आमी मोन्जोलीका.....आमी तोमार रोक्ता पान करबो. एय राजा चोलबे ना.
घाबरू नका, घाबरु नका. मला कुठल्याही बंगाली हडळीने झपाटलेलं नाहीये. पण माझ्या आवडीच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर अशी ड्रॅमेटिक सुरुवात करणं गरजेचं होतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत थ्रिलर-हॉरर ह्या genre मध्ये खोर्याने चित्रपट निघालेत असं नाहीये. खरं तर अतृप्त आत्मे, रात्री बेरात्री हातात दिवा घेऊन केस मोकळे सोडून फिरणारी जन्मोजन्मीचं विरहगीत गाणारी पांढऱ्या साडीतली 'भटकती रूह', कर्र आवाज करत उघडणारे दरवाजे, कुत्र्याच्या रडण्याचे, पैंजणाचे आवाज, जुनेपुराणे झपाटलेले वाडे, काळी मांजर ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. ह्या पठडीत महल, गुमनाम, मेरा साया, वो कौन थी, कोहरा, बीस साल बाद, नील कमल, पुनमकी रात असे अनेक चित्रपट होऊन गेले. ह्यातला प्रत्येक चित्रपट स्वतंत्र लेखाचा विषय नक्कीच आहे. महमूद आणि आर. डी. बर्मन जोडीचा 'भूत बंगला' हा नावावरून भयपट वाटला तरी बराचसा विनोदी चित्रपटाच्या अंगाने जाणाराच होता. नुसतं 'भयपट' म्हटलं तर सुप्रसिद्ध रामसे बंधूंचे बंद दरवाजा, पुराना मंदिर, विराना, डाक बंगला, सामरी वगैरे चित्रपट कितीही साचेबद्ध कथानक आणि अभिनय असला तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतातच हे माझे वैयक्तिक मत आहे
रहस्य-थरार आणि विनोद ह्यांची उत्तम सांगड घातलेला (शेवटचा अर्धा पाउण तास सोडल्यास) अलीकडच्या काळातील माझा अतिशय आवडता चित्रपट म्हणजे २००७ साली आलेला प्रियदर्शनचा 'भुलभूलैय्या'. प्रियदर्शनचे गरम मसाला आणि हेराफेरी प्रचंड आवडले होते. त्यामुळे मोठ्या उत्सुकतेने 'भुलभूलैय्या' पाहिला. तेव्हापासून आजतागायत टीव्हीवर कधीही लागला तरी हातातलं काम बाजूला ठेवून मी आवर्जून पहाते.
विकिवर एक नजर टाकली तर लक्षात येतं की ह्या चित्रपटाचं कथानक ओरिजिनल नव्हे (तसं कुठल्या चित्रपटाचं असतं म्हणा!). १९९३ मध्ये आलेल्या "Manichitrathazhu" ह्या मल्याळम चित्रपटाचा 'भुलभूलैय्या' हा चौथा रिमेक. आधीच्या रीमेक्सपैकी २००५ च्या तामिळ "चंद्रमुखी"चं डब केलेलं रुपडं मी पाहिलं होतं. पण रजनीकांतचा अभिनय सोडल्यास त्यात दक्षिणेकडच्या चित्रपटात हमखास आढळणारा बटबटीतपणाच जास्त आहे. त्यामानाने 'भुलभूलैय्या' ची हाताळणी बरीच संयत आहे.
तर ही कथा आहे अवनी आणि सिध्दार्थची. सिध्दार्थ एका राजघराण्यातला असतो. अमेरिकेहून तो येणार म्हणून त्याच्या पिढीजात वाड्यातले सगळे कुटुंबीय खुश असतात. सगळ्यात जास्त खुश असते ती राधा - गावातल्या पुजार्याची अनाथ मुलगी जिला सिध्दार्थच्या नातलगांनी आपल्या मुलीप्रमाणे वाढवलेलं असतं. राधा आणि सिध्दार्थचं लग्न होणार हे जवळजवळ सगळ्यांनीच गृहीत धरलेलं असतं. पण सिध्दार्थ येतो तो अवनीला सोबत घेऊन. अमेरिकेत असताना त्यांची ओळख झालेली असते, ओळखीचं रुपांतर प्रेमात होतं आणि ते दोघे लग्न करूनच येतात. हे कळल्यावर सगळ्याना धक्का बसतो खरा पण त्यातून ते सावरतात.
अवनीच्या लवकरच लक्षात येतं की ह्या मोठ्या थोरल्या वाड्यात एक खोली आहे जिला बाहेरून मोठं कुलूप आहे. सिध्दार्थच्या घराण्यातल्या पूर्वीच्या एका राजाने त्याच्या पदरी असलेल्या मंजुलीका नावाच्या बंगाली नर्तीकेवर भाळून जाऊन तिच्या प्रियकराचा वध केलेला असतो आणि मग तिला कैदेत घातलेलं असतं. राजाचा वध करण्यासाठी तडफडणार्या ह्या मंजुलीकाच्या अतृप्त आत्म्यामुळे आपल्या कुटुंबाला काही त्रास होऊ नये म्हणून सिध्दार्थच्या पूर्वजांनी ती खोली बंद करून तिच्या दरवाज्यावर मंत्रीत केलेलं 'भैरवकवच' लावलेलं असतं. ती खोली काही अवनीला स्वस्थ बसू देत नाही आणि उत्सुकतेपोटी सगळया धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तो दरवाजा ती एकदा उघडते. मग वाड्यात विचित्र घटना घडायला लागतात. सिध्दार्थाचे काका त्यांच्या ओळखीच्या शास्त्रीजींना बोलावणं पाठवतात. पण सिध्दार्थचा आत्मे, भूत वगैरे भाकडकथांवर विश्वास नसतो. आपण राधाशी लग्न न करता अवनीशी केलं, त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तीच हे सगळं करतेय अशी त्याची पक्की धारणा असते. त्यामुळे तो आपल्या मित्राला, डॉक्टर आदित्य श्रीवास्तवला बोलावणं पाठवतो. आदित्य एक मानसोपचारतज्ज्ञ असतो. काही दिवस वाड्यात राहिल्यावर त्याला वाटतं की राधाचा ह्या गोष्टींशी काहीच संबंध नसावा. जे घडतंय त्यामागे कोणीतरी दुसरंच आहे. तो मग ह्या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवतो. आदित्य ह्या रहस्याची उकल करू शकतो का? कोण करत असतं हे सगळं? आणि कश्यासाठी? आमी बोलबो ना
चित्रपटाची कथा ऐकून तुम्ही म्हणाल ह्यात फारसं काही नवीन नाही. बरोबर आहे तुमचं. भूतकथेत नवीन काय असणार? मग ह्या चित्रपटात आहे काय एव्हढं आवडण्यासारखं? तर मी एका शब्दात म्हणेन त्याचं सादरीकरण. दरवाज्यावरचं ते भलंमोठं 'भैरवकवच' बघितल्यावर आपल्यालाही उत्सुकता वाटते की आत नक्की काय असेल. अवनीने दरवाजा उघडल्यावर आपणही धास्तावतो की आता काय होईल. आपणही घरातल्या सगळ्याच माणसांवर संशय घ्यायला लागतो. ह्या रहस्यमय वातावरणाला विनोदाची एक खमंग फोडणी देण्यात प्रियदर्शन कमालीचा यशस्वी झालाय. त्याने विनोद पेरलाय तो अश्या खुबीने की तो 'कॉमिक रिलीफ' न वाटता कथानकाचा एक भाग बनून येतो.
हे खरं आहे की चित्रपटाच्या उत्तरार्धात रात्री पैंजणांच्या नादाबरोबर ऐकू येणारे बंगाली गाण्याचे स्वर, सिद्धार्थच्या राज्याभिषेकाचं चित्रीकरण केलेल्या फिल्मचं नष्ट होणं, घरातल्या मोलकरणीने मंजुलीकाला पाहणं आणि घरातली सगळी माणसं स्वैपाकघरात असताना तिथल्या कपाटाचं धाडकन खाली पडणं ह्या सगळयातून आपल्याला रहस्याचा अंदाज येतो. म्हणूनच की काय कोण जाणे.....पण प्रियदर्शनही हे रहस्य फार ताणत नाही. मग प्रश्न हाच उरतो की आदित्य हा गुंता सोडवणार कसा? नेमकी ह्याच वळणावर प्रियदर्शनची गाडी रुळावरून घसरलेय. निव्वळ भूतकथा दाखवायची का चित्रपटाला गुंतागुंतीच्या मनोव्यापाराचं परिमाण द्यायचं ह्या दुग्ध्यात पडल्याने त्याने शेवटल्या अर्ध्या-पाउण तासात चित्रपटाची पार खिचडी केलीय एव्हढी एकच दुर्दैवाची गोष्ट आहे.
