आठवणींच कपाट भाग- ८ ( अंतिम भाग )

Submitted by विनीता देशपांडे on 8 August, 2012 - 00:00

२५/१०/१९८१
आपल्या माणसांचा आनंद, समाधान आपणच शोधायचा आणि वाटायचा. सुहासदा - सुमीचा आनंद बघून मला आनंद झाला. आता आयुष्याच्या वळणावर मागे वळून बघण्याची हिम्मत होत नाही. आठवणी दाटून आल्यात तरी मी घट्ट डोळे मिटून घेते, मुठी आवळून घेते. ना कागदावर टिपते, ना उजळणी करते. त्या जिथून आल्या तिथे परत पाठवते.
डोळे उघडले की उरतो फक्त मी आणि माझे वर्तमान. त्या वर्तमानातच मी जगते

२१/११/१९८१
या डायरीने मला खूप साथ दिली. मला आधार दिला. काही दिवसात मी माझ्या प्रसन्नाकडे जाणार आणि मला आता याची गरज भासणार नाही. माझ्या लहानपणीचे फोटो, प्रसन्नाचे फोटो, मैत्रीणींचे फोटो यात जपून ठेवले आहेत.ही डायरी माझ्या कपाटात कायम असणार....माझ्या आठवणीच्या कपाटात.
________________________________________________________

डायरी इथेच संपली. नचिकेत भारावलेला अवस्थेत नात्यांची जुळवा जुळव करत असतांना अनुने त्यात दोन पत्रांबद्दल सांगितले होते ते आठवले. पत्र डायरीतच होते. एक गार्गीचे दुसरे सुमीचे. त्याला गार्गीने झपाटून ताकले होते. त्याने गार्गीचे पत्र वाचायला सुरवात केली:

॥ ॐ॥

१५/१२/१९८६
पुणे

प्रिय सुमी,
हे पत्र तुला मिळेल, तेव्हा कदाचित मी या जगात नसणार. मला कॅन्सर झाला आहे .खूप खूप उशीर झाला आहे. आलेला प्रत्येक क्षण मी जगण्यात घालवते. नचिकेत मोठा झाला असेल ना. त्याला बघायची खूप ईच्छा आहे. पण मला परत मोहपाशात अडकायचं नाही. म्हणून नागपूरला आले नाही. कोणालाच भेटायचं नाही. राग म्हणून नाही ग. मला जातांना त्रास होईल आणि माझ्या पेक्षा अधिक तुम्हाला.
माझ्या डायरीची आज खूप आठवण आली. ती धंतोलीच्या घरात. माझ्या खोलीत जे कपाट आहे त्याच्या वरच्या खणात आहे, तिथे माझी एक आवडती साडी आहे, आणि काही फोटो आहेत. मी नसले तरी या आठवणी मी तुला देउन जाईन आता मात्र मी जे डायरीत लिहिले असते ते तुला लिहित आहे, जायच्या आधी एकदा मनं मोकळ करावं म्हणते.
तुला आठवतो माझं आणि प्रसन्नाच्या लग्नाचा दिवस, १० एप्रिल १९८२. किती धुमधड्याकात आमचं लग्न झालं. आपण किती धमाल केली होती. त्या रंगलेल्या गप्पा, तो हळदीचा दिवस, सिमंतीला झालेली गाण्याचे मैफलं,ते उखाणे, आणि मांडवपरतणीचा थाट . आपण आपले किते फोटो काढून घेतले.
हळदीच्या दिवशी आपण किती गप्पा केल्या होत्या रात्री काय पहाटे तीन वाजेपर्यन्त गप्पा मारत होतो.ते मावशी रागवली म्हणून आपण झोपलो नाही तर जागरणच केले असते.
माझी पहिली मंगळागौर, पहिली हरतालिका, पहिली दिवाळी, पहिली संक्रांत सगळे सण डोळ्यासमोर येतात. असं वाटत काल परवाची गोष्ट आहे. आपण सगळे , सुहासदा, तू, कुमुद, आईबाबा, निरंजन दादा..सगळे मिळून आदासाच्या गणपतीला गेलो होतो. नचिकेत पूर्णवेळ माझ्याच जवळ होता. कोणाचकडे जायला तयार नव्हता..
मी प्रसन्ना सोबत मैसू र- उटी फिरली. आमचे पहिले वर्ष एकमेकात गुंफलेलं आणि गुंतलेलं होतं. प्रसन्ना मला सगळी कडे बरोबर घेउन जायचा. अर्चना आत्या आम्हाला रोमिओ-जूलिएट म्हणायची.
आईबाबांना मी धंतोलीचं घर विकत घ्यायला सांगितले. तू तेव्हा खूप मदत केली. तू त्यांना समजवून सांगितले नसते तर त्यांनी कधीच घर घेतलं नसतं. आता मी निश्चिंत आहे . माझ्या बाबांना वर्धेच्या घराचं भाडं मिळत. त्यांना म्हातारपणी त्रास होणार नाही. मी मुलगा असते तर त्यांची काळजी घेतली असती.
आमच्या पहिल्या दिवाळीला आम्ही कार घेतली. .ती दाखवायला आम्ही सगळे नागपूरला आलो होतो.
नचिकेत गाडीतून उतरायला तयारच नव्हता. आपण खूप भटकलो, खूप धमाल केली.
मला नेहमीच असं वाटायचं मला हवं ते सगळं मला मिळालं होतं. प्रसन्ना खूप आनंदात होता. लग्नानंतर तीन वर्ष तरी चान्स घ्यायचा नाही असं ठरलं होतं . प्रसन्नाला आणि मला खूप भटकायचं होतं केरळ., नेपाळ काश्मिर, राजस्थान आम्ही खूप भटकलो. सगळं कसं सुरळीत चालू होतं. सगळे आनंदात होते.
एक ट्रीप मला तू आणि सुहासदासोबत करायची ईच्छा होती. भारतात नाही, आपण यूरोप ट्रीपला चाललो आहे हे स्वप्न मी खूपदा बघितलं. पण आता ते पूर्ण होणं शक्य नाही.
मी खूप भावनाविवश झाली की मला कवितेच्या ओळी सुचायच्या. त्यानंतर मी दोनचार कविता केल्या.
आजवर प्रसन्नाशिवाय कोणालच माहित नव्हते मी कविता करते ते अगदी आईबाबांनासुध्दा. मला ती नेहमीच माझ्यासाठीच, माझ्याजवळ, माझ्या ह्रदयातच ठेवायची होती.
संधिप्रकाश
तिन्ही सांज संधिप्रकाशात
लख्ख उजळुन गेली
या प्रकाशात स्वप्नाचे गीत
तरंगुन गेले
सोनेरी स्मृतींची एकेक गुंफण
उकलुन गेली
मनातील गंधित फुलांची,पाकळी
उमलुन गेली
ही आज अन उद्या मधली वेळ
निसटुन गेली
या वेळेतील ॠणानुबंध,ह्रदयात
उमटुन गेले
या अनामिक बंधनातील बंध
निखळुन गेले.
निखळुन गेले
माझा हा संधिकालच चालू आहे. बधंनातून मी केव्हा निखळून जाईन ठाऊक नाही. असो याला मी काय म्हणू. देवाची ईच्छा, माझ दैव- प्राक्तन, कुठल्या तरी चुकीची शिक्षा, की कुणाचे दृष्ट लागली. राहू दे सुमे मला अजून कळलेच नाही ग. तुला कळले का ?
प्रसन्नाने लग्नाच्या वेळेस दिलेल्या प्रत्येक वचनाला जगला-जगतो आहे. मला भरभररुन प्रेम दिलं. मला हवं ते सगळ दिलं. आजही मला आनंदात ठेवण्यासाठी धडपडत असतो. आणि मी अर्ध्या वाटेवर त्याची वाट सोडून निघाले. कुमुद कशी आहे ग ? ती अकालीच पोक्त झाली . तिच्या बद्दल जेव्हा जेव्हा विचार करते..तेव्हा तेव्हा मला खूप वाईट वाटतं. नशीबी संसारसुख नाही असे ती गृहीत धरुन जगतं आहे.
सलीलमधे ती गुंतली होती...पण नियतीला कोण हवं ते ती तुमच्या कडून हिरावून घेईपर्यन्त कळतच नाही. आता या नियतीचा माझ्यावर डोळा आहे.
सुमे तुला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगू, मला जेव्हा कळलं मला कॅन्सर आहे बरेच वेळा माझ्या मनात यायचं मी गेल्यावर प्रसन्ना एकटा होणार. मग कुमुद आणि प्रसन्नाचं लग्न झालं तर दोघंही आनंदी होतील. मी हे चक्क प्रसन्नाला बोलून दाखवलं तर तो म्हणाला, तू सगळ्यांचा आनंद कशात आहे आणि ज्याला त्याला त्याचा आनंद मिळवून द्यायचा ठेका घेतला आहे का ? पण तुला माहिती आहे, सोन्या माझा आनंद तू आहेस. माझ्या आयुष्यात कोणतीही स्त्री तुझी जागा घेऊ शकत नाही.
मी तुला असा प्रश्न विचारणारच नाही की समजा मला कॅन्सर झाला असता तर तू केलं असतं का वैगरे,
कारण मला माहित आहे तू तसं केलं नसतं .सो प्लीज़ डोन्ट थींक ऑफ इट .यालाच प्रेम म्हणतात ना सुमे.
आज आईबाबांची खूप आठवंण येते आहे. माझ्या मागे त्यांना सांभाळशील ना. ते परवा येणारच आहेत आधी मी त्यांना बोलवणार नव्हते ग. मला असाह्य बघून त्यांची जी अवस्था झाली असती त्याची मी कल्पना करु शकत नाही. त्यांनी खचलेलं मलाच बघवलं नसतं. पण दूर राहून त्यांना विनाकारण हूरहूर द्यायची म्हणून बोलवून घेतलं.
माझ्या आजारपणाच कसं कळलं. झालं काय मला उलट्या होत होत्या, चक्कर, मळमळ, मला काय सगळ्यांनाच वाटलं गुडन्यूज़ आहे. चेकअपसाठी डॉक्टरकडे गेलो.
तपासण्या झाल्या. अगदी जसं सिनेमात होतं, रिपोर्ट आलेत. डॉक्टरांचा गंभीर चेहरा. केबीन मधली जीवघेणी शांतता आणि त्यांच सांगण, प्रसन्ना आणि माझा चेहरा पहाण्यासारखा होता . प्रसन्नाने तर परत सगळ्या टेस्ट करुन घेतल्या . त्याचा विश्वास बसत नव्हता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला डॉक्टर असून कळलं नाही. खरच कळलं नाही. एका क्षणात माझी भरली मूठ रिती झाली. आठ दिवस तर सगळ्याच संवेदना गोठून गेल्या होत्या. एका भिषण दडपणाखाली आम्ही सारे वावरत होतो. मग माझ्यातली जुनी, खूप जुनी गार्गी जागी झाली आणि तिने बघता बघता वातावरण जादूने बदलून टाकले. मी प्रत्येक क्षण जगायचं ठरवलं. हल्ली माझं घड्याळ्याकडे सतत लक्ष असतं.
माझ्या जाण्याने जी पोकळी तुमच्या आयुष्यात येणार आहे .त्या पोकळीत जगू नका..मला वाईट वाटेल. अजून एक, मी गेल्यावर प्लीज प्लीज कोणीच माझा फोटो भिंतीवर लावू नका. काही आठवणी मनातच जपायच्या असतात ना.
मागच्या आठवड्यात मला भेटायला माझे मेडिकलचे मित्र मैत्रिणी आले होते. तसे ते वरचेवर भेटायला येतातच. त्यांच्या कडून मला कळले की मेडिकल मधे माझी हेल्पिंग हॅन्ड सोसायटी बंद झाली. मी संपायच्या आधी मी रुजवलेले माझे विचार संपले याचे खूप वाईट वाटतं आहे. असो.
मी या कविता माझी किमोथेरपी सुरु असतांना लिहिल्या आहेत. आता या नंतर काही लिहिन असे वाटतं नाही.
(१)
पंख तुटले, सोड मायेची साउली
घे भरारी, निरभ्र निळ्या आकाशी
दूर जरी तू....छाया आहे उशाशी
डोळ्यात झाली आठवणींची दाटी
मायेच्या पाखरा..येशिल का परतुनी ?

