"ढापणे, काल 'हम आप के है कौन' पाहिला..."
"क्काय ? कसा आहे ? पटकन सांग"
शारीरिक शिक्षणाच्या तासाला शाळेच्या मैदानात कवायती करत असतानाचा संवाद.
माझ्या समोरच्या रांगेत उभ्या असलेल्या सखीने एचेएचके बघितल्याचं सांगितल्यावर माझ्या आवाजाची पातळी ताब्यात राहणं कठीणच होतं.
परिणामी शिक्षकांची बोलणी खायला लागली. पण एचेएचकेची गोष्ट ऐकायला मिळणार ह्या आनंदात शिक्षकांचं रागावणं कोण मनावर घेत बसणार ?
त्या चित्रपटात माझी लाडकी माधुरी होती हे एकच कारण उतावळं होण्यासाठी पुरेसं होतं.
काही चित्रपटांची नावं घेतली किंवा गाण्यांचा विषय निघाला की मला तो चित्रपट किंवा गाणं आठवायच्या आधी त्याच्या आजूबाजूला घडलेल्या वैयक्तिक गोष्टीच जास्त आठवतात.....'दिल तो पागल है' मधला राहुल त्याच्या कल्पनेतील मायाबद्दल बोलत असताना, पांढरी ओढणी फडफडवत हिरवळीवर हुंदडत पळणार्या माधुरीसारख्या.... ह्या आठवणीसुद्धा मग मनात हुंदडून जातात !
त्यामुळेच 'हम आप के है कौन' ची आठवण आली की कवायतीच्या वेळची ती चर्चा, शाळा, मैदान, मैदानातलं बुचाचं झाड, मागच्या मैदानातलं गुलमोहराचं झाड आणि शाळेतल्या बाई आणि मैत्रिणी ह्यांच्या अनेक आठवणी क्षणभरासाठी का होईना हमखास मनातून सळसळतात.
मी लिहितेय त्यातील अनेक चित्रपट समीक्षणाच्या दृष्टीने सामान्य किंवा अगदीच टाकाऊ व्याख्येत मोडणारे असतील. पण भूतकाळ आणि मी ह्यांच्यात हे चित्रपट दुवा बनून उभे आहेत !
'तेजाब' म्हटलं की मला आठवतो गौरी-गणपतीचा उत्सव.
आम्ही लहान असताना मोठ्या काकांच्या घरी सगळे जण एकत्र येऊन गौरी बसवायचे. मग काकांच्या मोठ्ठ्या घरात एवढ्या लोकांचा गजबजाट. चार काकू, त्यांच्या जरा बर्यापैकी हाताशी आलेल्या मुली स्वयंपाकघरात वेगवेगळे खमंग प्रकार बनवत बसलेल्या असायच्या...सोबतीला तोंडाच्या टकळ्या अखंड चालू.
मी तेव्हा लिंबूटिंबू. सगळ्या कोलाहलातून हळूच सटकून लाकडी जिन्यावरून सावकाश चढत लाकडी माळ्यावर घुसायचे आणि तिथली सगळी रद्दी उचकटून चंपक, ठकठक, चांदोबा किंवा इतरही जे हाताला लागेल ते 'हंग्री कॅटरपिलर' सारखं वाचत सुटायचे.
आरतीची वेळ झाली की कोणीतरी मला बोलवायला यायचं. मग त्या उकाड्याच्या वातावरणात कणकेच्या दिव्यांनी भरलेलं ताट फिरवत पाच की सात आरत्या व्हायच्या.
एकेवर्षी शेवटच्या दिवशी रात्री सगळी आवराआवर झाल्यावर व्हीसीआरवर तेजाब चित्रपट लावून पाहत बसलो होतो.....माधुरीची आणि माझी ती पहिली ओळख.
त्यामुळे असेल कदाचित, पण तेजाब म्हटलं की हटकून ते सगळं वातावरण, अर्धवट जळलेल्या कणकेच्या आणि कापराच्या खरपूस वासासहित आठवतं.
'तोहफा' चित्रपटाचं नाव निघालं की आमच्या घरात एक आठवण हमखास निघते. त्यातून तो प्रसंग जिच्यासोबत घडला ती मावशी तिथे साक्षात हजर असेल तर मग काय विचारायलाच नको.
अगदी ठराविक सुरूवात - आधी ती नुसतीच थोडीशी हसणार.