कलाकारांबद्दल म्हणाल तर सिध्दार्थच्या भूमिकेत कोणाचीही किंकाळी ऐकू आली की त्या भल्याथोरल्या वाड्यातून धावत जाणे ह्याखेरीज शायनी आहुजाला फारसं काम नाही. आणि ते असतं तरी त्याला कितपत पेललं असतं माहीत नाही. नाही म्हणायला भूताखेतांवर अजिबात विश्वास नसलेला पण डोळ्यादेखत वाड्यात जे काही घडतंय त्यामुळे भांबावलेला सिध्दार्थ त्याने चांगला दाखवलाय. ह्यासाठी त्याला कितपत अभिनय करावा लागला हा मुद्दा वेगळा. अमिषा पटेलला 'बाई, तू नुसतं छानछान दिस आणि लाडिक लाडिक बोल. बाकीचं मी पाहून घेतो' असं दिग्दर्शकाने सांगितलं असावं अशी शंका आपल्याला तिचा 'अभिनय' पाहून येते. तिच्याआधी ह्या भूमिकेसाठी केंटरीना कैफला विचारण्यात आलं होतं म्हणे. गावातल्या पुजार्याच्या मुलीच्या भूमिकेत ती कशी शोभली असती हे कास्टींग करणार्यालाच माहित.
चित्रपटात भाव खाऊन जातो तो मात्र डॉक्टर आदित्य श्रीवास्तवची भूमिका साकारणारा अक्षयकुमार. 'भोलीभाली लडकी' किंवा 'गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा' असल्या गाण्यांच्या तालावर नाचणारा किंवा व्हिलनच्या १०-१२ जणांच्या ग्रुपला लीलया लोळवणारा 'अक्की' हाच का असा प्रश्न पडावा असला सुरेख अभिनय त्याने केलाय. विनोदी बोलून सिद्धार्थच्या घरच्यांना हैराण करण्याचे प्रसंग असोत नाहीतर घडणारया अजब घटनांकडे एका मानसोपचारतज्ञाच्या दृष्टिकोनातून पहाण्याचे प्रसंग असोत, दोन्हीही त्याने तितक्याच ताकदीने निभावले आहेत. मानसोपचारतज्ञ म्हणून तो कुठेही उपरा किंवा 'मिसफिट' वाटत नाही. केवळ त्याच्या एकट्यासाठी हा चित्रपट खुशाल बघावा. दुसरी लक्षवेधी भूमिका आहे 'अवनी' झालेल्या विद्या बलानची. तिच्याआधी ऐश्वर्या रायचा विचार झाला होता असं विकीपिडिया सांगतो. तिने ह्या भूमिकेसाठी हो म्हटलं असतं तर काय झालं असतं ह्या विचाराने माझा थरकाप होतो आणि हो, दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे. तिचे सगळे सीन्स चुकवू नयेत असेच आहेत.
भयपटात हमखास आढळणारे कर्णकर्कश्य पार्श्वसंगीत ह्या चित्रपटात अजिबात नाही. जे आहे ते प्रसंगांची गुढता अधोरेखित करायला अत्यंत परिणामकारकरित्या वापरण्यात आलं आहे. हिंदी चित्रपटांचा अविभाज्य अंग म्हणजे गाणी. 'भुलभूलैय्या' तलं माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे 'अल्ला हाफिझ कह रहा हर पल'. अवनी आणि सिध्दार्थवर चित्रीत झालेलं 'लबोंको लबोंपे सजा लो' हे प्रणयगीत आणि चित्रपटाचं शीर्षकगीतसुध्दा श्रवणीय आहेत.
हिंदी चित्रपट मेंदू बाजूला काढून ठेवून बघावेत असं म्हणतात ते ह्या चित्रपटाच्या बाबतीतही खरं आहे. एकच उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धार्थ आदित्यला भारतात बोलावून घेण्यासाठी वाड्यातून त्याला इमेल करतो तेव्हा एका गावात एव्हढा चांगला इंटरनेट एक्सेस कसा हा प्रश्न आपल्याला पडतो.
थोडक्यात काय तर, बाहेर मस्त पाउस पडत असताना, समोर गरमागरम कांदाभजी किंवा पॉपकॉर्न असताना, सगळे दिवे मालवून एखादा झक्कास रहस्यमय किंवा भीतीदायक चित्रपट बघावासा वाटतो तेव्हा (अजून पाहिला नसल्यास) प्रियदर्शनचा 'भुलभूलैय्या' नक्की पहा.