(२)
निस्तब्ध भावनांचा कशाला कोंडमारा
डोळ्यात आसवांना उगा दिलास थारा
नको आठवणींचा मांडु नको पसारा
कंठात दाटुन येतो हुंदका एक बावरा
एकटीच बरी मी, कोणाची साथ कशाला
(३)
ओठांना हलकेच स्पर्शून गेला, एक थेंब ओला
आठवणी दाटुन आल्या, कळलेच ना रे मना
ह्रदयी अनेक द्वंद्व, मी अश्रुत भिजुनि चिंब
तिमिरात कधी हरवले, कळलेच ना रे मना
स्पंदनात उसास्यांचा कल्लोळ झपाटलेला
निष्प्राण देह झाला, कळलेच ना रे मना

सुमी, कुमुदची...माझ्या आईबाबांची काळजी घे आणि माझ्या इटुकल्या पिटुकल्या नचिकेतची पण.
माझी डायरी एकदा वाचून बघ .मला त्यातील माझी ईश्वर विषयची माझी कल्पना आठवते. माझ्यासाठी ती तेव्हा एक शक्ती होती आणि आजही आहे. माझ्या ईश्वराला नाव नाही, रंग नाही , रुप नाही ती आहे एक अज्ञात शक्ती.
तुला पत्र लिहिलं आणि आज मला आतून बाहेरुन मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे. माझ्यात आता फक्त मी उरले आहे. माझ्यात अभिलाशा नाही,अपेक्षा नाही, खंत नाही, द्वेष नाही, वेदना नाही, देणे-घेणे हिशेब नाही, स्वप्न नाही, आसक्ती नाही, जगण्याची उर्मी नाही. आहेत फक्त मुक्तीचे तरंग.
जाता जाता माझ्यासाठी ही चारोळी:
मावळत्या देहामधे
श्वासाचा हा संग,जणु
हरवलेल्या वाटेवर
मुक्तीचा अभंग

तुझी गार्गी

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.....................<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
कुठलाच विचार न करता, वेळ न दवडता नचिकेतने त्याच भारवलेल्या अवस्थेत सुमीचे पत्र वाचायला घेतले.