मग - "काय सांगू अगं, हा शद्या ना लहानपणापासूनच फार वात्रट"
ह्या वाक्यापासून गोष्ट सुरू.
मग एकदा आईबाबा माझ्या मोठ्या भावाला मावशीकडे ठेवून कसे गावाला गेले होते, त्याला करमत नव्हतं म्हणून काका-मावशी त्याला कसे 'तोहफा' बघायला घेऊन गेले आणि तिथे हा ५-६ वर्षाचा महाभाग दोन्ही हातांनी डोकं खाजवत बसल्यामुळे मावशीला कसं मेल्याहून मेल्यासारखं झालं....ही सगळी इष्टोरी साद्यंत ऐकायला मिळते.
आजही, त्या प्रसंगानंतर सुमारे ३० वर्षांनी, माझा थोरला भ्राता अगदी तस्संच दोन्ही हातांनी डोकं खाजवून दाखवतो आणि म्हातार्या मावशीची लाडिक चापटी खातो !
अशीच एक आठवण 'हातिमताई' चित्रपटाची.
बाबा कुठलंसं काम करून परस्पर सिनेमागृहात पोहोचणार होते. आम्ही दोघे आईसोबत तिथे जाणार होतो. तेव्हा आम्ही बकाऊल कॉलनीच्या जवळ राहायचो.
(बक म्हणजे संस्कृतचा बगळा आणि आऊल म्हणजे इंग्रजीचं घुबड....मग बकाऊल कॉलनीचं नाव असं संमिश्र का ठेवलं असेल हा गहन प्रश्न मला लहानपणी पडला होता. मुळात हे नावच बरोबर आहे का हा प्रश्न वेगळाच.)
तिथून पिंपरीला तेव्हा चालतच जायचो. आम्ही तिघे निघालो.
चालतच जायचं होतं तरी भावाने सायकल सोबत घेतली होती (बहुतेक नुसतीच शायनिंग मारायला)
मध्येच मला म्हणाला "चल तुला सायकल शिकवतो"
त्याच्यामानाने मी तशी भित्रटच होते. "तू धर हं मागनं" "सोडू नकोस रे" "आई बघ ना गं, तो हात काढून टाकतोय" वगैरे पालुपदांच्या संगतीने माझं सायकलशिक्षण चालू होतं.
एक मोठ्ठा उतार आला. माझी सायकल एकदम बुंगाट पळायला लागली.
मी स्वतःच एवढी छान सायकल चालवतेय असं वाटून फुशारक्या मारायला मी मागे भावाकडे बघितलं.
पण.....तो होता कुठे ?
त्याने कधीच हात सोडला होता. उताराच्या अगदी सुरूवातीला आई आणि तो चालत येत होते. माझी भितीने दाणादाण. आधीच नवशिकी, त्यातून आपला प्रशिक्षक एवढ्या लांब पाहून मी थेट समोरच्या दगडावर सायकल आपटवली.
संपूर्ण चित्रपट खरचटण्याच्या हुळहुळत्या जखमा घेऊन पाहिला.
दहावीची बोर्डाची परिक्षा चालू होणार होती. अभ्यासाचा कंटाळा आला.
परिक्षेच्या आदल्या दिवशी अचानक बाबांना म्हटलं "चला आपण कुठला तरी पिक्चर पाहून येऊ या"
बाबांना धक्का बसलाच असेल. पण एकदा माझ्याकडे नीट पाहिल्यावर तेही म्हणाले "चल"
आई मात्र पूर्ण शॉक मध्ये.
"अहो, काहीतरीच काय ? उद्या बोर्डाची परिक्षा चालू होणार आणि पिक्चरला कुठे निघालात ? लोकांचा तरी विचार करा"
पण बाबांचा लोकांपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास होता.
मग आम्ही तिघे पटापट आवरून मणिरत्नमचा 'बॉम्बे' बघायला जयश्री सिनेमागृहात.
चित्रपटाचा मध्यंतरानंतरचा भाग बघून सुन्न झाले होते. पण तरी मेंदूला जो हवा होता तो ब्रेक मिळाला होता.
बाहेर पडताना एकदम कोणीतरी समोर येऊन उभं राहिलं. पाहिलं तर शास्त्राच्या माझ्या लाडक्या शिक्षिका. त्यांच्या चेहर्यावरचे भाव अजूनही जस्सेच्या तस्से आठवतात....आश्चर्य, राग, काळजी, 'हद्द झाली बाई', 'पालक तरी कसे ऐकतात' वगैरे सगळ्या भावना एकत्रित.
