मनात मी कुठलेसे गाणे सहजच गुणगुणतो
माझ्या येथे अंगणात मग पाउस रुणझुणतो
लाघववेळी मोहक वेडा सुगंध दरवळता
पारिजात जो विझून गेला हसून मिणमिणतो
पुन्हा जुनीशी बेचैनी मग नवीन अंकुरते
अशीच अर्धी राहुन गेली कविता मोहरते
झुळुकीसोबत पाठवलेले शब्द तुझे मिळता
हवीहवीशी गोड वेदना स्वत:स रंगवते
डोळ्यामधल्या पाण्यासोबत अशीच तू ये ना
कितीक मोती ओवुन झाले माळुन तू घे ना
सप्तरंग प्रेमाचे माझे नभपटली सजता
हळवी फुंकर देऊन थोडे उडवुन तू ने ना
नकळत निसटुन गेलेला क्षण अवचित सापडतो
रंग गुलाबी दरवळणारा उधळुन मोहवतो
फूलपाखरू नाजुकसे ते तळहाती बसता
जणु ओठांचा अमृतप्याला गाली ओघळतो
सांग कधी तू अश्या पावसाला अनुभवले का?
केवळ माझ्या अंगणात हे गंध पसरले का?
पुन्हा पुन्हा माझ्या दु:खाने उदास मी हसता
गार हवेचा स्पर्श बदलता तुला समजले का ?
....रसप....
१० जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_10.html
सह्ही कविता आहे रणजित.....
सह्ही कविता आहे रणजित..... फारच सुरेख.....
डोळ्यामधल्या पाण्यासोबत अशीच तू ये ना
कितीक मोती ओवुन झाले माळुन तू घे ना >>>>> हे तर केवळ अगदी......
मस्तच रे रणजित ! छान आशय आणि
मस्तच रे रणजित !
छान आशय आणि मोहक शब्दांमध्ये मस्त गुंगवणारी कविता.
गुंगी चढावी/चढवावी म्हणून परत परत वाचावीशी वाटणारी कविता.
खूप आवडली...! सुरेख!
खूप आवडली...!
सुरेख!