स्वप्नांच्या पलीकडले
कोल्हापूरची मीटिंग संपली आणि मी घरी जाण्यासाठी एस टी पकडली. मीटिंग म्हणावी तशी यशस्वी झाली नव्हती . मन जरा खट्टू झालं होतं. तरी बरं की एस टी तरी लगेच मिळाली. . एस टी वाटेला लागली आणि मग सकाळपासून मनाआड केलेले घरचे विचार मनात पिंगा घालू लागले .
घरातून निघतानाच सुलाभाशी , माझ्या पत्नीशी झालेला वाद मला आठवला . किती क्षुल्लक कारणावरून आम्ही भांडलो होतो ! आजची मीटिंग महत्वाची होती आणि सुलभाला नेमकं आजच गाणगापूर की कोणत्याशा गावाला जायचं होतं ! तिने जायला माझी काहीच हरकत नव्हती. पण तिला माझ्याच बरोबर जायचं होतं ! तीर्थाच्या ठिकाणी जाण्यात मला मुळीच रस नव्हता . सुलभाला ते ठाऊक होतंच! पण या वेळी मात्र ती का
कोण जाणे, कधी नव्हे ती हट्टाला पेटली होती ! मी मग तावातावाने तिचा निरोप न घेताच घरातून निघालो होतो.
वेळेवर एस टी सुटल्यावर थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर मला भांडल्याबद्दल पश्चात्ताप व्हायला लागला . मी तिला फोन करायचा प्रयत्न केला. पण रागावलेल्या सुलभाने स्वीच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे माझा नाईलाज झाला. मिटींगमध्ये पण मी मधून मधून अस्वस्थ होत होतो . आता तर घरी जातो कधी आणि तिची समजूत घालतो कधी असे मला झाले होते. तिला खुश करण्यासाठी काय भेटवस्तू न्यावी याचा मी विचार
करू लागलो .
वास्तविक पहाता आमचा प्रेम विवाह झाला होता. ते पाहता आमचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी असायला हवे होते. आमचे दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असूनही वरचेवर छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचे वाद व्हायचे आणि वातावरणात ताण यायचा . आज देखील तसेच झाले होते.
आमच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी आम्हाला अपत्य प्राप्ति झालेली नव्हती. ते देखील आमच्या काळजीचे कारण ठरत होते. तसे तीन वर्षे झाल्यानंतर मूल झाले नाही म्हणून आम्ही साऱ्या चाचण्या करून घेतल्या होत्या. दोघांमध्ये काहीही दोष नव्हता. आता देवाची कृपा कधी होते त्याची वाट बघण्यावाचून हातात काहीच नव्हते. आजची गाणगापुरची वारी कदाचित त्यासाठीच असण्याची शक्यता होती आणि म्हणूनच मला भांडून तिच्या भावना दुखावल्याचे वाईट वाटत होते.
सुलाभाचा राग शांत झाला की नाही ते पहावे आणि लवकरच घरी परतत असल्याचे कळवावे म्हणून मी मोबाइल हातात घेतला आणि नंबर डायल करणार इतक्यात चालकाने करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि सफाईदारपणे घाटाची वळणे पार करणारी आमची एस टी वेडी वाकडी हेलपाटत कशीतरी डावीकडे वळून गचका खावून थांबली . सगळेजण भराभरा खाली उतरले . मी देखील उतरलो . बघतो तर काय ! डावीकडे असलेल्या खोल दरीच्या काठावर पुढचे चाक आणि मागचे चाक एका दगडाला अडलेले अशा स्थितीत ती कशी बशी उभी होती ! एक तसूभर जरी पुढे गेली असती तर आम्हा सर्वांचा कपाळमोक्ष निश्चित होता ! सर्वांच्या काळजात अगदी धस्स झालं!
सर्वजण देवाचे आभार मानू लागले. आता त्या बसला त्या स्थितीतून बाहेर काढून मार्गी लागायला दोन तीन तास तरी सहज लागणार असा माझा अंदाज होता. मी सभोवार पहिले. हाकेच्या अंतरावर लहानसे स्थानक दिसत होते. मी तिथे गेलो. तेरगाव नावाचे ते गाव होते. तिथल्या टपरीवर बसून चहा घेता घेता मी विचार करू लागलो . घडलेली घटना आठवून आत्ताही अंगावर काटा येत होता. बसपाशी आलो तर अजूनही बस त्याच स्थितीत होती. मदत मिळायला वेळ लागणार होता. शिवाय एक टायरही पंक्चर झालेले दिसत होते. एकूण परिस्थिती बघता तीन तास तरी लागतील असे वाटत होते. एवढा वेळ कसा आणि कुठे काढावा कळेनासे झाले. मग विचार केला कि खूप दिवसात मनासारखी भटकंती करायला जमले नाही . आता वेळच घालवायचा आहे तर फिरून यावे झाले!
मी आपली पिशवी उचलली . माझ्याजवळ सामान काहीच नव्हते. पिशवी खांद्याला अडकवून मी भटकायला निघालो. निरुद्देश भटकता भटकता मी एका जंगलात येऊन पोहोचलो. चारही बाजूला पसरलेली ती हिरवाई पाहून मन कसं प्रसन्न झालं. मधूनच अस्पष्ट दिसणारी पायवाट धरून मी निघालो . कुठे जायचे ते ठरलेले नव्हतेच. पाय नेतील तिकडे चालत गेलो. बराच वेळ चालत गेल्यावर अचानक ब्रेक लागल्यासारखा थबकलो. पायवाट अचानक संपली होती आणि मी एका जुनाट वाड्यासमोर उभा होतो!
आश्चर्यचकित होऊन मी त्या भव्य वाड्याचे निरीक्षण करू लागलो. एकंदर रंगरूपावरून वाडा खूपच जुना, अगदी इंग्रजांच्याही आधीच्या काळातला असावा असे वाटत होते. त्याच्या नवलाईच्या काळात तो अतिशय आकर्षक असावा अशी खात्री वाटली .काळ्या दगडाचं ते बांधकाम इतकं भक्कम होतं कि काळाच्या ओघाचा त्याच्यावर फारसा परिणाम दिसला नाही. . मधल्या फटीतून झाडे झुडुपे उगवली असली तरी त्यामुळे बांधणी सैल झालेली दिसली नाही. पुढे जावे कि नाही याचा विचार करण्यात थोडा वेळ गेला. अखेर उत्सुकतेने मला मागे फिरू दिले नाही . मी पुढे जाऊन वाड्याच्या प्रवेश द्वारातून म्हणजे दार नसलेली चौकट ओलांडून आत गेलो.
