जाता जाता...

Submitted by वैभव फाटक on 31 May, 2012 - 12:38

धीर सोडुनी नकोस हारू जाता जाता..
स्वप्नाला सत्यात उतारू जाता जाता....

किती वादळे घेरून आली अवती भवती..
कलंडणारी नौका तारू जाता जाता....

तेल तूप नेताना नेले धुपाटणे ही..
दैवाला या जाब विचारू जाता जाता....

जगा कळू दे लाख सोसले जीवनभर मी..
आता संकट नको निवारू जाता जाता....

शुष्क प्रदेशी तडफडणारी जमात अमुची..
अवर्षणाने नकोस मारू जाता जाता....

लोचनास मी छळता थोडे आक्रंदाने..
अश्रू वदले "संप पुकारू" जाता जाता....

---- वैभव फाटक (०२-०२-२०१२) ----

गुलमोहर: 

वैभव
मस्त गझल, आवडली

तेल तूप नेताना नेले धुपाटणे ही..
दैवाला या जाब विचारू जाता जाता....
हा शेर विशेष आवडला.

चांगली गझल आहे.

बेफिंनी उद्धृत केलेल्या शेरात संदिग्धता आहेच.

दुसरं एक -
वैयक्तिक पातळीवर मला स्वतःला 'सोडुनी' हा प्रयोग पटला नाही. जसं शेरात भरीचे शब्द टाळायला हवेत, तसेच माझ्या मते ही 'नी'कारान्त, 'या'कारान्त रुपंही भरीचीच आहेत. हे विशेष खटकण्याचं कारण की हा शब्द मतल्यातच आला आहे. म्हणजे तो गाताना/ सादर करताना पुनरावृत्त होणार आहे.

हे माझे वैयक्तिक मत आहे. ते चुकीचे असल्यास अवश्य सांगावे.

धन्यवाद!

रणजीत, अचूक सांगितलेस.....एकदम मान्य.
'शुष्क प्रदेशी तडफडणारी जमात अमुची..
अवर्षणाने नकोस मारू जाता जाता...>>>>>> '
आम्ही आधीच कोरड्या भागात( जीवनाश्यक गोष्टींचा जिथे तुटवडा आहे) रहात असल्याने संघर्ष करत आहोत. त्यात आणखी दुष्काळ(अवर्षण) आणून आम्हास मारू नकोस असे विधात्यास गझलकार सांगत आहे.
एक मान्य की 'जाता जाता' या रदीफ ला न्याय मिळत नाहीये. त्यामुळे कदाचित शेर संदिग्ध वाटला असावा.
प्रतिक्रियेबद्दल आभार.