निकाल लागल्यावर आणि गुणवत्ता-यादीत नाव वाचल्यावर मात्र खूप कौतुकाने आवर्जून सगळ्यांना सांगत होत्या.
दहावीपर्यंत रात्री जागून टीव्ही बघायला परवानगी नव्हती. दहावीनंतर मात्र 'मी आता मोठी झालेय' असं ऐकवून मी ही परवानगी घेतली. मग आठवड्यातून एकदा दूरदर्शनवर रात्री नऊ की साडेनवाला चालू होणारा चित्रपट बघायला सुरूवात झाली.
आई-बाबा सुद्धा माझ्यासोबत बसायचे. मात्र थोड्याच वेळात दोघं पेंगूनही जायचे.
एकदा 'एक दूजे के लिए' लागला होता. आईला झोप लागली. बाबा मात्र शेवटपर्यंत जागे राहिले होते. वासू आणि सपनाच्या प्रेमाचा शेवट पाहून मी मुसमुसतेय, हे बाबांच्या लक्षात आलं होतं.
मग टिव्ही बंद केल्यावर मला बराच वेळ 'ते सगळं कसं खोटं असतं, असं काही करायची गरज नसते, मनावर घेऊ नकोस' वगैरे समजावून सांगत बसले.
तेव्हा त्यांच्या चेहर्यावरची, हळव्या स्वभावाच्या लेकीबद्दलची काळजी आणि प्रेम अजूनही तस्संच्या तस्सं आठवतं !
मुंबईला कॉलेजला आले. आधीची मैत्र मागे सोडून जाताना तुटत होतं.
तशातच एकदा माझ्या खास सखीने "अमक्या दिवशी 'रूके रूके से कदम' हा गुलझारच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. तू येच" असं सांगितलं.
टाळणं शक्य नव्हतं, तशी इच्छाही नव्हती.
ठरल्याप्रमाणे मी निघाले. कार्यक्रम टिळक स्मारक सभागृहात रात्री ९ च्या आसपास सुरू होणार होता.
सिंहगड एक्स्प्रेसने निघून ७-७:३० पर्यंत पुण्यात पोहोचू असा विचार होता. सकाळच्या वॉर्डस-क्लिनिक्सना हजेरी लावून (आणि दुपारची लेक्चर्स सोयीस्करपणे बुडवून) मी सव्वादोनच्या आसपास छत्रपती शिवाजी स्थानकावर पोहोचले.
मला सोडवायला माझी एक सखी आली होती. गप्पांच्या नादात धांदरटपणे माझी पर्स तिच्याचकडे राहिली. तिला दुपारचं लेक्चर गाठायचं होतं म्हणून ती लगेच तिथनं निघूनही गेली.
(सँडहर्स्ट रोड ते सीएसटी एवढ्याशा प्रवासात केवळ सोबत व्हावी आणि गप्पा मारता याव्यात म्हणून तिने येणं ह्या गोष्टीचं आत्ता हसू येतं !)
तिकीट खिडकीजवळ गेल्यावर घोळ लक्षात आला. क्र. १२ च्या फलाटावर गाडी मला आव्हान देत उभी होती. माझ्या बॅगेत फक्त सर्जरीचं एक पुस्तक होतं. तडक तिथल्या एका औषधाच्या छोट्या दुकानात गेले.
दुकानदारापुढे पुस्तक ठेऊन एका दमात विचारलं,
"मुझे इस गाडी से जाना है, पर्स भूल गई हूं, मुझे पैसे चाहिए, क्या आप ये किताब आप के पास रखकर पैसे दे सकते हो ? मैं कल पैसे देके किताब ले जाऊंगी"
त्याने एकदा पुस्तकाकडे आणि एकदा माझ्याकडे पाहिलं, शांतपणे विचारलं "कितने चाहिए?"
"सौ रूपये"
त्याने पुस्तक ठेवलं आणि शंभराची नोट काढून दिली.
मी धावाधाव करून तिकीट काढलं, पण तोपर्यंत गाडी गेली होती.
एवढ्या वेळात मैत्रिण मला शोधत तिथवर येऊन पोहोचली होती. मग माझा उतरलेला चेहरा पाहून पुढचं काहीच न विचारता अक्षरशः माझ्या हाताला ओढतच तिने मला मुंबई सेंट्रल स्थानकावर आणलं. तिथून लाल डब्बा पकडून मी पुण्याला.
नेमक्या वेळेत पोहोचले, जुन्या सखीसोबत गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
...'रूके रूके से कदम' कानावर आलं की हा सगळा प्रसंग पुन्हा जिवंत होतो.
जळगावजवळच्या एका गावात मैत्रिणीसोबत ५-६ दिवसांच्या सुट्टीसाठी गेले होते (आधीच्याच प्रसंगातील मैत्रिण)
काकूंच्या हातच्या चविष्ट खानदेशी स्वयंपाकावर सगळी लाज सोडून तुटून पडले होते. सातपुडाच्या पाटोड्या, लाल चटणी, खानदेशी खिचडी, वरणबट्ट्या....
एके रात्री त्यांच्या गावातल्या उघड्या सिनेमाघरात गेलो. त्यादिवशी बुद्धपौर्णिमा होती. मोकळं मैदान, डोक्यावर मोठ्ठा चंद्र, सुखद हवा आणि बांबूच्या चौकटीला बांधलेल्या पडद्यावर लागलेला 'जिस देस में गंगा रहता है'.....
समोरच्या माणसांमुळे पडदा नीट दिसत नसेल तर जिथे बसलोय त्याच्या आजूबाजूची वाळू गोळा करून ढीग करायचा, त्यावर बसायचं आणि मग चित्रपट बघायचा.
....डोक्यावर मुंडासं बांधलेल्या गोविंदाचा फोटो दिसला की आजही तो दुधाळ चंद्र आठवतो.
तब्बूने काम केलेला 'अस्तित्व' चित्रपट होस्टेलच्या सगळ्या मुलींना फुकटात दाखवला होता.
उणेपुरे १७०० रूपये दरमहा वेतन मिळणार्या आम्हाला लिबर्टीला फुकटात चित्रपट ह्या गोष्टीचाच अपार आनंद झाला होता.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' नावासोबत सुद्धा अशाच अनेक आठवणी आहेत.
लग्नानंतर पहिल्यांदाच नवर्यासोबत मुंबईत आल्यावर त्याला अतिमहत्वाची स्थळे दाखवावीत अशा आवेशात मराठामंदिर दाखवलं होतं....तिथे डीडीएलजे अजून लागतो आणि त्याने शोलेचा विक्रम मोडला म्हणून.
"ओव्ह्युलेशनचा फंडा तरी काय आहे नेमका" ह्या प्रश्नाचं उत्तर समजावून सांगताना शाहरूख खान आणि काजोल ह्यांना अनुक्रमे पुरूषबीज आणि स्त्रीबीज ही रूपे प्रदान केली गेल्याने आता ओव्ह्युलेशन शब्दासोबतही डीडीएलजेची आठवण अटळ !
लग्नानंतर मुंबईतून थेट संकेश्वरसारख्या ग्रामीण भागात गेल्यावर तिथल्या सिनेमागृहात पाहिलेला 'कोई मिल गया'.....असले (नवर्याच्या भाषेत - चंपक) चित्रपट मला आवडतात. तोही आवडला.
आजही 'जादूss' म्हटलं की मला आठवतं....संकेश्वरजवळचं आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र, खचाखच भरलेले मिनीटेम्पो, 'साहेबsरीs,मॅडमsरीs' करत आमच्याशी गप्पा मारणारा स्टाफ, तोंडं हुळहुळी होईपर्यंत खाल्लेले आंबे आणि लग्नानंतर नवर्याला चकित करून टाकण्याच्या हेतूने केलेली (पण पुरती फसलेली) मसाला भेंडी (नवर्याच्या भाषेत - चायनीज भेंडी) !
सांसर्गिक आजारांसाठी असलेल्या मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना गर्भाला व्हायरसचं इन्फेक्शन झालं. त्यानंतर घडत गेलेल्या एकाहून एक वेदनादायक घटनांनी पुरती सुन्न झाले होते.
मन भरून आलेलं असायचं, पण रडूच थांबलं होतं.
एक दिवस नवर्याने जबरदस्तीने चित्रा सिनेमागृहात 'धूम' बघायला नेलं.
अनेक महिन्यांनी मी खळखळून हसले आणि हसता-हसताच बांध फुटून मनसोक्त रडले......त्यानंतर मात्र खरंच एकदम मोकळं-मोकळं वाटायला लागलं. सगळं मळभ निघून गेल्यासारखं.