आत गेल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. एका भव्य दिवाणखान्यात आल्याचे मला जाणवले. आतील उंचच उंच छत बघायला मान पूर्ण मागे
न्यावी लागली. कधीकाळी झगझगीत असणारे झुंबर आता असंख्य कोलीष्टकांसह लटकत होतं. भिंतींवर मोठमोठ्या तसबिरींच्या रिकाम्या चौकटी जागोजागी
दिसत होत्या. त्यातील चित्रे मूल्यवान असल्यामुळे कोणीतरी काढून घेतली असावीत बहुधा ! एका तसबिरीतले चित्र मात्र शाबूत होते. त्यांनी माझे लक्ष्य वेधून घेतले.
कुण्या ऐतिहासिक पुरुषाचे ते तैलचित्र दिसत होते. मी त्यावरची धूळ शक्य तितकी पुसली . काळाच्या ओघात अस्पष्ट झाले असले तरी एका
उमद्या , ऐटबाज पुरुषाचे ते चित्र होते हे कळत होते.
त्याच्या अक्कडबाज मिशा तर विशेष लक्षात राहण्याजोग्या होत्या.दिवाणखाना पाहून झाल्यावर मी आत गेलो. आत जाणारा दरवाजा अर्धवट बंद
अवस्थेत होता.
मी तो पूर्ण उघडण्याचा प्रयत्न करताच तो मोठ्याने करकरत उघडला . आतल्या बाजूला माजघर असावे. ते देखील दिवाणखान्याला
शोभेल असे विस्तीर्ण होते. त्याच्या भिंतीत मोठ मोठे कोनाडे दिसत होते. त्याचा वापर कशासाठी करत असतील याचा मी विचार करू लागलो.
कदाचित मशाल किंवा उजेडाचे जे कोणते साधन असेल ते ठेवण्यासाठी त्याचा वापर करत
असावेत, कारण माजघरात उजेड येण्याकरिता कुठलाच
मार्ग दिसत नव्हता. माजघरात प्रवेश करण्याच्या विरुद्ध दिशेला भिंतीमध्ये दोन दरवाजे असावेत. कारण तिथे आता फक्त चौकटी उरल्या होत्या.
त्यातल्या एका चौकटी मधून मी आत गेलो. ते बहुधा स्वयंपाकघर असावे.
त्यात चुलाणे लावण्यासाठी उपयुक्त वाटणारी ओट्या सारखी जागा
दिसली. त्याच्या विरुद्ध दिशेला दोन पायरया उतरून एक छोटीशी खोली दिसली.
बहुधा देवघर असावे. कारण आमच्या घरी आजही अशी स्वतंत्र पण
लहानशी खोली देवासाठी आहे. त्या खोलीलाही खिडकी दिसली नाही.
स्वयंपाक घरासारख्या जागेला मात्र खिडक्या होत्या. त्यातून येईल तीच हवा
देवघरातही खेळावी अशी योजना असावी असे वाटले. माजघराच्या दुसऱ्या चौकटीतून आत गेल्यावर तीन चार लहान लहान खोल्या दिसल्या.
ती कदाचित कोठीघरे किंवा गेस्टरूम असाव्यात. त्या खोल्यांच्या वरच्या बाजूला झरोके होते. मागच्या बाजूला बरीच मोठी मोकळी जागा किंवा परसू
होते. मात्र अंघोळ करण्याला योग्य अशी जागा दिसली नाही. कदाचित उघड्यावरच करत असावेत. किंवा तट्टा लावून तात्पुरता आडोसा करत असतील. एका बाजूला वर जाण्यासाठी जिना दिसला. वर जावे कि नाही याचा विचार पडला. पण तेवढेच कशाला सोडायचे असा विचार करून पायरी
चढायला सुरुवात केली. पडझड झालेल्या असल्या तरी चढता येण्याजोग्या होत्या पायऱ्या. वरती पण खालच्यासारख्याच खोल्या होत्या.
पण जास्त
हवेशीर होत्या. गम्मत म्हणजे इतक्या मोठ्या वाड्यात एकही वस्तू नव्हती! त्या पुरुषाच्या तसबिरीचाच काय तो अपवाद! काही वस्तू दिसल्या
असत्या तर! तिथे राहणाऱ्या लोकांविषयी काहीतरी जाणून घेता आलं असतं! माझा जीव हळहळला . ही वास्तू इतकी दुर्लक्षित का बरे असावी? कदाचित भूताखेताच्या वावड्या उडालेल्या असू शकतील! पण अशा वावड्या उडवणारे अवैध कामांसाठी तिचा उपयोग करतात. इथे तसेही काही दिसत
नव्हते .
आपण ह्या वास्तूचा उपयोग केला तर? विजेसारखा एक विचार माझ्या मनात चमकून गेला.
एखाद्या विशिष्ट कामासाठी म्हणून नव्हे पण एकांतात काही
करायचे असल्यास ह्या वस्तूचा उपयोग होऊ शकेल एवढेच मला वाटून गेले. तो विचार मी माझ्या मनाच्या कप्प्यात ठेवून दिला.एव्हाना बराच वेळ झाला होता.
पोटात भूक लागली होती. जवळ काहीच नव्हते. नाईलाजाने त्या वास्तूकडे पुन्हा पुन्हा वळून
बघत परत फिरलो.
गावात आल्यावर पहिले तर माझी एस टी
दुरुस्त होऊन निघून गेली होती. त्याची मला काळजी नव्हती. माझ्या भटकंतीची आवड
असलेल्या मनाला जो खजिना गवसला होता त्यापुढे त्या गेलेल्या एस टी चे दुक्ख काहीच नव्हते. तिथे असलेल्या एकुलत्या एका भिकार खानावळीत मी जेवलो. जेवताना सहज म्हणून त्या वाड्याबद्दल काही माहिती मिळाली तर पाहावं
म्हणून जेवणाऱ्या लोकांना विचारायचा प्रयत्न केला, पण गावातला एक ओसाड वाडा या पलीकडे कोणाला काहीच माहिती नव्हती.
मला मात्र तो वाडा आवडला. पुढच्या वेळी आपल्या भटकंती ग्रुप ला बरोबर घेऊन यायचे आणि
वस्ती करण्याच्या तयारीने यायचे असे मनाशी ठरवून मी त्या
गावाचा निरोप घेतला. घरी गेल्यावर नेहेमीप्रमाणे माझ्या मित्रांचा कंपू माझ्या भटकंतीची
हकीगत ऐकण्यासाठी उत्सुक होऊन वडाच्या पारावर जमला.
