शिरीन फरहाद की विजोड जोडी (Shirin Farhad ki to nikal padi - Review)

Submitted by रसप on 25 August, 2012 - 01:20

"प्यार की कोई 'एक्सपायरी डेट' नहीं होती." - असं एका दृश्यात जेव्हा बोमन इराणी म्हणतो तेव्हा म्हणावंसं वाटतं की "लेकीन, 'मॅन्युफॅक्चरिंग डेट' तो होती हैं ना ?" नक्कीच असते. किमान त्या-त्या वयात होणाऱ्या प्रेमाची जातकुळी तरी वेगळी असतेच आणि इथेच 'शिरीन-फरहाद..' कमी पडला. वयाची चाळीशी ओलांडलेल्या दोन अविवाहितांच्या भावविश्वास दाखविताना जरी एक हलका-फुलका सिनेमा बनवायचा दृष्टीकोन ठेवला असला, तरी केवळ एका दृश्याचा अपवाद वगळता - त्यातही सौजन्य, बोमन इराणी - कुठेच सिनेमा अपेक्षित भावनिक उंची गाठत नाही.

'फरहाद पस्ताकीया' (बोमन इराणी) एक ४५ वर्षांचा अविवाहित पारशी 'मुलगा', आई नर्गिस (हनी इराणी) आणि आजीसोबत राहात असतो. एका ब्रा-पँटी च्या शो-रूम मध्ये सेल्समनची नोकरी करणारा फरहाद खूप सरळसाधा असतो. त्याच्या लग्न न होण्यामागे त्याची ही 'भुक्कड' नोकरीही कारणीभूत असते. शेकडो मुली बघूनही त्याला त्याच्या नोकरीमुळे कुणी पसंत करत नसते. पण फरहाद आपल्या नोकरीशी प्रामाणिक असतो.
दुसरीकडे, 'शिरीन फुग्गावाला' (फराह खान) पारसी ट्रस्ट ची सचिव असते. पस्ताकीयांच्या घरात लावलेल्या बेकायदेशीर पाण्याच्या टाकीबद्दल ती नोटीस बजावते आणि फरहादच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी बसवलेली ती टाकी पाडते.
शिरीन-फरहाद ची पहिली भेट शो-रूममध्ये झालेली असते आणि ती त्याला पहिल्या नजरेतच आवडलेली असते. टाकी पाडली, म्हणून नर्गिसचा शिरीनवर असलेला राग, फरहाद शिरीनला घरी घेऊन येतो तेव्हा शिरीनने 'त्या टाकीवाल्या बिनडोक बाईला' अनावधानाने घातलेल्या शिव्यांमुळे अजूनच वाढतो आणि ती फरहाद-शिरीनच्या लग्नाला साफ नकार देते.
लेकीन, प्यार को कौन रोक सकता हैं?? पुढची स्टोरी सांगायची आवश्यकता नसावी.

बाकी सर्व ठीक आहे, पण ही कहाणी प्रमुख व्यक्तिरेखांच्या वयाशी न्याय करत नाही. हे जे काही होतं, ते होण्यासाठी हिरो-हिरोईन २६-२७ वर्षांचेही चालले असते की ! - असो.
बोमन-फराह जोडी म्हणजे एका बाजूने ग्लेन मॅकग्रा आणि दुसऱ्या बाजूने जोगिंदर शर्मा ने गोलंदाजी करावी इतकी विजोड वाटते. फराह खान इंडिअन आयडॉलच्या परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यासारखी त्याच टिपिकल एका सुरात संवाद 'फेकते'. दिसते चांगली आणि मध्यमवर्गीय पारसी स्त्री म्हणून शोभतेही पण पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदाही तिच्यात 'फराह खान' सोडून इतर कुठल्याही व्यक्तिरेखेचा आभासही होत नाही, 'शिरीन'सुद्धा नाही. तिची कमजोरी बोमन इराणी च्या 'Flawless' अदाकारीसमोर जास्तच प्रकर्षाने जाणवते.
सिनेमाच्या उत्तरार्धात दोघांत होणारं भांडण आणि अगदी शेवटी फरहादला पोलिसांनी पकडणं वगैरे तर कृत्रिम नाट्यनिर्मितीचा साफ फसलेला प्रयोग आहे. कारण ह्या घडलेल्या रामायणांचा 'फॉलोअप' दृश्यांत काही संदर्भच येत नाही!
संगीतकार जीत गांगुली चे काम कर्णमधूर आहे. खासकरून 'कुकूडूकू' आणि 'राम्भा मे सांबा' ही गाणी छान जमली आहेत.