.....आजही टीव्हीवर धूम लागला की माझ्या मनात नकळत कृतज्ञतेची भावना येते !
'एक रात्र मंतरलेली' चं नाव ऐकलं की दसर्याला आम्ही बनवलेला महा-विनोदी रावण आणि त्यातल्या निळू फुलेंच्या वाक्याने आमची हवा टाइट झालेले क्षण आठवतात.
एकदा मी आणि नवरोजी 'सात खून माफ' बघत बसलो होतो. पूर्ण चित्रपट संपला तरी तिने सातवा खून कुणाचा केला हे आम्हाला कळलं नव्हतं. दोघांनीही एकदमच एकमेकांकडे पाहिलं. मग परत-परत सगळे खून मोजले. पण सहाच माणसांचा हिशोब लागत होता.
शेवटी गुगलकाकांना विचारावं म्हणून चौकटीत लिहायला सुरूवात केली. सुरूवातीचे दोन-तीन शब्द लिहिल्यावर
"Which is the seventh person killed in Saat Khoon Maaf?"
असं वाक्य आपोआपच प्रकटलं.
आपल्यासारखेच गोंधळलेले अजून प्राणीसुद्धा आहेत, हे कळल्यावर दोघांनी टाळ्या देऊन मोठमोठ्याने हसून घेतलं. त्यावेळचा आनंद (!) खरंच अवर्णनीय होता !
एकदा बाबा टीव्हीवर 'गाढवाचं लग्न' पाहत होते. त्यातली मकरंद अनासपुरेची भाषा आणि बोलण्याचा ढंग लेकाने इतका लक्षात ठेवला की कुठूनही त्याचा नुसता आवाज आला तरी टिव्हीच्या पडद्याकडे बघायच्या आधीच तो 'सावळ्या' म्हणून आनंदाने ओरडतो.
मात्र तशी भाषा बोलण्यासाठी मी नुसतं "आवं धssनि" एवढंच म्हटलं तरी तो दोन्ही कानांवर हात ठेवून मोठ्ठ्याने म्हणतो "आई, नको ना प्लीज"
कारण विचारलं तर म्हणे "तू असं बोलायला लागलीस की मला तू माझी आई नाही, दुसरंच कुणीतरी आहेस असं वाटतं"
(त्याच्या ह्या शेर्याला माझ्या चांगल्या अभिनयाची पावती समजून मी स्वतःचीच पाठ थोपटून घेते !)
असे असंख्य प्रसंग.....
- 'मैंने प्यार किया' पाहून आईबाबा नको म्हणत असतानाही हट्टाने घ्यायला लावलेला आणि एकदाच घालून पडून राहिलेला ठिपक्यांचा निळा स्कर्ट आणि लाल कोट असलेला ड्रेस,
('जूते दो पैसे लो' ह्या गाण्याकडे बघून तस्सलाच हिरवा ड्रेस पाहिजे असा हट्ट करण्याच्या वयातून मी पुढे गेले होते हे आईबाबांचं नशीब !)
- 'आशिकी' मधल्या अन्नू अगरवाल सारखे केसांना लावण्याचे जाळी-जाळीचे लांब रबरबॅण्डस,
- 'पायलिया होs होs होs' हे गाणं आवडलं म्हणून आईने बाबांना 'दिवाना' चित्रपट पाहायला नेणं आणि ते गाणं संपल्यावर 'चला आता जाऊया' म्हणून उठवून आणणं,
- सौदिंडियन चित्रपट बघून त्या वातावरणाच्या मोहात पडून (थोराड हिरोंच्या नाही!) आपण दाक्षिणात्याशीच लग्न करूया अशी मनातील सुप्त इच्छा आणि मी ज्या दाक्षिणात्याशी लग्न केलंय त्याच्या गावातील लोक केळीच्या पानात जेवत नाहीत, बायका रोज डोईभरून गजरे घालत नाहीत, हे लग्नानंतर कळल्यावर झालेला हिरमोड,
- कानडी नवर्याच्या आग्रहाखातर भाषा कळत नसतानाही पाहिलेले आणि गाण्यांनी मोहात पाडलेले 'गीतांजली' 'सनादि अप्पण्णा', 'कविरत्न काळिदास' आणि इतर अनेक चित्रपट,
- पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला हमखास लागणारे देशभक्तीपर चित्रपट पाहता-पाहता हॉलमध्ये ताटं घेऊन जेवण्याची आईकडून मिळवलेली खास परवानगी आणि ते सगळं बघून भारावून जाण्याचा दरवर्षीचा अनुभव,
- 'मला अभ्यास करायचाय' ह्या सबबीवर आईबाबांसोबत लोकांकडील घरगुती कार्यक्रमाला जाणं टाळणं आणि ते गेले की वह्या-पुस्तके बंद करून टीव्हीच्या अगदी जवळ बसून चित्रहार,छायागीत सारखे कार्यक्रम बघणं, जिन्यात त्यांच्या येण्याची चाहूल लागली की पटकन टीव्ही बंद करून साळसूदपणे पुन्हा अभ्यास करण्याचं नाटक करणं,
- कॉलेजात असताना एकाच दिवशी लागोपाठ तीन चित्रपट (संघर्ष, बादशहा, तिसरा ?) मेट्रो सिनेमागृहात बघण्याचा पराक्रम करणं आणि ह्यासाठी आमच्या अतिशय सरळमार्गी बंगाली मैत्रिणीला भरी पाडून बाटवणं,
- उर्मिला मातोंडकरचा 'कौन' बघताना दरवाजातून अचानक एक हात येतो तेव्हा मोठ्याने फोडलेली किंकाळी आणि मेट्रोपासून जेजेच्या होस्टेलपर्यंत बसच्या प्रवासात आपल्या मागनं तसाच हात येणार की काय ह्या भितीने उडालेली गाळण,
- साहित्यसहवासमध्ये वपुंसोबत बसून बघितलेला 'झनक झनक पायल बाजे' आणि ते सगळे मंतरलेले दिवस,
- 'तू अजून शोले बघितला नाहीस, काय तू' ह्या नवर्याच्या सततच्या चिडवण्यामुळे आत्ता परवा-परवाच 'शोले' पाहिला. त्यात अमिताभ शेवटी मरतो हे पाहून आत्ता ह्या वयातही प्रचंड चुटपुट लागणं आणि दुसर्या दिवशी अनपेक्षितपणे लेकाने 'तुम्हारा नाम क्या है बसंती ?' चा डायलॉग टाकून दिलेला धक्का......
अनेक चित्रपट....असंख्य प्रसंग....त्यात गुंतलेल्या अगणित आठवणी....काही सुखद, काही बोचर्या.....कोलाज अजून घडतोच आहे !
मस्त मस्त मस्त!!!! रुणु,
मस्त मस्त मस्त!!!!
रुणु, लिहीत रहा गं!!!
छान लिहिलय आवडल एकदम
छान लिहिलय आवडल एकदम
@ बाळू
@ बाळू जोशी....
नाही....'सनादी अप्पाण्णा" आणि पांडू हवालदारचा संबंध येत नाही. सनादी (शहनाईवादक) हा ग्रामीण भागातील एक संगीतप्रेमी युवक आणि त्याच्या वादन कलेवर लुब्ध झालेली एक नृत्यांगना....जयाप्रदा...पुढे तीने त्याच्या उन्नतीसाठी केलेले प्रयत्न....आदी.
'सनादी' भूमिकेशी तद्रुप व्हावे यासाठी डॉ.राजकुमार यानी चक्क उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याकडे राहून शहनाईवादनाचे धडे घेतले होते.
सुंदर
सुंदर
फार छान लिहीलयस रुणु
फार छान लिहीलयस रुणु
काय मस्त लिहिलं आहेस!
काय मस्त लिहिलं आहेस!
मस्त लिहिलं आहेस रुणू!
मस्त लिहिलं आहेस रुणू! आवडलंच!
मस्त, मस्त
मस्त, मस्त
सहीच.. आवडेश..
सहीच.. आवडेश..
खूप सुंदर लिहिलेय! मजा आली!
खूप सुंदर लिहिलेय! मजा आली!
मस्त! मस्त!! झक्कास कोलाज
मस्त! मस्त!!
झक्कास कोलाज रुणू
अशोकराव, तुम्हाला कानडीत
अशोकराव, तुम्हाला कानडीत रिमेक झालेला दादाचा पांडू हवालदारच्या कानडी अवताराचे नाव माहीत आहे का?
फार मस्त आहे कोलाज! सगळे
फार मस्त आहे कोलाज! सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले!
