स्वप्न

Submitted by फेसबुके on 28 July, 2012 - 03:19

स्वप्नं लैच काहीच्या बाही पडतात च्यामायला ,दिवसाढवळ्या ! तर आपण निशाचर असल्यामुळे दिवसा सुमारे २-३ तास डुलकी घेत असतो, हे ओघानेच आले. पण झोप कधी लागते कधी लागत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा झोप लागते, तेव्हा लैच तर्राट झोपतो आपण. बायको सुद्धा आपल्याला उठवण्याची हिम्मत करीत नाही; मात्र सदर जबाबदारी ती माझ्या दोन्ही बच्चूंवर सोपवत असते. तर आज असाच मस्त झोपलो होतो आणि स्वप्न पडलं. ते स्वप्न होतं हे नंतर समजलं. कारण स्वप्नात हे स्वप्न आहे, असे लैच वेळा समजत नाही.

एका मोठ्या हॉलमध्ये कसला तरी क्लास , प्रवचन किंवा तसाच काही प्रोग्राम सुरु आहे. आपण आणि आपला एक मित्र तिथे जातो. नंतर ते लेक्चर किंवा जे काय असते, ते अटेण्ड करतो. आजूबाजूला लैच खोल्या आणि बेंचेस सर्व डॉक्टरमंडळी बसलेली. काही नवीन पोट्टे बेंचवर बसून झोपा काढताहेत.

'च्यायचे xyz' अशी शिवी आपण त्यांना देतो 'आयला हे लेक्चर ऐकायचे सोडून झोपतात xxxx ".

मित्र सुद्धा या शिवीला समर्थनार्थ मान हलवतो आणि मग व्यासपिठापासून दूर असल्याने मित्राशी मनमुराद गप्पा होतात. आता इथे एक फेसबुकवरचे मित्र येतात.हे अचानक कुठून उगवतात, समजत नाही.

"फेसबुके, चालेल आपल्याला. आपण आपण हा हॉल तीस लाखाला विकत घेऊ !
"अच्छा , अच्छा. बघू गुरुजी , प्रयत्न करू आपण" म्हणजे तो हॉल विक्री होता की काय कळेना !

त्यानंतर आम्ही त्या जागेची संपूर्ण पाहणी करून घेतो. दरम्यानच्या काळात ते व्याख्यान , विद्यार्थी आणि तत्सम लोक कुठे अंतर्धान पावतात कोण जाणे ! नंतर जेवणाच्या वासाने ते तत्सम विद्यार्थी जागे होतात. आणि समोरच्या आरशात फिल्मी स्टाईलने भांग बिंग पाडून थोबाड पाहतात.कारण सदर कार्यक्रमानंतर सुरुचीभोजन अर्थातच असते.

"च्यामायला, हे फक्त हादडायला येतात साले " इति मित्र
"हं, चलता है, दुनिया है. आपण तरी कुठे ऐकले लेक्चर ?"

यांनंतर आपल्या मोबाईलची रिंग वाजते. एक मैत्रीण बोलत असते. ती आपल्याला भेटायला तिकडेच येणार असते. आता ही भेट नेहमीप्रमाणे कुठे ठरली होती, काहीच संदर्भ लागत नाही. मात्र स्वप्नात तो लैच वेळा लागत असतो.
"हो, झालेच आता. दहा मिनिटांनी फ्री होईन !"
"मी पोचते दहा मिनिटांत "
"चालेल "

"एफबी तू सुधरणार नाहीस !" इति मित्र
"हाहाहा, त्यात काय नवीन विशेष ?"

एकदाचे ते तत्सम व्याख्यान, भजन , कीर्तन किंवा जे काय असेल,ते संपते. आणि आम्ही हॉलच्या बाहेर येतो. समोरून ती येते; पण ही वेगळीच मैत्रीण असते. एरवी मस्त साडीत वगैरे असणारी ती लैच मॉडर्न ड्रेस घालून वगैरे. यावेळी भर उन्हात ती लैच मस्त दिसते.आणि आपण चक्क अनवाणी. शूज कुठे गेले, हा प्रश्न तेव्हा लैच वेळा पडत नाही.

"चल "
"हं, चल" म्हणत आपण सोबतच्या मित्राची चिंता न करता तिच्यासोबत चालू लागतो. आणि सोबत आलेला मित्र त्याच्या सायकलवर बसून संतापून निघून जातो. खरे म्हणजे हा मित्र आणि आपण स्वतः त्याच्याच कारने इथे या तथाकथित प्रोग्रामला आलेलो असतो. मग हा आता सायकलवरून कसा काय जातोय किंवा सायकल हा लैच वेळा कालातीत झालेला प्रकार तिथे कसा आला ,हा प्रश्न सतावत नाही. मात्र माझी मैत्रीण त्याच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकते, आणि आम्ही मार्गस्थ होतो.

यानंतर माझ्या छोट्या बच्चूने आपल्याला झोपेतून उठवले. आपण " ये बेटा, झोप माझ्याजवळ ! " असे म्हणून त्यालाही झोपवले आणि तो सुद्धा बिचारा आपल्याजवळ झोपी गेला आणि खुद्द आपण सुद्धा पुन्हा झोपी गेलो. आता याला काय म्हणावे ?

तर स्वप्न पुन्हा कंटीन्यू झाले पण ते अगदीच किरकोळ होते. आता ती मैत्रीण अंतर्धान पावलेली. आपण त्या पूर्वीच्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो.

"अजून साले किती उशीर करून राहिलेत. अजून प्लेट्स सुद्धा नाहीत इथे !" असा विचार करून आपण गुलाबजामच्या स्टालवर आलो आणि गुलाबजाम उचलला. आणि .. पुढे काही नाही, बायको ओरडत होती

"अहो, उठा. काय बडबडताय, साडेपाच झालेत !"
'सकाळचे की संध्याकाळचे ?" आपण अर्धवट झोपेत विचारले. तिने कपाळाला हात लावला. पण आपल्याला अर्थातच ताप वगैरे नव्हता !

आपण उठलो फ्रेश झालो ,चहा घेतला आणि क्लिनिकला आलो. आता रात्री ते स्वप्न कंटीन्यू होतंय का पाहतो !
http://facebookay.blogspot.in/2012/07/blog-post.html

गुलमोहर: