आभाळ भरुन आलं होतं. अनु आत्ताच कुठे काम आवरुन निवांत बसली होती. दुपारचा हा एकांत तिला खूप हवाहवासा वाटत असे. बंद घरात मोकळा श्वास घ्यायला तिला हाच वेळ मिळत असे. आज भरुन आलेल्या आभाळाने आज या एकांतात आणि या एकांतात ती करत असणार्या अभ्यासात व्यत्यय आणला होता. ती अनिच्छेनीच उठली भराभर तारेवरचे कपडे आत आणले. भांड्यांच टोपलं घरात घेतलं. आभाळ एव्हाना गडगडायला लागलं होतं. चांगलाच काळोख दाटला होता. या आभाळासोबत अनुचे मन भरुन आलं, सारं काही कंठाशी दाटून आल्यासारख वाटत होतं. इकडे भरुन आलेल्या काळवंडलेल्या आभाळातून टपोरे थेंब कोसळायला लागलेत, आणि तिकडे त्यांच्यासवे अनुच्या डोळ्यातून अश्रु कोसळायला लागलेत ते तिलाच कळलं नाही. आज अश्रुंना आवरण्याचा धीर तिच्यात नव्हता. दाटलेल्या हुंदक्यांना आवरत ती स्वत:ला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.
मनातलं मळभ बर्यापैकी निवळलं होतं. अनु उठून कामाला लागली.
"आजी-आजोबांची वामकुक्षी आटपेल..चहा ठेवायला हवा"..स्वत:शी पुटपुटत अनु स्वयंपाकघरात आली.
"अनु अगं दूध उतू जाईल"..आजी घाई घाईने ओट्यापाशी आल्या.
"कां ग बरं नाही वाटत कां?" आजी
"अं नाही हो असच " अनु.
तिचा उदास आवाज आजीला खटकला. बिनसलं असेल काही...म्हणत त्यांनी त्यावर बोलायच टाळले.
"चहा आटोपला....आता संध्याकाळच्या नाश्ता..काय करु ? रोजरोज काय करायचं ?" अनु परत स्वत:शीच पुटपुटली. आपल्याला असे प्रश्न पडावेत तिला तिच्या या विचारांच हसू आलं. तिला लक्षात आलं आपण आपल्याच विचारांतून पळवाटा काढायचा प्रयत्न करत आहोत. विचारंच थैमान आता जीवाला घोर लावत होतं. डायरीतील पानं तिच्या डोळ्यासमोर फडफडत होती. सारखी ती वाक्य डोक्यात पिंगा घालत होती. त्या पानांना मनोमन चाळत अनुने कसे बसे घरातले काम उरकलेत.
"आई-बाबा युरोप ट्रीपवरुन यायला अजून एक आठवडा आहे.." नचिकेत.
"नचिकेत..अरे नचिकेत..बघ जरा..बायकोकडे लक्ष दे..आज दुपारपासूनच ती उदास आहे." आजोबा
"काय अनु..काय झालं, सासु-सासर्यांची आठवण आली कां घरातली कामं करुन दमलीस?" नचिकेत गमतीने म्हणाला.
"तसं काही नाही रे..असच जुन्या आठवणी..उगाळत बसले.." अनु.
हह्म्म काही विशेष..नचिकेत डोळे मिचकावत म्ह्णाला.
लटक्या रागाने अनुने त्याच्याकडे बघितलं..आजी-आजोबांसमोर मस्करी नको..हा आशय तिच्या डोळ्यात बघून नचिकेतही जरा गंभीर झाला.
आजी-आजोबांनी अनुच्या हातच्या स्वयंपाकाच कौतूक करत रात्रीचं जेवण केलं.
बाकी कामं उरकुन अनु हात पुसत बेडरुममधे आली.
नचिकेतनी लग्नाची सी.डी.लावली होती.
"या मॅडम बसा.....जरा बघा.....ए पण काहिही म्ह्ण राणीरंगाच्या शालूत मस्त दिसत होतीस तू."
अग..जेमतेम वर्षच झालं आहे आपल्या लग्नाला..एवढ्यातच तू ..अं
नचिकेतची थट्टा सुरुच होती.
अनुच लक्षं कशातच नव्हतं.
अनु... अॅनीथींग सिरीयस? नचिकेतने काळजीनं विचारलं.