प्रिय गार्गी,
मला माहिती आहे तू या जगात नाहीस. तू आमच्या मनात आहेस ,डोळ्यात आहेस. मला आणि सुहासला तू नचिकेत दिलास. मला आईपण तू दिलं, .हे मी कशी विसरु शकते. ही डायरी वाचली आणि मला तू नव्याने उमगली. तू आमची मैत्री, माया, शक्ती. तू प्रत्येक पावलासोबत होतीस. दूर असतांना मी तुझ्या आठवणीत होती.
प्रामाणिकपणे सांगू , तू मेडिकलला गेल्यावर मला माझा आधार हरवल्या सारखं वाटलं. आता तूला माझी आठवण कशाला येणार. नव्या विश्वात रमेल आणि आम्हाला विसरेल अ शी हूरहूर दाटून यायची.पण डायरी वाचल्यावर तू आमच्यातच गुंतलेली दिसली. अरे हो मी तुझी डायरी,.साडी, फोटो तुझ्या आठवणीच्या कपाटासकट उचलून आणलं. डायरीतून बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला. कुमुद बाळ माझ्या ओटीत टाकतांना तू तिचा हात का नाही पकडला. सांग ना ?
तुझं लग्न म्हणजे माझं स्वप्न होत ते. तुला प्रसन्नाची नवरी होतांना पहायचं होतं. तुमच्यापेक्षा मलाच आनंद झाला ठाऊक आहे. डॉ. काणेंची ट्रीटमेन्ट सुरु असतांना तू इंजेक्शन देतांना मला त्रास होणार नाही इतक्या हलक्या हाताने ते द्यायची. तू नचिकेतमधे किती रमायची की आम्हाला तू त्याच्याच एवढी वाटायची. सुहास म्हणतो तेच खरं माझी बहिण म्हणजे ना एखादं कोड आहे सहज न सुटणारं.
फायनलं सोडून तू प्रसन्नासाठी देहरादूनला गेली. त्याच्या अपघाताचं ऐकून माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे, मी प्रसन्ना सापडल्याचा निरोप मिळे पर्यन्त देव पाण्यात ठेवले होते .त्या काळात तू त्याच्यासाठी काय काय सोसलं हे मला कधी का बोलली नाही ग. प्रसन्नासाठी सावित्री झालीस.
आजही आपला लहानपणाचा दंगा, आईच्या हातचा माझा मार वाचवण्यासाठी तुझी धडपड, शाळेतला पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, मधल्या सुट्टीतला डब्बा अदलून बदलून खाणे,आणि तुला आठवतं मला खारावलेले फुटाणे आवडायचे म्हणून ते तू तुझ्या बाबांना हट्टाने घेऊन मागायची आणि चार-पाच दाणे तोंडात टाकून पुडी मला द्यायची. हे तेव्हा कळलं नाही ग. तुझ्या धीटपणा पूढे आमच्या खोड्या कोणी करायचे नाहीत. तुला आठवतं पाचवीच्या पंकजने मला आणि कुमुदला सुम्माड-कुम्माड चिडवलं तर तू केवढ मारलं त्याला. आणि अशी अचानक अर्ध्यावाटेवर साथ सोडून गेली. किती रडलो मी आणि कुमुद ठाऊक आहे का तुला ?
तू आम्हाला अगतिक पाहू शकली नसती म्हणून तू नागपूरला आलीए नाही ना.
तुझं प्रसन्नावर प्रेम आहे हे तुझ्या आधी मला कळलं आणि मीच तुला सांगितलं आठवतं ना ?
एवढा जीव कोणी लावतो का ? आठवणीनेच डोळे आणि गळा भरुन यावे सांग ना ?
प्रसन्नाची पण पत्र वाचलीत. काय मजेशीर प्रेम होतं ग तुमचं. तुमची मनं एकमेकांत गुंतली होती.
इकडे मरणाच्या दारात टेकली आहे आणि तरी जाता जाता प्रसन्ना आणि कुमुदच्या लग्नाचा विचार करतेस..
धन्य तुझी माते..धन्य. किती वेळा सांगितलं इतरांसोबत स्वत:चा पण विचार कर पण खरच सुहास म्हणतो तेच ठीक. आणि अशी कशी डॉक्टर तू ?इतक्या लोकांना बरं केलं. हेल्पिंग हॅंड सोसायटी तयार केली. इतक्या जणांना मदतीचा हात दिलास आणि स्वत:चा आजार बरा करता नाही आला.
मी तुझी आठवण वैगरे अजिबात काढणार नाही. आठवण तेव्हा काढतात जेव्हा आपण कोणाला तरी विसरतो. तुला विसरु शकेन का ग?
तुझी आठवणं केव्हा केव्हा येते काय सांगू, आवळ्याचं लोणचं करतांना, आंब्याचा तो दशहरी आंब्याचा रस करतांना आणि हो उडदा-मुगाचे पापड करतांना तुला लाट्या खूप आवडतात ना. मला तुझ्या सारखं लिहिता येत नाही. नाहीतर तुला न सांगता बी.ए.स्सीची अ‍ॅडमिशन रद्द करुन आर्ट्स कशाला घेतले असते? तू त्याबद्दल मला रागावून झालं आहे.
कुमुद पण तुझ्यासाठी तळमळते ग .तू आम्हाला दिलेली साथ कशी विसरेन. देव असेल तर माझं आयुष्य तुला देईलं, पण माझाही आज देवावरचा विश्वास उडाला..तो भेटला तर विचारेन, तू माझ्या निश्पाप मैत्रीणीला का घेऊन गेला? तिचा अवेळी मृत्यू म्हणजे तिचे प्रक्तन, दैव, कुठल्या चुकीची शिक्षा? दृष्ट कोणाची लागली रे ? त्याला सगळेच हिशेब मागणार मी. तुला काय वाटलं कविता तुला एकटीलाच करता येतात ?तू मला दाखवलेले आकाश बघ वाचून.
स्वगत
विरघळलेल्या आशेमधून
माझ्यातलं मी पण उठून
उभ राहिलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
तळहातावर घेउन बघ
तळहातांवरच्या रेषांमधून
माझ प्राक्तन मला शोधत
मनात आलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
डोळ्यात साठवून बघ
डोळ्यातले स्वप्न दडलेल्या
विचारांमधून वाट काढत
ओठावर आलं-मला म्हणालं
असच जाउ देते मला
एकदा नवा श्चास घेउन बघ
घुसमटलेल्या श्वासांमधून
उसासे बाहेर पडले तळमळत
मला म्हणाले-केव्हा पासून या
मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.
तुझी सुमी
........................................................................................................................................................

डायरी आणि पत्र वाचून झाल्यावरही पानं चाळत नचिकेत सुन्न टेरेसवर उभा होता. त्याला काहीच सुचत नव्हते. डोकं सुन्न झालं होतं. जाणीवा सगळ्या बधीर झाल्या होत्या.
"नचिकेत...जेवायला चलं प्लीज, भुक नाही वैगरे डायलॉग मारु नकोस. मला तुझ्या मनस्थितीची चांगलीच कल्पना आहे. तुला जे सत्य कळलं आहे ते तू मनावरच घेऊ नको असं मी म्हणारच नाही...पण असं काही करु नको किंवा वागू नको ज्यामूळे आईबाबांनी इतके वर्ष जे सांभाळलं, ज्या आठवणी जपल्या त्याला धक्का लागेल." अनु
"म्हणजे तुला म्हणायचे आहे की मी माझ्या खर्‍या आई बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही.." नचिकेत
"तुला कळलच नाही मला नेमकं काय सांगायच ते. तुला जन्म देताच पळून गेलेल्या आईची तुला कीव आली पण ज्यांच्या मूळे तू आपल्या पायावर उभा आहे, तुला काहीच कळू न द्यायचा ज्यांनी सतत प्रयत्न केले, त्यांची माया, त्यांचे प्रेम, त्यांनी निरपेक्ष तुझे केलेले संगोपन, त्यांची तुझ्यासाठी काळजीआणि स्वप्न ते सगळं थिट आहे का ?" अनु
"विचार कर अणि खुशाल जा आपल्या खर्‍या आई-वडिलांना शोधायला."म्हणत अनु खोलीतून निघून गेली.
काय ग काय झालं ? आजी
काही नाही....अनु
जेवण आवडलं नाही का ? अनु
"तुला माझ्या आईसारखी भाजी जामणारच नाही. तुझ्या हाताला ती चवच नाही." नचिकेत
अनु गालातल्या गालात हसली.
"छान झाली आहे हं आई येणारं की पाच सहा दिवसात., मग करेल ती तुझे लाड " आजी

