ती अक्षरश: तिरीमिरीत घराबाहेर पडली. आज कुणालाच जुमानायचे नाही, तिने अगदी मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं. साधारण साडे अकराची वेळ. रस्त्यावर नेहेमीची शाळांची धांदल नव्हती तरी एक गडबड उडाली होती. आजूबाजूला नजर टाकली तर रस्त्याच्या दोन्ही बाजूना ठराविक अंतरावर मंडपाच्या लाल पांढऱ्या कापडात गुंडाळून रोवलेले लाकडी बांबू . मंगल कार्याचे द्योतक. त्या खांबांवर तोल सावरत एकमेकींचा हात धरून हसणाऱ्या तशाच लाल पांढर्या कमानी. जागोजागी फडकणारे भगवे झेंडे. रस्त्यावर एकही वाहन नाही. बस, सायकल, रिक्षा, स्कूटर्स काहीच नाही. आणि तरीही एक गजबज गोंगाट. तिने दोन क्षण डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला, आज काय आहे? डोक्यातली आधी चालू असलेली चक्र भिरभिरत थांबली तेव्हा कुठे तिला त्या गोंगाटात चालू असलेल्या स्पीकरचा कर्कश आवाज ऐकू आला. "गणराज रंगी नाचतो… पायी घागऱ्या करिती रुणझुण... " आणि लख्ख आठवलं, आज अनंत चतुर्दशी!
आज खरंतर नवीन काहीच घडलं नव्हतं. गेल्या पाच वर्षातलं अंबर आणि तिचं झालेलं चोवीसशे अठ्ठ्याहत्तरावे भांडण. विषयही नवीन नाही. तेच तेच आणि पुन्हा तेच तेच. म्हणूनच कदाचित तिला आता उबग आला होता साऱ्याचा. मुळात पाच वर्ष हे सगळं का झेलतोय आपण हाच प्रश्न तिला गेले कित्येक दिवस आणि रात्री छळत होता. आता अंबर आला की शेवटचा तुकडा पडायचा असा अनेकदा तिने निश्चयही केला होता. मात्र दरवेळी अंबरच्या बचावात्मक धोरणापुढे तो फिका पडायचा. पुन्हा तो गेल्यावर ती अस्वस्थता, एकाकी जाणीव आणि भिरभिरलेपण. स्वत:चा स्वत:शी घातलेला वाद. द्वंद्व. तळमळणाऱ्या पोकळ रात्री आणि अर्थहीन निरुद्देश दिवसचे दिवस.
चालत चालत ती अप्पा बळवंत चौकात आली. एकूण एक दुकान बंद. फक्त कोपर्यावरचा लस्सीवाला आणि त्या पलीकडचा फुलवाला तेवढा जोरात होता. खरंतर आज कधी नव्हे ते संपूर्ण चोवीस तास पुणं जागं असूनही बाजारपेठा, दुकानं बंद. कुणाची तक्रार नाही, पंचाईत नाही. सारा राजीखुशीचा मामला. परस्पर मान्य तडजोड. कोणत्याही नात्यात सुरुवातीला तरी असते तशी. चौक ओलांडून पुढे गर्दीचा जथ्था. माणसांचा समूह बिनपायांनी पुढे सरकत असल्यागत. दगडूशेठ हलवाई गणपती थोड्याच वेळात त्याच्या दिमाखदार भव्य देखाव्यातून हलणार होता म्हणून ही झुंबड. तिच्या विचारांची हळूहळू एकेक कडी जुळत गेली. हे वातावरण, हा उत्साह, हे मांगल्य एकेकाळी किती भिनलं होतं आपल्यात! ती स्वत:शीच हसली. तिला आठवत होतं तेव्हापासून ते अगदी ५ वर्षांपूर्वीपर्यंत - म्हणजे लग्न होईतो एकही अनंत चतुर्दशी आपण हे रस्ते, हे चौक, ही गर्दी सोडून काढलेली नाही. लहानपणी घरातूनच कसबा गणपतीची तुतारी ऐकून स्लीपर घालून तुरुतुरु पळत सुटलेली फ्रॉकमधली ती तिच्याच डोळ्यांपुढे आली. कसबा गणपती सगळ्या जगासाठी असेल मानाचा पहिला गणपती वगैरे. तिचं मात्र ते लाडकं दैवत होतं , तितकाच दगडूशेठ आणि सारसबागेतलाही. दगडूशेठची शान, डौल दिमाख भुरळ पाडणारा तर सारसबागेतला- मन एकदम शांत, निर्लेप करून टाकणारा. कसब्याच्या गणपतीचं ऐतिहासिक महत्त्व तिला फार भारी वाटायचं. कसा झाला असेल प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापनेचा सोहळा? जिजामाता अक्षरश: राणीसारख्या तेजस्वी दिसत असतील! मुस्लीम राज्यकर्त्यांनी पुण्याची जी धूळधाण उडवली त्यानंतरच्या पुनर्रचनेचा पाया घातला सोन्याचा नांगर फिरवून! आणि त्याचा मुहूर्त केला कसबा गणपतीने. आज कितीतरी दिवसांनी तीच विचारांची साखळी तशीच सरकत गेली.