लेख चांगला. पण स्वप्ना तुझी
लेख चांगला. पण स्वप्ना तुझी लेखणी तिरकस चालताना जास्त भावते....
सॉरी पण स्वप्ना इफेक्ट नाही.
लेख आवडला
लेख आवडला स्वप्ना!

भुलभुलैय्या माझाही फेवरेट आणि मी ही जेंव्हा लागेल तेंव्हा पहाते.
पण मी मुळातच प्रचंड घाबरट असल्याने भयपट कधीच पहात नाही
भुलभुलैया एका कझिनशी बेट लागल्याने पाहिला पण त्याचा शेवट एका वेगळ्या वळणाने गेल्याने त्या सिनेमाबद्दलची भिती कुठल्या कुठे पळून गेलीये
त्यामुळे तुला शेवटी पडलेले प्रश्न ( इंटरनेट बद्दल) मला अजिबात पडले नव्हते
तिकडे लक्षही गेलं नाही
आता हा सिनेमा एकदा तुझ्या डोक्याने पहायला हवा पुन्हा एकदा
वाह स्वप्ना ! कालच पाहिला
वाह स्वप्ना !
कालच पाहिला होता हा लेख. पण तुझा स्पर्धेतला लेख म्हटल्यावर निवांत वाचायचं ठरवलं. (रुमाल हा शब्द सध्या वादग्रस्त झालेला असल्याने जागाही धरली नाही). तुझे ( आणि फारएण्डचे) नेहमीचे सहज पंचेस हे तुमच्या लिखाणाचं मोठं आकर्षण असतं ( कसं काय सुचत ?). कदाचित स्पर्धेतला लेख असल्याने हात आखडता घेतला असावा. (नंतर भरपाई करावीच लागेल याची :)). भयपट आणि या सिनेमातला फरक मस्त स्पष्ट केलाय. सिनेमा खरोखर चांगला आहे. मूळ सिनेमापेक्षा लॉजिकल शेवट देखील आहे. एका चांगल्या सिनेमावरचं हे चांगलं परीक्षण म्हणूनच आवडलं.
रच्याकने : तेव्हा एका गावात एव्हढा चांगला इंटरनेट एक्सेस कसा हा प्रश्न आपल्याला पडतो - ते गाव लवासा होतं हे मी सॅटेलाईट फोनद्वारे कन्फर्म केलंय.
>>ते गाव लवासा होतं हे मी
>>ते गाव लवासा होतं हे मी सॅटेलाईट फोनद्वारे कन्फर्म केलंय. >
छान लिहलय. यामध्ये राजपाल
छान लिहलय.
यामध्ये राजपाल यादवने साकारलेला "छोटा पंडीत" ही भुमिकाही छान विनोदी आहे, शेवटी त्याला झापडवून 'अब तुम ठीक हो गये हो' अस अक्षय कुमार म्हणतो तो सीन तर मस्तच.
परेश रावल आणि असरानी यांच्या भुमिकाही जबरदस्त होत्या...
लेख सुंदर आहे. विद्याचा अभिनय
लेख सुंदर आहे. विद्याचा अभिनय फक्त आवडला, सिनेमा नाही.
मूळ सिनेमाच माझ्या फारसा
मूळ सिनेमाच माझ्या फारसा आवडीचा नसल्याने लेख फारसा उत्सुकतेने वाचायला घेतला नाही.. पण तरीही छान लिहिलाय.. आवडला..
भूलभुलैयाचे टायटल साँग तेवढे मोबाईलची रींगटोन म्हणून एकदा वापरल्याचे आठवतेय... तसेच ते आमी छे तोमार की काय ते बंगाली शब्दांचे गाणे क्लास आहे..
अक्षयकुमारने यात संयमित अभिनय केल्यामुळे छान वाटतो.. तसा तो आचरटपणा न करता विनोद करतो तेव्हाही छान वाटतो.. कालच त्याचा हाऊसफुल १ पाहिला पुन्हा..
विद्याचा अभिनय यातही नेहमीप्रमाणेच उत्तम, खास करून शेवटी तिच्या अंगात संचारते, खाट वगैरे उचलते, घोगर्या आवाजात बोलत्या त्या सीन मध्ये खासच..
छान लिहिलय. माझाही आवडता
छान लिहिलय.
माझाही आवडता पिक्चर.
तामिळ पाहिला होता रजनीकांत वाला.
तो तेवढा आवडला नाही. त्यात भडकपणा वाटतो.
स्वप्ना भूलभुलैया बद्दल ठीके.
