ह्या विषयाबद्दल काहीही लिहायच्या आधी एक प्रश्न पडतो तो असा की मराठी चित्रपटांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, असा प्रश्नच विचारायची वेळ का येते? भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट बनतात. त्यांचे ठरलेले फॉर्म्युले असतात. तामिळ, तेलुगू सिनेमे म्हणजे बलदंड नायक, सुंदर, फटाकडी आणि नायकावर अवलंबून असलेली नायिका, अतिशय क्रूर असा खलनायक आणि त्याची ’सेना’, सुमधूर, ठेक्याची गाणी आणि ह्या सगळ्याला बांधून ठेवणारा कथेचा एखादा क्षीण धागा हे पक्के! बंगाली-कन्नड सिनेमे थोडे वेगळ्या वाटेने जाणारे- वैचारिक असे. गुजराथी-भोजपुरी सिनेमे तद्दन व्यावसायिक, प्रादेशिक प्रेक्षकांचा प्राधान्याने विचार करणारे, काहीसे चावट, टोटल मनोरंजन असे. मात्र मराठी चित्रपटाला कोणत्याच एका समीकरणात बसवता येत नाही. तो तद्दन मसालापट, चावट विनोद आणि अंगविक्षेप असलेला असू शकतो, निखळ विनोदी किंवा अतिशय गंभीर, वैचारिकही असतो, ग्रामीण किंवा शहरी आणि ह्या सगळ्याची भेळ असलेला असाही असू शकतो. हे मराठी चित्रपटाचं सुदैव म्हणायचं की दुर्दैव!?
सांख्यिक दृष्टीने पाहिले, तर मराठी सिनेमा पाहणारा प्रेक्षक हा वर्ग खूप मोठा नसेल कदाचित; पण ह्या प्रेक्षक वर्गाच्या मानसिकतेमध्ये प्रचंड तफावत आहे. शहरी, निम्न-शहरी आणि ग्रामीण- ह्या सर्वच प्रेक्षकांना एकाचवेळी आपलासा वाटणारा मराठी चित्रपट निर्माण होणे हेच एक मोठ आव्हान आहे. त्याला कोणत्याच ’ट्राईड अॅन्ड टेस्टेड’ फॉर्म्युल्यात बांधता येणार नाही. मराठी चित्रपटाच्या निर्मितीत हाच मोठा अडसर असेल का?
मराठी प्रेक्षक हा तसा बुद्धिजीवी आहे असे मला वाटते. म्हणजे, जर त्याला एखादा लॉजिक सोडून बनवलेला चित्रपट पहायचाच असेल, तर तो अत्यंत सहजपणे हिंदी सिनेमाचीच निवड करेल. कारण हिंदी सिनेमा म्हणजे ’काहीही चालतं’ हे त्याने मान्यच करून टाकलेलं आहे. आवर्जून मराठी सिनेमा पहायचा असेल, तर मराठी प्रेक्षक भिंग लावून चित्रपटाची निवड करतो. ह्या बाबतीत ’आपला तो बाब्या’ नसून ’आपलं ते कार्टं’ असतं आणि अनेक चाळण्या मग तयार होतात. असा हवा, तसा नको, त्याचा हवा, ती हवी, हा आहे?- मग नको, इत्यादी. तर मराठी चित्रपटाकडून असलेली प्राथमिक अपेक्षा म्हणजे त्याची कथा! कथा म्हणजे चित्रपटाचा कणा. उत्तम कथा असलेला चित्रपट माझ्यासारख्या मराठी प्रेक्षकांना खेचतो. नुसती कथा नाहीच अर्थात, ती कथा चित्रपटासाठी कशी बदलली आहे, त्यात काय बदल केले आहेत, ते बदल पटण्यासारखे आहेत का, की उगाच ओढूनताणून काही केले आहे- ह्यावर काटेकोर लक्ष दिलं जातं. मराठीमध्ये ’लॉजिक’ला पर्याय नाही. कारण, प्रेक्षक चाणाक्ष आणि बारिकशा त्रुटीही सहन न करणारा. मला अपेक्षित असलेला मराठी चित्रपट हा प्रथमतः उत्तम बांधीव कथा-पटकथा-संवाद असलेला असावा. इथे एकच उदाहरण देईन ते ’कदाचित’ ह्या तुलनेने नवीन सिनेमाचं. गिरीश जोशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ह्या चित्रपटाची कथा सुरेख होती. अश्विनी भावे आणि सदाशिव अमरापूरकर ह्यांच्या समर्थ अभिनयाची जोड हा बोनस! हा चित्रपट एकदाच पाहून अजूनही लक्षात आहे, तो त्याच्या कथेमुळे.
