घटस्फोट... (जुनाच.. पण आता व्हिडीओ सकट..!)

Submitted by धुंद रवी on 7 June, 2012 - 07:53

माझं हे व्यंगलेखन काल ई-टिव्हीवर कॉमेडी एक्सप्रेसमध्ये सादर झालं. यापूर्वीच माबोकरांनी हे लेखन वाचताना आपापल्या मनात पाहिलं असेलच. आता हा व्हिडीओ पहा आणि ठरवा की कुठलं जास्त छान आहे....
तुमच्या डोक्यातलं की हे ‘खूळचट खोक्यातलं’
म्हणजे ‘ईडियट बॉक्स’ हो.. Proud

दुवा - http://www.youtube.com/watch?v=axFi-fZlFyM&list=UU5CpuXxjdGy21JdEtK-a19Q...

काहीच्या काही कविता यासारखाच 'काहीच्या काही विनोदी लेखन' असा विभाग इथे नसल्याने दुर्दैवाने इथेच धागत आहे.
सबब हा धागा काहीच्याकाही सदरात वाचावा.
Proud

पात्र: मॅरेज काऊंसिलर आणि एक घटस्फोटुत्सुक बाई

मॅरेज काऊंसिलर : नमस्कार. बोला, काय प्रॉब्लेम आहे ?
बाई : वातअसंतुलनाचा प्रॉब्लेम आहे. त्यात नागीण झाल्यानी दोन महिन्यांपासून संपूर्ण अंगाला खाज येते, अंगावर लाल चट्टे येतात.
मॅरेज काऊंसिलर : अहो हे काय बोलताय तुम्ही ?
बाई : हो मग.. काय पदरचं सांगतीये की काय ? ज्याचं जळत त्यालाच कळतं.
मॅरेज काऊंसिलर : काय???
बाई : हो ना... म्हणतात ना की आधी गुंतू नये मग कुंथु नये. पण आधी नाही ना कळत.
मॅरेज काऊंसिलर : अहो काय करताय तुम्ही?
बाई : काय करणार? आल्याच्या रसासह पाव चमचा लवणभास्कर चूर्ण घेते. मग त्यानंतर पाऊण चमचा पंचतिक्त घृत आणि थोडस्सं गोक्षुरादी गुग्गुळ....
मॅरेज काऊंसिलर : ओ बाई... काय करताय म्हणजे काय बरळताय? मी कोण आहे असां तुम्हाला वाटतय? मी वैद्य नाही, समुपदेशक आहे. मॅरेज काऊंसिलर.
बाई : अय्या, माहिती आहे की मला. तुम्हीच विचारलत की काय प्रॉब्लेम आहे म्हणुन सांगितलं. माझे वकिल म्हणाले की काऊंसिलरपासुन काही लपवायचं नाही. मला आम्लपित्ताचा पण त्रास होतो.
मॅरेज काऊंसिलर : असले प्रॉब्लेम नाही हो. मला हे विचारायचय की ‘पटतय की नाही’?
बाई : इश्श.. न पटायला काय झालय ? मला पटलय की तुम्ही मॅरेज काऊंसिलर आहात.
मॅरेज काऊंसिलर : माझ्याविषयी नाही तुमच्या नव-याविषयी बोलतोय मी.
बाई : छे... तो मॅरेज काऊंसिलर नाही.
मॅरेज काऊंसिलर : तो नाही, मी आहे मॅरेज काऊंसिलर. मी विचारतोय की त्याच्याशी पटतं की नाही ?
बाई : कोणाचं?
मॅरेज काऊंसिलर : तुमचं.
बाई : कशाविषयी?
मॅरेज काऊंसिलर : एकुणच.
बाई : एकुणच तर अवघड आहे. आवडीने केला वर.... त्याला दिवसा खोकला, रात्री ज्वर.
मॅरेज काऊंसिलर : आजारी असतात का ते?
बाई : आजारचं म्हणायचा.
मॅरेज काऊंसिलर : म्हणजे काय ?
बाई : (मोठा उसासा टाकते) नका विचारु.
मॅरेज काऊंसिलर : अहो मग मला कसं कळणार. नक्की काय बिनसलय ?
