैसे कमविण्यासाठी त्याचा वापर केला होता.
त्याने आम्हाला एक आकडा सांगितला. आम्ही तो आकडा श्याम टॉकीज जवळच्या मटक्याच्या अड्ड्यावर लावला. हा अड्डा त्यावेळी खुलेआम चालत होता. रात्री नऊ वाजता ओपनचा आकडा आला. तो बरोबर लागला. त्यामुळे आम्ही मोठं हरकून गेलो होतो. म्हणून दुसरा क्लोजचा आकडा बारा वाजता येईपावेतो आम्ही तेथेच थाबलो. दुसरा पण आकडा बरोबर आला. मग आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्यावेळी मला पहिल्यांदा पन्नास रुपये लागले होते.
दुसर्या दिवशी सकाळी चुकारा घेतला. त्या पैश्यातून मी माझ्यासाठी लाल रंगाची मस्तपैकी महागाची सॅंडल विकत घेतली. तशीच सॅंडल माझा लहान भाऊ-अज्यापला त्याच्या पायाच्या मापाची घेऊन दिली. आम्ही दोघांनीही जीवनात पहिल्यांदा अशी महागडी व सुंदर चप्पल विकत घेतली होती. ही चप्पल घालून मी बरेच दिवस मिरवत होतो. उरलेले पैसे परत त्या बाबाने दिलेल्या आकड्यावर लावले. परंतु त्यानंतर मात्र कधीही आकडा लागला नाही.
अर्थात हे सारे कामे कायदेशीर नव्हते. आणि भगवान बुध्दाच्या अष्टांगिक मार्गाच्या सम्यक कर्मांत आणि सम्यक उपजिवीकेच्या तत्वात बसत नव्हते. परंतु हे तत्वज्ञान त्यावेळी माहीती नव्हते, ना… !
छान .... अगदी छान. ओघवती
छान .... अगदी छान. ओघवती भाषा.
लि़खाण आवडले. पाणी गधूळ करून
लि़खाण आवडले. पाणी गधूळ करून मासे पकडण्याची पद्धत माहीत नव्हती.