मराठी चित्रपटातल्या नायिकांच्या बाबतीत मात्र क्रांती व्हायची गरज आहे असं मला वाटतं. हिंदी, भोजपुरी, दाक्षिणात्य नायिकेने ’वाट्टेल ते केलेलं/ बोललेलं/ घातलेलं’ सहज खपवून घेतलं जातं. मात्र मराठी नायिका ही ’साधीच’ हवी ही अपेक्षा अजूनही आहे. आपल्या घरातली अथवा शेजारची मुलगी आधुनिक कपडे घालते ते आपण चालवून घेतो, किंचित अघळपघळ भाषा बोलते ते आपल्याला चालतं. पण मराठी नायिका मात्र आदर्श नारीच असावी. अजूनही कथेतली स्त्री व्यक्तिरेखा एकतर अगदीच शोभेची बाहुली असते जिला चित्रपटात वेगळं असं काही स्थानच नसतं, किंवा नायकाला आधार म्हणून ’संकटांच्या कचाट्यामधून सोडवणारी, सर्व दु:ख सोसणारी’ अशी स्त्री असते. एखादा स्त्री व्यक्तिरेखेवर भर असलेला चित्रपट असेल तर ती व्यक्तिरेखा जितकी मोठी करता येईल तितकी मोठी आणि आदर्श केलेली असते. माझ्या अपेक्षेमधली मराठी नायिका ही ’नॉर्मल’ असेल आणि प्रेक्षकांनाही ती आवडेल. प्रेक्षकांनीही त्याबाबतीत प्रगल्भ व्हायची गरज असेल. नायिका शहरी असेल, आधुनिक असेल, ग्लॅमरस कपडे घालणारी असेल तर ते ठीक असू शकतं. ग्लॅमरस म्हणजे स्वैर नाही! मात्र इथे थोडीशी गल्लत होते. एकतर ग्लॅमरचं टोक म्हणून काहीही खपवलं जातं, नाहीतर अत्यंत वाईट पोशाखांची निवड केली जाते, भडक रंगभूषा केली जाते. ज्याची खरंच गरज नसते. आपल्या आजूबाजूची मराठी मुलगी उत्तम कपडे घालते आणि चांगला मेक-अपही करते. तशी चित्रपटात का दिसत नाही? आपली नायिका जर ग्रामीण असेल तर अस्सल ग्रामीण असेल. उगाच आव आणून, काळा रंग फासून ग्रामीण बोलणार आणि दिसणार नाही. अलिकडच्याच ’बाबू बॅन्ड बाजा’ च्या चित्रपटातली नायिका मिताली जगतापने काय चपखल उभी केली होती! भाकरी थापण्यापासून ते साध्या चालण्या-बोलण्यातून. त्यात ना कुठे आव होता, ना दिखावा. तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं ह्यातच काय ते आलं. ह्यासाठी कपडेपट तयार करणारे आणि सांभाळणारे खाते चोखंदळपणे निवडलेले असेल आणि त्याची धुरा एखाद्या जाणत्या व्यक्तीकडे असेल अशी इच्छा आहे.
चित्रपटात नायिकेला एक स्वतंत्र स्थान असेल. आणि स्वतंत्र स्थान म्हणजे केवळ नायिकाप्रधान चित्रपट नाहीत. आजकालची ग्रामीण अथवा शहरी मराठी मुलगी खरंच तडफदार आहे. तिला स्वाभिमान आहे, मान-अपमान आहे. ती कधी चुकतही असेल. ती उदात्त किंवा त्यागमूर्ती नाही. मग ती तशी सिनेमात दिसावी ही अपेक्षा.