अंबरला या कशात कधी रस वाटलाच नाही. काय मूर्खासारखं त्या दिशाहीन गर्दीच्या चेंगराचेंगरीत स्वत:ला लोटून द्यायचं? काय तो ढणढणाट, त्यातला बीभत्स नाच आणि कागद, प्लास्टिक कचरा भरून वाहणारे गलिच्छ रस्ते. आणखीही बरंच काही काही. तिला एकदम चपराक बसल्यासारखं झालं होतं. जणू तिला त्या आधी हे कधी दिसलच नव्हतं. तिच्या भावविश्वाचा एक मोठा भाग बनून राहिलेल्या या उत्सवाचा मनातला कप्पा तिनं गुपचूप बंद करून टाकला होता. त्यात जे काही मौल्यवान होतं त्याची इथे कदर होणार नाही हे तिला स्पष्ट समजलं अन ते अस उघड करून कवडीमोल होऊ न देण्याचं मनाशी पक्कं ठरवून टाकलं. त्या सोहळ्याची ही कुरूप अन तिरस्करणीय कल्पना ऐकून तिनं परत कधीही त्याला 'चल' म्हटलं नव्हतं हे मात्र खरं. ती ही गेलीच नव्हती त्यानंतर पुन्हा, आजच. अचानक. असे कितीतरी प्रसंग तिच्या मनाचे कितीतरी कप्पे बंद करत गेले. आजचा बहुतेक शेवटचा उरलेला असेल…
विचारांच्या नादात ती त्या गर्दीतून टिळक पुतळ्यापाशी कधी येऊन पोहोचली तिलाही कळले नाही. बरोबर १२ वाजता मानाच्या पहिल्या गणपतीची पूजा आणि आरती होऊन भव्य पारंपारिक मिरवणुकीचा श्रीगणेशा. अनेक उत्साही लोक मोक्याच्या जागा पटकावून उभे होते. फूटपाथ गच्च भरला होता. दुकानाबाहेरच्या पायर्यांवर उभे राहून लोक मनोभावे नमस्कार करत होते. कसबा गणपतीची पालखी फुलांनी सजवलेली होती. त्या फुलांचा, उदबत्त्यांच्या झाडांचा, धुपाचा सुगंध आसमंत भरून टाकत होता. रस्त्यावर आलिशान ऐसपैस रांगोळ्या काढल्या होत्या. पुढच्या दहाच मिनिटात त्या पुसल्या जाणार, हे माहित असूनही. कित्येक मुलं-मुली अर्धा अर्धा तास कमरेत वाकून ते रंगीत कोरीवकाम करत होती. नकळत तिच्या मनात आले.. अंबरने यांच्या कष्टाला नक्कीच 'बिनडोक ढोर मेहनत' म्हणून हिणकस कटाक्ष टाकला असता. तेवढे ती आता त्याला ओळखून होती.