सांगू की नको या विचारात मग्न अनुने आपल्या मनाचा विचार झटकून बुध्दीला पटेल तेच करण्याचा निर्णय घेतला. आणि नचिकेतला सगळ सांगायच ठरवलं
अनु..ए..राणी..आईबाबा युरोट्रीपला गेलेत.....कळतय मला. तुझ्यावर सध्या खूप काम पडतय.
त्यात आजी आजोबांची तब्येत सांभाळायची..कठीण जातय कां तुला?
तुला पी.एचडीचा अभ्यास पण करायला वेळ मिळत नसेल ना ?
आईबाबांनाही मला पाठवायच होतं ग..बाबांच स्वप्न नाही, खरतर माझंच स्वप्न होतं त्यांना या ट्रीप
वर पाठवण्याचं.
"अजून बस एक आठवडा.."नचिकेत
" मी पण खूप त्रास देतो कां?" नचिकेत डोळे मिचकावत म्हणाला.
अनुला एवढ गंभीर बघून नचिकेत चरकलाच.
आपण जरा जास्तच मस्करी केली कां त्याला उगाच वाटून गेले.
आपण एकटंच बोलतो आहे हे नचिकेतच्या लक्षात आलं.
काय बिनसलय..अनु..सांगशील कां ?
मला वाटल तू दमली असशील परन्तू कारण काही तरी वेगळच वाटतय.
प्लीज..अनु काही बोलशील का ?
शांत..आणि गंभीर अनुला बघून नचिकेतला आता काळजी वाटायला लागली.
आपल्या आई-वडिलांना अनु तर गेल्या आठवडातच भेटून आली.
आणि ते भेटायला वरचेवर येतच असतात. मगं अनुला झालं तरी काय ?
अनु ए अनु....अनुप्रिता नचिकेत बोधनकर आता मात्र थोडं दाटत नचिकेतनी तिला भानावर आणलं.
अनुने पाणावलेल्या डोळ्यांनी एक जुनाट डायरी त्याच्या पुढे केली. नचिकेतनी ती डायरी हातात घेत विचारलं कुठे सापडली?..कोणाची आहे? ही डायरी अनुच्या काळजीच कारण आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं.
"परवा आईबाबांचा लंडनवरुन फोन होता . बाबांचे मित्र आहेत ना रघुनाथ सरदेसाई..त्यांचा मुलगा तिथेच असतो, त्याचा फोन नंबर बाबांनी त्यांच्या पासबुकवर लिहून ठेवला होता..तो मी आईबाबांच्या कपाटातून काढतांना.. ही डायरी आईंच्या कपाटात सापडली.
आईच्या कपाटाला कशाला हात लावलास..नचिकेतनी चिडून विचारलं .
आम्ही आजवर कुणीही त्याला हात लावला नाही. आणि तू ?
आई नेहमी त्याला आठवणींच कपाट म्हणते. तिच्या खूपशा आठवणी त्या छोट्या कपाटाशी निगडीत आहेत.
"तसं नाही रे मी आजीच्या बांगड्या आणि गोफ आईंच्या कपाटात ठेवायला गेले....म्हणजे आजींनीच मला तसं सांगितलं "......घाबरत अनु म्हणाली.
वरच्या खणात एक जुनाट पण खूप सुंदर साडी दिसली..आईंना मी त्या साडीत कधीच बघितले नाही...आणि त्यातून बाहेर निघालेल्या पदराच टोक .अं..म...मी ते नीटच करायला गेले..अरे मला कारभार नव्हता करयचा नचिकेत
" आणि ही डायरी त्या साडीतून खाली पडली." आवंढा गिळत अनु म्हणाली. खर तर मी ही डायरी वाचणार नव्हते...पण त्यातून एक फोटो बाहेर पडला तो ठेवण्याच्या नादात मी काही ओळी वाचल्यात....आणि मग मला पूर्ण डायरी वाचायचा मोह आवरलाच नाही. अपराधीपणाने अनु म्हणाली.
"असं काय लिहिलं असावं की ज्यामुळे अनुला एवढा त्रास होतो आहे." नचिकेत स्वत:शी पुटपुटला.
या विचारात अनुच चुकलं हे जरी त्याच्या लक्षात आले असले तरी..........डायरीत काय आहे या विचारात तो अनुशी न बोलता डायरी घेत टेरेसवर येउन बसला.