’निर्मितीमूल्य’ हा काहीसा गुंतागुंतीचा विषय आहे. चित्रपट ’चकाचक’ असावा अशी अपेक्षा सगळ्यांचीच असते, पण त्यासाठी त्यात निर्मात्याला पैसा घालावा लागतो. पैसा घालायचा, तर तो परत मिळेल अशीही हमी हवी; आणि चित्रपटनिर्मिती ह्या बेभरवशाच्या व्यवसायात ती मिळणं अशक्य; त्यातून मराठी चित्रपटातून तर अवघडच- अशी मानसिकता. त्यामुळे ’पहले आप, पहले आप’सारखं नक्की कोणी पुढाकार घ्यायचा, इथे गाडं अडतं. बरं, मान्य. खूप चकाचक नको सिनेमा, पण अगदीच पाट्याटाकूही नको. परदेशी तंत्रज्ञ घ्यायला पाहिजेत, नाच-गाणी परदेशात व्हायला हवीत, हेलिकॉप्टरं-विमानं उडवली पाहिजेत इतकंही नको. पण किमान ’हा सिनेमा आहे’ इतपत भान ठेवून चित्रपटातला प्रत्येक घटक निवडावा. पडद्यामागचे लोक दिसले नाहीत, तरी त्यांचं काम पडद्यावर दिसतंच, त्यामुळे ती काळजी जरूर घ्यावी. चित्रपटात काम करणारे कलाकार, हा चित्रपटाचा केवळ एक भाग आहे. पण त्यात सहभागी असलेले सर्व तंत्रज्ञ- छायाचित्रकार, गीतकार, संगीतकार, संकलक, रंगभूषाकार, वेशभूषाकार ह्या सर्वांचाही विचार करून योग्य निवड करून चित्रपटाचे निर्मितीमूल्य सुधारावे.
सरतेशेवटी, पण महत्त्वाची अपेक्षा ही अर्थातच मी धरून सर्व प्रेक्षकांकडून. लेखक, कथा, तंत्रज्ञ, कलाकार- चित्रपटासाठी लागणार्या सर्व गोष्टी मराठीत विपुल आहेत. गरज आहे ती योग्य विपणन, जाहिरात आणि जनाश्रयाची. आताचे मराठी चित्रपटसृष्टीतले बदल बरेच आश्वासक आहेत. निर्माते-दिग्दर्शक जोमाने प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायचे काम मात्र प्रेक्षकांचेच आहे. ’मराठी’ ब्रॅन्ड म्हणून जसजशी सिद्ध होत जाईल तसतशी मराठी चित्रपटसृष्टीही अधिक समृद्ध होईल. मराठीबद्दल आपण प्रेक्षकच जेव्हा आणि जितके आग्रही होऊ, त्या पटीने चित्रपट व्यवसायाकडून आपल्यालाही चांगले काहीतरी दिले जाईल; आणि जर दिले गेले नाही, तर तेव्हा ते नाकारण्याचा हक्क आपल्याला असेलच. एक चित्रपट म्हणजे एक वस्तू आहे असे मानले, तर त्या वस्तूला बाजारातूनही उठाव आणि मागणी हवी. जर मागणी नसेल, तर त्या वस्तूच्या निर्मितीसाठी कोणी कष्ट तरी का घेईल? आणि मग चांगली वस्तू मिळत नाही अशी तक्रार करायचा तरी काय हक्क राहिल? माझ्या मनातला मराठी चित्रपट असा असेल- उत्तम कथा, उत्तम निर्मितीमूल्य आणि उदंड प्रतिसाद लाभणारा. मराठी चित्रपटसृष्टी ही एक स्वतंत्र स्थान असलेली चित्रपटसृष्टी असेल. त्यातले तारे आणि तारकाही तितकेच ग्लॅमरस असतील जितके हिंदीतले आहेत; आणि त्यांचं त्याबद्दल कौतुकही होईल. मराठी प्रेक्षक थोड्या सन्मानाने मराठी चित्रपटाकडे पाहील; आणि थोडे कमीजास्त काही झाले, तर उदार मनाने माफ करेल!
