चूक
==================================================
" आयला संत्या, किती वेळ लावतोस रे प्यायला . पटापट पी आणि चल. "
" गप् रे वाकड्या, पिऊ दे कि त्याला निवांत. आणि एवढ्या लवकर घरी जाऊन काय अंडी घालायची आहेत ? "
" अरे तसं नाही रे पण आता बारा वाजत आलेत आणि - "
" बारा तेरा मला काय माहित नाही. एवढा चकणा संपेपर्यंत थांब. फार फार तर अर्धा तास लागेल. मग साडे बारा वाजता निघूया आपण. "
वाकड्या काय बोलतो यावर ! तो बसला गप् चकणा खात.
संत्या, वाकड्या, आणि रुप्या. तीन जिगरी यार. कुठलीही गोष्ट एकटे करणार नाहीत. ' मजा हो या सजा मिल बाट के ले लेंगे ' या मताचे तिघे. त्यात संत्या म्हणजे संतोष सिंगार हा पैसेवाला होता. वाकड्या आणि रुप्या त्यामानाने मध्यमवर्गीय. वाकड्या म्हणजे त्याला कुठल्या व्यंगावरून चिडवत नव्हते तर ते त्याच्या आडनावावरून त्याला म्हणायचे. त्याच नाव होत दिनेश वाकडे. आणि रुप्या हा रुपेश खोत.
पैसेवाला असूनही संत्या अतिशय चांगल्या मनाचा होता. तो कधी कुणाला दुखवायचा नाही. नेहमी दुसऱ्यांना मदत करायचा. याच कारणाने तो कॉलेजमधेही खूप लोकप्रिय होता. त्याला त्याचे मित्र म्हणायचे ' सबका मदतगार याने संतोष सिंगार '.
हा संत्या दर रविवारी आपल्या या दोन जिगरी मित्रांना ' पार्टी ' द्यायचा. दर वेळी तो त्यांना शहरातील एका नवीन ठिकाणी घेऊन जायचा जिथे ते पूर्वी कधी आले नाहीत. यावेळी ते तिघे समुद्रकिनाऱ्याच्या एका शांत भागात जमले होते. रात्रीची शांतता, चंद्राचा शीतल प्रकाश आणि लाटांचा धीमा आवाज. सुंदर वातावरण होते. समुद्राच्या या भागात कमी मासे असल्याने कोळीही इकडे फिरकायचे नाहीत. अशा शांत ठिकाणी त्यांना कोण डिस्टर्ब करणार होतं !
त्या थंड वातावरणात त्या तिघांचे मदिरासेवन निवांत चालू होते. पण आज का कोण जाणे वाकड्या निघायची घाई करत होता. संत्या पिऊन सुस्त झाला होता. हळूहळू करत त्याने एक अख्खी किंगफिशर संपवली होती.
थोड्या वेळाने संत्या उठला. रुप्या बोलल्याप्रमाणे साडेबारा वाजत आले होते. तिघे उठले. त्यांनी किंगफिशरच्या रिकाम्या बाटल्या समुद्रात भिरकावल्या. चकण्याची रिकामी पाकिटे तिथेच टाकून ते उठले.
नेहमीप्रमाणे वाकड्या रुप्यासोबत त्याच्या रुमवर निघाला. वाकड्या लोकल होता आणि रुप्या होस्टेलाईट होता. दारूचा वास घेऊन घरी जायला नको म्हणून वाकड्या दर पार्टी नंतर तो रुप्याच्या रुमवर राहायचा आणि सकाळी घरी जायचा.
संत्या झोकांड्या देत त्यांच्या सोबत चालत होता. नंतर रुप्या आणि वाकड्या संत्याला जातो म्हणून निघाले. रूम किनाऱ्याजवळच होती. ते चालत निघाले. आणि संत्या वाकडातिकडा त्याच्या बाईककडे निघाला.