नचिकेत नॉर्मल झाला. निदान त्याच्या बोलण्यावरुन तरी तसं वाटत होतं. अनुने तीडायरी...फोटो...साडीत गुंडाळून परत आठवणी्च्या कपाटात जागेवर ठेवून दिलेत. नेहमीचे रुटीन सुरु झालं....आज अनुला लायब्ररीत जायचं होतं. नचिकेत आठ वाजता निघाला...घरातले काम आटपून आजी-आजोबांचा स्वैयंपाक करुन अनु निघाली. तिला वाटलं आजी-आजोबांना गार्गी-प्रसन्नाबद्दल सगळच माहिती असणारं ,त्यांना विचारु, नको विचारु या संभ्रमात ती निघाली. आधी नचिकेतशी बोलू आणि मग काय ते ठरवू.
"नचिकेत....ऐक...ना. " अनु
"ह्म्म....बोलं..." नचिकेत
"सोडं तो लॅपटॉप....माझ ऐक तर"...अनु
"काय झालं...?" नचिकेत
"अरे! आपण जर आजी आजोबांशी या विषयावर बोललो तर..." अनु
"कोणता विषय.. ?" नचिकेत
नचिकेत, तुला माहिती आहे मी काय म्हणते आहे ते. डायरी वाचली तरी काही तरी सुटतं आहे असं सारखं वाटतं. एक तर पूढे प्रसन्नाचे काय झाले ? आणि कुमुद कुठे आहे ? काय करते ? आपण गार्गीची बाजू वाचली. सुमीच्या म्हणजे आईंच्या पत्रावरुन त्यांची भूमिका १९८६ ला उत्तर म्हणून लिहिलेले पत्र यावरुन कळते. गार्गीचे आईबाबा आणि इतर , आपल्या आजी-आजोबांना नक्कीच माहिती असणारं. पण १९८६ ते आजपर्यन्त या पैकी आपल्याला कुणीही भेटलं नाही किंवा आपल्याला माहिती नाही. त्यांच्या आयुष्यात पूढे काय झालं असेल हे मला जाणून घ्यायचं आहे.
"आईबाबा ट्रीप वरुन परत यायच्या आत विचारु ना ?"अनु
"तू मला विचारते आहेस की सांगते आहेस"...नचिकेत
तेच ते मी उद्याच बोलते आजीशी..
नचिकेतला लक्षात आलं, अनुला पूर्ण कथा ऐकल्या शिवाय चैन पडणार नाही. त्याला तो कोण आहे हे कळल्यापासून घर, घरातली माणसं उगीचच परकी वाटायला लागली. त्याला कळत होतं ही नुसतीच बोचरी जाणीव आहे. माझ्या वागण्याने मला कोणाला दु:खवायचे नाही. हाच विचार त्याच्या मनात येत होता.
सकाळी आठ वाजता नचिकेत गेला आणि अनुने आजीला गाठले. कारण आजी एकदा पूजा कारयला बसल्या मग लवकर उठणार नाही. या वयात आजीला या विषयावर थेट विचारणं बरं नाही, पण सुरवात कशाने करायची.? अग्निहोत्र मालिका थोड्यावेळातच लागेलं लक्ष वेधायला अनुने लग्नाचे अल्बम टी.व्ही.समोर आणून ठेवले.
आजीशी गप्पा मारता मारता ती नाश्त्याची तयारी करु लागली....
अनुचा अंदाज बरोबर ठरला.आ जीने विचारलेच "अगं अनु अल्बम इथे कसा काय..?"
काही नाही असेच. चला ना पाहू. आजीने आधी टाळम टाळ केली..पण नंतर तयार झाली.
आठवणी रंगत आल्या. एकेक फोटो दोघी बघता बघता. अनुने नकळत विषय काढला. माझ्या आईच्या मैत्रीणी आल्या वैगरे आणि हळूच विचारले, आईंच्या मैत्रीणींचा फोटो नाही दिसत. लगेच आजीने एक ग्रुप फोटो दाखवत म्हंटले "हे तर आईंच भजनी मंडळ.. त्यांची एखादी बालमैत्रीण...".आजीचा चेहरा उतरला.
अनुला स्वतःचाच राग आला. आपण उगीच विचारलं असं तिला वाटतं होतं. आजी सॉरी...आता आजीला सांगून टाकावं सगळ तिच्या मनात आलं. अनुभवी आजीने अनुला काहीतरी सांगायचे आहे हे हेरलं.
काय झालं अनु ? तू एवढी त्रासिक का?
त्या क्षणी अनुने ठरवले आता आजीला सगळे सांगायचे.
आणि अनुने आजीला डायरी-फोटोबद्दल सांगितले.
"म्हणजे तुला सगळ कळलं.तर " आजी.
अनुला अपराध्यासारखं वाटतं होतं.
अग, वाईट नको वाटून घेऊ. तुला सगळं जाणून घ्यायचा अधिकार आहे.
त्यांच्या मैत्री बद्दल तू वाचलंच आहे. सुमी , सुमिता म्हणजे माझी सुन , सुहासची बायको. मी तीच आत्या, गार्गीची आत्या. लहानपणापासून बघितलं मी तिला. अगाखांद्यावर खेळवलं, पोर हट्टी होती पण खूप समजुदार आणि गुणी होती. खूप माणसं तिने जोडली आणि त्यांच्यावर खूप प्रेम केले. दिसायला म्हणशील तर सावळीच पण चेहर्‍यावर कमालीचे तेज, उफराटा बांधा आणि बोलण्यात पटाईत. मुली करायच्या तशी कामं म्हणजे रांगोळी, भरतकाम, विणकाम या सगळ्यात कधीच रस नव्हता. सडेतोड बोलण.एकतर हो किंवा नाही हे दोनच पर्याय. प्रचंड आत्मविश्वास अगदी माझ्या बाबांसारखा. मी आणि देवदत्त दोघं भावंड. .मी आणि देवदत्त घराबाहेर पडलो तेव्हा आम्ही आमच्या घरच्यांना पाहिलं,नंतर आयुष्यात इतके सुख-दु:खाचे प्रसंग आलेत पण कोणी कोणालाच भेटलं नाही. चैताली वहिनीला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. देवदत्त समोर बोलायची सोय नव्हती.पण मनं दुभंगली आणि कधी जुळलीच नाही. आपणच या सर्वाला कारणीभूत आहोत याच विचारानं खंगून गेली. हे सारं तुला माहिती आहे मला म्हातारीला आठवले म्हणून सांगितले.
गार्गी, सुमी आणि कुमुद जिवाभावाच्या मैत्रिणी एकाच बाकावरच्या. तिघी खूप गप्पा मारायच्या. कुमुद खूपच साधी अगदी गाय होती, सुमी हौशी तिघी तिन टोकं पण घट्ट जुळलेले. आजोबा त्यांना त्रिकूट म्हणायचे. उन्हाळ्यात आम्ही खूप पत्ते खेळायचो, गच्चीवर आईसक्रीम पार्टी करायचो, ते दिवस आठवले की बरं वाटतं. कुमुदचं पहिल लग्न फसलं , दुसरं नियतीने फसवलं. कुमुद नंतर समाजसेवेत रमली किंवा विरंगुळा म्हणून तिने तो मार्ग स्विकारला होता. या दोन अपघतामुळे ती नेहमीच अलिप्त रहायला लागली होती. आधी आश्रमशाळेत जायची पण गुंदेचा लोकांनी सबंध तोडला आणि शाळा बंद झाली. मग समितीच्या ऑफिसमधे कामं करत होती. वर्धेच्या समीतीच्या मुख्य आचार्यबाईंची खूप लाडकी. तिने सुमीच्या पदरात टाकलेले बाळ निमोनियाने गेले आणि तिने वर्धा सोडलं. नागपूरच्या भगिनी संस्थेत आचार्यबाईंनी तिची रहाण्याची सोय केली. आधी ऑफिसची कामं .मग समितीच्या बैठकीला येऊ लागली. छोट्या छोट्या गांवांमधे समितीचा प्रसार करता करता .तिची नागपूर केंद्राची सहसचिव म्हणून नियुक्ती झाली. खूप वर्षांपूर्वी ती नागपूरला भेटली होती आता ती पूर्वीची साधी-भोळी कुमुद नाही.. समितीत मोठ्या पदावर आहे म्हणे. इतक्यातच पेपेरमधे वाचले. पचमढीच्या जवळ आदिवासी गावात कुठली तरी शिक्षण संस्था चालवतं आहे. परिस्थितीने अलिप्त...अबोल...साध्या कुमुदला कुठल्या कुठे पोहचवलं. आपल्या नशीबी जे नाही त्याचं गार्‍हाणं गात रहाण्यापेक्षा दुसर्‍यांना सावरतं स्वत:ला सावरले. धीट आणि खंबीर कुमुद बघून आनंद झाला .
माझी सुमी, आमच्या दोघीतलं नातं कधीच सासू-सुनेचं नव्हतं. खरं सांगू , हे सारे दादाच्या अंगणात सागरगोट्या, लपाछपी, लगोरी खेळत असे. सुहास-सुमीला खेळतांना बघून माझ्या मनात ही माझी सून झाली तर असा विचार येऊन जायचा .तिच्या माहेरी सगळे सणवार, येणारे-जाणारे त्यामुळे लहानपणापासूनच तिला कामाची सवय. रोज दारात रांगोळी काढायची. भरतकाम, विणकाम सारेच गुणं होते. खूप हौशी नटण्याची नेहमीच टापटीप रहायची. तिचा नीट नेटकेपणा मला आजपण आवडतो.
सुमीचा गार्गीवर फारच जीव. लग्नानंतर नाव बदलता येतं त्याचा फायदा घेतला. सुहासला लक्ष्मीपूजनाच्या वेळीस गार्गी नाव ठेवायला लावलं. मला नंतर या नाव बदलण्याचा किस्सा कळला. खूप आधी दोघींची नावावरुन वादावादी झाली होती आपल्या नावात आपले व्यक्तिमत्व असते. गार्गी म्हणाली तुझं नाव सुमिता, कोणीही ओळखेलं थोडीशी बावळट असेलच. माझं नाव गार्गी-गार्गी एक ऋषिकन्या आणि विदुषी होती, तिने म्हणे ब्राम्हणमहासभेत ऋषि याज्ञवल्कला हरवले.माझं नाव ऐकताच कोणीही म्हणेल एक हुशार मुलगी असेल. गमती गमतीत हा संवाद वादावादीत बदलून गेला आणि तिला चैतालीने समजवून सांगितले आपल्याला आपल्या लग्नात नाव बदलता येतं तेव्हा कुठे दोघींची भांडण मिटलीत. कायम या तिघींचे भांडण...रुसणे..फुगणे...कायम चालू असे. अगदी कुठलीही नवीन गोष्ट, नवीन बातमी आधी एकमेकांना सांगायचे मगच इतरांना हा नेम त्यांचा बरेच वर्ष टिकला. गार्गीला वाचनाची आवड होती. इंग्रजी कादंबर्‍या खूप वाचायची. तिला कॅन्सर झाल्याचं कळलं आणि खूप रडली . दैव बघ कसं आहे, नेमकी आजोबांना बरं नव्ह्तं म्हणून तिची आणि गार्गीची शेवटची भेट झाली नाही. गार्गीची मावशी अमेय त्यांचा मुलगा नंतर एक मुलगी झाली. तिने खूप मदत केली. शेवट पर्यन्त सेवा केली. पण नवरर्‍याला ऑस्ट्रेलियाला नोकरी मिळाली आणि तिथेच गेली. सुरवातीला एकदोनदा वर्धेला आली तेव्हा भेट झाली पण आम्ही पुण्याला आल्यापासून ती कधीच भेटली नाही.

सुमी अर्थात गार्गीला सुहासने कधीच नोकरी करु दिली नाही.त्याला आवडायचे नाही. तिने एक दोनदा घरगुती व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण नाही जमला. गार्गीची माझी भेट ती किमोथेरपी करुन नागपूरला आली होती तेव्हा झाली होती.. ती गेल्यावर प्रसन्ना देहरादूनला गेला. त्याच्याबद्दलं उडत उडत ऐकले, कोणी म्हणे तो नेपाळला गेला, कोणी म्हणे हिमाचल प्रदेश. पण सेवाग्रामच्या त्या वकिलीणबाई आहेत ना, त्यांचं नाव आठवतं नाही .त्यांचा मुलगा पण आर्मीत आहे. त्या सांगत होत्या की तो लष्करात मोठ्या हुद्यावर आहे. त्याने दुसरे लग्न केले नाही. तो एका मद्रासी मुली सोबत रहात असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. नंतर त्याचे काय झाले? तो कुठी आहे?काय करतो? काहीच माहित नाही आम्ही एकदोनदा विचारपूस केली . दादा वहिनी असे पर्यन्त त्याने सबंध ठेवलेत. त्यांच्या साठी त्याने खूप केले, दादा आणि वहिनी, गार्गीच्या अवेळी जाण्याने फारच खचले. त्यांची आस्था, विश्वास, डळमळला होता. वहिनेने तर अंथरुण धरले. दोघांनी सुमीने-सुहासने खूपदा नाही म्हंटले तरी त्यांनी नागपूरचे घर विकले आणि वर्धेला रहायला गेलेत. पण गार्गीच्या आठवणींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. आम्ही पुण्याला यायचे ठरले. सुहासला चांगली नोकरी मिळाली . आम्ही सगळे पुण्याला निघणार तेव्हाच वहिनी गेल्याचं कळलं. दादा अस्वस्थ झाला. जगण्यासाठी कुठले कारणच नव्हते. मी दोनदा पुण्याला आणले पण तो थांबला नाही.
मन:शांतिच्या शोधात खुप भटकला.....देहू..आळंदी...अक्कलकोट...पंढरपूर....गाणगापूर...यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला आम्ही सावरण्याचा ...पण तो त्याही स्थितीत नव्हता.....एकदा यांना वर्धेला घेऊन गेला सगळी इस्टेट एका संस्थेला दान केली आणि परत फिरस्तीला लागला. लाड-कारंजाला जाताजाता त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याला कायमची मुक्ती मिळाली. आम्ही पुण्यात आलो तेव्हा सुहास-सुमी अर्चनाकडे म्हणजे प्रसन्नाकडे गेले होते. ते पण खचलेले होते. आधिच एका पायाने अधु त्यात त्यांना अर्धांगवायुचा झटका आला आणि आठ-दहा दिवसात ते गेले. प्रसन्ना -सुहास-सुमी अधून मधून भेटत पण त्यांचा विषय गार्गीच असायचा. शेवटी प्रसन्नानेच सांगितले सुमे तू भेटल्यावर गार्गी आठवते आणि मला अगतिक-निष्प्राण झाल्यासारखं वाटतं . तिच्याशिवाय मी कसा जगतो माझं मलाच माहिती. प्लीज तू गैरसमज करुन घेऊ नकोस. त्याने त्याची बदली देहरादूनला करुन घेतली. आईला घेऊन तो तिकडे गेला आणि आमचा संपर्क तुटला. तो आज कुठे ? काय करतो ? त्याने लग्न केले का ? काहीच माहित नाही. पण त्याने दुसरे लग्न केले नसावे. तो गार्गीत खूप गुंतला होता. सुहास-सुमी अर्थात..गार्गी यांच्याबद्दल तुला माहितीचं आहे .सुमीने पुण्याला मैत्रिणी जमवल्या पण गार्गी ती गार्गी, तिच्या मनाच्या एका कप्यात तिने तिला बंद करुन ठेवले आहे, सुहासने अमाप कष्ट केलेत,मेहनत केली, नोकरी करता करता एम.बी.ए केले, प्रगती केली. एकदा काय मनात आले, वर्धेचे घर विकले आणि तळेगावला एक प्लॉट घेतला.
कुमुदचे अधून मधून फोन यायचा...हल्ली तो ही बंद झाला....यांना जोडणारं निमित्यच संपल आणि ते नातंही...मी प्रसन्नाचे समजू शकते पण कुमुद का दुरावली मला माहित नाही.....सुमीला याचा त्रास होतो....पण तिने परिस्थितीतशी जुळवून घेतलं... सुहास-सुमीने हॅल्पिंग हॅंन्ड संस्था सुरु करण्याचा प्रयत्न केला....पण असं काही करणे त्यांचा पिंडच नाही म्हणून ते त्यांना जमलच नाही. मला म्हातारीला तारखा-साल आठवतं नाही....पण आज या गोष्टीला कामीत कमी बावीस-तेवीस वर्षे सहज झाली असतिल.
आता राहिली तुझ्या दोन प्रश्नांची उत्तरं ती मला माहिती नाही ग. एक म्हणजे प्रसन्नाचे पूढे काय झाले? आणि कुमुद का दुरावली...असो काही प्रश्नांची उत्तरे एकतर आपोआप मिळतात आणि काहींची सापडता सापडत नाही. तुला काय हवं ते समजं पण आता स्वैयंपाक पटपट कर आजोबांना भूक लागली असेल....नाही तर असं कर खिचडी पिठलं कर...." आजी
अनुला एका कथानकात वावरल्यासारखं वाटतं होतं.....नचिकेत ऑफिसमधून आल्यावर त्याला सांगू.
राहून राहून तिच्या डोक्यात....हेल्पिंग हॅंड संस्था काही केल्या जात नव्हती...गार्गीची ती ईच्छा पूर्ण करायचा प्रयत्न आईबाबांनी करुन बघितला......मी काही करु शकते का ? या विचारांत घरातले कामं आटोपले...
आईबाबा येणार त्यांना घ्यायला जायचं आहे.. अरे हो नचिकेतला कॅब बुक करण्याची आठवण करुन द्यायची आहे....त्यांचे वेलकम धडाक्यात करु..... अनुच्या डोक्यातला विचारांचा पिंगा संपत नव्हता......
सगळे विचार बाजूला झटकून ती पी.एच.डीच्या अभ्यासाला बसली.....तिला एखाद्या मॅगज़िन किंवा वर्तमानपत्रात तिच्या विषयाला अनुसरुन एक आरटिकल लिहायचा होता.....पुष्कळ दिवसांपासून ती काय लिहू या संभ्रमात होती....सायकालॉजीला धरुन चांगला विषय सापडत नव्हता.
हेल्पिंग हॅंड......नाव कसं वाटेलं......यावर ती लिहू लागली....आणि विचारांच्या ओघात ती लिहू लागली.......आणि बघता बघता आरटिकल पूर्ण झाला.....अनुचा विश्वास बसतं नव्हता.
नचिकेतला आल्या आल्या बाईसाहेबांनी सगळं सांगायला सुरवात केली.....
"पण तुला हे सर्व कळले कुठून.? ओके म्हणजे तू आजीला सांगितलं सगळं....मला वाटलच...तू असं काही करशील म्हणून....अ‍ॅनी वे...आजी कशी आहे. " नचिकेत
त्या ठीक आहेतं......मी कॉफी आणते आधी तू हा आरटिकल वाचं.....सुधारणा आहेत का सांग....आजच रात्री मेलं करते....
ह्म्म....वाचला?....कसा वाटला ? अनु
विचारलं नसतं तरी सांगणारच होतो...मॅडम.....मस्तच झाला आहे...एक दोन चुका दिसल्यात त्या मी ठीक केल्या...कुठल्या मॅगज़िन ला देणार ? नचिकेत
कुठला विचार करतो आहेस..? अनु
आपण या हेल्पिंग हॅंडबद्दल काही करु शकतो का ? नचिकेत
यस ! सकाळपासून मी हाच विचार करतं होते रे....यातूनच तर हे सगळं तयार झालं....अनु
इंडियन एक्सप्रेस ला दे...माझा मित्राचा भाऊ आहे तिथे...नचिकेत
आईबाबांना घ्यायला तू येणार आहेस ?
हो ! अर्थातच....हे काय विचारण झालं.
ती आणि आजी आईबाबांच्या स्वागताची काय काय तयारी करतं आहे ते सांगितले.....बोलता बोलता तिला लक्षात आलं...नचिकेत मिस्कील हासतो आहे....
" का रे काय झालं....मी नाही बोलतं..."लटक्या रागाने ती म्हणाली.
तू जेव्हा बोलायला अधीर होते.....तेव्हा तू इतके भरभर बोलेते....आणि इतकी एक्साईट असते...एखाद्या लहानमुली सारखी....आणि तू जे सांगायचं ते अर्धवट सांगते....अर्धे शब्द ओठात अर्धे पोटात रहातात"
बघ, तू आत्त्ताच म्हणाली...गाडीच...आणि लगेच म्हणाली....दुसर्‍याच दिवशी पूजा.... सगळं आटोपलं की दगडूशेठ ला जाऊन येऊ.......ओठातंन एवढंच निघालं बाकी शब्द गेले पोटात...मला कळलं....मी गाडी बुक केली, तू पुजेची सगळी तयारी केली शेजारच्या नैना काकूला जेवायला बोलवलं तुझ्या आईबाबा येणार आहेत...आणि ....आणि दगडूशेठला अभिषेकाची व्यवस्था मी बघतो......
"अशीच आहे मी !" अनु म्हणाली.
"म्हणून तर मला आवडते.".नचिकेत लाडात येत म्हणाला.
खूप दिवसांनी आईबाबांना बघून आनंद झाला...कशी झाली ट्रीप...माझ्यासाठी काय काय आणले....नचिकेत गाडीत बसतांना म्हणाला.
"अरे हो! घरी जाऊ मग दाखवते सगळं." आई . गाडीत तीन तास चौघांनी खूप गप्पा मारल्या....कुठे कुठे गेलो..काय बघितलं....खाण्याचे हालं फार नाही झाले.....कंपनी चांगली मिळाली....आणि खूप काही.
घरी आल्यावर आजी औक्षणाचं ताट घेऊन दारात उभीच होती............ठरल्या प्रमाणे पूजा..जेवणं आटोपलं.
दोन तीन दिवस जेट लॅगमधेच गेले. नंतर अनु...गार्गी(सुमी)..आजी तिघींच्या गप्पांना उधाण आलं होतं. फोटो बघितले.....सी.डी बघितली ......नचिकेतने तर आधी सुटकेस उघडून लहानमुलासारखं माझ्यासाठी काय आणलं...म्हणत कारभार केला. जवळ जवळ दहा दिवस आमच्या प्रवासाच्याच गप्पा सुरु होत्या.
अनु तुझा इंडियन एक्सप्रेसला लेख आला आहे. ".हेल्पिंग हॅंड" आंघोळ नाश्ता उरकला की वाचतो. नचिकेत म्हणाला.
टॉवेलला हात पुसत...आई स्वैयंपाकघरातून बाहेर येतं म्हंटलं....काय ? त्यांच्या एका "काय" मधे भिती...काळजी आणि आश्चर्य तिन्ही भाव होते. मी मनोमन घाबरलेच आता कसं सुचलं काय सागू .तेवढ्यात आजी पूजा करता करता म्हणाल्या. ".अग.....अनु आपल्या पी.एच.डीच काहीतरी लिहित होती....बिचारीला नावच सुचत नव्हते.....मीच सुचवलं."
"मगं...माझ्याही मदतीचा हात होता..."आजोबा पेपेर ठेवत म्हणाले..
तुमचा कसां ? आजी
"अनुने लिहिले इंग्रजीत तुला ते मराठीत कोणी समजवून सांगितले..मीच ना"....आजोबा
"बरंबरं....दोघांनी सांगितले.....खूश." आजी
थॅंक् गॉड ! आज या दोघांच्या प्रसंगावधानाने परिस्थिती सांभाळल्या गेली. अनुने मनात विचार केला.
हळूहळू रोजचं रुटीन सुरु झालं. अनुच्या डोक्यातून एचएचचा विषय काही केल्या जात नव्हता. ती लॅपटॉपवर काम करत असतांना तिला तिचाच एक जुना सर्व्हे रिपोर्ट दिसला...यस ! आपणच हडपसर येथिलं मानसिक रुग्णांच्या एका आश्रमात गेलो होतो...मनोरुग्ण लहान मुलांची मानसिक प्रगती साधण्यासाठी तिने काही उपचार पध्दतींबद्दल लिहिले होते..... पुन्हा एकदा तिने त्यासंबधीचे बरेच पुस्तकं वाचलेत...संदर्भ गोळा केलेत.... आणि त्यातून एक उपक्रम तयार केला..." हेल्पिंग हँड- वन स्टेप टुवर्डस डेव्हलपमेंट ऑफ मेन्टली रिटार्डेड चाईल्ड" अर्थात.."मदतीचा हात- चिमुकल्या मनोरुग्णांसाठी उचललेले पहिले पाऊलं." या उपक्रमाला फायनलं टचं देण्यासाठी ती आजोबा आणि बाबांशी यावर चर्चा करत होती. दोघांनी तिला थोड्याफार सुधारणा सांगितल्या.....आजी आणि आई हे सगळ ऐकतं होत्या..... सुमीने हळूच आजीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले......मी तिला फक्त नावं तेवढं सुचवलं म्हणतं मोठ्याने श्रीसुक्त म्हणू लागल्या.....आजीचा आव बघून अनुने चर्चा आटोक्यात घेतली आणि कामं आहे म्हणून लॅपटॉप घेऊन खोलीत पळाली.
कॉलेजमधे एच ओ डी डॉ. पोंकशेंना प्रेझेंटेशन आवडले. उद्या ग्रुप डिस्कशन मधे इतर स्टुडंट्ससोबत बोलू..... तिला वाटलं त्यांना आवडेल....पण तसं ते काहीच म्हणाले नाही...जाऊ दे उद्द्या इतरांची प्रतिक्रिया बघू...
आज अनुच्या मनासारखं झालं....सर्वांनी कल्पना उचलून धरली....हा प्रोजेक्ट करायचं असं ठरलं.....आणि तयारी सुरु झाली.....पुण्यात मनोरुग्णांच्या किती संस्था आहेत....त्यांची ट्रीटमेन्ट कशी सुरु आहे....यात कसले अडथळे येतात...संस्थेची...स्टाफ ची भूमिका काय....डॉक्टरांचे....तज्ञांचे काय मतं आहे ,सगळा स्टॅटेस्टिकल डेटा तयार करण्यात आला. झाला....ग्रुप्स तयार झालेत....आणि सगळे कामाला लागले. आपल्या एका विचारंच बीज रुजुन त्याचे रोप तयार होईल अनुला कधीच वाटले नव्हते.....प्रयोग यशस्वी होत होता....अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पूढे आल्या. या प्रोजेक्टमधे अनुचे एक वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही..... तिच्या या उपक्रमाचं सुमीला कौतुक वाटल......मनोमन तिला आपण जे करु शकलो नाही ते सून करते याचा आनंद हो होता .आज तिला गार्गीची आठवण आली. तुझं स्वप्न अर्धवट नाही रहाणार. माझी अनु ते पूर्ण करणार..पण तिला कुठे ठाऊक होते या संकल्पनेचा जन्म गार्गीमूळेच झाला आहे.
अनुने सगळे डिटेल्स फेसबुकवर अपडेट केले......तिच्या या उपक्रमाला नेटवर छान प्रतिसाद मिळाला. हेल्पिंग हॅंडचा वृक्ष परत बहारला. तोच वीणाने तिच्या मैत्रीणीने...पुण्यातला दोन संस्था....मनोरुग्णांसाठी एकत्र येऊन काम करायला तयार असल्याचे सांगितले.....त्या संस्थेंच्या कार्यकारी मंडळाची भेट घेऊन सगळी तयारी करायची होती.....जवळ जवळ सहा महिने....अनुचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरु होते. ..
अशा उपक्रमांना यशस्वी होण्याकरता मनुष्यबळ तर लागतचं आर्थिक मदतीची गरज असते...मोठ्या लोकांना हाताशी घेऊन.....आपणच रिसोर्सेस उपलब्ध करुन घ्यायचे असतात. हा उपक्रम यशस्वी होण्यकरता अर्थातच नचिकेतनी...आणि घरातल्या सगळ्यांनी खूप मदत केली.
थोडक्यात.....अधिक मदतीचे हात...अधिक आर्थिक मदत... आता सगळे रिसोर्सेस शंभर टक्के उपयोगात आणून आपला प्रोजेक्ट यशस्वी करायचा......गार्गीचे स्वप्न पूर्ण होणार याची तिला आशा होती.......प्रसन्ना जिथे कुठे असेल त्याने नुसते नाव जरी वाचले...तरी त्यालाही आपल्या गार्गीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान मिळेलं. पण कोणास ठाऊक तो कुठे आहे .
संस्थेच्या एकत्रीकरणाचे जवळ जवळ सगळे सोपस्कार पूर्ण झालेत......उदघाटन समारंभ ठारवायचा होता....प्रमुख पाहूणे....अध्यक्ष....सत्कार समारंभ....बरीच मोठी यादी होती....संस्थेच्या स्टाफने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली.... प्रमुख पाहूण्यांचा प्रश्न सुटला नव्हता.......कोणाला वेळ नव्हता....नेहमीच्याच सबबी.....शक्यतो राजकारणातील व्यक्ति आम्ही टाळत होतो. एक क्षण माझ्या मनात कुमुद गुंदेचा नाव आलं ....पण त्या कुठे आहेत...त्यांचा पत्ता शोधा...आणि त्या तयार झाल्या पाहिजे......सगळ असं घडण किंवा घडवण जरा कठीणच होत.
आधी नचिकेत आणि आजीशी बोलू.....मग ठरवू.......
दोघांना कल्पना आवडली....पण संस्थेच्या लोकांशी आधी बोललं पाहिजे......
"मी कुमुद गुंदेचा बद्दल माहिती शोधते" अनु
"थांब"....नचिकेत म्हणाला.....
त्याने कोणाला तरी फोन लावला.....
"काम झालं अनु......थोड्यावेळात माहिती मिळेलं." नचिकेत
अगं ! रोहनची मावशी समितीच्या पुणे केंद्रात कामं करते....जर कुमुद समितीच्याच कामानिमित्य कुठे कामं करत असेल तर कळेलं......
वाट बघावी लागणार...
अनुने पेपर...मासिकातले कात्रण जमवलेत......
रोहनचा मेल आला आहे.....नचिकेतने जोरात अनुला हाक मारली.....
समितीच्या पुणे केंद्रात त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला......
"आश्रय", संचालक
कुमुद गुंदेचा, दिग्रस.
"दिग्रस......पुसद आणि यवतमाळजवळ गाव आहे"....आजी
सगळे संदर्भ घेऊन मी प्रोफाईल तायर केला.....संस्थेत एका बैठकीत यावर चर्चा केली.....
"बघा त्या हो म्हणतात का .? आपण त्यांना जाण्या येण्याचा....रहाण्याचा खर्च करु." पाटिलसाहेब म्हणाले.
एक महत्वाचा टप्पा मी पार केला होता......आता त्यांच्या होकारावर अवलंबून होतं.
"अनु...तू फोन करु नकोस..." नचिकेत
"का ? मी संस्थेच्या सल्लागार समितीतल एक सदस्य आहे." अनु
"परत घाई ! अडनाव बोधनकर आहे ना . त्यांना साधी शंका आली तर तुझ्या मनासारखं होणार नाही एवढच." नचिकेत.
"अरे हो! मी विसरुनच गेले. असो मी संस्थेतील सेक्रेटरींना सांगते....." अनु
"बोधनकर अडनाव अजून कोणाचंही असु शकत पण रिस्क नको घ्यायला.
समजा त्यांनी हो म्हंटलं तर आपण असं भासवायच जसं आपल्याला माहितच नाही." नचिकेत
त्यांचा होकार आल्याशिवाय पूढचा विचार करायचा नाही, हे मी ठरवलं होतं. संस्थेच्या ऑफिसमधून फोन गेला....आधी यएऊ शकणार नाही वैगरे सबबी सांगितल्या. पण देसाईकाकांनी ....आपल्या मर्गदर्शनाची आवश्यकता आहे.....असले काही भारी शब्द बोलून त्यांचे मनं वळते केले.