एकंदरीत, बासू चटर्जी वाल्या पारसी सिनेमांच्या समोर ह्या सिनेमाला ठेवणार असाल तर घरात बसूनसुद्धा पाहू नका. पण पुढे-मागे टीव्हीवर जेव्हा हा सिनेमा येईल, तेव्हा अगदीच काही बघण्यासारखं नसेल, तर त्या दाक्षिणात्य डब्डं सिनेमांपेक्षा निश्चितच सरस मनोरंजन आहे!

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post_25.html

Farah-Khan-Boman-Irani-In-Shirin-Farhad-Ki-Toh-Nikal-Padi1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाक्षिणात्य डब्डं सिनेमांपेक्षा निश्चितच सरस मनोरंजन आहे!<< Proud

बोमनचा फॅनक्लब आवश्यक वाटत आहे.

बोमन-फराह जोडी म्हणजे एका बाजूने ग्लेन मॅकग्रा आणि दुसऱ्या बाजूने जोगिंदर शर्मा ने गोलंदाजी करावी इतकी विजोड वाटते. >> Lol

एका ब्रा-पँटी च्या शो-रूम मध्ये सेल्समनची नोकरी करणारा फरहाद खूप सरळसाधा असतो<< हा विरोधाभास आहे का?

हे जे काही होतं, ते होण्यासाठी हिरो-हिरोईन २६-२७ वर्षांचेही चालले असते की ! - असो.<<< आज एका प्येपरात परिक्षण वाचले तर त्यात लिहिले होते की मध्यमवयीनच प्रेम दाखवायचे होते म्हणे!

बाकी तुमचा, तुम्ही शेवटी लिहिलेला सल्ला पटलाच आपल्याला Happy

फार अपेक्षा न ठेवता गेलात तर २ तास चांगले मनोरंजन होईल....
बोमन आणि या चित्रपटातला पारसी मॅडचॅपपणा ह्या जमेच्या बाजू!
फराह खान ही बाई मला पहील्यापासूनच आवडत नाही.... उगा आगाउ वाटते.... पण या व्यक्तीरेखेत बरी शोभते.... अर्थात तिची संवादफेक वगैरे एकसुरी वाटते पण पहील्या चित्रपटाच्या मानाने बरेच बरे काम केले आहे!

पंचेचाळीस वर्षाचा रिलायबल बॅचलर मस्तच रंगवला आहे बोमनने..... काही काही प्रसंगातला त्याचा मुद्राभिनय तर केवळ अप्रतिम Happy

मी ट्रेलर बघितले होते याचे. त्यातही फराह नव्हती आवडली.
पुर्वी पर्ल पद्मसी नावाची गोड चेहर्‍याची अभिनेत्री होती, ती शोभली असती, या रोलमधे.

पारसीच हवी होती तर..................पेरिझियाद पण चालली असती उलट धावलीच असती

डिंपल चांगला चॉइस होती , बिइंग सायरस मधे चांगली वाटली होती.
इव्हन किटु गिडवानी पण पारसी वाटली होती '१९४७ द अर्थ ' मधे !