मला दिसलेल्या वाड्याबद्दल ऐकून अपेक्षेप्रमाणे तिथे जायला सर्वजण उत्सुक झाले. पंधरा दिवसानंतर शुक्रवारी सुट्टी येत होती. तिचा उपयोग करून तो वाडा
पहायला जायचे ठरवून टाकले आम्ही! पंधरा दिवस मोठ्या मुश्किलीने काटले. शुक्रवारी सकाळी लवकरची एस टी पकडून आम्ही तेरगावला पोहोचलो.
मधले
पंधरा दिवस पाउस पडला नसावा असे मला वाटले. मागच्या वेळी दिसलेली हिरवाई मला कुठेच दिसेना!
सगळीकडे वाळलेल्या पिवळ्या गवताचे साम्राज्य
पसरले होते. मी त्या दिवसाच्या आठवणी मनात जागवत त्या दिवशीची पायवाट शोधू लागलो. हिरव्यागार
गवतात स्पष्ट दिसलेली टी पायवाट पिवळ्या गवतात मला काही केल्या
सापडेना! कोणाला विचारावे म्हटले तर त्या दिवशीचा गावकरी लोकांचा अनुभव चांगलाच लक्षात होता. कोणी सांगणारा भेटणार नाही याची खात्री होती. मला मूर्खात काढणारेच भेटले असते.
मी वेगवेगळ्या ठिकाणी आतपर्यंत जाऊन खूप शोध घेतला. सारी मेहेनत व्यर्थ! सगळ्या मित्राना मी त्यांना थापा मारल्या असे वाटू लागले. त्यांचा
गैरसमज दूर करण्याचा मार्ग मला दिसेना! शेवटी नाईलाजाने आम्ही परत फिरलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत येउन वाडा शोधून काढावा असा माझा विचार होता, पण कोणीच त्याला दुजोरा दिला नाही. सर्वजण रात्रीच्या एस टी ने परत गेले. मी मात्र हट्टाने थांबलो. मी खोटे बोलत नव्हतो
हे त्यांना पटवून दिल्याशिवाय मला चैन कसे पडणार? तिथल्या एकुलत्या एका गेस्ट हाउस मध्ये मी अंग टाकले.
रात्रभर मला वाडा सापडल्याची
स्वप्ने पडत राहिली. सकाळ होताच मी वाडा शोधायला निघालो. मी कागद पेन्सिल बरोबर घेतली . रस्त्याचा नकाशा तयार करायला. पुढच्या वेळी
सर्वांना नेण्यासाठी उपयोगी पडला असता.
मी प्रथम एस टी स्थानकावर गेलो. अपघाताच्या दिवशी गेलो तसा पुन्हा गेलो; आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल मला शोध शोध शोधूनही न सापडलेली
पायवाट आज अगदी सहज दिसली. मी कमालीचा गोंधळलो. काल मी दुसऱ्याच कुठल्यातरी जागी गेलो होतो कि काय? कारण कालच्या जागी गवत
पूर्ण वाळलेले होते तर आज मागच्या वेळी दिसलेली हिरवाई कायम होती. मी अतिशय आनंदित झालो. झपाझप पावले टाकत पायवाटेने निघालो.
वाड्यासमोर आल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही! वाडा आतां ओसाड राहिलेला नव्हता! त्याची रंगरंगोटी झालेली होती! झाडे झुडुपे साफ झाली होती.सर्व दारे खिडक्या दुरुस्त झालेल्या दिसत होत्या.एवढेच नव्हे तर वाड्याच्या प्रचंड दारासमोर सुंदरशी रांगोळी रेखलेली दिसत होती!
कोणीतरी तिथे रहायला आले होते खास! मी वाड्याच्या जवळ गेलो. आतून लहान मुलाच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. एखाद्या मुलाने कसलातरी हट्ट करावा आणि आईने त्याला रागे भरावे अशा प्रकारचे ते आवाज होते. आवाज अशाकरता म्हणतो कारण हे सर्व संभाषण ज्या भाषेत चालू होते ती मला मुळीच कळत नव्हती . तामिळ , तेलगु किंवा अशीच कोणती तरी ती असावी असा मी अंदाज बांधला. तो वाडा कोणी घेतला,तिथे आलेले नवीन लोक कोण असावेत हे जाणून घेण्याची मला खूपच उत्सुकता होती.
तिथे नवीन आलेले लोक कोण असतील ? कुठून आलेले असतील ते सर्व जाणून घेण्याची मला अनावर उत्सुकता निर्माण झाली. भाषेचा प्रश्न समोर
दिसत होताच , तरीसुद्धा मी उत्सुकतेपोटी पुढे झालो. दार वाजवणार इतक्यात कोणीतरी माणूस काही कामासाठी कदाचित बाहेर आला. दार वाजवण्याच्या
तयारीत मला पाहून कोण तुम्ही? काय पाहिजे? अशासारखे प्रश्न विचारू लागला .अर्थातच ते
त्याच्या भाषेतच होते. मी त्याच्या हावभावावरून त्यांचा अंदाज
बांधत होतो . तेवढ्यात आतून कोणीतरी या संवादाबद्दल काहीतरी विचारले असावे बहुधा,कारण आतून बायकी आवाजात प्रश्नार्थक स्वर आला व त्याने दाराकडे
तोंड करून उत्तर दिले . आतून पुन्हा काहीतरी प्रश्न आला. त्यावर त्याने माझ्याकडे निरखून पहिले आणि अचानक जोरात ओरडला. ओरडला कसला,किंचाळलाच ! काहीतरी अगम्य शब्द उच्चारात त्याने आत धूम ठोकली. माझा आश्चर्याने जणू पुतळाच झाला. त्याला इतके कसले आश्चर्य वाटले असावे ते मला कळेना. आता पुढे काय करावे ते हि कळेनासे झाले. काही क्षण असेच शांततेत गेले. अचानक आतून गलबला ऐकू येऊ लागला .एक प्रौढा आतून बाहेर आली, माझ्याकडे नीट निरखून बघितले आणि अचानक ती देखील त्या पहिल्या माणसाप्रमाणे ओरडत आत पळाली,
मग तर काय एकामागोमाग एक अशी अनेक लहान मोठी माणसे बाहेर आली आणि मला बघून चकित होऊन आत पळाली. या सगळ्या गोंधळात मला जे विचारायचे होते ते कोणीकडेच राहिले !
काय करावे ते मला कळेना! तिथून निघून जायलाही मन होईना ! काही वेळ अशा स्थितीत निघून गेला आणि एकदम बऱ्याचशा बायकांचा घोळका
बाहेर आला. सर्वांनी माझ्याकडे हसून बघत आत येण्याची खूण केली.