गरज आहे ती योग्य विपणन,
गरज आहे ती योग्य विपणन, जाहिरात आणि जनाश्रयाची>> अचूक रीत्या मांडले आहे.
छान लिहिले आहेस. आवडले.
मस्त लिहिलंय एकनंबरी!!
मस्त लिहिलंय
एकनंबरी!!
खूपच छान लिहिले आहे.
खूपच छान लिहिले आहे. नायिकबद्दलच्या अपेक्षा एकदम पटल्या.
शुभेच्छा.
खूप छान लिहीले आहे... खूप खूप
खूप छान लिहीले आहे... खूप खूप शुभेच्छा
काही मतं पटली. प्रेक्षकांची
काही मतं पटली. प्रेक्षकांची वर्गवारी योग्यच आहे. पण मला लिखाण आवडलं. मांडणी आवडली.
रच्याकने - मराठी सिनेमा कसाही चालवून घेतला जात होता असं वाटतं. धूमधडाका, दे दणादण, धडाकेबाज, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे सवंग सिनेमे पाहीले तर आपलं आहे ना... जरा काणाडोळा केला तर बिघडलं कुठं असाच दृष्टीकोण समीक्षक आणि प्रेक्षकांचाही राहीलेला आहे. माहेरची साडीच्याच प्रेक्षकांनी शोले देखील हिट केला आहे.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
लेख आवडला. मराठी प्रेक्षक
लेख आवडला.
मराठी प्रेक्षक किती बारकाईने चित्रपट बघतो, त्याचे एक उदाहरण.
सांगते ऐका ज्यावेळी दूरदर्शनवर दाखवला होता त्यावेळी, माझ्या आईची आत्या घरी होती. त्यातला मा. आल्हाद बरोबरचा पहिलाच प्रसंगात ज्यावेळी रत्नमाला अंगावरची चादर नीट करते, त्यावेळी त्याचे पाय उघडे राहतात.
चादर नीट करणारी आई, असे कधीही होऊ देणार नाही, असे तिने लगेच बोलून दाखवले.
सिंधुताई सकपाळ, हा एक सुंदर चित्रपट. पण त्यात नायिका तेल पोळी करताना, पोळी तव्यावर टाकताना तिला
मोठे भोक पडलेले दिसते. अभिनेत्री पाककलानिपुण नसेलही, पण दृष्य चौकटीत जे आलेय, त्याची जबाबदारी दिग्दर्शकाचीच आहे.
काहि नॉर्मल, नायिका अभिनेत्री सीमाने जरूर रंगवल्या होत्या. पण तिचे स्कूलच वेगळे होते.
चित्रीकरणासाठी, सुंदर सेटपेक्षा उत्तम फोटोग्राफर हवा. दृष्यचौकटी कल्पक करण्यात तरबेज हवा.
आणि आता ग्रामीण लोकांना शहरी जीवनाची ओळख नाही असे नाही. अगदी प्रत्यक्ष बघितले नसले तरी मालिकातून आणि हिन्दी सिनेमातून त्यांनी शहरे बघितलेली असतात. उलट आपल्यालाच खरा ग्रामीण बाज, नीटसा माहित नसतो.
सखोल विचार. शुभेच्छा. ’मराठी’
सखोल विचार. शुभेच्छा.
’मराठी’ ब्रॅन्ड म्हणून जसजशी सिद्ध होत जाईल तसतशी मराठी चित्रपटसृष्टीही अधिक समृद्ध होईल.
खरेय..
खरंतर आपणच मराठी जनांनी मराठी सिनेमा सीरियसली घेतला नाहीय कारण आपले अग्रक्रम नेहमीच साहित्य अन नाटकाला राहिले.. सिनेमा म्हणजे टाईमपास अन डोके बाजूलाच ठेवायचे तर ते काम हिंदी सिनेमांच्या विषयात सफाईने होते या मराठी विचित्र मानसिकतेमुळे आपली सिनेमादृष्टी अन सृष्टी अपवाद वगळता विकसित झाली नाही..
