'घोषणांच्या पुराखाली..'

Submitted by भारती.. on 17 June, 2012 - 07:01

'घोषणांच्या पुराखाली..'
koestler.jpg

आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये सुवर्णमहोत्सवी पुरवणीत अचानक आर्थर कोस्लरचा फोटो पाहिला.त्याच्यावर लिहिलेली माझी एक कविता सर्वांशी शेअर करावीशी वाटली.आर्थर कोस्लर सारख्या प्रतिभावंतांची जातकुळीच वेगळी.त्यांचं लिखाण वाचणं म्हणजे आत्मछळ आरंभणं किंवा मर्ढेकरांच्या शब्दात 'जुनी जखम फाडून धिटाईने तिच्यात डोकावणं'.

मी त्याचं सगळंच वाचलं आहे असं नाही,पण जे वाचलं त्याने झपाटून गेले,मोडून गेले आणि मग स्वत;ची पुनर्जोडणी करायला त्याने मला भाग पाडले.प्रतिभेची ही सत्ता केवळ विस्मयकारक! त्याची 'Thieves in the night' ही एक महान कादंबरी.कोस्लर जन्माने ज्यू होता.मुळात ब्रिटनचा रहिवासी.दुसरं महायुद्ध त्याच्या तोपर्यन्तच्या सरधोपट बुद्धिवादी आयुष्यावर ज्या विक्राळपणे कोसळलं त्याचं अर्ध- आत्मचरित्रात्मक चित्रण या कादंबरीमध्ये आलंय.

इथे त्याच्या स्मृतींच्या व्यक्तिगत छळ-छावणीत अनन्वित अत्याचारांच्या बरोबरीने पहिल्या उत्कट प्रेमात ज्यू म्हणून नाकारले जाण्याची कोवळेपणात करपलेली अनुभूतीही आहे.ही कादंबरी होरपळत जगभरातून एकत्र येऊन इस्रायेलची निर्मिती करणार्‍या अस्वस्थ उद्ध्वस्त अत्यंत तल्लख बुद्धीच्या ज्यूवंशीय तरूणाईची आहे.त्यांच्या कम्यून्समधल्या प्रेमांची ,भयस्वप्नग्रस्त मनोविश्वांची,त्यागांची,संघप्रेरणांची, डावपेचांची,स्वप्ने पहाण्याच्या अनाघ्रात राहिलेल्या क्षमतांची आहे.

युद्धाच्या आणि युद्धानंतरच्या ओसाडीचा एका संवेदनाक्षम मनाने अनुभव घेण्यासारखे विदारक दुसरे काही नसेल.महाभारत हे महाकाव्याची मिती गाठतं आणि मापदंड ठरवतं ते यामुळेच.युद्धानंतर जीवनाचं पुनर्वसन करण्याइतका शून्याकारी कार्यक्रमही नसेल.तो दुसरा विषय. आत्ता माझ्या कोस्लरवरच्या कवितेबद्दल .त्याच्यासारख्या प्रतिभेची अनुभवाधिष्ठित भव्यता निर्मिणार्‍या लेखकाला माझ्यासारखी एक एतद्देशीय कवयित्री एका कवितेचं देणं नक्कीच देऊ शकते.देऊ इच्छिते.

कोस्लर ,भारत हा तसाही तुझ्या आस्थेचा विषय होताच.तुझं तळमळतं संचित घेऊन विश्वप्रवाहात जिथे कुठे असशील,ही मानवंदना ..

घोषणांच्या पुराखाली शरीराचे जळे गाव
आणि भाडोत्री लाटांत रुते दु:खाचा पडाव

तुझ्या बोटात ओठांत उरे मैफिलजागर
माझे रिते काचपात्र फुटे शब्दकोशावर..

येथे घुम्या अंतराळी वाढे ओळींचे अरण्य
अनेकार्थांचे रूपांचे वस्त्र वेढणारे शून्य

साल सोलून संपेना कंद हाताला लागेना
त्रिकाळांचे खारे पाणी माझी तृष्णा शमवेना

शस्त्रे संहाराची तंत्रे निर्माणाची तुला ज्ञात
व्यूह जनाविजनांचे तुझ्या व्युत्पन्न बुद्धीत

आर्त विरहाचे, सूक्ष्मसंवेदनांची नियती
ताण सोसताना सारे झाला असशील कष्टी

कळे तुझाही प्रवास धुक्यातून धुक्याकडे
मध्यंतरातले श्वास तुझे मोलाचे केवढे

माझ्या जिवाला घेरते जेव्हा वाळूचे वादळ
तुझ्या अस्तित्वाचे काव्य देते जगण्याचे बळ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम आहे हे... केवळ अप्रतिम... काय आवडलं ते सांगताना अख्खं कॉपी-पेस्टावं लागेल... इतकं.
खरय... कविता म्हणून ह्या कवितेला तिचं स्थान मिळूद्या, भारती.
खूप लिहा... तुम्ही लिहायला हवंच इतकं हे आतलं, सहज... भिडणारं आहे.

अप्रतिम्............यावर भाष्य करायला जणु शब्दच नाहीयेत...... Happy

दाद +१ एवढेच म्हणेन......... Happy

दाद ,मामी,योगुली, लाजो खूप खूप आभार.काहीच प्रतिसाद नाही तर कुणीच हे वाचत नाहीय का असं वाटत होतं.त्याचीही सवय आहेच . :))

तुम्हाला हात जोडून नमस्कार! मायबोलीला तुम्ही मिळालात हे मोठे भाग्य!

खरंच, काय आवडलं हे सांगायचे झाले तर सगळेच कॉपीपेस्ट करावे लागेल.

पण हे खालील वाक्य, सटपटवून गेले मला तरी.

>>>आत्मछळ आरंभणं किंवा मर्ढेकरांच्या शब्दात 'जुनी जखम फाडून धिटाईने तिच्यात डोकावणं'.<<<

तसेच, हे विधान गडबडवून गेले

>>>जे वाचलं त्याने झपाटून गेले,मोडून गेले आणि मग स्वत;ची पुनर्जोडणी करायला त्याने मला भाग पाडले.प्रतिभेची ही सत्ता केवळ विस्मयकारक! <<<

तुम्ही खरंच अप्रतिम लिहिता

धन्यवाद

जे वाचलं त्याने झपाटून गेले,मोडून गेले आणि मग स्वत;ची पुनर्जोडणी करायला त्याने मला भाग पाडले.प्रतिभेची ही सत्ता केवळ विस्मयकारक! >>> खरंय......

तुमची कविता ह्रदयस्पर्शी आहे अगदी.

वेदन,बेफिकीर,शशांकजी,मुक्तेश्वरजी,विक्रांत
अनेकवार आभार..
बेफिकीर,शशांकजी, अशा प्रतिसादांसाठीच लेखनव्यवहार असतो..
विक्रांत,अवश्य वाचा..प्रगल्भता येण्यासाठी युद्ध अन हिंसेच्या दाहक वास्तवातून जाणे आवश्यक असते की काय.. आपण हा भयंकर प्रवास शक्यतो परकायाप्रवेशानेच करावा.. आपल्या भारतीय सहनशीलतेला तेवढेच सोसेल :))