इतक्यात एकाच गलका उठला. पालखी हलली. बंदोबस्ताची लगबग उडाली. खिल्लारी बैलजोडीपुढे नारळ फोडला आणि बैलगाडीतला चौघडा तडतडू लागला band वाले रापलेले काळे म्हातारे छातीचा भाता फुंकत आणि गळ्याच्या शिरा ताणत पुढे सरसावले. लाल निळ्या रंगांच्या मखमालीवर संस्कृतीची शुभ चिन्हे कोरलेले मानदंड घेतलेले शिलेदार अदबीनं एकेक पाउल टाकू लागले. अचानक सुरु झालेल्या या आवाजांनी इतका वेळ शांत उभे असलेले पांढरेशुभ्र घोडे उगीचच माना इकडे तिकडे झटकू लागले, पाय दुमडून पुढे मागे टाकत धावायची तयारी करू लागले. सजवलेल्या घोड्यांवर नटलेल्या नऊवाऱ्या सळसळल्या, बांगड्या, छल्ले, पैंजण रुणझुणले. "आई गं! देवा! बापरे!" अशा नाजूक हसर्या तक्रारीही फुटल्या. घोडेवाल्यांनी लगाम खेचून घोड्यांना ताब्यात घेतले अन ते डौलात पुढे जाऊ लागले. त्यांच्याच मागे ढोल, ताशा कमरेला गच्च आवळून बांधलेले तरुण तरुणी केव्हापासून याच क्षणाची वाट बघत होते. एकदा शेवटचा हात कमरेच्या दोरीवरून फिरवून पुन्हा काच घट्ट करत होते. त्यांच्या रिंगणात मधोमध उभा असलेला ताशेवाला एकाग्रचित्त होऊन ताशाच्या दोन्ही काड्या लयीत ताशावर आपटू लागला. मिरवणुकीची ही खरी सुरुवात! संपूर्ण गर्दी प्राण कानात गोळा करून तो आवाज मनात साठवत आहे. आता त्या संपूर्ण चौकात दुसरा कुठलाच आवाज नाही. संमोहित झाल्यासारखी ती गर्दी एकटक ताशेवाल्याकडे बघते आहे. त्याचे मात्र लक्ष दुसरे कुठेच नाही. तो आपल्याच नादात. त्याच्याशेजारी उभा आहे एक उंच तरुण- उंच जडशीळ लोखंडी काम्बीला खोवलेला भगवा स्तब्ध धरून.. मान मोडेस्तोवर त्याच्याकडे बघत. माध्यान्हीचा सूर्य त्याला रोखू शकत नाही. वारा त्या भगव्या पताकेला हलवीत असेल तेवढीच काय ती हालचाल. ताशाच्या तडतडणाऱ्या काड्या जणू त्याची परीक्षा घेतायत. त्याचा मूळचा गोरा रंग आता लालबुंद होत होता. कपाळ घामाने डवरले होते. ताशाचे टीपेचे रिंगण संपले आणि एकाच वेळी शिस्तीत शंभरेक ढोलांवर थाप पडली. तो दमदार आवाज छातीच्या ठोक्यावारच पडल्याचा भास झाला. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. किती दिवसांनी! ढोलांनी आता दणक्यात ठेका पकडला होता. ताशांचा थयथयाट त्यांना आणखी उत्तेजित करत होता. भगव्या झेन्ड्यानीही ताल धरला होता. दहा वर्षांच्या आसपासची पन्नासेक छोटी छोटी मुलं ताईच्या शिट्टीवर लेझीम घेऊन पुढे मागे करू लागली. त्यांची चिमुकली मोजकी ढांग, कोवळे हात आणि लेझीमचा छुमछुमाट लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागला.
ती गोड मुलं पाहून एकदम पोटात खोल खड्डा पडल्यासारखं तिला वाटलं. लहान मुलांची तिला खूप आवड. तासनतास ती छोट्या मुलांशी खेळण्यात रमून जात असे. त्यांचे बोबडे बोल, गोजिरवाणे हावभाव, चिमुकल्या हालचाली तिला अक्षरश: वेडावून टाकत. तिनं स्वत:च्या मुलाची किती अनंत स्वप्ने रंगविली होती! आणि आज...! ते आठवूनही तिचं तोंड कडूशार झालं. अंगावर पाल पडावी तसा तिनं तो विचार झटकून टाकला. पुन्हा त्याच विचारात अडकून जाण्याच्या भीतीने तिने पाय उचलला. आज दिवसभर ती याच रस्त्यांवरून भटकणार होती. तिला कुणी विचारणार नव्हत. ती कुणाला बांधील नव्हती. गर्दीतून वाट काढत ती पुढे निघाली. लहानपणी आईसोबत जाताना किती त्रेधा उडायची. चुकून हात सुटला तर संपलंच सगळं! आईने घरून निघतानाच बजावलेले असायचे. आई बाबा दोघेही प्रचंड हौशी. सगळे सणवार, उत्सव धडाक्यात साजरे व्हायचे. त्यात समरस होणं कुळधर्म, कुलाचारापेक्षा जास्त महत्त्वाचं असायचं. आपल्या वाड्याच्या मंडळाचा गणपती उत्सव अगदी जल्लोषात असायचा. रोज आरत्या, खिरापती आणि विसर्जनाची जंगी मिरवणूक. तेव्हा तो उंच जड झेंडा नाचवायला शिकवले होते काकाने. त्यानंतर दरवर्षी तो झेंडा तिच्याच ताब्यात असायचा. त्या ढोल आणि ताशाच्या तालावर दमदार पावले टाकत तो झेंडा जमेल तितका उंच उडवायचा, गोल गोल फिरवायचा, हातांवर तोलून धरायचा. स्वत:च्या खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर गोल फिरवताना, उंच उडवताना दंड भरून यायचे. कारण त्यात एक मोठी मेख होती - भगव्याचा स्पर्श जमिनीला होता कामा नये! डोळ्यात तेल घातल्यागत त्या पताकेकडे नजर ठेवावी लागत असे.ते सारे करताना अवघडलेल्या मानेला लागलेली रग आत्ताही तिला स्पष्ट जाणवली.
...हे सारं म्हणजे मी आहे. हे सगळं माझ्या रक्तातून, नसानसांतून वाहतं आहे. मी स्वत: कितीही दाबून ठेवलं तरी ते एक न एक दिवस ज्वालामुखीच रूप घेऊन उफाळत, फेसाळत उसळणारच आहे. काय काय दाबून ठेवू आणि? गेल्या पाच वर्षातला तमाशा? अंबरचा विक्षिप्त स्वभाव? तिला चालता चालता धाप लागली.ती घामाने संपूर्ण डबडबली होती.घशाला कोरड पडली होती.पोटात आगीचा डोंब उसळला होता. घड्याळात पहिले तर दोन वाजून गेले होते. सकाळपासून अन्नाचा एक कण पोटात नव्हता. आता तिला दोन घोट थंड पाणी तरी तीव्रतेने हवंच होतं. तिनं आजूबाजूला पाहिलं. पुढच्याच चौकात डाव्या हाताला एक चांगलं हॉटेल होतं. तिथे निवांत बसून जेवायचं तिनं ठरवलं. आई आणि ती बऱ्याचदा तिथे जायच्या. आईच्या आठवणीने तिला धाय मोकलून रडावसं वाटलं. आज आई बाबा हवे होते. त्यांना काहीही सांगितलं नसतं मी, पण निदान त्यांच्या जवळ जाऊन स्वस्थ बसले असते तरीही हा उद्रेक शांतावला असता. गेल्या पाच वर्षातलं सगळ्यात मोठं नुकसान आई बाबा गमावल्याचं! आई बाप जाणं म्हणजे डोक्यावरचं छत्र हरपणं. तिला अचानक आपण या प्रचंड गर्दीत विलक्षण एकटे असल्याची जाणीव झाली. आत्ता या क्षणाला मोकळ्या आभाळाखाली या माणसांच्या महापूरात आपलं हक्काचं असं एकही माणूस नाही! गर्दीत हरवून जाऊ नये म्हणून घट्ट पकडून ठेवायला एक प्रेमळ हात नाही. तिला भयाण एकटेपणाने भोवंडून गेल्यागत झालं. स्वत:ला सांभाळत तिनं पटकन हॉटेल गाठलं. कोपरयातली शांत जागा मिळाल्याने तिला त्यातल्या त्यात समाधान वाटलं. एक ग्लास थंड पाणी पिऊन झाल्यावर वेटरला ऑर्डर दिली आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून त्यावर हनुवटी टेकून ती शांत बसून राहिली. नको असतानाही अनेक विचार तिच्यावर चाल करून येत होतेच.
कुठपासून सुरुवात झाली या पडझडीला? पण कोसळून पडायला मुळात आधी काही भक्कम असं उभं राहिलं होतंच कधी? लग्न झाल्यापासून अंबरचा विचित्र स्वभाव तिला खुपत होता. त्याचं तिच्याच नाही, तर स्वत:च्याही आई वडिलांशी फटकून वागणं तिला कधीच आवडलं नाही. कारण शोधायचा खूप प्रयत्न केला तरी समाधानकारक असं एकही सापडलं नाही. हळूहळू तिच्या लक्षात येत गेलं की त्याचा सगळ्या जगावरच राग आहे. चार लोक जिथं एकत्र येतात, बोलतात तिथं जाणं तो आवर्जून टाळतोय. त्याला एकत्र येऊन साजरे करायचे सण, उत्सव नकोसे वाटतात.त्याला कुटुंब संस्थाही मान्य नाही की काय, असाही तिला अधून मधून संशय येऊ लागला. आणि नंतरच्या एकेक घटना तर त्यावर शिक्कामोर्तबच करत राहिल्या. लग्न झाल्यावर काही महिन्यातच त्याचं नोकरी बदलून फिरतीची नोकरी पत्करणं तिला खरंतर खटकलं होतं पण मोठ्या पगाराच्या आमिषापुढे तिला ते मान्य करावं लागलं. सुरुवातीला महिन्या महिन्याने घरी परतणारा अंबर हळूहळू तीन तीन महिने झाले तरी घरी फिरकेना झाला. तसा त्याच्या येण्यात तरी काय अर्थ होता म्हणा! निम्मा वेळ प्रवासाचा शीण घालवण्यात जायचा आणि बाकीचा टीव्हीसमोर. भरभरून बोलणाऱ्या माणसांपैकी तो नव्हताच. कधी कुठे बाहेर फिरायला जाणं नाही, हॉटेलिंग, सिनेमा तर अजिबात नाही. घरासाठी, तिच्यासाठी कधी हौसेने काही आणणं नाही, की तिच्यासोबत शॉपिंगला जाणं नाही. नवरा बायकोचं नातं कर्तव्यापलीकडे कधी पोचलंच नाही. अपमान! क्रूर