आता काळ बदलतोय,पण खूप डॅमेज होऊन गेलंय..
छान लेख. उत्तम भाषा.
छान लेख. उत्तम भाषा.
छान लेख तू म्हटल्याप्रमाणे
छान लेख तू म्हटल्याप्रमाणे नॉर्मल नायिका मला 'बिनधास्त' मध्ये दिसली होती.
छान लिहिलं आहेस पूनम
छान लिहिलं आहेस पूनम
केश्विनी + १. मलाही वाचतावाचता 'बिनधास्त' आठवला होता. अजून एक म्हणजे बर्याच मराठी चित्रपटात वचावचा, अंगावर आल्यासारखं मराठी बोलतात. फार खटकतं ते कानांना.ह्याला 'बिनधास्त' सुद्धा अपवाद नाही, विशेषतः सुरुवातीचा काही भाग. 'कदाचित' चा उल्लेख तू केला आहेसच. 'नितळ' मधलं घरातलं वातावरण, संवाद मला खूप नैसर्गिक वाटले होते.
लेखनशैली तुझी नेहेमीच छान
लेखनशैली तुझी नेहेमीच छान असते पूनम, पण काही मुद्दे नाही पटले.
मराठी प्रेक्षक हा तसा बुद्धीजीवी आहे असे मला वाटते. म्हणजे, जर त्याला एखादा लॉजिक सोडून बनवलेला चित्रपट पहायचाच असेल, तर तो अत्यंत सहजपणे हिंदी सिनेमाचीच निवड करेल. कारण हिंदी सिनेमा म्हणजे ’काहीही चालतं’ हे त्याने मान्यच करून टाकलेलं आहे. आवर्जून मराठी सिनेमा पहायचा असेल, तर मराठी प्रेक्षक भिंग लावून चित्रपटाची निवड करतो.
<<<
नाही पटलं .
सिनेमा पहायचा बेसिक हेतु 'एंटरटेन्मेन्ट' एखाद्या सिनेमातून मिळतेय असं वाटलं तर खरच 'काहीही चालतं' कुठल्याही भाषेतला सिनेमा पहाताना !
मराठीत पण आवडीनं पाहिलय प्रेक्षकांनी 'काहीही चालतं' टाइप .. ९० च्या काळातले लक्ष्या-महेश कोठारे-सचिन ट्रेंड चे सिनेमे तसेच होते पण निखळ करमणुक देणारे !
काही वर्षांपूर्वी कमर्शिअल सक्सेस मिळवलेला ' मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' टाइप चे सिनेमे पाहिले तर वाटतं कि खरच 'का ही ही' चालतं मराठी सिनेमा ऑडियन्स ला सुध्दा :).
प्रेक्षकांना खरच "कुठल्याही" भाषेतला सिनेमा पहातना काहीही चालतं, एक बेसिक 'चांगला मार्केटिंग केलेला' सिनेमा सगळ्यांनाच पहावासा वाटतो.
चांगला वाइट वगैरे पुढची गोष्ट, मुळात पहावासा वाटला पाहिजे इथे सगळं आडतय असं मला वाटतं !
'ही' भाषा आहे म्हणून 'अशी' आपेक्षा, ती भाषा म्हणजे 'तशी' आपेक्षा मधे थोडं फार तथ्य असेलही पण मुळात कुठल्याही भाषेतला सिनेमा पहाताना ऑल दॅट ऑडियन्स वॉन्ट्स इज एन्टरटेन्मेन्ट !