बोमनलाच स्त्री भूमिका दिली असती तर हा वेगळाच डबल रोल त्याने मस्तच निभावला असता... (एनीटाईम बेटर दॅन फराह खॅन)

मनिमाऊ,

आप फल खाईये, पेड गिनने की क्या जरूरत हैं ??

(असे प्रश्न विचारून माझी विकेट काढू नका हो!!)

आज दैनिक सकाळ मध्ये या चित्रपटाचे जे परीक्षण आले आहे ते रसप यांच्या प्रत्येक मुद्द्याच्या विरोधी आहे. आता आपण काय करावे?:अओ:

जितक्या घाईत हिंदी चित्रपटांचे परिक्षण लिहितात .........तितक्याच तत्परतेने मराठी चित्रपटावर सुध्दा लिहावे....ही विनंती

मस्त

एक अपेक्षा. पेपरात आलेल्यासारखे परिक्षन लिहु नका. जरा आपल्या कडुन देखील भर टाका . असे वाटते की २ - ३ पेपरातले, वेबसाईटवरचे परिक्षण एकत्र करुन लिहिलेला आहे. खुसखुसीत लिहा राव.

@उदयन भाऊ,

ज्या सिनेमांच्या वेळा सोयीच्या असतात, ते पाहातो. मराठी सिनेमांच्या नसतात त्याला मी काय करणार? तुमच्या ओळखीत कुणी थेटरवाला असल्यास सोयीच्या वे़ळी लावायला सांगा मराठी सिनेमे !!

@किशोर,

आपण लिहिता ते श्री. बाळू जोशी ह्यांच्या प्रतिक्रियेशी विसंगत कसं काय ? आपला आरोप (किंवा निरिक्षण!) चुकीचा आहे. कदाचित आपण वाचलेल्या परिक्षणांना माझं परिक्षण वाचून लिहिलेलं असू शकतं!!
(ऑन अ सिरिअस नोट - एकाच सिनेमावरील लिखाण असल्याने थोडं साधर्म्य वाटू शकतं. पण अजून तरी मला कुणा दुस-याचं लिखाण कॉपी करायची वेळ पाहावी/ अनुभवावी लागलेली नाही.)

मी माझ्या तीन मित्रांबरोबर ह्या चित्रपटाला गेले आणि आम्ही सगळे आपण ह्या पिच्चरला का आलो ह्याबद्दलच हसत बसलो होतो!
शेवटी आम्ही इंटर्व्हल नंतर निघून आलो!

काल पाहिला थेटरात... बरा आहे. मारधाड मूवीजपेक्षा बरा वाटला.

बमन रॉक्स!! फराह आल्यानंतर बोर...

ती एकाच तार स्वरात जज असल्यासारखीच बोलते... चेहर्‍यावर काहीच भाव नाहीत....

हलकाफुलका आहे तरीही बमन साठी पहावा एकदा. गधेरा... मस्त गाणं आहे.

चित्रपट बोर झाला थोडा. चांगल्या कल्पनेची वाट लावली आहे.
फराह कमालीची माठ आहे.
इराणी सायेब हायेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?
बाकीचे जाऊ दे, पण भाषा?. पारशी बाई पोराला 'मुआ' म्हणेल असे संवादलेखकाला (असलाच तर) का वाटले असावे?

पारशांबाबत बोलायचे तर नसिरुद्दिन शाह, शबाना आझमी, अनुपम खेर यांचा (विजया मेहता दिग्दर्शीत) पेस्तनजी आठवतोय का कोणाला?

पारशांबाबत बोलायचे तर नसिरुद्दिन शाह, शबाना आझमी, अनुपम खेर यांचा (विजया मेहता दिग्दर्शीत) पेस्तनजी आठवतोय का कोणाला?>>>

आठवतोय तर!!!! एकदम मस्त... त्यात नसीर खरो खरीचा पारसी वाटला होता. त्याचं ते पोक काढुन चालणं, थोडं सटकलेलं असणं.... एकदम छान