--------------------------------------------------------------------------------------
सोमवार
सकाळचे ९ वाजले होते.
ट्रिंग...ट्रिंग...
टेबलावरचा फोन खणखणत होता. आतल्या खोलीतून इन्स्पेक्टर सावळे ओरडले,
" अरे बाहेर कुणी आहे का नाही... पटकन उचला की फोन..किती वेळचा वाजतोय.."
कुणीच फोन उचलेना म्हणून सावळे स्वतः बाहेर येऊन बघतात तो काय, हवालदार मिसाळ बाकड्यावर बसून सकाळसकाळी आपल्या काठीला रेलून चक्क डुलक्या काढत होता. सावळेनी मिसाळच्या डोक्यात एक टपली मारली आणि त्याला म्हणाले,
" उठा.. आणि तो फोन बघा कुणाचा आहे ते. "
" सकाळीसकाळी झोपा काढतायेत साले.. " असे स्वताशी म्हणत ते परत आतल्या खोलीत जाऊन बसले.
मिसाळने फोन उचलला.
" हालो, सदर बझार पोलीस चौकी "
" हेलो हेलो... " पलीकडचा फारच घाबरून आणि गोंधळून बोलत होता, त्यामुळे तो काही शब्द दोनदोनदा बोलत होता.
" प..पोलीस ना ? "
" नाही. तुझा बाप बोलतोय भ** "
" क..क..काय ? "
" पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असणार नाहीतर काय तुझा बाप असणारे ? काम काय आहे ते पटकन बोल "
हवालदार या शब्दाचा मगरूरी या शब्दाशी काहीतरी निकटचा संबंध असावा. कारण बहुतेक हवालदार पोलीस चौकी स्वतःच्या बापाची असल्याच्या अविर्भावात दुसऱ्याच्या बापाचा सतत उद्धार करत असतात. अर्थात त्याला अपवादही असतात.
मिसाळचे बोलणे सावळेच्या कानावर गेले. ते आतून ओरडले.
" ए मिसाळ, नीट बोल नाहीतर गाठ माझ्याशी आहे. "
सावळे हे एक कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर होते. कामाच्या बाबतीत ते कधीच कुचराई करत नसत. ते सदैव जनताजनार्दनाच्या सेवेत तत्पर असत.
साहेबांनी दम दिल्यावर मिसाळ जमिनीवर आला.
" हा बोला, काय काम आहे आपलं ? "
" म..मी कोळी...कोळीवाड्याच्या क..किनाऱ्या..वरून बोलतोय. इथे एका मुलाचा म..मृत..देह पडला आहे.. "
" काय ? तिथेच थांब आम्ही येतोच पाच मिनिटात."
" हो..हो..साहेब...मी मेनरोडला थांबतो. "
" ठीकाय..." असे म्हणून मिसाळने फोन ठेवला आणि साहेबांना याची खबर दिली.
सावळे ताडकन उठले. मिसाळ आणि ढेरेना घेऊन जीपमधून घटनास्थळी निघाले.
ढेरे हा तिथला दुसरा हवालदार. पण हा अपवादात्मक कॅटेगरीमधला. सर्वाशी अतिशय नम्रपणे वागणारा.
जीपमधून सावळेंनी आपल्या एक्स्पर्ट टीमला फोन लावला आणि कोळीवाड्यावर बोलावले.
सावळेंची या भागात नियुक्ती होऊन पाच वर्षे झाली होती. गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक केसेस यशस्वीरित्या सॅाल्व्ह केल्या होत्या. वेगवेगळ्या भरपूर लोकांसोबत त्यांनी काम केले होते. त्यातून काही सिलेक्टिव पाच जणांची त्यांनी एक टीम बनवली होती. दोन डॉक्टर, एक फोटोग्राफर, दोन फोरेन्सिक एक्स्पर्टस् होते. कोणत्याही मर्डर केसला ते या टीमला घेऊन जायचेच.
