जितके जमते..

Submitted by ज्ञानेश on 11 July, 2012 - 01:24

=======================

संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही

तुझ्या कृपेची वर्षा झाली.. निरभ्र झाले
अजून शिल्लक भिंतीमधली ओल तरीही

काठावरती बसणे बहुधा रम्य असावे
आपण जावे जमते तितके खोल तरीही

भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही !

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...

-ज्ञानेश.
========================

गुलमोहर: 

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...>>>

सुंदर शेर.

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही.... काळजात आरपार झाला हा शेर.

छान गझल.

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...
सुंदर...
गझलही सुरेख्...
.....आवडली.

भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही ! छानच

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !>>> मस्त

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...>>> अतिशय आवडला, मी पानांमधली असेही वाचून पाहिले... मजा आली!

मी पानांमधली असेही वाचून पाहिले... मजा आली!>>>

होय कणखरजी आपला हा प्रतिसाद वाचून मीही तसे वाचून पाहिले.............. मजा आली

<<<पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...>>> अतिशय आवडला, मी पानांमधली असेही वाचून पाहिले... मजा आली!>>>>.......अनुमोदन

संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही.....खल्ल्लास मतला.

पानांमधली = पानांमध्ये आधीच असलेली

पानांमध्ये जपणे = (एक प्रकारे स्वतःच तशी जाळी पानांमध्ये निर्माण करून) जपणे

(असल्या संदर्भांना मात्र मोल असते असे मला वाटते. पानांमधली आणि पानांमध्ये यात सूक्ष्म का होईना पण फरक आहे आणि माझ्यामते तो महत्वाचा आहे)

(जस्ट चर्चा म्हणून, बाकी पानांमधली यालाही एक छान अर्थ आहेच)

धन्यवाद!

अह्ह्हा! सुंदरच..!
मतला अव्वल झाला आहे...

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !>> हा खलास शेर, फार फार आवडला..!

ज्ञानेशजी!
आपली गझल वाचली. आवडली
. पण..............
मतला.....छान...........पण..........सानी मिस-यात रदीफ उगाचच द्विरुक्ती करणारा आहे असे वाटून गेले. ब-याचदा गुणगुणून पाहिले.
पण रदीफाचाच तो शब्द असल्याने, हा दोष काढणे केवळ अशक्य आहे, कारण रदीफच बदलावा लागेल. असो.

आपल्या उर्वरीत शेरांमधील खयाल आवडले. पण आपल्या या गझलेचा बारकाईने अभ्यास केल्यावर मला जाणवले की, आपले सानी मिसरे सुंदर आहेत. पण उला मिसरे लिहिण्यापूर्वी करावयाचे चिंतन अजून सखोल व्हायला हवे होते, असे वाटून गेले.

मला सुचलेले उला मिसरे (शेर नंबर २ ते ६) करता खालीलप्रमाणे...........

तुझ्या कृपेच्या पाघोळ्याही बंद जाहल्या;
..................................................................................

काठावरुनी अंदाजाने कळते खोली;
...................................................................................

चुकामूक जन्माची होते दोन जिवांची;
...............................................................................

असो रथी वा महारथीही झळकत येथे;
...............................................................................

पुस्तकामधे पिंपळजाळी जपत रहावी;
.............................................................................

आपली मते वाचायला आवडतील!
.............प्रा.सतीश देवपूरकर

Pages