जा दूर कितीही तू पण, असशील तरीही जवळी
ना सूर्य कधीही विझतो, किरणांस जरी तो उधळी
मी असाच तळपत होतो, पण तुलाच दिसले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
भिरभिरता नीलाकाशी मी एकलकोंडा मेघ
वा तांबुस क्षितिजावरची मी क्षणात पुसली रेघ
गहिवरलेल्या धरणीला मी कधी भिजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
पानांना झाडुन साऱ्या गुलमोहर मी मोहरलो
झेलून झळा दु:खाच्या मी मनासारखा फुललो
मी चाफा बनून माझ्या गंधास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
तू हसताना मी माझ्या डोळ्यांचा सागर प्यालो
तू चिंब चिंब भिजताना मी मनात माझ्या न्हालो
माझ्या कविताही हसल्या, दु:खास उधळले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
धगधगता लाव्हा माझ्या छातीत कोंडला आहे
एकेक निखारा माझ्या डोळ्यांत पेरला आहे
बेचिराख झालो आहे, पण तू पेटवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
आरोप कधी ना केले, ना दिला तुला मी दोष
तू मित्र मानले होते, ह्याच्यात मला संतोष
मन माझे झोके घेते, पण कधी उलटले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही
एकेक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावलो होतो
मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपलो होतो
पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही..
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही....!
....रसप....
१९ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_19.html
_/\_ सहजसुन्दर!!
_/\_
सहजसुन्दर!!
सुन्दर
सुन्दर
कमाल! प्रभावहीनतेची पोज
कमाल! प्रभावहीनतेची पोज घेणारी प्रभावी कविता.
सुंदर!!
सुंदर!!
भारती ताई, "प्रभावहीनतेची
भारती ताई,
"प्रभावहीनतेची पोज" म्हणजे काय?
स्वतःला ,स्वतःच्या
स्वतःला ,स्वतःच्या सामर्थ्याला दडवून ठेवता ठेवता ,आतल्या आत संपवता संपवता उफाळून प्रकटणारे भाव मला जाणवले..
एकेक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावलो होतो
मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपलो होतो
पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही..
मी कधी बोललो नाही, अन तुला समजले नाही..हा अटिट्यूड या कवितेचा स्थायीभाव आहे.
रणजित काय एक सो एक कविता
रणजित काय एक सो एक कविता लिहितोस तू.....
बहोत खूब, बहोत खूब......
छान कविता. "एकेक तुझ्या
छान कविता.
"एकेक तुझ्या अश्रूला टिपण्यास धावलो होतो
मी तुला घडवण्यासाठी शून्यात संपलो होतो
पण माझ्या अस्तित्वाला माझ्यात रुजवले नाही" >>>
हे अधिक आवडलं.
मस्तयं!
मस्तयं!