अपमान.. आपल्या प्रेमाचा, प्रतीक्षेचा,तळमळत केलेल्या जागरणांचा! तो राग आताही तितकाच धुमसतो आहे आपल्यात हे तिला प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर तिनं मुलासाठी केलेले सुरुवातीचे लाडिक हट्ट, मग हळुवार क्षणी केलेल्या विनंत्या, डोळ्यात पाणी आणून केलेली आर्जवं.. त्यावरून होणारे निष्फळ वाद, भांडणं.. त्याचं म्हणणं एकच.. मी असा फिरतीवर, कसे जमायचे सारे? मूल म्हणजे मोठी जबाबदारी.. तुझ्या एकटीवर कशी टाकू? सुरुवातीला तिला ते सारे खरेच वाटले होते.. तिच्या प्रेमापोटी तो हे सारे बोलतोय असे. पण नंतर तिला तो टाळतोय असं जेव्हा तिला जाणवायला लागलं तेव्हा मात्र तिला याचा संशय येऊ लागला. तिने नंतर कित्येक वेळा आडून , उघड विचारायचा प्रयत्न केला आणि आज अखेरचा स्फोट झाला. आज प्रश्न तोच होता, पण उत्तर तिच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. तो आघात तिला सहन झाला नाही. सतत फिरतीवर असणारा नवरा; जो आपल्याला सोबत घेऊन जायलाही तयार नाही अन आपल्याला सासू सासर्याम्जवळही राहू देत नाही. कारण याचे त्यांच्याशीही पटत नाही. एकटीने सुसज्ज flat मध्ये राहावे असा त्याचा आग्रह. मग मी माझ्यासाठी म्हणून मुलाचा हट्ट केला तर बिघडले कुठे? तू नोकरी बदल, इथे राहा. मला चालतील कमी पैसे. किंवा मग मी येते तुझ्याबरोबर. विंचवाचे बिर्हाड मिरवयाचीही ताकद, तयारी आहे माझ्यात. मी इथे एकटीने का म्हणून राहायचे? मला का ही शिक्षा? तेव्हा ताडकन उठून तो उभा राहिला. तिच्या अगदी जवळ आला तेव्हा तिला त्याचे गरम श्वासही जाणवत होते. त्याने अत्यंत थंडपणे तिचा चेहरा हनुवटीला धरून एकच हाताच्या पकडीत वर उचलला, आणि तिच्या डोळ्यात डोळे घुसवून तो म्हणाला,
"मग? अजून अक्कल आली नाही? कशासाठी माझ्या मागे लागली आहेस ?"
ती निर्बुद्धपणे त्याच्याकडे बघतच राहिली. हे सगळे तिच्यासाठी अनपेक्षित होते.
"जा ना... मी विचारले गेल्या पाच वर्षात एकदाही तुला? एवढं घर आहे, गाडी आहे पैसा आहे. काय कमी आहे का तुला? ३-३ महिने मी घरी येत नाही याचा अर्थ काय होतो? तुला आज समजेल, उद्या समजेल म्हणून गप्प बसलो तर उलट आकांडतांडव करतेस? मूल कशाला हवय आणि? मला अडकवून ठेवायला बघतेस? जा.... आय डोन्ट नीड यू."
ते शब्द गरम शिशासारखे तिचे कान भाजत गेले. इतका वेळ घट्ट धरून ठेवल्याने जबड्यातून येणारी चमक थेट मस्तकात भिणभिणली. अंबरचे डोळे आग ओकत होते. त्याच्या ताणलेल्या डोळ्याच्या मध्यभागी येऊन थरथरणारी त्याची बुबुळे पाहताना हे जग भेलकांडत गोल फिरल्याचा तिला भास झाला. तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेचा, निष्ठेचा,कर्तव्यांचा,प्रेमाचा, त्यागाचा एका क्षणात कचरा झाला होता. एकाच क्षणात तिच्या सगळ्या इच्छा, स्वप्नं होरपळून गेली. हा अपमान, ही क्रूर चेष्टा तिला सहन झाली नाही. संताप तिच्यात मावेना. तिचा हात उठला आणि सणसणून अम्बरच्या एक थोबाडात बसली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ते अश्रू नसून उल्कापात होतो आहे असाच भास अंबरला झाला असावा. तिनं पर्स घेतली आणि खाडकन दरवाजा उघडून ती बाहेर पडली. डोक्यात प्रचंड वावटळ उठली आहे अन पाय जमिनीवर ठेवणं मुश्कील आहे अशाच परिस्थितीत ती चालत राहिली..
आजच्या भयंकर दिवसाचा पट डोळ्यांपुढून सरकत असतानाच वेटरने जेवण लावले. ती अक्षरश: तुटून पडली. आता बस. मन मानेल तसे जगायचे. ती चांगली इंजिनियर होती, नोकरी करत होती. त्यामुळे राहण्या खाण्याचा प्रश्न तिच्यापुढे नव्हताच. उलट आता ती तिला हवं तसं जगू शकणार होती. कोणतेही कप्पे बंद न करता. आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी तिला कुणाचीही भीक मागावी लागणार नव्हती. एक जोखड फेकून दिल्याचा आनंद तिला आता या क्षणाला झाला.बिल चुकतं करून ती बाहेर रस्त्यावर आली. आता मिरवणूक अगदी रंगात आली होती. बहुधा पावसाची हलकीशी सरही येऊन गेली असावी कारण रस्ते ओले दिसत होते आणि हवेत थोडा गारवाही आला होता. ढोल ताशांचे आवाज येताच होते. तुळशीबागेचा भव्य गणपती पुढच्या चौकात गेलेला दिसत होता. ती धावतच तिथे गेली. ते तुन्दिलतनु गोजिरे रूप नजरेत मावत नव्हते. दागिन्यांनी मढलेली ती विशालकाय, हसरी निरागस मूर्ती पाहून तिनं तिच्याही नकळत हात जोडले. मन भरेस्तोवर डोळे मिटून नमस्कार केला. एका नव्या आयुष्याचा श्रीगणेशा तुझ्या आशीर्वादानं करते आहे... तिने सावकाश डोळे उघडले. आजूबाजूला एकच जल्लोष चालू होता. घामेघूम झालेले ढोल ताशेवाले पाहून तिला एकदम उत्साह आला. पांढरे शुभ्र सलवार झब्बे, त्यावर घेतलेले लाल केशरी दुपट्टे आणि ढोल, ताशे झेंड्यांची एक शिस्तबद्ध रचना. इवल्याश्या शिट्ट्यांच्या हुकुमावर बदलणारे शंभर ढोल ताशांचे ठेके. ढोलाची थाप म्हणजे बेलगाम शौर्याला, साहसाला दिलेले आव्हान, स्फ़ूर्तीचं, चैतन्याचं प्रेरणास्थान. ताशांचा तडतडाट म्हणजे सतत झुंजत राहण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि त्याला लागणारं बळ एकवटून निकराने दिलेला लढा. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तासाचे टण टण पडणारे अविरत टोले... काळाची गतीच जणू.. हे जे चालू आहे ते नुसतं वाजवणं नाही, आनंदाचं उधाण नाही.. त्याही पलीकडे जाऊन काहीतरी आहे. इथल्या वाजवणाऱ्या, बघणाऱ्या, ऐकणार्या प्रत्येकाच्या आंतरिक उर्मींचा तो सामुहिक असा आविष्कार आहे. इतरांकडून पूर्ततेची अपेक्षाही करू न शकणार्या आपल्या आत दबलेल्या आत्मसन्मानाची आपणच केलेली पूजा आहे, आरती आहे. स्वाभिमानाचा येळकोट आहे. दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवून अस्तित्वाचा केलेला उदो उदो आहे. मन:शक्तीचा जयजयकार आहे.
तिची नजर फिरत फिरत मधल्या रिंगणावर स्थिरावली. ती तिच्याही नकळत ते कडे भेदून थेट आत चालत गेली.एक दोन हातानी तिला अडवण्याचा जुजबी प्रयत्न केला पण ती पुढेच जात राहिली. मध्यभागी झेंडा घेऊन नाचणारी मुलगी थांबली. तिने हात पुढे केला. त्या मुलीने काहीच न समजून इकडे तिकडे पाहत झेंडा तिच्या हातात सोपवला. तिने ओढणी छातीवरून नीट पसरून घेऊन कमरेला घट्ट बांधली. झेंडा सरळ उभा धरून एक नजर वरपर्यंत नेली. दोन मिनिटे खोल श्वास घेतला. ढोल ताशे वाजतच होते. तिने एक क्षण थांबून बरोब्बर सम पकडली. तिची पावले आणि हात एका विशिष्ट लयीत थिरकू लागली. सुरुवातीला झेंडा सावकाश नाचवत असतानाच तिने कधी वेग पकडला तिलाही समजले नाही. आता ती तिचीही उरली नव्हती.. ढोलाचे रिंगण टिपेला पोचले तशी तिच्या पावलांची झेप आणि गती दुप्पट झाली. जणू आजवरचे सारे अपमान, अपेक्षाभंग चीड, संताप उफाळून येऊन तिच्याच पायाखाली चिरडले जात होते. तिची झालेली घोर फसवणूक ती फिसकटून टाकते आहे. जे घडले ते घडले नाहीच, त्याच्या सार्या पाउलखुणा ती जीवाच्या आकांताने पुसून टाकत आहे.. तिच्या स्वाभिमानाचा झेंडा तिच्याच नशीबाच्या छाताडावर नाचवते आहे.. तिचा आवेग, आवेश आणि त्वेष यात आता फरकच उरला नव्हता.ती आता बेभान झाली होती.. पण खरंतर, आता कुठे तिला भान आले होते.
मस्त! आवडली कथा.
मस्त! आवडली कथा.
फारच छान रंगवलीय.. योग्य
फारच छान रंगवलीय.. योग्य वर्णन , योग्य तिथेच शेवट. उत्तम..
आशूडी , खूप सुन्दर्...शब्द
आशूडी , खूप सुन्दर्...शब्द नाहित माझ्याकडे....
खुप खुप छान! शेवटी तिचा वेग
खुप खुप छान! शेवटी तिचा वेग वाचुन अंग शहारले.
पण त्याने नकार देण्याचं कारण काय? बाहेरख्यालीपणा की त्याच्यातील काहि वैगुण्य? हे कळलं नाहि.
अप्रतीम, आवड्ली -- तगमग आणि
अप्रतीम, आवड्ली -- तगमग आणि मग त्यवर मात करत नाचवलेला झेंडाही

पु.ले.शु.
मस्त आहे.. आवडली.
मस्त आहे.. आवडली.
अप्रतिम
अप्रतिम
भावना+१.
भावना+१.
पण त्याने नकार देण्याचं कारण
पण त्याने नकार देण्याचं कारण काय? बाहेरख्यालीपणा की त्याच्यातील काहि वैगुण्य? हे कळलं नाहि.
<<<<<<<<<<<<< अनुमोदन
कथा वाचुन झाल्यावर मी देखिल याच गोष्टीचा विचार करत होते की हिच्या नवर्याचा actual problem काय आहे, ते काही कळलेच नाही........बाकी कथाबीज लहान आहे पण आजुबाजुच्या वातावरणाचे वर्णन भरपुर आहे....... तिला तीचा नवरा ५ वर्ष झाली तरी समजू नये म्हणजे कमालच आहे
सु रे ख ! व्वा आशूडी !
सु रे ख !
व्वा आशूडी !
आवडली. किती दिवसांपासून
आवडली.
किती दिवसांपासून तुझ्या लिखाणाची वाट पाहत होते
मस्त आहे.. आवडली.
मस्त आहे.. आवडली.
अप्रतिम लिहीली आहे........
अप्रतिम लिहीली आहे........
खूप सुंदर लिहिलं
खूप सुंदर लिहिलं आहे........
मनाला भावलं अगदी.......
पु.ले.शु.
नवर्याने नक्की काय केले होते
नवर्याने नक्की काय केले होते हे तसे क्लीअर नाहीच पण त्याची गरजही भासली नाही एवढे नितांतसुंदर वर्णन त्याच वेळी दुसर्या ट्रॅकवर चालू होते..
मिरवणूकीचे वर्णन वाचताना चार-पाच गणपतीची गाणी पार्श्वभूमीला कुठेतरी माझ्या कानावर पडत असल्याचा भास होत होता.. खूपच सुरेख..
सही!!!
सही!!!
वा!!! सुरेख
वा!!! सुरेख
तुफान वेगात.. आवडली.
तुफान वेगात..
आवडली.
जब्बरदस्त!!
जब्बरदस्त!!
पण त्याने नकार देण्याचं कारण
पण त्याने नकार देण्याचं कारण काय? बाहेरख्यालीपणा की त्याच्यातील काहि वैगुण्य? हे कळलं नाहि.>>> दोन्हीही नसावे.