मी माझ्याही नकळत पुढे झालो. प्रौढ वाटणाऱ्या त्या बाईने माझ्या पायावर पाणी घातले. नंतर तिच्या मागे उभी असलेली तरुण स्त्री पुढे झाली. तिने झिरझिरीत ओढणीने तोंड झाकून
घेतले होते. तिने मला औक्षण केले. त्यानंतर मला आत यायला वाट करून देत सगळ्याजणी मागे झाल्या. ह्या सर्व प्रकारामुळे गोंधळलेला मी आत जायला कचरू लागलो. त्यावर दोघा समवयस्क माणसांनी माझा हात हळुवारपणे धरत
आग्रहपूर्वक आत नेलं. मी भीत भीत आत गेलो . तोच दिवाणखाना
होता ! पण आता झुंबर लखलखत होती ! लोड तक्क्याची बैठक अंथरलेली होती .तिथे काही वयस्कर लोक बसलेले होते.
नकळत मी त्यांच्यापुढे वाकलो. त्यांनी जवळ घेत आशीर्वाद दिला . ते सर्व आपापसात चर्चा करू लागले. मला त्यांची भाषा कळत नव्हती पण एकंदर त्यांच्या वागण्या वरून ते मला दुसराच कोणीतरी समजत होते एवढे माझ्या लक्षात आले. "तुम्ही समजत आहात तो मी नव्हे" हे वाक्य मला येत असलेल्या सर्व भाषा वापरून मी
त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सर्व व्यर्थ ! अखेरीस मी थकलो . गप्प बसून राहिलो .मनातल्या मनात पुढे काय करावे याचा विचार करू लागलो .माणसांनी भरल्या त्या दिवाणखान्यात मी मात्र एकटा पडलो होतो.
जो तो माझ्याकडे कुतूहल भरल्या नजरेने बघत होता आणि माझ्याशी नजरानजर होताच हळूच हसून नजर वळवत होता. हे असं किती वेळ चालणार तेच मला समजेना ! मला बसल्या बसल्या पेंग येऊ लागली . ते पाहून एका वयस्कर माणसाने एका नोकराला काहीतरी सांगितले. त्या नोकराने मला आपल्या मागे येण्याची खूण केली आणि तो चालू लागला.
मी त्या वयस्कर माणसाकडे पहिले. त्याने संमती दर्शक मान हलवली. मी नोकराच्या मागे गेलो. तो मला एका खोलीत घेऊन गेला. मी आधी पाहिलेल्या तीन चार खोल्यांपैकी एक ! ती बेडरूम होती ! प्रशस्त पलंगावर पांढरा स्वच्छ पलंगपोस घातलेला होता.पायागती सुंदरशी चादर ठेवलेली होती. मी इतका थकलो होतो कि कसलाही विचार न करता पलंगावर ताणून दिली. मला केव्हा झोप लागली ते कळलेही नाही.
तासा दोन तासांनी माझी झोप उघडली . मी पहातो तर तो नोकर माझ्या उठण्याचीच वाट पहात असल्यासारखा जमिनीवरच बसून होता. तो माझ्याकडे पाहून कळे न कळेसा हसला . मला त्याने प्यायला पाणी दिले. नंतर "चला" अशा अर्थाची खूण करून तो चालू लागला. मी त्याच्या मागे गेलो.
वाड्याच्या मागच्या अंगाला न्हाणीघर होते. अगदी मला वाटले होते तसेच ! तट्टा लावून केलेले ! मला माझ्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटून गेले. माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटले बहुधा, कारण नोकराच्या चेहेऱ्यावर आश्चर्य उमटलेले मी पहिले. मी गप्पच बसलो. कारण माझ्या हास्याचे कारण त्याला
सांगायचे म्हटले तरी भाषेच्या अडसरामुळे ते शक्य नव्हते. न्हाणीघरात गेलो तर घंगाळात गरम पाणी तर दुसऱ्या हंड्यात साधे पाणी , लोटा वगैरे सारे साहित्य तयार होते. मी मुकाट्याने अंघोळ केली. तो बाहेर उभाच होता. अंघोळीनंतर मी आपले कपडे शोधू लागलो तर त्याने तत्परतेने पुढे येऊन नवा कोरा झब्बा व धोतर दिले. धोतर मला कुठे नेसता यात होते?
मी ते हातात घेऊन विचार करू लागलो कि याला माझी अडचण कशी सांगू? पण त्याने ती न सांगताच ओळखली बहुधा ! त्याने मूकपणे मला
धोतर नेसवून दिले व नेसवताना एक एक स्टेप समजावूनही दिली , म्हणजे दाखवली ! त्यानंतर तो मला माजघरात घेऊन गेला. तिथे सात आठ
पाने मंडळी होती.
केळीच्या पानावर बरेच पदार्थ वाढलेले दिसत होते. पदार्थ ओळखू येत नव्हते पण वास चांगला होता.मी जास्त विचार न करता मला दाखवलेल्या पानावर बसलो. ओळखीचे नव्हते तरी ज्येष्ठ दिसणाऱ्या लोकांना खुणेने नमस्कार केला आणि जेवायला बसलो.
नोकर लोक वाढत होते. मध्येच ती प्रौढ स्त्री आली . सर्वाना,खास करून मला आग्रह करून गेली. मी तिला खुणेनेच स्वयंपाक चांगला झाल्याचे सांगितले. तिला
झालेला अवर्णनीय आनंद तिच्या फुलून आलेल्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट वाचता आला. जेवणानंतर काय करावे असा प्रश्न पडला. नोकर माणसे कुठल्या न
कुठल्या कामात गुंतली होती . बायकाही कुठेतरी लवंडल्या असाव्यात
कारण कोणीच दिसत नव्हते. माझी झोप झालेली होती . मी हळूच सटकण्याची संधी व जागा दिसते का ते पाहावे म्हणून वाड्यात फिरू लागलो.
वाडा ओसाड होता तेव्हा मी पूर्ण फिरलो होतोच पण आता साधन सामग्रीने भरलेला वाडा बघताना गोंधळायला होत होतं. अचानक मला दिवाणखान्यातील
तस्बिरींची आठवण आली. मी दिवाणखान्यात गेलो. जिथे मी रिकाम्या चौकटी पाहिल्या होत्या तिथे अप्रतीम निसर्गचित्रे दिसत होती. काही ठिकाणी काही व्यक्तींची तैलचित्रे दिसली .
त्यातले एक तैलचित्र मी ताबडतोब ओळखले. अगदी राजबिंड्या ऐटबाज तरुणाचे ते चित्र होते. घारे तीक्ष्ण नजर असलेले ते डोळे ! अक्कडबाज
मिशा ! डोक्यावर लाल पगडी ! चेहेरा ओळखीचा वाटतही होता, पण आठवतही नव्हता ! तो कोण असावा ते मी आठवण्याचा प्रयत्न करत उभा होतो.
