लग्नाला यायचं हं!!!!!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

खाली लिहिलेला मजकूर कुठल्या कॅटॅगरीत घालावा हा प्रश्ण मला आधी पडला होता. (जुन्या मायबोलीत हे पत्रिका प्रकरण मी आधीच लिहून चुकलेय. तीथे हा ताप नव्हता!) पण नव्या मायबोलीनं खास सोय केलीय. ह्या खर्‍याखुर्‍या लग्नपत्रिकांनी आमची बरीच 'करमणुक' केली म्हणून विषय : करमणुक! Happy ह्या आमंत्रणपत्रिकांचा आम्ही घेतला तसाच आपण देखिल 'आस्वाद' घ्यावा ही विनंती!!

नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १

'हिरवाकंच शालु लेवून...
गंधधुंद करणार्‍या निशिगंधाचा हार घेऊन...
अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! !
तीचे थरथरणारे ओठ.. अबोल!
फडफडणार्‍या पापण्या...

वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर!
नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता.
"पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!"
"छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.)
बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती!
"ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" वगैरे वगैरे...! कसली अबोल डोंबलाची!
पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या.
निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!

***
लग्नाला याय्चं हं-भाग २

आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना!

"बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव).
"तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात!
असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.
'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं!
लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का?

***
लग्नाला याय्चं हं-भाग ३
ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे..

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
यायलाच हवं तुम्हाला
मंदार-अपर्णा साठी...
अपर्णा कन्या दातारांची
तीन भावंडात मोठी...
मंदारही घरात मोठा
आमची म्हातारपणची काठी...

असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्‍या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते!

***
लग्नाला याय्चं हं-भाग ४
दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. ..

"भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..
हे मानसके राजहंस
तुम भूल न जाना आनेको!"

नो कमेंट्स!

विषय: 
प्रकार: 

हे आजच पहिल्यांदा वाचतेय! Rofl मूळ लेख आणि प्रतिसाद, दोन्ही अशक्य विनोदी आहेत!
वपुंच्या कुठल्यातरी कथाकथनात त्यांनी मंगलाष्टकांमधे नावं कोंबण्यावरून विनोद केलाय. 'पटवर्र....धन् ' हे त्या (शार्दूलविक्रीडिताच्या?) चालीत म्हटलंय!

Pages