आत्तापर्यन्त तरी माझ्या प्रयत्नांना यश आले........
आजी आजोनांना हे सारं माहिती होतं.....पण आईबाबांना आम्ही काहीच सांगितलं नाही....दोघी मैत्रिणींची भेट आम्हाला सहज आणि नकळत घडवून आणायची होती....आईंनी मला कितीवेळा समारंभाची कार्यक्रम पत्रिका मागितली...पण मी या ना त्या कारणाने टाळत गेले...
उदघाटन समारोचा दिवस उजाडला.
मी आणि नचिकेत जरा लवकरचं निघालो.......ते चौघं वेळेवर येणार होते..
संस्थेच्या संचालकांनी त्यांची माझी ओळख करुन दिली.......मी त्यांच्याशी माझ्या पीएचडीच्या संदर्भातच बोलत राहिले.....मी खूप नॉर्मल रहाण्याचा आव आणत होते....माझं काम.....वैगरे एक दोनदा त्यांनी घरच्यांची चौकशी केली पण मी हे कंपनीत आहे.....कुणाचेच नाव न घेता थोडक्यात बोलले...जणु मला त्यांच्याशी माझ्या विषयाला धरुनच चर्चा कारायची ईच्छा आहे. मनात आले आत्तापर्यन्त मी डायरीतले वाचून कुमुद अश्या एकेरी नावाने संबोधित होते....मी काय नचिकेत पण, आता मॅडम म्हणते आहे.
कार्यक्रम सुरु झाला.....प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन देण्यात आला......कुमुद गुंदेचा....समाज सेविका....समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक .....मी हळूच आईंकडे बघितले... त्यांच्या डोळ्यात पाणी तरंगतांना दिसले......कुमुदला भेटण्याची अधीरता त्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होती.....आजी जोरात म्हणाल्या अगं ही तर आपली कुमुद....! आईंनी त्यांचा हात दाबत शांत राहाण्याचा संकेत केला.
दोन तासात कार्यक्रम संपला.....ठरल्याप्रमाणे त्यांना ऑफिसमधे चहापानासाठी नेण्यात आले......तिथे नचिकेत चौघांसोबत हजर होता....संस्थेच्या इतर लोकांशी बोलता बोलता...मी त्यांना म्हटले...मॅडम हे माझे बाबा सुहास बोधनकर आणि आई गार्गी बोधनकर........त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता....आश्चर्य.....आनंद....भय तिन्ही रसांचा संगम होता. दोघीच्या डोळ्यात एकमेकींना बिलगण्याची अनिवार ईच्छा मला ...आजीला आणि नचिकेतला पण दिसली. पण त्यांनी उपस्थितांसमोर संयम दाखवला. नचिकेतनी रागाने माझ्याकडे बघितले.....मी समजायचे ते समजले.
तुम्ही दोघी एकमेकांना ओळखता. ? मी पटकन विचारले. हो ! आम्ही एकाच शाळेतल्या...दोघी एकदम बोलल्या आणि आजीला बघून कुमुद (मॅडम)नी नमस्कार केला.....
बघता बघता....निघण्याची वेळ झाली....
आजीने त्यांना घरी चलण्यासाठी म्हंटले, आग्रह करावाच लागला नाही. त्या लगेच तयार झाल्या.
बाबा....त्या चौघांना घेऊन पूढे निघाले.
कार्यक्रम संपल्या संपल्या अनुला निघताच आले नाही....
तिच्याच विचारांच हे रोपटं होतं.......कर्तव्य सोडून जायचं तिला पटतं नव्हतं.....असो जे साधायच ते साधलं.
तासाभरात उरलेली कामं आटपून दोघं निघाले.
" मला त्या दोघींना कडकडून भेटलेलं बघायचं होतं रे ." अनु
"बरचं झालं, आपण नाही तर निदान त्यांना मोकळे पणाने बोलता येईल." नचिकेत
" का ? आपल्या समोर का नाही ?" अनु
" परत घाई , अग वेडे त्या गार्गीबद्दल आपल्यासमोर थोडीच बोलणार "नचिकेत
" यस! मी विसरुन गेले.पण आजी सांगेल ना आपल्याला लाइव टेलीकास्ट "अनु
इकडे घरी गेल्या गेल्या कुमुद आणि सुमी उर्फ गार्गीची गळा भेट झाली. कितीतरी वर्षांचे संचित होते...ते उमाळे सगळे धो धो करुन बरसू लागले. आजीने दोघींना सावरले. गार्गीच्या आठवणींनी दोघींना गहिवरुन आलं. "मी यासाठी तुला भेटत नव्हते ग.....आपण दोघी गार्गी शिवाय अपूर्ण आहोत. एकमेकींना बघितलं तरी तिची आठवण येणार....आणि आठवणीत आयुष्य घालवणं किती यातना देतं ते मला नाही तर कोणाला माहित. आठवणींच ओझं वाहता वाहता थकून गेली आहे....इतरांच्या दु:खात माझं दु:ख लपून रहातं काही वेळ.आगा नाही -पिछा नाही....एकटीच वणवण फिरते म्हणून आठवणींच ते गाव ते पाश सगळं सोडलं....अधून मधून निरंजनदादाला फोन करते एवढच. तू सांग सुमे. सुहास तू किती लठ्ठ झाला..टक्कल पडलं......मी ओळखलेच नसते रे......तुझी सून फार हूशार आहे रे......पण हे हेल्पिंग हॅंडच नाव तिला कसं सुचलं ? खरतर ते नाव ऐकून मी या कार्यक्रमाला आले.....नाहीतर मी जात नाही असल्या समारंभाला...." कुमुद.
आजीकडे बघतं सुमी म्हणाली हे नाव आईंनी सुचवलं...
तुम्ही गेले फिरायला.....घरातली सगळी कामं आटपून....आमच्याकडे लक्ष रहावं म्हणून इथ अभ्यास करत बसायची...आमच्याशी गप्पा करायची तिच्या प्रोजेक्टची बद्दल यांना सांगयची...मला इंग्रजी कळत नाही म्हणून हे मला ते मराठीत सांगायचे. एका लेखाचं नाव सुचत नव्हतं....एकंदरीत मानसिक त्रास असलेल्या मुलांच्या मदती विषयी काहीतरी आहे एवढचं कळलं.....कसं कोण जाणे माझ्या तोंडून निघालं....असू दे.....आज गार्गीला खरा आनंद झाला असेलं. तुम्ही दोघी भेटल्या.....आणि तिचं स्वप्न हेल्पिंग हॅंड पूर्ण झालं..... चौघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. प्रसन्नाबद्दल मात्र कोणालाच माहिती नव्हतं.
तेवढ्यात अनु-नचिकेत आले......मैत्रिणींच्या गप्पा रंगलेल्या बघून....हळूच पूटपूटली.....हरवलेली मैत्री गवसली......लगेच आईंनी विचारलं.....टाळत काही नाही....काहीच माहिती नसल्याचा आव आणत...ती त्यांच्या गप्पांमधे रंगली. रात्रभर मैत्रिणी गप्पा मारत होत्या.
सकाळी कुमुद मावशी....त्यांनीच मला सांगितले....मावशी म्हण.....निघाली....तिच्या हातात..एक बॅग होती.....मी सामान पकडायच्या निमित्याने त्यात डोकावून बघितलं.....त्यात डायरी आणि ती साडी होती. आठवणींची देवाण-घेवाण झाली होती....खरच आज गार्गी हवी होती.......
नेहमेचं रुटीन सुरु झालं......पेपरमधे बातमी वाचून सुरवातीला समारंभासंबधी...बरेच फोन...पत्र आले. लोकं भेटून गेले.......अनुचे थिसीस संपत आले.....या डायरीतील मुख्य पात्र प्रसन्ना कुठे होता कोणास ठाऊक....अनुला वाटलं ही बातमी त्यांच्या कानावर गेली तर ते नक्की फोन करतील......तिने बरेच दिवस वाट बघितली.....अगदी इंटरनेटवर एन.डी.एच्या साईटवर चेक केले......आर्मीत चौकशी करण्याचा प्रयत्न केला....पण तो सापडला नाही...
" अनु.......कधी कधी कथेचा शेवट असाच अर्धवट सोडून द्यायचा असतो..... तो गार्गीच्या आठवणींनी झुरत असेल.....अश्वत्थामा सारखा.....जखमेवर तेलं घालण्यासाठी तो द्रौपदीला शोधत फिरत आहे केव्हाचां......आणि प्रसन्नाला आठवणींनी इतके घाव दिले असतील त्या जखमांच ओझं घेऊन तोही सुटण्यासाठी फिरत असेल....." नचिकेत
अनु...अनु...आईंनी आवाज दिला....तुमच्या संस्थेत जुनं सामान घेता का ? मला देणगी द्यायची होती.....
हो ,काय आहे ? अनु
थोडेसे कपडे....एक पंखा आहे.....तो जुना कंप्युटर टेबलं ...तुला पैसे देते...थंडीचे दिवस आहेत...चादरी..ब्लॅंकेट...काय हवं ते घे ? आणि हो ते माझं जुनं कपाट दिलं तर चालेल का ?
अनुने डोळे मिटून हो म्हंटले......आठवणींच कपाट....आठवणीतल्या उपक्रमात हेल्पिंग हॅंडमधे जाणार या कल्पनेनं तिला आनंद झाला. गार्गीला मनातल्या मनात धन्यवाद देतं ती कामाला लागली.
"आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव प्रसन्ना ठेवू ओके." नचिकेत
>>>>>>>>>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<.
( समाप्त )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसानी वाचली कारण सुरेख पण विचार करायला लावणारे वाचायला पुरेसा सलग वेळ हवा होता.