(तीनदा म्हणायचा कंटाळा आला )
मराठी चित्रपटातल्या नायिकांच्या बाबतीत मात्र क्रांती व्हायची गरज आहे असं मला वाटतं. हिंदी, भोजपुरी, दाक्षिणात्य नायिकेने ’वाट्टेल ते केलेलं/ बोललेलं/ घातलेलं’ आपण सहज खपवून घेतलं जातं. मात्र मराठी नायिका ही ’साधीच’ हवी ही अपेक्षा अजूनही आहे. आपल्या घरातली अथवा शेजारची मुलगी आधुनिक कपडे घालते ते आपण चालवून घेतो, किंचित अघळपघळ भाषा बोलते ते आपल्याला चालतं. पण मराठी नायिका मात्र आदर्श नारीच लागते. अजूनही कथेतली स्त्री व्यक्तीरेखा एकतर अगदीच शोभेची बाहुली असते जिला चित्रपटात वेगळं असं काही स्थानच नसतं, किंवा नायकाला आधार म्हणून ’संकटांच्या कचाट्यामधून सोडवणारी, सर्व दु:ख सोसणारी’ अशी स्त्री असते. एखादा स्त्री व्यक्तीरेखेवर भर असलेला चित्रपट असेल तर ती व्यक्तीरेखा जितकी मोठी करता येईल तितकी मोठी आणि आदर्श केलेली असते.
<<< हे पण नाही पाटलं.
म्हणजे तू म्हणातीयेस तशा नायिका नक्कीच होत्या मराठीत, टिपिकल रडक्या अलका कुबल टाइप किंवा शोभेच्या बाहुली टाइप त्या लक्ष्या - महेश कोठारे काळातल्या.
पण जुन्या तमाशा प्रधान सिनेमातल्या नायिका खूप स्ट्राँग व्यक्तिरेखा होत्या 'स्वतःचं स्थान' होतं त्यांना सिनेमात , नुसत्याच शोभेच्या बाहुल्या नव्हत्या उलट बर्यापैकी नायिका प्रधन होते तमाशा पट !
उंबरठा, जैत रे जैत ची स्मिता पाटिल , महानंदा आणि स्मिता तळवलकर चे सिनेमे, बिनधास्त , जोगवा असे नायिका प्रधान बरेच सिनेमेही येउन गेलेत.
बोल्ड ग्लॅमरस नायिके पेक्षा आय गेस मराठी प्रेक्षकांना 'सो कॉल्ड बोल्ड रोमान्स' झेपत नाही !
'खुपते तिथे गुप्ते' मधे मुक्ता बर्वे जे म्हणाली ते एकदम बरोबर होतं, ती म्हणे 'रेप सीन्स' सारखी विकृत भावना कितीही बोल्ड असलेले सिनेमे चालतात पण जर हळुवार रोमान्स मधे एखादा किसिंग सीन आला कि उगीच भुवया उंचावतात !
असो, बाकी अर्थातच 'बॅड ड्रेसिंग सेन्स' बाबत अनुमोदन :).
पूनम तुझी लेखनाची शैली
पूनम तुझी लेखनाची शैली नेहेमीच उत्तम असते ..
मलाही लेख थोडा त्रोटक वाटला .. आणि काही काही मुद्द्यांबाबत डीजे +१ ..
आणि "मराठी प्रेक्षक बुद्धीजीवी आहे" हे विधान पटकन जनरलाईझ करता येणार नाही असं वाटलं .. बुद्धीजीवी प्रेक्षक जेव्हढा मराठीत आहे तेव्हढाच तो ईतरत्रही आहे आणि निखळ बिनडोक करमणूक जेव्हढी ईतरत्र हवी असते आणि चालते तेव्हढी ती मराठीतही आहे असं मला वाटतं .. पण मराठीचं मार्केट अजून पूर्णपणे इव्हॉल्व झालेलं नाही असं मला वाटतं जेव्हढं हिंदीचं आणि साऊथ इंडियन भाषांमधल्या सिनेमांचं झालं आहे ..
आता ज्या पटीने मराठीतही सिनेमे निघत आहेत, वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत तर सिनेमा अजून सशक्त झाला की पूर्ण इंडस्ट्रीही इव्हॉल्व होईल असं वाटतंय ..
काही मुद्दे अगदी पटले. काही
काही मुद्दे अगदी पटले.
काही मुद्यांवर अजून थोडासा विचार व्हायला हवा असे वाटले.
हा लेख खूपच छान जमलाय....