बाई : काय सांगु तुम्हाला ? (रडायला लागते) नशीब माझं... असला नवरा होता नशीबात माझ्या. लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
मॅरेज काऊंसिलर : तो वडापाव खातो हा तुमचा प्रॉब्लेम आहे का ?
बाई : कोण खातो वडापाव?
मॅरेज काऊंसिलर : तुमचा नवरा ?
बाई : तो वडापाव खातो ? कोण म्हणालं ?
मॅरेज काऊंसिलर : तुम्हीच. आत्ता नाही का म्हणालात की तो वडापाव शिवाय काही खात नाही.
बाई : ते तसं नव्हतं हो. म्हण आहे तशी म्हणुन म्हणाले. म्हणजे म्हणीला काय म्हणायचय की...
मॅरेज काऊंसिलर : ते म्हणीचं राहु द्या हो. तुम्हाला काय म्हणायचय ते म्हणा आधी.
बाई : (पुन्हा मोठा उसासा टाकते.) नका विचारु.
मॅरेज काऊंसिलर : हे बघा तुम्ही असंच बोलत राहिलात तर मला तुम्हाला मदत करता येणार नाही.
बाई : सांगते... जड अंतःकरणानी सांगते... विद्द मनानी सांगते. माझा नवरा माझ्या भावन्ना समजुन घेत नाही.
मॅरेज काऊंसिलर : हे बघा तुमच्या भावांचं नंतर बघु. आधी तुमच्या दोघातला वाद मिटवु.
बाई : भावांना नाही हो. भावना... भावना... ! ते काय झालं की भावना म्हणताना आवंढा गिळला गेला आणि ते भावांना झालं.
मॅरेज काऊंसिलर : काय गिळलंत? हे बघा, माझ्या कार्यालयात बाहेरील खाद्यपदार्थ गिळण्यास मनाई आहे.
बाई : मग इथे काय मिळतं गिळायला?
मॅरेज काऊंसिलर : हे काय हॉटेल आहे का ? तुम्ही मुद्द्याचं बोला. ‘तुमचा नवरा तुम्हाला समजुन घेत नाही’ म्हणजे काय?
बाई : म्हणजे तो बदललाय.
मॅरेज काऊंसिलर : हे बघा तुम्ही आधी ठरवुन घ्या की तुम्हाला घटस्फोट कोणापासुन हवाय. पहिल्या नव-यापासुन की ह्या बदललेल्या नव-यापासुन.
बाई : बदललाय म्हणजे तसा नाही. बाहेरचा तोच आहे, आतला बदललाय.
मॅरेज काऊंसिलर : हे बघा, हिंदु मॅरेज अॅक्ट नुसार विवाह अंतर्गत संबंधांनाच घटस्फोट मिळतो. विवाहबाह्य....
बाई : ओ... काहीतरी बोलु नकात. माणुस तोच आहे, लग्नांनंतर स्वभाव बदललाय असं म्हणायचं होतं मला.
मॅरेज काऊंसिलर : बदललाय म्हणजे काय? आधी प्रेमात होता आणि आता शिव्या देतो.
बाई : नाही.
मॅरेज काऊंसिलर : धमक्या देतो.
बाई : नाही.
मॅरेज काऊंसिलर : फटके देतो.
बाई : नाही.
मॅरेज काऊंसिलर : मग...?
बाई : ढेकर देतो. फार अचकट-विचकट ढेकर देतो.
मॅरेज काऊंसिलर : हे काय लग्न मोडण्याचं कारण झालं?
बाई : तुम्हाला भोगावं लागत नाही म्हणुन.... परवा तर इतका कर्कश्श ढेकर दिला की खिड्कीचे पडदे फाटले माझ्या.
मॅरेज काऊंसिलर : तुम्हाला कानाचे पडदे म्हणायचं का?
बाई : नाही... खिडकीचेच.
मॅरेज काऊंसिलर : काहीतरीच. अतीशयोक्ती करताय तुम्ही.
बाई : नाही हो. अतीशयोक्ती करत असते तर म्हणाले असते की मुंगी व्यायली, शींगी झाली. दुध तिचे किती? बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पिउन गेले.
