गझल
तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायाला तयार आहे!
तुझ्याचसाठी रक्तामध्ये नाहायाला तयार आहे!!
बघू तरी या, दोघांमध्ये कोण प्रथम थकतो ते आता;
मला जीवना! रोज दु:ख दे....सोसायाला तयार आहे!
रचून माझी चिता कधीचा कलेवरासम पडून आहे!
चूड फक्त लावा मजला मी, पेटायाला तयार आहे!!
चहूकडे कागदीच घोडे! दिशाहीन अन् त्यांच्या टापा!
त्या तालावर जनता भोळी नाचायाला तयार आहे!!
अलौकीक ज्ञानाचे सागर, पण कोणाचे लक्षच नाही;
दूर....वाचणे, सांगा कोणी चाळायाला तयार आहे?
जवळ किती जग आले पण हे, नात्यांमधले किती दुरावे...
कोणासाठी कोण आसवे ढाळायाला तयार आहे?
जो तो झिजतो, झटतो, जळतो निव्वळ स्वार्थासाठी येथे;
दुस-यांसाठी कोण जिंदगी जाळायाला तयार आहे?
पूल नदीचा उद्घाटन होण्याची करतो किती प्रतिक्षा;
हरेक नेता श्रेय पुलाचे लाटायाला तयार आहे!
लाच घ्यायला सरावलेल्या पोलिसचौक्या जिकडे तिकडे...
बिनवजनाची कोण शिकायत नोंदायाला तयार आहे?
युती आज कोणीही करतो, मिळून सगळे स्वार्थ साधती!
स्वार्थासाठी, चूल अलगही मांडायाला तयार आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
सतीश देवपूरकर जनाची नाही
सतीश देवपूरकर जनाची नाही मनाची बाळगा. स्वतःची चिता रचून कलेवरासम पडून आहात आणि फक्त चूड लावायला सांगताय ती काय आमची कामे आहेत का
मोहिनी पवारजी! प्रांजळ
मोहिनी पवारजी!
प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण तसदी घ्यायची गरज नाही.
शेराचा फारच उथळ अर्थ आपण बहुधा घेत असावा. ध्वन्यार्थाकडे व लाक्षणिक अर्थाकडे जरा पहायचा सराव करावा.
काव्य ही वक्रोक्ती असते असे जाणकार म्हणतात. नाही तर, आम्ही सरळ सरळ गद्यात नसते का हो लिहिले? गझलेचाच प्रपंच गेले३०-३५ वर्षे कशाला मांडला असता हो!
चिता, कलेवर, चूड, पेटणे ही सर्व प्रतिके आहेत, ज्यांची एक विशिष्ट गुंफण शेरात आहे. त्यावर आपण चिंतन केलेत काय? अर्थात आपण जर चिंतन करत असाल तर हो!
शांतपणे शेर गुणगुणून पहा, काय अर्थ उलगडतो ते. काही बोध झालाच तर जरूर कळवा. आमच्या ज्ञानात तरी भर पडेल. मग महसूस झाले तर, आपला गंडाही बांधू की! मी चांगले असेल ते, शेंबड्या पोराचेही घेतो व पुढे जातो. तुमचे का स्वीकारणार नाही?
टीप: समाजातील कोणत्या प्रवृत्तीवर आम्ही बोलत आहोत या शेरात? अंदाज आला तर जरूर कळवा. अर्थांचे नवीन पदर आम्हालाही कळू लागतील.
.........प्रा.सतीश देवपूरकर
..............................................................................................