थांब नचिकेत...अनुने तो डायरी वाचायला सुरवात करणार तेवढ्यात त्याला आवाज दिला.
कुठून सुरवात करावी या संभ्रमात अनुने त्याचे हात हातात घेत त्याला सांगितल.." माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे तू कधीच आणि कुठल्याच क्षणी विसरु नको."
या वरुन डायरीत नक्की त्याच्यबद्दल काय लिहिलय एका अनामिक जाणीवेने नचिकेत शहारुन गेला.
त्याला आता मात्र डायरी वाचायची घाई झाली होती. पहिलं पान उलटतांना उगाच हात आणि मन थरथरुन गेलं
काय असेल..या भितीने त्याचा अख्खा देह मुंग्या याव्या असा झिणझिणला.
पहिल्याच पानावर ॐ गणेशाय नम: लिहिलं होत. त्याच्या खाली गार्गी देवदत्त खानोलकर बारीक अक्षरात लिहिलेल होतं. हे वाचून नचिकेत जरा गांगरलाच. आईच नाव गार्गी पण हे देवदत्त खानोलकर कोण ? एवढ्या वर्षात त्याने हे नाव कधीच ऐकले नव्हते. खानोलकर अडनाव त्याने आजीच्या तोंडून ऐकल्याचे पुसटसे आठवत होते.
१४/०८/१९७५
आज माझा अठरावा वाढदिवस. मला लिहिण्याची आवड म्हणून बाबांनी मला ही डायरी आणि कॅमलीनच सोनेरी रंगाच झाकण असलेलं फाउन्ट्न पेन भेट दिलं. मी त्याच दिवशी ठरवलं नेमानी ही डायरी लिहायची.
आज सुरुवात कुठून करु ? माझी आवडती कविता ग.ह. पाटिल यांची " देव " कवितेने सुरवात करते:
देवा तुझे किती , सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो ॥
सुंदर चांदण्या , चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर , पडे त्याचे ॥
सुंदर ही झाडे , सुंदर पाखरें
किती गोड बरें ,गाणे गाती ॥
सुंदर वेलींची , सुंदर ही फुलें
तशी आम्ही मुले, देवा तुझी ॥
इतुके सुंदर , जग तुझे जर
किती तू सुंदर , असशील ॥
आज वाढदिवसाच्या दिवशी मला सगळच सुंदर दिसत आहे. आत्यानी मला गुलबाक्षी रंगाचा पंजाबी ड्रेस घेतला . आईनी ओवळून मला अबोलीचा गजरा दिला. सगळं कसं छान वाटत आहे ना ! मावशीने दृष्ट काढत म्हटले "जरा मोठ्या मुलींसारखी वाग आता पोरकटपणा बास झाला हं...मुलांसोबत खेळणे बंद करा...ताई तू समजवून सांग कार्टीला..नुसती उनाडक्या करत फिरत असते..." आधीच रंग सावळा त्यात अशी उनाड फिरत राहिलीस तर काळीकुट्ट होशील...मग लग्न कसं जमणार "
" ए मावशी आज तरी उपदेशाचे अभंग म्हणू नकोस ना.." मी लटक्या रागानं म्हटलं.
माहिती आहे बाबांची लाडाची मैना आहेस तू. खरच मावशी ना उगाच माझी काळजी करते.
माझा वाढदिवस दरवर्षीसारखा यंदाही साधाच आणि छान साजरा झाला....आईवडिलांची एकूलतीएक असल्याने माझे सगळे लाड, सगळे हट्ट पूर्ण होतात.
१५/०८/१९७५
आज कॉलेजमधे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला. मला भरपूर बक्षीस मिळालीत खेळात, निबंध स्पर्धेत, वादविवाद स्पर्धेत.. कालचा वाढदिवसाचा आनंद त्यात आजचा बक्षीसांचा आनंद...मी खूप खूश आहे. आज का कोणास ठाउक जरा वेगळच वाटत होतं..खरच का मी मोठे झाले.. ..आज समितीत आचार्यबाई मला असच काही बोलतं होत्या.
मला आता मोकळेपणाने खेळता येणार नाही या कल्पनेने मला मोठं होण्याची एकदम धास्ती बसली......
बापरे ! जवाबादारीची जाणीव ठेवायला पाहिजे असे विचार मनात येताच मी ते पटकन झटकून स्टाफरुममधे हुद्दरसरांना बोलावायला गेले. आजही रसायनशास्त्राच्या वर्गाला ते आले नाहीत. त्यांची तब्येत ठीक नाही असे कळले.....गेली आठ दिवस सर येत नाहीत..उद्द्या मसुळकर मॅडम ला विचारु. त्यांना माहित असणार सरांना काय झाले आहे ते.
मला वाटलं होतं डायरीच अर्ध पान तरी मी लिहेन पण छे काय सुचतच नाही. असो....आज एवढच. मात्र काहिही झालं तरी कवितेच्या दोन ओळी या डायरीत नेटाने लिहायच्या. मला मराठी विषय तसा फार आवडत नाही , कविता खूप आवडतात. आज कार्यक्रमात सावरकरांनी लिहिलेले हे गाणे आठवले तरी अंगावर शहारे येतात. तर आजच्या ओळी :
जयोस्तुते श्री महन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे
या स्वातंत्र्याचे स्तोत्रचा अर्थ समितीतील आचार्यबाई किती छान समजवून सांगतात. परतपरत ऐकावसा वाटतो. आज समितीत कार्यक्रम झालेत...माझ्या भाषणाला बर्यापैकी टाळ्या पडल्यात.
१६/०८/१९७५
मसुळकर मॅडम कडून हुद्दार सरांना कावीळ झाल्याचे कळले. म्हणजे आता सर जवळ जवळ वीस पंचवीस दिवस येणार नाहीत.....त्या विषयाचा अभ्यास आता मला स्वत:ला कारावा लागणार. विचार करुनच वाईट वाटलं. सर खूप छान शिकवतात...जास्त अभ्यास करायची गरज रहात नाही.
आज माझं आणि सुमीच भांडण झालं. ते नेहमीच होतं, आज सुमीचा मला खूप राग आला. कुमुद्ला पण तिच्या वागण्याचा राग आला, म्हणजे मी बरोबर होते..हो हो मीच बरोबर होते. सुमी मला असं कां बोलली ?
आता हे तिलाच विचारायला हवं. तिच्या दादाचं लग्न ठरलं होत. तिचं थोडीच.. कधी कधी उगाच भाव खाते सुमी. तिला बघून घेईल . असो.
माझ्या वाढदिवसाला मी फोटोस्टुडिओमधे जाउन फोटो काढला होता, उद्दा बाबा बॅंकेतून येतांना घेऊन येणार.
केव्हा मला फोटो बघायला मिळणार असं मला वाटत आहे. ही उत्सुकता सुमीला कळेल असं वाटलं पण नाही ती अजुनही नाराजच आहे. आज कुमुद म्हणाली सुध्दा ए तुम्हा दोघींच काय बिनसलय...
ही सुमी ना छोट्या छोट्या गोष्टींचा बाउ करते...मैत्रीत चालतं सारं, होतं कधी विसरायला..
तिला म्हणजे सर्व इत्यंभूत गोष्टी व्यवस्थित सांगाव्या लागतात.. माझ्या घरी काय चाललाय...कोण काय
कुठे जाणार , तपशिलवार माहिती देणं इतक्यात मला नाहीच जमलं म्ह्णून रुसली बया. कठीण आहे हीच..
हिचा रुसवा काढायचा म्हणजे.....नेमकी कशावर रुसलीय ते शोधून काढायला हवं.
सारेच म्हणतात सुमी इतकी कटकटी मुलगी आहे आणि तू अशी बिनधास्त तुम्हा दोघींच पटतं कसं ?
ती दक्षिण धृवाचं टोक ... मी उत्तर धृवाचं टोक...दोघे एकमेकांना आकर्षित करतात तश्या आम्ही दोघी.
असो आजच्या ओळी सुमीच्या अबोल्यासाठी :
चांफा बोलेना, चांफा चालेना,
चांफा खंत करी काहीं केल्या फुलेना ॥धृ॥
गेले अंब्याच्या बनी
म्हटलीं मैनसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून.
१८/०८/१९७५
हे काय, काल मला डायरी लिहायला वेळ नाही मिळाला. आज कॉलेजमधे मराठीच्या नवीन लेक्चरर सौ. प्रभुणे आल्यात. रुक्ष विज्ञान विषयांच्या अभ्यासानंतर मराठीचा तास मला खूप आवडतो. या मॅडम छान शिकवतात.
सुमी..काल आणि आजही कॉलेजमधे माझ्याशी बोलली नाही. पण ती नाही बोलली याचा मी एवढा त्रागा का करते मलाच कळत नव्हतं. राहू दे नाही बोलत तर नको....मी पण नाहीच बोलणार तिच्याशी. हे काय या सुमीच्या रागापायी मला लिहायला देखिल सुचत नव्हतं.
घरी चलते का ?सुमीला विचारलं तर नाक मुरडवून चालली गेली.
खर तर तिला माझा फोटो दाखवायचा होता. आईने तो आता कपाटात ठेवला असेल.
ती घरी आल्यावर दाखवेन. आज कॉलेजमधे छान कविता शिकवली , अजून ओळी ओठावर घुटमळतात आहे.
पिवळे तांबुस उन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर. ॥१॥
झाडांनी किती मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतांत पसरला गुलाल चौफेरी ॥२॥
हिंरवे हिंरवेगार शेत हें सुंदर साळीचे
झोके घेते कसें, चहुंकडे हिरवे गालीचे. ॥३॥
२०/०८/१९७५
एक तर पावसानं धिंगाणा घातला आहे.....आज दोनदा ओली झाली. कदाचित त्यामुळेच आज सुमीचा अबोला आता माझ्या डोक्यात गेला होता. आज कॉलेजमधून थेट सुमीच घर गाठलं....खर तर तिथुनच समितीत जाणार होते पण सुमी एवढी चिडली असेल असं वाटलंच नव्हतं. तिची समजुत काढता काढता मीच वैतागले होते....डायरी लिहिण्याचा मूडच होत नाही आज....आज एवढच. आईची समजुत काढून मी सुमीसाठी माझा फोटो पण घेउन गेली होती..पण रागात तिने तो बघितलाच नाही. ही सुमी पण ना झाल्या गेल्या गोष्टींचा कीस काढते. मी असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते पण आज का नाही करु शकले? खरतर मी या प्रकरणाचा तिथेच तिच्या घरी सोक्षमोक्ष लावायला हवा होता...मी का तिच्यासारख वागली.... नको ती उद्या कॉलेजला आले की मिटवते हे प्रकरण , नाही तर माझ्यात आणि तिच्यात फरक काय उरला....मैत्रीत चालणारच असं. आज छान काय घडलं... कॉलेजमधे मॅडमनी भा.रा. तांबेंची कविता "सायंकाळची शोभा पूर्ण" केली आणि माझ्या रसग्रहणाला शाब्बासकी मिळाली.
सोनेरी, मखमली, रुपेरी पंख कितीकांचे
रंग किती वर तर्हेतर्हेचे इंद्रधनुष्याचे ॥४॥
अशीं अचल फुलपांखरे फुले साळीस जणुं फुलती
साळीवर झोपलीं जणू का पाळण्यात झुलती ॥५॥
झुळकन सुळकन इकडून तिकडे किति दुसरीं उडती
हिरे, माणके, पांचू फुटुनी पंखच गरगरती ॥६॥
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा
कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा ? ॥७॥
२२/०८/१९७५
हे काय आजकल रोज डायरी लिहायलाच जमत नाही. कॉलेज-अभ्यास-समिती यात वेळच होतं नाही. सुमीची गाडी रुळावर आली आहे खरं पण तिच्या चेहर्यावर थोडी नाराजी दिसली. आजही रसायनशास्त्राचा वर्ग झाला नाही. या विषयाच्या अभ्यासाबद्दल मला माझीच काळजी वाटत होती....मला कोण मदत करु शकेल ?
आजकाल आईला कामात मदत करावी लागते. खूप दिवसांपासून आईची तब्येत ठिक नाही...बाबांना पण आजच गावाला जायचं होतं. आत्या परवा येणार तोपर्यंत मला, आईला आणि घर सांभाळायलाच पाहिजे. कुमुद आणि सुमी आज रात्री झोपायला येणार..बाबा गावी गेले की त्या मला आणि आईला सोबत करायला यायच्या. मग आमचा धिंगाणा तो फक्त आमच्या घरीच चालायचा...आईला तो आवडायचा....माझ्या एक लक्षात आले होते ते म्हणजे माझे आई बाबा मला व्यक्त होण्यासाठी मदत करायचे आणि मत इच्छा अपेक्षा मांडण्याच स्वातंत्र्य...प्रत्येकाची अभिव्यक्ती आमच्या घरात जपली जात होती.
माझ्या इतर मैत्रीणींकडे वडिलांचा धाकच इतका जब्बर आहे की ते नाहीच म्हणतील हे गृहीत धरुनच कार्यक्रम ठरत असे....मी पण बाबांना नाही पटले तर नाही म्हणायचे पण त्यासाठी ते सशक्त कारणेही मला सांगत की एखादा कार्यक्रम किंवा स्पर्धेला मला ते का जाउ नको म्हणतात.
खरच आज मलाच मी मोठी झाल्या सारखे वाटले. उगाच मला माझे बाबा मला त्यांचा मुलगा नाही म्हणत.
आहेच मी माझ्या बाबांची लाडकी . आजच्या ओळी बालकवींचा औदुंबर कवितेतील :
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन
निळा सांवळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयांतून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
२५/०८/१९७५
आज आत्या आल्यामूळे मला जरा तरी वेळ मिळाला. नाही तर कॉलेज -अभ्यास- घर सांभाळतांना कळलं की आईला किती काम पडत असणार ते. त्यात आमच्या गौराबाईंनी कामाला दांडी मारली. कामाचा राबता संपतच नव्हता. त्यात भर म्हणजे सुमी प्रकरण काही डोक्यातून जाता जात नाही. हम्म डायरे माझे सखे आता सांगते तुला हा गुंता...सुमी माझी खासम खास मैत्रीण.....तिच्या दादाच लग्न ठरलं...तिने तिच्या वहिनीचा फोटो मला फक्त मला दाखवायला शाळेत आणला होता..पण अंतरमहाविद्द्यालय स्पर्धेच्या नादात मे तो नीट बघितला नाही.....त्यावर खूप छान प्रतिसाद पण दिला नाही...त्यात मी माझ्या वाढदिवसाच्या कौतुकात गुंग होते.....आणखी बर्याच गोष्टी जशा ...कुमुदच तिच्या घरचे लग्नाच बघत आहे.. (खरतर काकुंनी ओळखीचे स्थळ म्हणुन आईकडे चौकशी केली एवढच मला माहिती होतं)....सुहास..माझा आत्ये भाऊ येउन गेला...मुख्य म्हणजे तो तिला न भेटता गेला...आमच्या परसदारातील जांभळाच्या झाडाची जांभळ तिला दिली नाही...आईला बरं नाही......अश्या खूपश्या गोष्टी सांगायच्या राहून गेल्यामुळे स्वारी नाराज होती. तिची समजुत काढता काढता नाकी नऊ-दहा आले. शेवटी नरुमावशी तिचीच आई तिच्यावर चिडली
" अग तिच्या आईला बर नाही तरी ती तुला भेटायला आली "
तेव्हा कुठे बाईसाहेब शांत झाल्यात.
आजच्या ओळी: सुमीच्या घराच्या दारासाठी....इंदिरा संत यांची मृगजळ या कवितेतील काही ओळी
दारापाशी उभी तुझ्या मी
बंद दार तरि, अधीर पाउल
निसटूं बघते
चपलांच्या बंधातून ;
क्षण थरथरते
बोट विजेच्या बटणावरती..
गजबज उठती
लालविजेची नादपांखरे
अंगाअंगातून
मालाही मला आजवर नाही उमगले की मी सुमीचे रुसवे फुगवे आनंदाने का काढते ? मैत्री...जिवाभावाची मैत्री अजून काय?
( क्रमशः)
वा सुरवात चांगली जमली आहे.
वा सुरवात चांगली जमली आहे.
छान वाटातंय वाचून... पटापट
छान वाटातंय वाचून... पटापट टाका पुढ्चे भाग...
छान जमलीय! पुढचे भाग पटापट
छान जमलीय! पुढचे भाग पटापट येऊ देत!
आवडलं. पुढचे भाग पटापट येउ
आवडलं. पुढचे भाग पटापट येउ द्या.