तेवढ्यात ती प्रौढ स्त्री कुठूनशी प्रगट झाली आणि मला ती तसबीर न्याहाळताना बघून हळूच हसली. मला काहीच बोध झाला नाही. " हा कोण " असे मी तिला खुणेने विचारू लागलो, तर ती तोंडावर पदर घेऊन खुदकन हसली आणि माझा गालगुच्चा घेऊन " एवढं पण कळत नाही? वेडा कुठला!" अशा सारख्या खुणा करत तिच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत आत निघून गेली. मी हतबुद्ध होऊन स्तब्ध उभा राहिलो. मी तिच्या खुणांचा
अर्थ लावायचा प्रयत्न करू लागलो. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! ते माझेच तैलचित्र आहे असे तर तिला म्हणायचे नसेल ? छे! छे!
तो उमदा पुरुष कुठे आणि मी कुठे ! पण तिला असे का वाटत असावे? मी नीट निरखून ते चित्र पुन्हा पहिले.
घारे डोळे, सरळ नाक आणि एकूण
चेहेरयाची ठेवण यात साम्य होते खरे ! भाऊ म्हणून सांगितले तर सहज पटेल इतके साम्य होते ,पण तो मी नव्हतो हे ही खरे होते न ! त्यांच्या
गैरसमजामागचे कारण माझ्या लक्षात आले.
मी मिशा राखल्या नव्हत्या. त्या राखल्या तर साम्य आणखीन जास्तच दिसेल हे मलाही पटले. पण त्या लोकांचा गैरसमज भाषा येत नसताना दूर
कसा करायचा तेच मला कळत नव्हते . अर्थात , इथे आल्यापासून माझी जी चंगळ सुरु होती त्यामागे ही तस्बिरच आहे हे माझ्या लक्ष्यात आले.
मनात विचारांचे मोहोळ घेऊन मी वाड्यात फिरू लागलो. ज्या खोल्या मला पूर्वी कुबट वाटत होत्या त्या आता तशा नव्हत्या . खोलीच्या छताला
लावलेली जाळी मला अचानक दिसली. त्यातून बेताचा उजेड आणि हवेचा झोत सरळ अंगावर येणार नाही अशा बेताने हवा आत येण्याची सोय होती . ती बालन्तिनीची खोली होती बहुधा ! हळू हळू मी सारी हवेली पालथी घातली . मला कोणीही अडवलं नाही. फाटकापाशी गेलो तर भला मोठा अडाणा
लावून शिवाय कुलूप लावलेलं दिसलं. संपूर्ण वाड्याला चारही बाजूनी उंच भिंतींचे संरक्षण होतेच . माझ्यासाठी मात्र ते तुरुंगाहून वेगळे नव्हते असे मला वाटले. अर्थ स्पष्ट होता ! खायला प्यायला आणि वाड्यातल्या वाड्यात फिरायला मला बंधन नव्हते पण बाहेर जायला मी स्वतंत्र नव्हतो !
मी उदास झालो. काहीतरी करायचे म्हणून वरच्या मजल्यावर गेलो. तिथल्या एका खोलीत मला सतार ठेवलेली दिसली . माझी उत्सुकता जागी झाली.
मी
सतार शिकत होतो. खूप चांगली येत होती असे नव्हे पण वाजवण्यात मला खूप आनंद मिळत असे एवढे खरे. मी सतार काढली. तारा जुळवल्या आणि डोळे मिटून हलकेच सूर छेडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मी त्यात इतका रंगून गेलो कि मला स्थळा काळाचे भान राहिले नाही.
त्या सुरांनी माझे
एकटेपण , औदासिन्य , कैदेत पडल्याचे दुक्ख सर्व काही बाहेर काढले. मी भानावर आलो तेव्हा माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. मी डोळे पुसून
खाली आलो. दिवस सरला. रात्र झाली. अचानकपणे मला टीव्ही ची आठवण झाली. ही माझी रोजची बातम्या ऐकायची वेळ ! पण वाड्यात टी व्ही तर सोडाच
पण साधी वीज देखील नव्हती . मी सुस्कारा सोडला. रात्री पुन्हा सकाळ सारखेच चविष्ट जेवण झाले. पण मला ते आता चविष्ट लागले नाही. इथून बाहेर कसे
पडायचे याच चिंतेत मी होतो. जेवणानंतर मी आवारातच शतपावली घातली. आकाशात दिसणाऱ्या कोट्यावधी चांदण्या पाहून मनाला थोडी शांतता वाटली.
मी बेडरूम मध्ये आलो आणि कुठून मला ह्या वाड्याकडे येण्याची दुर्बुद्धी सुचली म्हणून स्वतःला दोष देत तळमळत पडून राहिलो. मला माझ्या बायकोची ,
सुलभाची तीव्रतेने आठवण येत होती.सर्वजण माझी काळजी करत असतील का ? माझे सारे मित्र परत गेले आणि मी मात्र गेलो नाही म्हणून ती चिडली
असेल का? माझा झक्की स्वभाव तिला माहिती होता. मला लहर आली कि मी असा डोंगर दऱ्या नदी,सागर किनारी भटकायला पुष्कळदा जात असे. त्यामुळे
मी असा कैदेत सापडलो असेन हे त्यांच्या ध्यानी मनी ही येणार नाही. माझ्या झक्की स्वभावाला बोल
लावत ते माझी वाट बघत बसतील. अचानक मला
माझ्या आईचे शब्द आठवले. ती म्हणाली होती , " बेटा, तू घराबाहेर जातोस तेव्हा दिवसातून एकदा तरी घरी संवाद साधत जा. तू असा बाहेर जातोस आणि
चार चार दिवस तुला घरी फोन करायची शुद्ध नसते. सर्व काही नीट आहे तोवर ठीक , पण कधी अडचणीत सापडलास तर घराच्या लोकांना कल्पना कशी येणार ? तू नेहेमीसारखा आपल्याच तंद्रीत असशील असे ते धरून चालतील . जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. "
आज तिचे ते शब्द अक्षरशः खरे झाले होते. मी अडचणीत सापडलो होतो.
आणि कुणाच्या तरी मदतीशिवाय यातून सुटू शकणार नव्हतो . मला एकदम माझ्या
मोबाईल ची आठवण झाली. मला सकाळ पासून एकही फोन आला नव्हता. मला आठवले. अंघोळीसाठी मी कपडे काढले तेव्हा तो खिशात राहिला होता!
तो मला कसा सापडेल ? माझ्या अंगावर तर कपडे देखील माझे स्वतःचे नव्हते. माझी भाषा इथे कुणाला समजत नव्हती ! मी हताशपणे डोळे मिटले. विचार करता करता केव्हातरी मला झोप लागून गेली.