मॅरेज काऊंसिलर : काय बोलताय हे ?
बाई : अशी अतीशयोक्ती दाखवणारी एक म्हण आहे.
मॅरेज काऊंसिलर : मग आत्ता का म्हणताय ?
बाई : तुम्हाला अतीशयोक्ती काय ते कळावं म्हणुन.
मॅरेज काऊंसिलर : तुम्ही सारखंसारखं असं ‘म्हणी’ का म्हणताय.
बाई : कारण अशी एक म्हणच आहे की ‘म्हणणा-यानी म्हण केली आणि जाणणा-याला अक्कल आली.’
मॅरेज काऊंसिलर : म्हणजे मला अक्कल नाही.
बाई : अतीशयोक्तीच करताय बाई. मी नुसती म्हण ऐकवली.
मॅरेज काऊंसिलर : ओ बाई... प्लीज अवांतर बोलणं थांबवा. मुद्द्यावर या. तुम्ही खिडकीच्यी पडद्यांविषयी बोलत होतात.
बाई : हो ना... नाहीच मिळाले ते फेंदरट शेंदरी पडदे. मग काय आणले केशरीच. त्यावर अशी हिरवट मोरपंखी किनार...
मॅरेज काऊंसिलर : मला काय करायचय की तुमचे पडदे कुठल्या रंगाचे आहेत. तुम्ही म्हणत होतात की परवा तर इतका कर्कश्श ढेकर दिला तुमच्या नव-यानी की खिड्कीचे पडदे फाटले. असं कसं होईल?
बाई : सांगते की. मी अशी खिडकीत पडदा धरुन उभी होते आणि नव-यानी (असा) असह्य ढेकर दिला की मी शहारलेच. डोळे गच्च मिटून घेतले आणि मुठीत पडदा असा घट्ट पकडला की फाटलाच. एका ढेकरामुळे. एकदम मखमली होता हो...
मॅरेज काऊंसिलर : ढेकर ?
बाई : पडदा...!
मॅरेज काऊंसिलर : बाई तुम्ही जरा पडद्यावर या.... आपलं मुद्द्यावर या. नवरा ढेकर देतो म्हणुन तुम्हाला घटस्फोट हवाय ?
बाई : नाही. मुद्दा तो नाही. तो मुद्दामुन तसा ढेकर देतो, मला त्रास व्हावा म्हणुन. तो बदललाय. पुर्वी.. म्हणजे लग्नापुर्वी... मी बोलताना त्याला जांभई आली तरी अशी पावा वाजवल्यासारखी जांभई द्यायचा. हळुवार... अलवार... अलगद. आणि आता भोंगा वाजवल्यासारखा ढेकर देतो. भसाभस... धपाधप.... बकाबक.
मॅरेज काऊंसिलर : अजुन काही.
बाई : रपारप.. सपासप.
मॅरेज काऊंसिलर : ते नाही हो. म्हणजे घटस्फोटासाठी अजुन काही मुद्दा.
बाई : बदललाय.
मॅरेज काऊंसिलर : मुद्दा.
बाई : नाही, नवरा. मला वाटतं तो आईच्या सांगण्यावरुन देत असेल.
मॅरेज काऊंसिलर : काय ढेकर ?
बाई : ढेकर नाही, त्रास. कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
मॅरेज काऊंसिलर : बाई... तुम्ही कळेल अशा भाषेत बोला जरा. तुम्हाला असं कशावरुन वाटतं की तो आईच्या सांगण्यावरुन तुम्हाला त्रास देतो.
बाई : (नाक मुरडते) त्या आहेतच तशा... तरण्या झाल्यात बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्यात हरण्या.
मॅरेज काऊंसिलर : बाई, मी तुमच्या पाया पडतो पण प्लीज त्या म्हणी थांबवा आणि नीट सांगा.
बाई : त्याच्या आईच्या भडकवल्यामुळे तो असा बदललाय. पुर्वी तो फक्त खोटं बोलायचा... पण आता
मॅरेज काऊंसिलर : आता टाकुन बोलतो ? वाईट बोलतो ? अपमानस्पद बोलतो ?
बाई : नाही, तो आता फक्त खरं बोलतो.
मॅरेज काऊंसिलर : ‘तो खरं बोलतो’ हा तुमचा प्रॉब्लेम आहे ?
बाई : हो.
मॅरेज काऊंसिलर : काय विनोद करताय का ?
बाई : नाही. विनोद करत असते तर म्हंटले असते की एकदा एक मुंगी आणि हत्ती...
मॅरेज काऊंसिलर : पुरे. भावना पोहचल्या तुमच्या. नव-यानी खरं बोलण्यानी काय प्रॉब्लेम होतो ते सांगा.
बाई : सगळंच खरं बोललं तर कसं सहन करायचं बायकांनी ? संसार करायचा कसा ??
मॅरेज काऊंसिलर : जरा सविस्तर सांगाल का..???
बाई : पाय धू, तर म्हणे तोडे केवढ्याचे. आता विचारताच आहात तर ऐका नव-याकडून बायकांना सगळं खर ऐकायचं नसतं.
मॅरेज काऊंसिलर : काहीही काय ?
बाई : ‘मी कशी दिसतीये? या ड्रेसमध्ये मी जाड तर दिसत नाहीये ना? माझा रंग जरा उजळलाय का हो?’ या प्रश्नांची खरी उत्तरं देतो नवरा मला. किती घरं पडत असतील काळाजला? किती फाटून जात असेल हृदय? किती क्लेष होत असतील मनाला ? तुम्ही पण या प्रश्नांची खरी उत्तरं एकदा देऊन बघा बायकोला.
मॅरेज काऊंसिलर : शक्य नाही.
बाई : बघा, म्हंटलं नव्हतं मी.
मॅरेज काऊंसिलर : नाही, शक्य नाही कारण माझं अजुन लग्न झालं नाहीये. पण पुढच्या महिन्यात करतोय.
बाई : बाई... कहरच करताय तुम्ही.
मॅरेज काऊंसिलर : कसला कहर ?
बाई : फुकटचे खाणं आणि हागवणीला कहर.
मॅरेज काऊंसिलर : शीऽऽऽ काय बोलताय हे इथं...???
बाई : गप्प बसा. रुखवत आलं, रुखवत आलं... उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
मॅरेज काऊंसिलर : (वैफल्यग्रस्त) फडकी ???
बाई : मला वाटलं होतं तुम्हाला स्वतःची चांगली तीन-चार लग्न मोडल्याचा अनुभव असणार म्हणुन करताय तुम्ही उपदेश.
मॅरेज काऊंसिलर : समुपदेशन.
बाई : तेच ते. तुमचं काय जातय दुस-यांना अक्कल शिकवायला. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
मॅरेज काऊंसिलर : माफ करा मला. चूक झाली माझी. मी पुन्हा कोणाला समुपदेशन करणार नाही... मी कुठल्याही लग्न झालेल्या बाईला काही विचारणार नाही.... मी लग्नच करणार नाही. आता बास करा. गाढवापूढे वाचली गीता... अन वाचणाराच गाढव होता!!
बाई : अहो पण...
मॅरेज काऊंसिलर : अति शहाणा त्याच्या काखेत कळसा गावाला वळसा..
बाई : ऐका तर....
मॅरेज काऊंसिलर : गाढव मेलं ओझ्यानं अन् गंगेत घोडं न्हालं. (पडतो.)

धुंद रवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

lol

तो बदललाय. पुर्वी.. म्हणजे लग्नापुर्वी... मी बोलताना त्याला जांभई आली तरी अशी पावा वाजवल्यासारखी जांभई द्यायचा. हळुवार... अलवार... अलगद. आणि आता भोंगा वाजवल्यासारखा ढेकर देतो. भसाभस... धपाधप.... बकाबक.

मॅरेज काऊंसिलर : अजुन काही.

बाई : रपारप.. सपासप.

>>>>>>>>>>>>

Proud Proud Proud

Pages