धन्यवाद लोक्स अशोक, तुम्ही
धन्यवाद लोक्स
अशोक, तुम्ही पण तिकडचेच का ?
सनादि अप्पण्णा.....माझा नवरा राजकुमारच्या नुसत्या नावानेच ट्रान्समध्ये जातो !
<<'चित्रपट' हे आपल्या जीवनातून कधीही उडून जाणार नाही असाच रंग. >> अगदी अगदी.
बाळू जोशी, विचारून सांगते.
मस्त लिहिलय. आगाऊ + १
मस्त लिहिलय.
आगाऊ + १
रुणुझुणू.... मी
रुणुझुणू....
मी कोल्हापूरचा....त्यामुळे निपाणी बेळगाव तसे जवळचे....बेळगावचे 'ग्लोब' आणि 'हंस' तर आमच्या ठिय्याचे ठिकाण होते....
त्यातच माझी आई धारवाडची.....बहीणदेखील धारवाडातच दिल्यामुळे... तिकडे येणेजाणे नित्याचे होते.
डॉ.राजकुमार इज इक्वल टु गॉड राम अँड कृष्णा....टु एन्टायर कन्नडा स्पीकिंग फोक....त्यामुळे तो क्रेझीनेस मी धारवाडहुबळीच्या थिएटर्समध्ये मी अनुभवला आहे. होतेच ते व्यक्तिमत्व तसे मोहिनी घालणारे....लहानथोर....सुशिक्षित काय अशिक्षित काय ....डॉ.राजकुमार सार्यांना थोरल्या भावासारखे आदरणीय वाटायचे.
@ बाळू जोशी....या क्षणी ते नाव आठवत नाही....पण बेळगावी मित्रांकडून माहीती काढतो.
कोलाज आवडला !
कोलाज आवडला !
तुम्ही खरेच शोले परवा परवाच
तुम्ही खरेच शोले परवा परवाच पाहिला... काय चाल्लय काय???
लेख मस्त!
काही चित्रपटांची नावं घेतली
काही चित्रपटांची नावं घेतली किंवा गाण्यांचा विषय निघाला की मला तो चित्रपट किंवा गाणं आठवायच्या आधी त्याच्या आजूबाजूला घडलेल्या वैयक्तिक गोष्टीच जास्त आठवतात. >>>>> खूपच अनुमोदन. सुरेख लिहिलय कोलाज.. !
मस्त लिहिलंय...
मस्त लिहिलंय...
किती मस्त लिहिलयस गं. ('जूते
किती मस्त लिहिलयस गं.
('जूते दो पैसे लो' ह्या गाण्याकडे बघून तस्सलाच हिरवा ड्रेस पाहिजे असा हट्ट करण्याच्या वयातून मी पुढे गेले होते हे आईबाबांचं नशीब !) >>>> तुझंपण नशीब कसला भयाण ड्रेस होता तो
मस्तच .. आवडला लेख.
मस्तच .. आवडला लेख.
किती छान लिहितेस रुणू! कोलाज
किती छान लिहितेस रुणू! कोलाज आवडलाच..!
(No subject)
खुप खुप आवडले तुझे आठवणीतले
खुप खुप आवडले तुझे आठवणीतले कोलाज! तुझ्या आठवणींची मजा काही औरच होती. मस्त मजा आली वाचायला.
कसला भयाण ड्रेस होता तो >>
कसला भयाण ड्रेस होता तो >> भान, खरंय तुझं.
सर्वांचे आभार
>>केळीच्या पानात जेवत नाहीत,
>>केळीच्या पानात जेवत नाहीत, बायका रोज डोईभरून गजरे घालत नाहीत,
मस्त लिहिलंयस रुणुझुणू. एकदम आवडले. कोलाज अगदी.
मस्त रुणु.... तुमचा दिदींच्या
मस्त रुणु.... तुमचा दिदींच्या एका मैफिलचा लेख मला खूप आवडला होता... तसाच हाही ....मस्तच!!!
शुभेच्छा!!
मस्त लिहिले असे वाटले माझेच
मस्त लिहिले असे वाटले माझेच विचार आहेत , मी पण आशिच स्रुम्ती आठवत राहते
रुणू.. एकदम मस्तं वाटलं तुझा
रुणू.. एकदम मस्तं वाटलं तुझा कोलाज वाचताना..
संपूच नयेसा वाटत होता अगदी!!!
'भयाण ड्रेस... अगदी अगदी!!!
Pages