दहा मिनिटातच ते मेनरोडला आले. फोनकर्ता त्यांची वाट बघत तिथे उभा होताच. तो अजूनही भीतीने लटपटत होता. "चला " म्हणून तो मृतदेहाच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात मागून सावळेंची टीमही आली. ते सारे मृतदेहाजवळ पोहोचले.
सावळे आपल्या टीमला फोटो काढायला आणि प्रेताची तपासणी करायला सांगून त्या जागेच निरीक्षण करू लागले.
या ठिकाणी इतर बीचच्या मानाने फारच तुरळक वर्दळ होती. बीचच्या उजवीकडे १-२ किलोमीटरवर एक डोंगरवजा कडा होता आणि डावीकडे थोड्याच अंतरावर कोळीवाडा होता. तेथे सारे कोळीबांधव राहत असत. मागे थोडीफार नारळाची झाडे आणि काही विशाल खडक होते. बहुधा इथे पूर्वी भूकंप झाला असावा आणि त्या कड्याचे काही दगड तुटून इथे पडले असावे आणि भरतीच्या वेळी इथे पाणी येऊन ते गोलाकार झाले असावेत. त्या दगडांच्या मागे काहीच पावलांवर मेनरोड होता.
सावळेंनी त्या किनाऱ्याचे नीट निरीक्षण केले आणि त्या फोनकर्त्याकडे वळले.
" आधी तू लटपट थांबव. नीट उभा राहा. मी तुला काही खाणार नाहीये. फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे"
त्याने लटपट कमी केली पण मधूनच किंचित तो थरथरायचा. त्याने मान डोलावली. कुठल्याही मर्डर केसमध्ये सर्वात पहिला विचारला जाणारा प्रश्न सावळेंनी त्याला विचारला.
" मृतदेह पहिल्यांदा कुणी पहिला ? "
त्याने एका आठ-दहा वर्षाच्या किडकिडीत पोराकडे बोट दाखवले.
एका नारळाच्या झाडाला टेकून अंग चोरून तो उभा होता.
" तो कोण ? "
" तो काळ्या, माझी इथे एक बोट आहे. तिच्यावर माझे दहा कामगार रोज मासेमारी करतात. हे मासे मी बाजारात नेऊन विकतो. मासेमारी साधारण पाहते पाचला सुरु होते. "
त्याच्या बराच धीर आला होता. आता तो माणूस न अडखळता बोलत होता.
" मी रोज नऊच्या आसपास इथे मासे न्यायला येतो. आजही नेहमीसारख आलो. तर या काळ्याचा बाप मला आल्या आल्या ' मालक हिथं आकरीत घडलया बगा ' असे म्हणत इकडे घेऊन आला. समुद्राच्या या भागात मासे नसल्याने कुणी इकडे फिरकत नसत. आज काळ्या खेळायला म्हणून इकडे आला होता. आणि त्याची जोरदार किंचाळी ऐकून त्याचा बाप धावत आला. त्याने हे प्रेत पाहिलं आणि मी येताच मला त्याने ते दाखवलं. मी लगेच तुम्हाला फोन लावला. "
" अच्छा. " म्हणून सावळेंनी त्या मुलाकडे पाहत त्याला बोलावले.
तो पोर घाबरत चालत आला. तो जवळ येताच सावळे चवड्यांवर बसले आणि त्याला म्हणाले,
" बाळा घाबरू नको. मी तुला एक चोकलेट देईन. पण मला तू आधी एक गोष्ट सांगितली पाहिजे. "
चोकलेट म्हणाल्यावर तो मुलगा जरा खुलला.
" बाळ मला सांग. तू इकडे रोज खेळतोस ? " सावळेंनी एकदम हळुवारपणे विचारले.
" नै..मी तर तिकडं खेलतो रोज. "
" मग आज कसा काय इकडे आलास ? "
" अं.....अ... " तो मुलगा विचार करू लागला.