हा लेख खूपच छान जमलाय.... अनेक बाजूंनी चांगले विश्लेषण केलंय....
मराठी सिनेमा उत्तरोत्तर प्रगल्भ, मॅच्युअर्ड होत गेला, होत आहे - तो कधीही ट्रेंडी नव्हता, असूही नये - हेच त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल - मराठी माणसासारखाच तो तद्दन व्यावसायिक झाला नाही (मराठी सिनेमा आर्थिक बाजूत बर्याचवेळा मारही खातो ) पण अनेक अभिरुचीपूर्ण चित्रपट, वेगवेगळी विषय हाताळणी हे मराठी सिनेमानेच दिले असे मला तरी वाटते. एवढे विविध प्रयोग इतर कुठल्या भाषेत (हिंदी व बंगाली सोडून) होत असतील का नाही शंकाच वाटते.....
सुरेख लेख आणि स्पष्ट
सुरेख लेख आणि स्पष्ट विचार!
लेख आवडला.
माझ्याकडून बक्षिसांच्या यादीत.
लेख चांगला आहे. काही मुद्दे
लेख चांगला आहे.
काही मुद्दे पटले.
इतर भाषांतील चित्रपटांचा ठराविक मुखडा आहे असं आपल्याला वाटतं कारण एका ठराविक प्रकारचे तेवढेच आपल्यापर्यंत पोचतात. असेही असेल ना?
छान लेख!
छान लेख!
चांगला लेख. आवडला मराठी
चांगला लेख. आवडला
मराठी प्रेक्षक हा तसा बुद्धीजीवी आहे असे मला वाटते. >>> शहरी प्रेक्षक असतीलही काही प्रमाणात. पण इतर भाषिकांप्रमाणेच काही टक्केच बुजी असतील असे मला वाटते.
लेख आवडल अहे खरे असले तरी
लेख आवडल अहे खरे असले तरी स्पर्धेच्या संदर्भात नाही आवडला. म्हणजे लेखातील प्रत्येक दृष्टिकोन, प्रत्येक विचार व प्रत्येक अपेक्षा ही पटण्यासारखीच, पण मराठी चित्रपटाने काय बदलावे, काय करावे याबाबतच्या अपेक्षा 'कथा चांगली असावी' वगैरेपुढे फार जाताना दिसले नाहीत. त्याचवेळी प्रेक्षकांच्या मानसिकतेतील वैविध्य, प्रेक्षकांकडून असायला हव्यात त्या अपेक्षा यामुळे लेख थोडा मुद्यापासून लांब गेल्यासारखा वाटला.
पण स्पर्धा हे निव्वळ निमित्तच. लेखातील प्रत्येक विचार पटला. दक्षिणेच्या 'साच्याचे' नेमके वर्णनही परफेक्टच!
सुंदर व जस्टिफाईड / जस्टिफायेबल मतप्रदर्शन! अभिनंदन व शुभेच्छा
-'बेफिकीर'!
थँक्स लोक्स हिंदीचा सहज सोपा
थँक्स लोक्स हिंदीचा सहज सोपा पर्याय उपलब्ध असल्यामुळे मराठीला काहीतरी वेगळेपणा जपायला आणि जोपासायलाच लागणार आहे असं मला वाटतं.
डीजे- नायिका म्हणजे आत्ताच्याच म्हणायच्या होत्या. तमाशायुग संपल्यानंतर, धोधोरडपटांनंतर आत्ताचे सिनेमे पाहिले, तर एखादा 'सिंधूताई सपकाळ' येतो. 'नटरंग'मध्ये सोनाली कुलकर्णीची अतुल कुलकर्णीच्या बरोबरीने सशक्त व्यक्तीरेखा होती- मला तशा म्हणायच्या आहेत. गेल्या दहा वर्षातले चित्रपट पाहिले, तर असे चित्रपट किती कमी आहेत
सशल, आमेन!
बाकी, हो, लेख त्रोटक आहे, अजून तपशीलात लिहायला हवे होते ह्याबद्दल माफी मागते पण अन्य लेखांमध्ये खरंतर बरेचसे मुद्दे आले आहेत, म्हणून तेच तेच लिहीले नाही.
चित्रीकरणासाठी, सुंदर
चित्रीकरणासाठी, सुंदर सेटपेक्षा उत्तम फोटोग्राफर हवा.>> सिनेमेटोग्राफर.
मराठी चित्रपटामधे एकंदरच उत्तम तंत्रज्ञांची उणीव भासून येते. बालगंधर्वचा कपडेपट, शिवाजीराजे भोसले बोलतोय मधले सेट आणि नटरंगमधले मेकप यामधे हे प्रकर्षाने जाणवून येते. अर्थात ही काही फक्त उदाहरणे.
मराठीचा सर्वात मोठा तोटा हा आहे की मराठी सिनेइंडस्ट्री ही हिंदी सिनेइंडस्ट्रीच्या एकदम जवळ आहे. (भौगोलिक रीत्या) त्यामुळे इतर प्रादेशिक सिनेमापेक्षा इथल्या कलाकारांना, तंत्रज्ञाना हिंदीमधे प्रवेश लवकर मिळू शकतो. कित्येक मराठी अभिनेते-अभिनेत्री आणि तंत्रज्ञ हिन्दीमधूनच करीअर चालू करतात.
छान लिहिलयं , आवडलं !
छान लिहिलयं , आवडलं !
कित्येक मराठी
कित्येक मराठी अभिनेते-अभिनेत्री आणि तंत्रज्ञ हिन्दीमधूनच करीअर चालू करतात. <<<
काम तेच आणि तेवढेच मात्र त्याचा मोबदला अधिक योग्य(कामाचे योग्य मूल्यमापन करणारा) असे असल्यावर तंत्रज्ञांचा हिंदीकडे ओढा असणं साहजिक आहे.
हो नंदीनी, कुशल
हो नंदीनी, कुशल सिनेमेटोग्राफर निसर्गातले साधे नेहमीचे दृष्य, सुंदर करु शकतो.
नी, असाही विचार करतो मी ( प्रेक्षकांच्या दृष्टीने ) आपल्याला हिंदी भाषा सहज कळते, (जसे दक्षिणेतील लोकांना नाही ) त्यामूळे आपली सिनेमाची गरज, हिंदी सिनेमा थोड्याफार प्रमाणात भागवतो. तसेच बंगाल्यांप्रमाणे आपल्याला साधारणपणे पुस्तके वाचायची आवड नसते. त्यामूळे आपले साहित्य, पडद्यावर यावे वगैरे ओढ ही वाटत नाही.
ज्याप्रकारे मनापासून लिहिलंय,
ज्याप्रकारे मनापासून लिहिलंय, एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून, सिने-चाहती म्हणून, ते आवडलं.
प्रत्येक भाषांच्या चित्रपटांबद्दल ते-ते रसिक अशा प्रकारचीच चर्चा करत असावेत असं वाटतं.
अन्यभाषिक चित्रपटांबद्दलची काही मतं पटली; काही पटली नाहीत. नीरजानं लिहिलंय तसं, अन्य भाषांतलं तेवढंच आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामुळे अशी मतं बनत असावीत.
'नॉर्मल' नायिका हवी - याला मात्र जोरदार अनुमोदन.
तसंच, नायिकेच्या भूमिकेसाठीच्या कलाकारांची निवड - हा देखील यामागचा कळीचा मुद्दा ठरतो. (उदाहरणार्थ - मला इथे 'बयो' हा चित्रपट आठवतो. पठडीबाहेरची चांगली कथा होती याची, पण प्रमुख भूमिकेसाठी मृण्मयी लागू?? त्या भूमिकेचं मातेरं होणार हे आलंच मग.)
ज्याप्रकारे मनापासून लिहिलंय,
ज्याप्रकारे मनापासून लिहिलंय, एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून, सिने-चाहती म्हणून, ते आवडलं. >>> अनुमोदन मस्त आहे लेख.. एकदम व्यवस्थित मांडणी...
सशल आणि नीधपला अनुमोदन.