कसल्याशा स्पर्शाने माझी झोप चाळवली. मी डोळे उघडून पहिले. ओढणीने तोंड झाकून मला ओवाळणारी स्त्री माझ्या पायाशी येऊन बसली होती
आणि हलक्या हाताने माझे पाय चुरीत होती. आता तिने ओढणी खांद्यावर घेतली होती . ती अत्यंत सुंदर दिसत होती. क्षणभर त्या लावण्यवतीकडे मी टक लावून बघतच राहिलो आणि मग एकदम चटका बसल्या सारखा उठून बसलो. ती सुंदर होती पण सुलभा, माझी पत्नी नव्हती ! परस्त्री होती ! मी तिला विविध खाणाखुणा करून " मी तुझा नवरा नाही " हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागलो पण तिला ते काहीच समजत नव्हते. उलट मी तिच्यावर रागावलो आहे असे वाटून तीच माझी समजूत घालत होती असे मला वाटले.
अखेर मी गच्च डोके धरून बसलो ! माझ्याकडे पाहून तिने रडायला सुरुवात केली. माझा नाईलाज झाला. मी आपली उशी आणि चादर घेऊन खाली झोपू लागलो . तेव्हा तिने माझा हात धरून मला पलंगावर झोपायला लावले आणि स्वतः खाली झोपली.
मी देखील नाईलाजाने पलंगावर मुकाट्याने पडून राहिलो. झोप काही आली नाही. काही विपरीत घडेल की काय या शंकेमुळे मी जागाच राहिलो. पहाटे
पहाटे केव्हा डोळा लागला कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा एकदम दचकून चारीकडे पाहिलं. खोलीत मी एकटाच होतो. माझ्या जीवात जीव आला. मग मी निश्चिंत मनाने झोपी गेलो. भरपूर झोप झाल्यावर मी उठलो. उठून करायचं काय हा प्रश्नच होता. तेवढ्यात तो नोकर आला. त्याने मला मागील दारी नेले. परसदारी विहीर होती. तिथे तोंड धुवून आल्यावर मला दूध देण्यात आले. ती पिऊन मी उगीच इकडे तिकडे फिरू लागलो.
माझ्या मागोमाग सावलीसारखा तो नोकर होताच! अंगणात आलो तर घरातून एक गोंडस मूल रांगत रांगत बाहेर आले. मला पाहून काहीतरी आवाज
काढू लागले. मी त्याला कडेवर उचलून घेतले. मला येत असलेली सर्व बालगीते त्याला म्हणून दाखवली. त्याने देखील खुदुखुदु हसून छान प्रतिसाद दिला .
थोड्या वेळाने मला त्याचा देखील कंटाळा आला. ह्या घरात किती माणसे रहातात, त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे, माझे त्यांच्याशी काय नाते आहे,
--म्हणजे त्यांना असे वाटते-- त्याची मला काहीच कल्पना नव्हती. एका गोष्टीचे मला अत्यंत आश्चर्य वाटत होते. मला त्यांची भाषा समजत नाही याचे त्यांना काहीच आश्चर्य कसे वाटत नाही? सर्वस्वी भिन्न भाषेच्या व्यक्तीला ते आपली व्यक्ती कसे काय समजत होते? जणू काही मी त्यांचा
लहानपणी हरवलेला मुलगा होतो आणि खूप वर्षांनी सापडल्यामुळे हे सर्व
त्यांना अपेक्षितच होते ! अचानक माझ्या डोक्यात हा विचार चमकला .
खरोखर असेच काही घडले तर नसेल न? मला याच गोष्टीची जास्त शक्यता वाटू लागली.केव्हातरी काहीतरी कारणाने दुरावलेला तसबिरीतला तो तरुण मुलगा तो मीच असे त्यांना खात्रीपूर्वक वाटत असले पाहिजे. काहीही असले तरी माझ्या मनाची तगमग थांबत नव्हती . माझ्या घरातल्या
माणसांशी संवाद साधण्यासाठी मी आसुसलो. कसेही करून माझी अडचण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे . त्यासाठी मला काय करता येईल याचाच मी सतत विचार करू लागलो." माझा मोबाईल कुठे आहे?" असे त्या नोकराला सारखे विचारू लागलो, पण त्याच्या डोक्यात ते शिरता शिरेना ! माझे
डोके अति विचाराने पिसाळल्यासारखे झाले होते. समोर येईल त्याच्यावर ओरडावेसे वाटत होते.
पुन्हा रात्र झाली . कालचा अनुभव आठवून पोटात भीतीचा गोळा आला. त्या परक्या बाईच्या सहवासात रात्र काढण्याच्या कल्पनेनेच मी अर्धमेला
झालो. आज तर आणखीनच कहर झाला. ती प्रौढ स्त्री त्या तरुण स्त्रीला नखशिखांत सजवून खोलीत घेऊन आली आणि " ही तुझी बायकोच आहे,
हिचा स्वीकार कर " अशा अर्थाच्या खुणा करून निघून गेली. मी अर्थातच बधलो नाही. ती तरुण स्त्री रात्री उशिरापर्यंत माझ्या विनवण्या करत राहिली. ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण मला समजत नव्हतं.
चार दिवसांनी ते मला आपोआप समजलं! चार दिवस -नव्हे चार रात्री कोऱ्या गेल्यावर अचानक ती स्त्री रात्री मला काय सांगत असेल त्याचा अंदाज यायला लागला. घरातले वातावरण तिच्यासाठी बदलून गेले.
ती प्रौढ स्त्री तिच्याच बाबतीत चंडीका अवतार धारण करताना दिसू लागली. घरातली नोकर माणसे रिकामी राहून सारी कामे त्या तरुण स्त्रीला करावी लागत आहेत हे मला दिसून आले. दिवसभर ती बिचारी खालमानेने कामे करत राहूनही प्रौढ स्त्रीची बोलणी खात रहायची . रात्र झाली की
माझ्या खोलीत येऊन माझी मनधरणी करत रहायची. माझ्या लक्षात येऊ लागलं की माझं माझ्या पत्नीशी एकनिष्ठ रहाणं ह्या स्त्रीच्या कष्टाचं
कारण बनतं आहे. रात्री ती मला तिच्या हाताला बसलेले चटके दाखवू लागली की माझ्या मनाची तळमळ व्हायची ! मी तिला कसे समजावू की मी
माझ्याबरोबर तिच्याही शीलाचे रक्षणच करतो आहे.
एक दिवस या साऱ्यांचा कडेलोट झाला.
माझ्यासमोरच त्या तरुण स्त्रीला प्रौढ स्त्रीने हातातल्या काठीने मार मार मारले. ती तरुणी स्फुंदत राहिली पण तिने कसलाही प्रतिकार केला नाही.