अप्रतिम कथानक. सुन्दर लेखन. ओघवती भाषा. दैनन्दिनि मधून असे लिहिणे अवघडच पण हे शिवधनुष्य तुम्ही छानच पेलले आहे.

कविता तर सुरेखच निवडलेल्या आणि लिहिलेल्या आहेत. प्रथम काही भागातील कविता मान्यवर लेखकाण्च्या व नन्तरच्या तुम्ही लिहिलेल्या असे ठरवून लिहिले असेल (कथानकाला अनुसरून) तर त्याबद्दलही अभिनन्दन.

असे काही सुरेख वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

इतकी सगळी पात्रं बघून आठवणींचा गुंता होईल की काय असं वाटलं होतं पण आठवणींचा गोफ सुरेख विणलाय. डायरीतल्या कविताही मस्तच. खूप छान लिहीलंय.

नमस्कार............
अतिशय उत्तम कादंबरी आहे ही विनीता ताई....
नागपूरकर अस्ल्याने, बर्याच जागांशी रीलेट करु शकलो.....
ह्या कादंबरी वर एक दिर्घ मालिका होउ शकते.....उत्कृष्ट कादंबरी!! खूप आवडली.

एका दमात सगळे भाग वाचले. खूप छान कादंबरी.... ७व्या भागापर्यंत फारच आवडली. शेवटचा भाग थोडा घाईत आटोपल्यासारखा वाटला. हा धागा वर आणल्याबद्दल Prasann यांचे धन्यवाद.

खुप छान.... एकदा सुरु केल्यावर संपल्याशिवाय चैन पडत नव्हता. वाचल्यावर पन कथेमध्ये गुंतुन राहिले किती वेळ तरी. ह प्रतिसाद लिहिताना सुद्धा किति तरी वेळ चुकिच लिहित होते करव डोक्यात सगळे कथेचेच विचार चालु होते...... Happy खरच खुप छान आहे....... Happy

मी एका बैठकीत वाचून काढली कथा... खरच अप्रतिम फ्लो आहे. ही कथा सत्य नसेल तर, इतका नात्यांचा प्रसंगांचा जम बसवणं... साष्टांग नमस्कार, अनिता.
आणि सत्यं असलीच तरीही, ती इतक्या सुंदर रितीने शब्दांत गुंफणं... पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार.
माझीही थोडी दमछाकच झाली वाचताना...
डायरीच्या स्वरूपात कथानक खुलवणं सोपं नाही...
खरोखर आव्डली... >>>> +++११११११
खुप छान... आम्ही पण तीन मैत्रीणी जिवाभावाच्या.. खुप रिलेट झाली. Happy

KHUP AAVADLI GOSHAT,KHUP CHAN LIHALY,GOSHAT VACHTANA NACHIKET PRAMNE MAJI HI AATURTA PHUDCH JANUN GHEYCHI VADAT HOTI.

खूप सुंदर कादंबरी..अगदी एका बैठकीत सगळी वाचली..मी यवतमाळ ची असल्यामुळे अजूनच जवळची वाटली..गार्गी ची डायरी वाचून मलाही माझी जुनी डायरी उघडून वाचाविशी वाटली...

Pages