कबूली

Submitted by बेफ़िकीर on 5 June, 2012 - 03:40

"चोर्‍या करण्यासाठी जन्म दिलाय तुला?"

आई रवीला मारत होती. मोलकरीण नुसती उभे राहून ते सगळे पाहात होती. दहा वर्षाचा रवी रडत होता. फटके चुकवत होता. मोलकरणीने आईला सांगितले होते की काल रवीला तुमच्या पर्समधून दहा रुपये काढताना मी पाहिले होते. हे कसे सांगावे या विचारात एक दिवस घालवला आणि आज ठरवले की इतक्या लहान वयात अशा सवयी लागू नयेत म्हणून सांगूनच टाकावे.

ते ऐकून थरथर कापत असलेल्या आईने घाबरून उभेही न राहता येत असलेल्या रवीला बदड बदड बदडले होते. अजून चालूच होते फटके. बाबा संध्याकाळी आल्यावर वेगळे फटके मारणार हे आईही रवीला सांगत होती आणि रवीलाही ते माहीत होते. फटक्यांमुळे होणार्‍या वेदना, चोरी केल्याचे समजल्याचा अपमान आणि ज्योतीकाकूंनी केलेली चहाडी आणि त्यामुळे त्यांच्याचसमोर होत असलेला वेगळा अपमान हे सगळे लहान रवीला असह्य झाले होते.

त्याच्या तोंडातून आता घाबरल्यामुळे आवाजही निघत नव्हता. फटके कसे चुकवावेत हे समजत नव्हते. आईने एका हाताने घट्ट धरून ठेवले होते.

ज्योती काकूंनी त्यातच आणखीन आग लावली.

"बाई.. आमच्यातसुद्धा असे काही होत नाही... झाले तर असे मारतात की पुन्हा हिम्मत होणार नाही"

उगीचच प्रकाराला वरचे खालचे लोक, जातपात वगैरे रंग चढला आणि आईने आणखीन सहा फटके लावले रवीला.

"का चोरलेस पैसे??? काय केलंस पैशाचं???"

लालबुंद चेहर्‍याने आई विचारत होती.

"काही नाही... काही नाही...."

कसेबसे एवढेच चार शब्द आक्रोशणार्‍या रवीच्या तोंडातून बाहेर पडू शकले.

"काही नाही म्हणजे काय???? कुठे आहेत ते पैसे????"

आता खरे उत्तर द्यावे लागणार होते. पण ते उत्तर ऐकून आईचा तीळपापड झाला असता हे रवीला समजत होते.

आईने त्याला सोडून सरळ बाबांना फोन लावला.

"संदीप... रवीने दहा रुपये चोरले माझ्या पर्समधून काल... ज्योतीबाई सांगतायत... आणि त्यानेही ते कबूल केले.."

"काय बोलतीयस तू अगं??? का चोरले पण??? काय केले त्याने दहा रुपयांचे???"

"ते सांगत नाहीये... मला वाटतं तू घरी ये..."

"मी आत्ता कसा येणार??? तो काय म्हणतोय???"

"बोलतच नाहीये काय केलं पैशांचं ते..."

"फटके लाव त्याला.. म्हणजे पोपटासारखा बोलेल..."

आईने फोन आपटला आणि पुन्हा रवीला धरले...

"मला आत्ताच्या आत्ता समजायला हवं आहे की दहा रुपयांचं काय केलंस??? बोल... बोल..."

रवीचा कान पिरगाळला गेला. तो ओरडूही शकत नव्हता आता.

त्याचा कान सोडल्यावर त्याए आईलाच मिठी मारली. तीच मारत असेल तर कोणाकडे धावणार??

ज्योतीबाई नुसत्या बघत होत्या.

"अभ्यासाच्या नावाने बोंब... सतत खेळायला खाली जायचं.. आणि आता चोर्‍या???? कितीवेळा चोरलेस पैसे आजपर्यंत????"

"नाही... नाही चोरले... आईग्गं...."

"काकू खोटं बोलतायत??? खोटं बोलतायत काकू??? खोटं बोलतायत???? याक्षणाला उत्तर दे मला..."

रवी आता सरळ जमीनीवर बसला. कारण सहन होत नव्हते. आजवर आईने धपाटे दिलेले नव्हते असे नाही. पण आज फारच मारत होती.

रवीला बोलायचीही संधी देत नव्हती. नाहीतर त्याने काहीतरी तरी सांगितले असते.

"जेवण खाण बंद... टीव्ही बंद... मित्र बंद आणि खेळणंही बंद... उत्तर दिले नाहीस तर बघच... आणि इथे उभा राहा...इथून हालायचं नाही... मी सांगेपर्यंत..."

रवी उभा राहिला. दोन्ही गालांवर बोटाच्या खुणा होत्या. अश्रूंच्या सरीने त्या भिजत होत्या. केविलवाणा रवी ज्योतीकाकूंकडे असहाय्यपणे पाहात होता. पण त्यांनीच चहाडी केलेली असल्याने त्या आपल्याला वाचवणार नाहीत हे त्याला माहीत होते. आणखी एक काळजी म्हणजे बाबा आल्याआल्या शूज काढायच्याआधीच मारायला लागणार होते. तेव्हा आई मध्ये पडणार नाही हेही समजत होते. खूप वेळ रवी उभा राहिला.