शेवटी मला ते पहावेना म्हणून मी त्या स्त्रीच्या हातातून काठी काढून घेण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडे जळजळीत नजरेने पहात तिने मला दूर ढकलले व आणखी दोन चार दणके तिला दिले ! मला कळून चुकले की पतीला -[त्यांच्या दृष्टीने -] आकर्षित करता न आल्याची ही अशी
शिक्षा तिला मिळते आहे. त्या रात्री तिच्या सर्वांगावर उमटलेले वळ पाहून मी अगदी कळवळलो. आज मात्र तिने मला कसलीच विनवणी केली नाही.
जणू काही दिवसा काम आणि मार आणि पतीची अवहेलना सहन करत रात्र घालवणे हेच आपले प्राक्तन असल्याचे तिने मनोमन समजून घेतले आणि मान्यही केले होते. मी तिला पलंगावर बसण्याची खूण केली आणि वास्तव समजावून सांगण्याचा शेवटचा प्रयत्न केला. माझे बोलणे न समजल्याने ती दीनवाणी होऊन माझ्याकडे बघत राहिली. तिच्याकडे पाहून माझं जीव अत्यंत कळवळला . मी इथे आल्यामुळे ह्या स्त्रीवर अशी वेळ
आली आहे.
इतके दिवस ती इथे सुनेच्या मानाने रहात होती. पती नसल्याने कदाचित सहानुभूतीलाही पात्र असेल सर्वांच्या! माझ्या आगमनामुळे तिची काहीही चूक नसताना तिची अशी अवस्था झालेली आहे . त्या अर्थी त्याला मीच कारणीभूत आहे. असे माझे मन मला सांगू लागले
माराचे वळ उमटलेले तिचे अंग , रडून सुजलेले डोळे आणि कोमेजून गेलेला उदास चेहेरा मला पाहवेना आणि हे सर्व माझ्यामुळे हा विचार मला
सहन होईना ! माझ्या सुलाभाचा चेहेरा डोळ्यापुढे नाचू लागला . तिची अशी अवस्था केल्याबद्दल ती मला धिक्कारत आहे असे वाटू लागले. मनावर एक प्रकारची गुंगी आली. आणि मनावरचा माझा ताबा सुटून गेला. मनात सुलभाच्या नावाचा आक्रोश चालू
असतानाच शरीराने मी त्या झिरझिरीत ओढणीतील स्त्रीचा औट घटकेचा पती झालो !
मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की माझी आई, सुलभा आणि माझे सारे मित्र माझ्याभोवती कोंडाळे करून बसले होते. प्रत्येकाकडे माझी नजर जाताच त्याच्या चेहेऱ्यावर हलकेसे स्मित उमटत होते. सुलभाकडे नजर जाताच मला ती झिरझिरीत ओढणी वाली स्त्री आठवली. तो वैभवसंपन्न वाडा! माझे तिथले वास्तव्य , ती कैद आणि अखेर ते .......सारे सारे आठवले. मला तिथून कोणी आणि कसे सोडवले हे जाणून घेण्यास मी उतावीळ झालो होतो. मी पुन्हा पुन्हा सर्वाना विचारत होतो पण कोणीच सांगेना!
वाड्याचा विषय काढताच" ते सर्व विसरून जा" असे म्हणू लागले. अखेर मी अन्न सत्याग्रह करण्याची धमकी दिली तेव्हा कुठे सुलभा मला सांगायला तयार झाली.
माझे मित्र मला सोडून परत गेले खरे पण त्यांना ते बरे वाटेना ! माझ्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन आउट ऑफ रीच येऊ
लागला त्यामुळे काळजी वाटून सर्वजण तेरगावला आले. एका माहितगार व्यक्तीला घेऊन ओसाड वाड्यापाशी आले. तिथे एका धुळीने माखलेल्या कुण्या ऐतिहासिक पुरुषाच्या तसबिरीपाशी बेशुद्ध पडलेला मी त्यांना दिसलो. तातडीने मला खाजगी गाडीत घालून इथे आणले आणि डॉक्टरला दाखवले. मानसिक ताणामुळे मी बेशुद्ध आहे असे त्यांचे म्हणणे पडले.
" किती दिवसांनी मला घरी आणले?" मी सुलभाला विचारले.
" छे! छे! किती दिवसांनी कुठे? दुसऱ्याच दिवशी! परवाच नाही का तुमची मीटिंग झाली? सुलभा उद्गारली
फक्त दोन दिवस? मी बुचकळ्यात पडलो. माझ्या हिशोबाने मी किमान एक आठवडा तरी तिथे घालवला होता. मला सात दिवस मी जेवलेले विविध
पदार्थ देखील आठवत होते. आणि हे सर्वजण वाड्याला ओसाड का म्हणत आहेत ? मी तर तो चांगला गजबजलेला पहिला! तिथलं आतिथ्य आणि नंतर कैद अनुभवली. त्यात लहान बाळापासून वडील माणसांपर्यंत सर्व लोक होते. हे सर्व काय खोटंच? शिवाय मला औक्षण करणारी ती झिरझिरीत ओढणी मागची स्त्री? ती कशी काय खोटी असू शकेल ? माझ्या आणि या सर्वांच्या अनुभवात इतका जमीन आसमानाचा फरक कसा काय ? मी माझे अनुभव सांगितले तर मला वेडा समजतील का? की मानसिक ताणाचा तो परिणाम होता असे समजतील? मी विचारांच्या आवर्तात सापडलो
मी पहिल्यापासून गणित मांडायला सुरुवात केली. सर्वांसोबत वाडा शोधण्याचे इतके प्रयत्न केले पण तो सापडला नाही. तो आधीपण मी एकटाच असताना दिसला होता.नंतरही एकटा गेलो तेव्हा लगेच सापडला . पंधराच दिवसात तो इतका कसा चांगला झाला? गम्मत म्हणजे हे प्रश्न मी तिथे
असताना मला पडले नाहीत.आता पडत आहेत! मला त्या सौन्दर्यवतीची आठवण झाली. माझे शील जपण्याचा माझा आटोकाट प्रयत्न आणि अखेर
मला त्यात आलेले अपयश ! ह्या इतक्या साऱ्या गोष्टी खोट्या ? विचार करता करता मी केसातून हात फिरवत होतो . अचानक माझ्या कपाळातून जोरात कळ आली ! मी चाचपून पहिले तर टेंगूळ ! माझी खात्री झाली ,माझे अनुभव खोटे नव्हते! पहिल्या दिवशी त्या स्त्रीला ढकलण्याच्या प्रयत्नात माझे डोके पलंगाच्या कडेवर जोरात आपटून टेंगूळ आले होते. सकाळी नोकराने त्यावर काहीतरी उगाळून लावले देखील होते.