" हांSSSSS........ आटवलं " तो जोरात म्हणाला.
" अरे हळू हळू..."
" मला ना...इकडं कायतर चमकलेल दिस्ल..म्हनून म्या इकडं आलो पन... "
त्या मुलाच्या चेहऱ्यावर थोडे भीतीचे भाव आले.
लहान पोराला जास्त काही विचारायला नको म्हणून त्यांनी खिशातून एक चोकलेट काढून त्याला दिले आणि जायला सांगितले.
सावळेंना चोकलेट खायची सवय होती. त्यामुळे ते सतत आपल्या खिशात इक्लेयर्स किंवा पॉपिन्स ठेवत असत. विशेषतः जेंव्हा काही विचार करायचा असेल तेंव्हा ते एक चोकलेट खात असत आणि शांतपणे डोळे मिटून विचार करत.
आता सावळे प्रेताकडे वळले. त्यांच्या टीमची तपासणीही झाली होती. त्यांची तपासाची पद्धत अजबच असायची. जनरली पोलीस आधी प्रेताची तपासणी करतात आणि मग बाकी चौकशी. पण सावळेंनी आधी चौकशी केली आणि मग प्रेताकडे वळले.
प्रेताकडे पाहताच त्यांनी एक इक्लेयर्स तोंडात टाकले आणि त्यांच्या डोक्यात विचारचक्रे चालू झाली.
मृतदेहावर ना गोळीची निशाणी ना कसली जखम. मग हा खून म्हणायचा का आत्महत्या. जर खून असेल तर बहुतेक गळा दाबून खून केला असावा नाहीतर याने काहीतरी विषारी किंवा झोपेच्या गोळ्या खून आत्महत्या केली असावी. पण आत्महत्या करायला कुणी समुद्र किनाऱ्यावर थोडीच येईल. ती त्याला घरबसल्यापण करता आली असती. म्हणजे सध्या तरी खुनाचे पारडे जड आहे. पोस्टमार्टेम नंतर कळेलच सगळ.
ती व्यक्ती तर नक्की मेलेली होती. मृत व्यक्ती एक तरुण पोरसवदा मुलगा होता. अंदाजे १८-१९ वर्षाचा असेल. म्हणजे त्याचं शिक्षण अजून चालू असणार. म्हणजे आता शहरातल्या सर्व कॉलेजेसमध्ये चौकशी करावी लागणार.
मुख्य गोष्ट म्हणजे हा मृत मुलगा या किनाऱ्यावर काय करत होता ?
त्या काळ्याला दिसलेली ती चमचमणारी वस्तूही शोधायला हवी.
मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी न्यायला सांगून सावळे पुन्हा किनाऱ्याची उजवी बाजू पाहू लागले. रिपोर्ट संध्याकाळच्या आत हवा अशी तंबीहि दिली. ते तसेच पुढे चालू लागले. त्यांना तिथे शेव फरसाणची पाकिटे दिसली. त्यांनी आपल्या फोरेन्सिक एक्स्पर्टला बोलावले आणि ती पाकीट घेऊन त्यावरचे फिंगर प्रिंट्स घ्या असे सांगितले.
तो पाकिटे घेऊन निघाला इतक्यात सावळेंनी परत हाक मारली.
" थांबा थांबा...तुम्हाला अजून काही न्यायचं आहे. " समोरच्या बाजूला वाळूत रुतलेल्या दारूच्या बाटल्यादेखील घ्यायला सांगितल्या.
ते गोळा करून तो सावळेंच्या पाठोपाठ चालू लागला. बरेच अंतर चालून गेल्यावर काहीच सापडना म्हणून ते माघारी फिरले आणि त्यांचे डोळे चमकले.
त्यांना ती चमचमणारी गोष्ट दिसली. ते धावत तिकडे गेले. तो एक नेकलेस होता. वीस-पंचवीस तोळ्यांचा असेल. तोही सावळेंनी घ्यायला सांगितला.
