( फेसबुकवर माझ्या तीन चार रचना चोरून कांही महाभागांनी स्वतःच्या नावावर पोस्ट केल्या. या घटनेवरून सुचलेली ही रचना. )
ए बी सी डी शिकलो नाही
माझी पाटी तशीच कोरी
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
दागदागिने अन् रत्नांचा
असे खजाना लुटण्यासाठी
साहित्त्याचे कुरण केवढे!
आज माजले चरण्यासाठी
लिखाण हिणकस अयोग्य खाण्या
निवडावी मी कशी शिदोरी?
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
चौर्यकर्म हे पाप भयंकर
भंपक तत्वे नकात शिकवू
स्वार्थासाठी सदैव आम्ही
योग्य वाटते तसेच वागू
तुमच्या कविता माझ्या सांगुन
पटवल्यात मी अनेक पोरी
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
राजकारण्यांनाच विचारा
राज्यशास्त्र का कुणी वाचती?
जरी अंगठेबहाद्दर तरी
खुर्चीवरती नाचनाचती
मलाच दूषण, डाकुंची या
ऐकुन घेता का शिरजोरी?
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
एक क्षेत्र मज दावा कोणी
चोर जिथे ना कधी नांदतो
पैज लावुनी शोध घेत जे
बाजी हरती, मीच जिंकतो
पंढरपुरच्या दिंडीमध्ये
सदैव करतो मी घुसखोरी
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
नाव तुम्ही का उगा ठेवता?
मान्य मला मी वाल्याकोळी
डोक्यावरती पेलत असतो
माझ्या पापांची मी मोळी
मार्ग दावण्या नारद नाही
करतो आहे पाप अघोरी
काय बिघडले? नाव कमवण्या
कवितांची जर केली चोरी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
वा काका वा मस्त, चपखल
वा काका वा
मस्त, चपखल !!
तुमच्या कविता असतातच अशा कुणाला तरी ; आपण चोराव्यात असे वाटावे अशा !!
सुंदर .
सुंदर .
उद्वेग अप्रत्यक्षपणे पण
उद्वेग अप्रत्यक्षपणे पण चांगला व्यक्त झालाय.