कोणाला काहीही वाटो , सुलभाला सारे खरे सांगायचेच असा निश्चय करून मी सुलभाला हाक मारली.
" सुलभा...... इकडे ये. मला तुला काही सांगायचं आहे." मी तिला बोलावले
" मला देखील तुम्हाला काही सांगायचं आहे " प्रसन्नपणे ती म्हणाली.
मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं ,.........आणि पाहताच राहिलो! नुकत्याच सुस्नात होऊन आलेल्या सुलभाच्या चेहेऱ्यावर अगदी तसेच, ..नव्हे... ,तेच भाव होते. असीम तृप्तीचे ! अपार समाधानाचे ! त्या झिरझिरीत ओढणीआडच्या चेहेऱ्यावर मला दिसलेले! मीलनानंतरचे !
"आपल्याकडे आता एक पाहुणा येणार आहे बरं का ! " डोळे मिचकावत ती म्हणाली आणि माझ्या कानापाशी येऊन हळूच पुटपुटली ,
" तुम्हाला बाबा म्हणणारा!"
खरेच स्वप्नांच्या पलीकडली
खरेच स्वप्नांच्या पलीकडली होती.. शेवट अगदी धक्कादायक वगैरे कॅटेगरीत मोडणारा नसला तरी कथा वाचताना उत्कंठा जाणवत होती..
अवांतर - आपली मागची कथा पण अशीच भूताखेतांची होती ना..
खरे म्हणजे हि माझी पहिली कथा
खरे म्हणजे हि माझी पहिली कथा आहे. खूप मोठी असल्याने आधी टाईप करायची हिम्मत झाली नाही म्हणून तुलनेने लहान गोष्ट आधी टाकली . दोन्ही कथा वेगळ्या वळणाच्या आहेत हे मात्र खरे पण लोकांना आवडली तर कष्ट सार्थकी लागतील .प्रतिसाद देण्याबद्दल धन्यवाद .
मजा आली वाचायला....
मजा आली वाचायला....
मला वाटले सीरीयलबद्द्ल काहि
मला वाटले सीरीयलबद्द्ल काहि लिहिले असेल.........
पु.ले.शु................
शेवट अगदी धक्कादायक वगैरे
शेवट अगदी धक्कादायक वगैरे कॅटेगरीत मोडणारा नसला तरी कथा वाचताना उत्कंठा जाणवत होती.. >>> +१
संपुर्ण वाचली. आवडली.
मज्जाच आहे की ..
मज्जाच आहे की .. कल्पवृक्षाच्या गोष्टीसारखी वाटली.
कथा छन आहे, आवदली. पण मला अस
कथा छन आहे, आवदली.
पण मला अस वाटतय की काही तरी स्पष्ट करायच राहिलय, काहितरी इनकंप्लिट.
पण मला अस वाटतय की काही तरी
पण मला अस वाटतय की काही तरी स्पष्ट करायच राहिलय, काहितरी इनकंप्लिट.>> +१
स्वप्नरंजन छान होते.. पण..
१.ती झिरझिरीत ओढणीतील स्त्री रात्री नायकाला चार भिंतींच्या आड आकर्षित करू शकत होती कि नाही हे बाहेरच्या (खोलीबाहेरच्या) लोकांना कसे कळत होते?
२. नायकाला त्या वाड्यापाशी / वाड्यात गेल्यावर जो काही अनुभव आला त्याची पार्श्वभूमी उलगडायला हवी होती. जसे कि 'तिथे पूर्वी असे कोणी राहत होते का? त्यांचे आत्मे वगैरे अजून तिथे वास करतात का?'
३. कथेत सांगितलेच आहे तसे त्याविषयी गावात कोणाला काहीच (त्या जागेचा इतिहास वगैरे) माहित नसणे हि एका छोट्या गावात बऱ्यापैकी अशक्य गोष्ट आहे. आणि ती जागा/ वाडा ओसाड असूनी त्याचा कोणीच वापर न करणे हि बाब पचायला अवघड आहे.
कथा चांगली झालीये पण कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहिल्यासारख वाटतंय.. कदाचित थोडी अजून सविस्तर लिहायला हवी होती.. विशेषत: शेवट गुंडाळलाय असं वाटत..
पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा !!!
माझ्या कथे बद्दलच्या शंकांची
माझ्या कथे बद्दलच्या शंकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते.
१--लेखक स्वतःचे अनुभव स्वतःच सांगत असल्याने खोलीत काय घडले हे तोच सांगत आहे त्यात नवल ते काय?
२-- तिथे घडलेया मीलनाचा परिणाम त्याला पत्नीमध्ये दिसला , अगदी अडलेली अपत्य प्राप्ती देखील, हे मला सूचित करायचे आहे.
३- झिरझिरीत ओढणीआड कदाचित मागील जन्मातील सुलभाच असू शकेल हि एक सूचक गोष्ट !
४--वाडा पाहून जे जे त्याला
४--वाडा पाहून जे जे त्याला वाटले ते त्याचे एकट्याचे विचार आहेत . त्याने कोणाशी शेयर केलेले नाहीत. विचार तर काय , कोणीही काहीही करायला स्वतंत्र असतोच कि !
शिवाय भुताखेताच्या वावड्यांचा उल्लेख केला आहेच.
५--कथा लेखकाच्या अनुभवाच्या
५--कथा लेखकाच्या अनुभवाच्या निमित्ताने अर्धवट राहिलेले घटनांचे वर्तुळ पूर्ण झाले असून ते फक्त त्या घटने साठीच थांबलेले होते व त्याचा एकट्याचा संबंध असल्याने फक्त त्याच्याच आयुष्यात "घडत" होते. इतरांसाठी ते एक स्वप्नच!
अशा कथालेखनाचा अनुभव नसल्याने
अशा कथालेखनाचा अनुभव नसल्याने मी माझी कल्पना नीट मांडण्यात कमी पडले असावे. सर्वांनी प्रश्न विचारून माझ्या ते लक्षात आणून दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
चांगली आहे कथा पू ले शू
चांगली आहे कथा पू ले शू .........................
पहिल्या रात्री सुनेने स्वतःच
पहिल्या रात्री सुनेने स्वतःच सांगितले [असे गृहीत धरावे ] दुसऱ्या रात्री नंतर सुनेचा शृंगार कायम पाहून सासू काय ते समजली ,सिनेमात नाही का हे दाखवत?
छान आहे कथा...अजुन वाचायला
छान आहे कथा...अजुन वाचायला आवडेल
मस्त
मस्त