स्वप्ना भूलभुलैया बद्दल ठीके. पण नो स्वप्ना टच.
मला आवडला होता. अक्षय, रसिका
मला आवडला होता. अक्षय, रसिका आणि अर्थातच विद्या साठी. अमिषा पटेल मात्र दवडली होती यात. नंतर तिचे एक गाणे अॅड केले होते, ते मी नाही बघितले.
शेवटचा अर्धातास सोडल्यास
शेवटचा अर्धातास सोडल्यास मलाही हा चित्रपट प्रचंड आवडतो. ते विक्रम गोखलेचं पात्र उगीचच घुसडल्यासारखं वाटत राहतं.
अक्षय - विद्या, परेश रावल, असरानी, राजपाल यादव यांची काम मस्तच झाली आहेत. जेव्हा त्या मंजुलिकाच्या वेशात प्रथमच विद्या पडद्यावर आपल्या समोर येते तेव्हा तिच्या चेहर्यावरचे अप्रतिम भाव पाहून मनापासुन मुजरा करावासा वाटतो तिला.
परिचय आवडलाच, धन्यवाद आणि शुभेच्छा !
मी मूळ मल्याळम चित्रपट
मी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्कल केली आहे असे मला वाटले.
पण भुलभुलैया पाहिला होता तेव्हा एंगेजिंग वाटला होता.
स्वप्ना, छान झाला आहे लेख.
स्वप्ना, छान झाला आहे लेख. कालच कोणत्यातरी चॅनेलवर आला होता हा सिनेमा. इतके दिवस तुकड्या तुकड्यात पाहिलेला, काल पहिल्यांदाच पुर्ण पाहिला आणि आज तुझा लेख वाचायला मिळाला. सगळा सिनेमा ताजा ताजा आठवणीत असताना तुझा लेख अजुनच आवडला.
सिनेमा तसा टिपिकल हिंदी सिनेमासारखाच आहे, पण सगळ्यांचेच अभिनय सुरेख. चक्क अमिषा पटेल पण आवडली. टिपिकल असला तरी एकुणात सादरीकरण छान असल्यामुळे एंटरटेनिंग वाटला.
भुलभुलैया.... एकदम मस्त....
भुलभुलैया.... एकदम मस्त.... माझ्या मुलीचा खुप आवडीचा सिनेमा. मला विद्या आणि अक्षय साठी आवडतो. परेश रावळ आणि रसिका चा वावर एकदम मस्त आहे.
मी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्कल केली आहे असे मला वाटले.>>>>>
मुळ मल्याळम ( मनीचित्रथारु) मध्ये "शोभना" ने हे काम केले आहे. अप्रतिम आहे. मुळात ती एक फार सुरेख नर्तकी आहे. त्यामुळे त्या भुमिकेला एक वेगळे परिमाण लाभले आहे. माझी एक कलीग मल्लु आहे तिने मला सीडी दिली होती. शोभना विद्या पेक्षा खुपच सरस!!!! ( शोभना ला ह्या सिनेमा साठी नॅशनल अवॉर्ड आहे!!!!) ह्या मल्लु सिनेमात अक्षय चे काम त्यांच्या "अमिताभ" ने ...म्हणजे मोहनलाल ने केले आहे. तो सिनेमा खुपच वेगळा होता.
पण भुलभुलैया मध्ये जो कॉमेडी टच दिला आहे तो खुपच मस्त आहे!!!!!
भुलभुलैय्या मधे ज्या नटाने शशीधर / शरद ( जो मंजुलिका चा प्रियकर दाखवला आहे) ची भुमिका केली तो म्हणजे "वीनीत" तो साउथ मधे खुपच प्रसिध्ध आहे. आणि योगा योगाने तो शोभनाचा चुलत भाउ आहे आणि तो आणि शोभना दोघेही उत्क्रुष्ट नर्तक आहेत. तसेच ते दोघे प्रसिध्ध " त्रावणाकोर सिस्टर्स" रागीणी आणि पद्मिनी ह्यांच्या भावांची मुलं!!!!!
मंडळी धन्यवाद. हा पिक्चर
मंडळी धन्यवाद. हा पिक्चर लाडका असल्याने तिरकं लिहिता आलं नाही
मी मूळ मल्याळम चित्रपट
मी मूळ मल्याळम चित्रपट पाहिलाय. तो भुलभुलैयापेक्षा उजवा आहे. विद्याने मुळ चित्रपटातील नायिकेची नक्कल केली आहे असे मला वाटले>>> सहमत.
युट्युबवर शोभनाचे यातले नृत्य अवश्य बघा. त्यात पूर्णपणे भरतनाट्यमच घेतले आहे, भूलभुलैय्यामधे थोड्यातरी फ्रीस्टाईल बॉलिवूड स्टेप्स घेतलेल्या आहेत. अर्थात विद्यापेक्षाही मला तमिळमधली जोतिका सदाना अजिबात आवडली नव्हती.
माझाही आवडता पिक्चर
माझाही आवडता पिक्चर !
>>दिवंगत अभिनेत्री रसिका ओक हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे>>
रसिका जोशी ना?
स्वप्ना, छान
स्वप्ना, छान लिहिलेय.......
मला प्रियदर्शन हा नेहमीच बॉलीवूडचा "ईसापनिती" कार वाटतो..... म्हणजे त्याच्या कथातून बोध घेण्यासारखं वगैरे असतंच असं नाही....... पण अलिकडच्या काळातले त्याचे चित्रपट हे एखाद्या "आटपाट नगराची कथा" टाईप्स जास्त असतात..... आणि मग त्यातली छोटी छोटी कॅरॅक्टर्स पण तो अगदी जिवंत करतो...... त्यासाठी असरानी, राजपाल यादव, मनोज जोशी, ओम पुरी, परेश रावल हे त्याचे खास पत्ते आहेत.....
त्याचा "हंगामा" पण भारीच होता.....
माझा अत्यंत आवडीचा
माझा अत्यंत आवडीचा सिनेमा
विद्या, परेश रावल, रसिका, असरानी भारीच.
हा सिनेमा पहायला आम्ही आमच्या ९-१० वर्षाच्या लेकीला घेऊन गेलो होतो. आमचाच मुर्खपणा कारण आम्हाला तो विनोदी सिनेमा वाटला होता. त्यामुळे बराच वेळ मी तिचे डोळे आणि नवरा कान बंद करून बसलो होतो.
चित्रपटात भाव खाऊन जातो तो
चित्रपटात भाव खाऊन जातो तो मात्र डॉक्टर आदित्य श्रीवास्तवची भूमिका साकारणारा अक्षयकुमार. >> अगदी अगदी. पण त्याच्याहून रसिका जोशी भारी वाटलीये मला त्यात. तिचा तो बाथरुम मधल्या प्रसंगातील अभिनय हसून हसून मुरकुंडी वळवतो.
अक्षयकुमार आणि विक्रम गोखले यांच्यातले प्रसंग मात्र अतर्क्य झाले आहेत. आधुनीक विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालता येउ शकेल पण चित्रपटात तसे काही न केल्याने दोघांचेही हसे झाले आहे.
तुझ्या पंचेस शिवाय लिहिलेला लेख - तरीही आवडला.
चित्रपट सुंदरच, लेख त्याहून
चित्रपट सुंदरच, लेख त्याहून सुंदर व चित्रपटाच्या निवडीला मनःपूर्वक दाद आणि शुभेच्छा
भूल-भुलैया माझाही आवडता
भूल-भुलैया माझाही आवडता चित्रपट ,तसं मी प्रियदर्शन चा फॅन आहे ,हंगामा,हलचल,मालमाल विकली ,गरम मसाला ,हेरा फेरी ,फिर हेरा फेरी सगळे आवडतेच ! पण भूलभुलैया सगळ्यांचा सरताज!
माला शेवटच्या म्ंजुलिका च्या गाण्याचे पिक्चरायझेशन खूप आवडलं ,अप्रतिम संगीत ,अप्रतिम नृत्य आणि पूर्वीच्या काळातील राजा-राजवड्यांचे श्रीमंत ,भव्य चित्रण ........................मस्तच ! ग्रेट !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
गीता, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. दुरुस्ती केलेली आहे.
माझाही आवडता पिक्चर
माझाही आवडता पिक्चर !
>>दिवंगत अभिनेत्री रसिका ओक हिनेदेखील एका छोट्याश्या भूमिकेत मस्त धमाल उडवून दिलेली आहे>>
रसिका जोशी ना?
>>>>>>>
स्वप्ना, तुझंही बरोबर आहे..... ती पूर्वाश्रमीची रसिका ओक होती.... त्यामुळे बरेच जण तिला रसिका ओक म्हणून ओळखतात काही जण जोशी म्हणून
भुंगा, असं आहे होय? तरी मी
भुंगा, असं आहे होय? तरी मी विचार करत होते की मी 'ओक' असं का लिहिलं म्हणून