ह्या साऱ्या वस्तू घेऊन तो फोरेन्सिक एक्स्पर्ट निघाला. सावळेंनी अजून एक इक्लेयर्स तोंडात टाकली.
याचा अर्थ खून करणारी बाई आहे. कदाचित रात्री खून करताना तिचा नेकलेस पडलेला तिच्या लक्षात आला नसावा. पण जेंव्हा तिच्या हे लक्षात येईल तेंव्हा ती नक्की इकडे येणार. काम आणखी वाढलं. आता दोन हवालदार इथे पाळतीवर ठेवावे लागणार.
दहा वाजले होते.
सावळेंनी ढेरेंना साध्या वेशात दोन हवालदार ठेवायला सांगितले. त्या मासेमारी करणाऱ्याला त्यांनी सांगितले,
" तुम्ही निश्चिंतपणे मासे विका. जर गरज लागली तर मी तुम्हाला बोलावेन. तुमचा सेल नंबर देता का मि. ..... ? "
" मि. नंदन खोले. ", आपले नाव सांगून त्यांनी आपला नंबर दिला आणि ते निघून गेले.
सावळेही आपल्या जीपमधून पोलीस चौकीकडे निघाले.
--------------------------------------------------------------------------------------
सावळे आपल्या खुर्चीत बसले होते.
ढेरे हवालदारांना पाळतीवर ठेऊन आला होता.
ढेरेला त्यांनी त्या मृत मुलाचा फोटो सर्व कॉलेजेसमध्ये पाठवायला सांगितले आणि किनाऱ्याजवळ आणखी काही सापडते का ते पाहायला सांगितले.
सावळे आता पोस्टमार्टेम रिपोर्टची वाट बघत होते. त्यावरूनच त्यांना पुढचे निर्णय घेता येणार होते.
त्यांनी मिसाळला सांगितले,
" रिपोर्ट आला की तडक आत आणून दे. आणि कुणी मला भेटायला आला तर त्याला मी भेटू शकणार नाही म्हणून सांग. आणि तुही मला डिस्टर्ब करू नको. "
सावळेंनी खुर्ची भिंतीला टेकवली. त्यावर ते डोके मागे भिंतीला लाऊन आरामात बसले. त्यांनी खिशातून इक्लेयर्स काढून तोंडात टाकली आणि डोळे मिटले.
क्रमश:
परत क्रमश
परत क्रमश :..................
.
.
.
.
पुर्ण झाल्या वर वाचणार आता ...............
छान
छान
२०- २५ तोळ्याचा हार घालून खुन
२०- २५ तोळ्याचा हार घालून खुन करायला???? ं:)))
२० तोळे म्हणजे किमान ७-८ लाख
२० तोळे म्हणजे किमान ७-८ लाख रुपये..........:) बापरे.........
इत्कि चान्ग्लि कथा प्अन
इत्कि चान्ग्लि कथा प्अन अर्धिच! वाट प हा वि लागनार!
पुध्चा भाग लवकर टाका
पुध्चा भाग लवकर टाका
उत्सुकता वाढ्तेय
उत्सुकता वाढ्तेय

पु.ले.शु.
वीस-पंचवीस तोळ्यांचा नेकलेस
वीस-पंचवीस तोळ्यांचा नेकलेस घालुन खुन ....
पुढ्चा भाग जरा लवकर येउ दे राव!
मस्त !!! पुढील भाग लवकर येउ
मस्त !!! पुढील भाग लवकर येउ द्या...
भारी सुरूवात!
भारी सुरूवात!
सर्व मायबोलीकर मंडळींना
सर्व मायबोलीकर मंडळींना धन्यवाद...
khup sundar ahe
khup sundar ahe story,,,
pudhacha part wachayala nakkich mazza yeil
पुढचा भाग कोठे आहे?
पुढचा भाग कोठे आहे?