त्याचा स्वभाव काहीसा माणूसघाणा असावा. कोणत्याही प्रकारचे बंधन नको, कुठलीही जबाबदारी नको, कोणाच्यातही गुंतणे नको वगैरे प्रकारचा. त्यामुळेच, तो स्वतःच्या आईवडलांबरोबरही नीट वागत नाही. त्यांच्यात गुंतत नाही.
आशू, मस्त कथा. आवडली.
कारणाने गोष्टीला फरक नाही पडत
कारणाने गोष्टीला फरक नाही पडत आहे. आणि असतात की असे लोक.. बायका आपल्या आंधळेपणाने करत रहातात संसार. त्यांना कळतच नाही पायाखाली काय जळतंय ते.
त्या निष्ठेचा, प्रेमाचा, सातत्याचा असा अपमान होईपर्यंत नाहीच समजत. आणि समजल्यावरही कित्येक जणी तसंच रेटत रहातातच. हिनं ते नाकारलंय.
रेंगाळतेय गोष्ट मनात आशू...
छान.
छान.
वर्णनशैली नेहमीप्रमाणेच
वर्णनशैली नेहमीप्रमाणेच सुंदर.
पण अंबरची बाजू नीटशी समजली नाही. तिची तिच्या सासू-सासर्यांशी थोडी इण्टरॅक्शन दाखवली असती, तर आवडलं असतं.
३-३ महिने मी घरी येत नाही
३-३ महिने मी घरी येत नाही याचा अर्थ काय होतो?>>>
हे आहे खरं कारण.
लली + १. विसर्जन मिरवणुकीचं वर्णन मस्त जमलंय, पण कथाबीज अजून फुलून यायला हवं होतं, अधिक स्पष्टपणे, विस्तृतपणे.
हिर्यापेक्षा कोंदण अधिक मोठं, जरा जास्तच लखलखित झालंय असं माझं मत
हिर्यापेक्षा कोंदण अधिक
हिर्यापेक्षा कोंदण अधिक मोठं, जरा जास्तच लखलखित झालंय असं माझं मत >>> मंजू, मला अगदी हेच म्हणायचं होतं, पण योग्य शब्द सुचले नाहीत मगाशी.
विसर्जन मिरवणुकीचं वर्णन पार्श्वभूमीवरच रहायला हवं, पण तेच ठळकपणे लक्षात राहतंय.
वातावरण निर्मिती सुरेख आहे.
वातावरण निर्मिती सुरेख आहे. एकदम जिवन्त झाले सगळे. एक मस्त short film होउ शकेल. पु.ले.शु.
आशूडी, कथा चांगली आहे. आवडली.
आशूडी,
कथा चांगली आहे. आवडली. वर मंजूडी म्हणाल्यात तसं हिर्यापेक्षा कोंदण जास्त लखलखीत झालंय. पण तरीही कथेचा उद्देश सुस्पष्टपणे कळतोय.
त्रितापांनी पोळलेला जीव शेवटी माझ्याकडे येतो असं गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वत: सांगून गेलेत. तोच भाव कथेत अचूकपणे पकडला आहे. त्याबद्दल अभिनंदन!
आ.न.,
-गा.पै.
मला आवडली.... त्या नवरा
मला आवडली....
त्या नवरा बायकोत कशाने बेबनाव झालेत त्या पेक्षा, हे नातं झुगारुन द्यायला हवय हे जे भान ह्या कथेत अधोरेखीत होतय ते मला खुप आवडलं. बाकी त्यांच्यात कशामुळे बिनसलं ह्याला काय महत्व आहे? कारणं काहीही असोत. हे नातं संपलय ह्याचा हा साक्षात्कार आहे. हे त्या नायिकेचं मुकरुदन आहे. तिच्या मनातिल अवस्थेचं आणि तिला झालेल्या साक्षात्काराचं वर्णन आहे.
तो जो एक क्षण असतो भानावर येण्याचा तो अचुक पकडला आहे ...
फारच आवडली.
अभिषेक +१
आवेग जब्बरदस्त. थेट
आवेग जब्बरदस्त. थेट पोचला.
मिरवणूकीचे वर्णन अचूक, अगदी डोळ्यापुढे उभं केलंस ते वातावरण. झेंडा फडकवण्याच्या रूपकाचा मस्त वापर.
पण..
शेवटी तिला भान येऊन ती 'लिबरेट' झाली असं मला नाही वाटलं. काहीतरी कमी पडलं.
आशूडी, खूप दिवसांनी अंगावर
आशूडी, खूप दिवसांनी अंगावर सरसरून काटा आणणारं... झिणझिणणारं काही वाचलं... जियो!
Pages