आई बडबडत होती. ज्योतीकाकू निर्विकारपणे काम करत होत्या.

"माझ्यापोटी असला मुलगा जन्माला आला याचेच आश्चर्य वाटत आहे... उत्तर देत नाहीये नालायक की काय केलं पैशांचं...आता बाबा आले आणि बसले फटके की समजेल.... मग पडेल बाहेर... काय केलं पैशांचं ते.. काय केलंस??.. कुठे आहेत पैसे??? पैसे कुठे आहेत?????... येउदेत बाबांना... तोपर्यंत उभाच राहा.. हालायचं नाही..."

काही वेळ गेल्यावर रवीच्या वेदना कमी झाल्या. उभे राहून ताण पडत असला तरी फटक्यांनी झालेली जळजळ आता होत नव्हती. आता खरे सांगायचा धीर एकवटू शकला तो.

"आई... मी पैसे घेतले होते..."

आई आणि ज्योतीकाकू हातातली कामे सोडून त्याच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या... डोळ्यात पुन्हा नवा राग ओतत आईने तारस्वरात विचारलं...

"काय केलंस त्या पैशांचं???"

"बॉल आणला... हरिशचा बॉल माझ्यामुळे हारवला होता... म्हणून त्याला आणून दिला..."

"गधड्या... मला विचारलं का नाहीस???"

"मला हरिश आणि त्याचा भाऊ सारखे ओरडत होते आणि खेळायला घेत नव्हते ... बॉल आणल्याशिवाय येऊ नकोस म्हणत होते...."

"मला विचारलं का नाहीस पैसे घेऊ का म्हणून????? मी नाही म्हणाले असते?????"

"नाही... पण त्यांचा बॉल मी हारवला म्हणून मारलं असतंस..."

"आणि चोरी केल्यावर दिवे ओवाळले असते???"

"मी चोरी नाही केली... मी पर्समध्ये तुझ्यासाठी पत्र ठेवलं आहे..."

आई पर्सकडे धावली.

पर्समध्ये लहान चिठ्ठी होती.

"आई, मी दहा रुपये घेतले आहेत, मोठा झाल्यावर ते परत देईन. माझ्याकडून चूक झाली म्हणून हरिशला नवीन बॉल आणून देण्यासाठी पैसे घेतले. रागवू नकोस. बाबांना सांगू नकोस. मी नक्की परत देईन"

=======================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोलकरीण म्हणजे घरची परीस्थिती देखील चांगली असणार..
तरी पण दहा रुपयांसाठी????????

.........

कुठेतरी वाचलेली एक छोटीशी कथा.. थोडक्यात सांगतो..

बाबा नवीन कार धुत असतात..
मुलगा जवळच काहीतरी किडे करत असतो..
बाबांचे लक्ष जाते.. पाहतात तर तो दगडाने कार खरडवत असतो..
बाबा भडकतात.. नवी कोरी कार आणि याने आपल्या मस्तीने तिची वाट लावली..
संतापाच्या भरात.. एक दगड उचलून त्याची बोटे ठेचून काढतात..
संतापाच भर ओसरतो.. आणि लक्षात येते आपण काय केले..
मुलाची बोटे रक्तबंबाळ झाली असतात..
त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात..
डॉक्टर निदान करतात.. मधील दोन बोटांची हाडे फ्रॅक्चर.. आता पुन्हा जोडली जाणे मुश्किल..
बाप उदास होऊन मुलाला घेऊन घरी येतो..
मुलाला झोपवून बाहेर येतो..
सहज कारवर नजर टाकतो तर मुलाने काहीतरी खरडवलेले दिसते..
जवळ जाऊन वाचतो तर... मटकन खालीच बसतो..
तिथे लिहिलेले असते..
"आय लव यू डॅडी.."
Sad

>>अर्रे मग एव्हढा मार खाऊन नंतर का सांगितलं.. आधीच सांगायचं ना त्याने..<<
तेवढाच आईच्या हाताला व्ययाम मिळेल, असा सुज्ञ विचार केला असेल त्या कार्ट्याने....!! Lol

बेफींची कथा ...आवडली. खुप मस्त.

अभिषेक चा प्रतिसाद ही आवडला.

नात्यात विश्वस् नसेल तर असच होतं. मोलकरणी समोर मुलाला ओरडणारी आई फार बेजबाबदार.

हम्म,,, Sad चोरीचे लेबल मुलांना गुन्हेगार बनवते. खुदा बचाये बच्चोको ऐसे नौटंकी पेरेंटस से..

अर्रे मग एव्हढा मार खाऊन नंतर का सांगितलं.. आधीच सांगायचं ना त्याने..

पण त्यांचा बॉल मी हारवला म्हणून मारलं असतंस..."

त्या मुलाला माराची वाटलेली भिती म्हनुन तो बोलला नाहि काही

खुपच छान लिहिता तुम्ही...वाचतच राहावसे वाटते.....तुमची प्रत्येक कथा वाचताना डोळे पाणावले नाही असे झाले नाही....खुप मस्त्.....

Pages