हौस सिनेमाची

Submitted by bnlele on 5 July, 2012 - 06:14

आमच्या लहानपणी, मुलांना सिनेमा बघण्याची संधि फार कमि मिळायची. पॉकेटमनि शून्य आणि वर मोठ्यांचा धाक.
परवानगी न देण्याच्या बाबतीत एकमत. या एकाच विषयावर त्यांच दुमत कधिच झाल नाही याच तेंव्हा आश्चर्य वाटयच -
स्वतः कुटुंबवत्सल झालो तेंव्हामात्र स्पष्ट कळल !
शहरात सहा-सात थिएटर्स होती. सदर क्षेत्रात दोन - तिथे केवळ इंग्रजीच सिनेमे दाखवीत. त्या भागात जाण्याचे योग कमि.
खरं तर, कधिकाळी बाहेरगावी जाण्यासाठी स्टेशन गाठण्याच्या मार्गात ओझरती दिसायची; बाहेरगावी जाण वर्षाकाठी उन्हाळ्याच्या सुट्टित ! तोकड्या कपड्यातील नट-नटींची किंवा पोलादी यष्टिच्या टारझनची भलीमोठ्ठी चित्र पाहून बालमनाला नक्की काय वाटायच ते सांगणं- जाऊ दे! तो एक स्वतंत्र विषय आहे.
मध्यवर्ती शहरात तीन-चार होती. त्यात हिंदी फिल्मस्‌ चे चार शो-- बारा वाजता, तीन वाजता, संध्याकाळी सहा आणि शेवटी रात्रि नऊला व्हायचे. तिकिटांचे दर आजच्या तुलनेत नगण्य-- थर्डक्लास सहाआणे, सेकंडला बाराआणे, इण्टरक्लास- रुपाय, फर्स्टला सव्वा. विशेष म्हाणजे बालकनिचा किंवा फर्स्टक्लासचा अर्धाभाग स्त्रियांसाठी राखिव असायचा- आणि तिकिताचा दरही त्यांना कमि. बालकनिचा बहुधा सव्वा असायचा.
आठवणीत आहे तो सर्वात आधि पाहिला तो ___ रामायणावर आधारित कथा होती.
मी दहा आणि आणि माझा धाकटा भाउ आठ वर्षाचे असता आई जवळ हट्ट धरला. तिनी वडिलांची अनुमति मिळवून दिली.
दोघांना सहा-सहा आणे मिळाले__ दुपारी बाराच्या तिकिटासाठी. जवळच राहणारे समवयस्क दोन भाऊ आमचे मित्र
होते. आमचे संगनमत होतेच म्हणून त्यांनाही घरून परवानगी आणि पैसे मिळाले. शर्टच्या खिशात पैसे आणि खिशावर
हाताचा पंजा घट्ट दाबून आम्ही चॉघे श्याम टॉकीज वर थर्डक्लासच्या तिकिट-खिडकीच्या रांगेत उभे. वेळेच्या भरपूर आधि गेल्यामुळे म्हणा किंवा ती फिल्म खूप दिवसांपासून लागलेली होती म्ह्णून गर्दी अजिबात नव्हती. सहज मिळाली तिकिटं _ आनंद अवर्णनीय ! डोअरकीपर जणु आमचीच वाट पहात होता. सर्व दार उघडी असल्यामुळे गृहात भरपूर उजेड होता. थिएटर संपूर्ण रिकामच होत. आत शिरता दिसला भव्य रुपेरी पडदा. भन हरपून बघितला आणि शो सुटल्यावर चटकन बाहेर येता याव म्हणून दारालगत अन्‌ पडद्याला सगळ्यात जवळच्या ओळीत पहिल्याच चार खुर्च्या अडवल्या __ जिंकलोच्या समाधानात. गणॆशोत्सव, शाला, मेळ्य़ाच्या कार्यक्रमांना अशीच सर्वात पुढे बसायचो; हो, पुढ्यात कोणी उंच-लठ्ठ नको म्हणून. सोईची सवय !
हळुहळु हॉल भरला. दारं काळा पडदा ओढून बंद झाली. दर्शकांची केकाटणी पण बंद झाली. हॉल मधले दिवे एकामागुन एक बंद होताहोताच रुपेरी पडद्यावर जाहिरातींच्या स्लाईडस्‌ सरकू लागल्या __ आलटुन पालटुन डवीकडून
उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. दर्शकांना विडी-सिगरेटची मनाईची आठवण दिली गेली. पार्श्वसंगीत म्हणून खूप ढाण-ढाण आवाजात गाणं पण होतं. अचानक डॉक्युमेंटरी सुरू झाली आणि मग खरा सिनेमा !
थोड्या वेळात विचित्रपणा जाणवला. राम फक्त एकटेच "अजानुबाहू" नव्हते; सर्वच रोड - उभे - लांबट ! भरिला त्यांच्या हालचाली बघताना मान इकडून-तिकडे वळवून दुखायला लागली. इतर दर्शक कसे सहन करतात ते बघायला मागे पाहिलं तर आमच्या मागे तीन-चार ओळी चक्क रिकाम्या ! मधेच उठून जागा बदलावी म्हटलं तर लोक ओरडणार म्हणून मध्यांतरापर्यंत कसबस सहन केलं.
घरि आल्यावर वडिलधार्‍यांनी विचारल -- छान होतानं सिनेमा ?
प्रत्यक्ष अनुभवतर लाजिरवाणाच होता. धडा शिकल्याची किंमत कळली !
असेच एकदा, कॉलेजात असताना, आम्ही चार वर्गमित्र दुपारच्या तीनच्या मॅटिनीला गेलो. पूर्वानुभवावरून
फर्स्ट्क्लासची तिकिट काढून छान सीटस्‌ वर बसलो. आमच आपसात हसणं-खिदळणं शो सुरू असतासुद्धा हलक्या आवाजात चालू होतं. आमच्या मागे स्त्रियांची बसण्याची व्यवस्था होती. सिनेमा सुरू होण्या आधि त्यांचा गोंगाट चढेल स्वरात होता. पण शो सुरू झाल्यावर त्या इतक्या गप्प होत्या कि साडि-पदराचा सळसळाटसुद्धा नव्हता. मॅटिनीला येणार्‍या बायकांमधे घरकाम करणार्‍यांचाच भरणा. त्यांचा नट्टापट्टा, हातात भक्कम चंदेरी कडे ओझरते अन्‌ एरवी पाहिलेले असल्यामुळे सिनेमाहॉल मधे बघण्यात स्वारस्य नव्हते.
एकमित्र सडपातळ -उंच तर दुसरा कमावलेल्या यष्टिचा जाड्या होता. सिनेमा रंगात असता आमच्यापैकी कुणि कमॆंट केली आणि आम्ही खदखदून हसलॊ. त्यासरशी मागून खरमरित आवाजात वॉर्निंग कानावर पडली. मागे एक राकट हात-- वजनदार कड्यांची चळत असलेला प्रोजेक्टरच्या उजेडात दिसला ! वॉर्निंगचे शब्द -- "अब जैसे मूड हिलैही तो दूंगी एक कसके"!
काय अवस्था झाली आमची ? न बोलता आम्ही चॉघे हॉलच्या बाहेर पळालो !

गुलमोहर: 
शब्दखुणा: