पालक कबाब

Submitted by लोला on 25 May, 2012 - 14:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची एक जुडी
४ मोठे बटाटे
पुदिना
कोथिम्बीर
हिरव्या मिरच्या
एक वाटी मूग डाळ, भिजवून
आले लसूण पेस्ट
धणे जीरे पावडर
गरम मसाला
मीठ
चवीपुरती साखर
काजू

क्रमवार पाककृती: 

-बटाटे उकडून किसून घ्यावेत.
-पालक धुवून मिक्सर मधे २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावा.
- पुदिना, कोथिम्बीर, मिरच्या बारीक चिरावे.
- भिजवलेली डाळ वाटावी व सगळे मिक्स करावे.

- या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत व थोडे चपटे करावेत.
- प्रत्येक काजूचे उभे २ तुकडे करावेत. एक तुकडा प्रत्येक कबाबच्या मधे बसवावा म्हणजे शोभा येते.

हे तयार करुन अर्धा तास फ़्रीज मधे ठेवावे . नंतर आयत्या वेळी तळावेत. (शॅलो फ्राय केले तरी चालतात, वरुन रवा - ब्रेडकम्स असे काही लावावे लागत नाही.) पालकाचा हिरवा रंग आणि वरुन लावलेले काजू यामुळे हे कबाब छान दिसतात आणि लागतात पण. कांदा व लिंबू याबरोबर सर्व्ह करावे व वरुन थोडा गरम मसाला भुरभुरावा.

पालक चिरुन, किंवा चॉपरमधून कापून-
pk1.jpg
मुगाची वाटलेली डाळ, याहून जास्त पातळ नको.
pk2.jpg
बटाटा, पालक, इतर जिन्नस मिक्स केलेले-
pk3.jpg
गोळा करुन फ्रीजमध्ये ठेवले (कबाब बनवूनच फ्रीजमध्ये ठेवू शकता)
pk5.jpg
मग कबाब बनवून ग्रिडलवर शॅलो फ्राय केले. पॅनवरही तेल टाकून करता येतील. प्रत्येक कबाब पॅनच्या बाजूला टेकवून किंवा उभा फिरवून बाजूला थोडी आच लागू द्यावी.
pk8.jpgpk10.jpg

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोक
अधिक टिपा: 

पालक पाणी न घालता chopper मधे बारीक करुन घेता येतो. मुगाची डाळ पटकन भिजते. गरम पाण्यात टाकली तर अगदी १५ मिनिटात. ती पण फार बारीक वाटू नये. पुदिना ऐवजी मी चाट मसाला घातला २ लहान चमचे. मग वरुन गरम मसाला टाकला नाही. खरपूस शॅलो फ्राय करावेत. कान्दा, लिम्बू तसंच आंबटगोड चटणीबरोबरही छान लागले.

माहितीचा स्रोत: 
रंगी (Rangy). मूळ रेसिपी इथे आहे- http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/126213.html?1155310405
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो नंतर टाकेन.
मूळ रेसिपीच्या लिंकवर अजून चर्चा आहे. तसेच इतर उद्बोधक माहिती मिळेल. 'भांडी व उपकरणे' धाग्याची जन्मकथा. इ.

फार सहि होतात हे! याच रेसिपीने केले होते एक-दोनदा.(डाळ किंवा पालक वाटताना पाणि जपुन घाला मिश्रण सैल झाले तर कबाब वळायला त्रास होतो.)

काजूचे तुकडे लावायच्या टिप बद्दल +१ अगदी सुगरणीचे लक्षण आहे हे. लाल भोपळ्याचे घारगे करतात त्यातही मी असे काजू लावत असे त्याची आठ्वण आली. आता दोन्ही पदार्थ परत करून बघितले पाहिजेत.

मी पण काल केले. मस्त झाले होते. लोलाच्या टीपेनुसार चाट मसाला घातला, पण मिश्रणात नाही, कबाब भाजून झाल्यावर वरून भुरभुरवला.

एक फु. स. :
पालकाची पेस्ट करून झाली की ती सूप गाळायच्या गाळण्यावर साधारण अर्धा तास टाकून ठेवा. म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल, आणि मिश्रण सैल होण्याची भिती राहणार नाही.

दक्षिणा, मेथी-मटार वापरु शकतेस. पण भाजी वाटू नको, बारीक चिरुन घे. मिसळण्यापूर्वी मायक्रोवेवेमध्ये मिनिटभर ठेवली तरी चालेल.

जागू, मिश्रण थोडं कोरडं आणि घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात. मग कबाब नीट बनवता येतात, उलटताना मोडत नाहीत. तसंच यामुळे पदार्थ चिवट होत नाही. काही कुकी रेसिपीजमध्येही असे सांगितलेले असते.

पराग, हो. नो नट. काजू ऐच्छिक.

पालक नुसता बारीक चिरून घ्यायचा की पेस्ट करायची?
उद्या सकाळी लेकीच्या समरकॅम्प पार्टीसाठी करावे म्हणते. आज रात्रीच फ्रिजमध्ये मिश्रण ठेवले आणि उद्या शॅलोफ्राय केले तर चालेल ना?

प्राची, मूळ रेसिपीत वाटून घ्या म्हटलंय. पण मी नेहमीच बारीक चिरुन/चॉपर मधून काढून घालते. रात्री फ्रिजमध्ये ठेवून सकाळी केले तर चालेल. पण फ्रीजमधून काढल्याबरोबर लगेच कर. आधी फारवेळ बाहेर काढून ठेवू नको, पाणी सुटेल.

अश्विनी भयानक सुंदर हा काय प्रकार असतो??
नेमका भयानक कि सुंदर?? फिदीफिदी
लोलादी मस्त वाटतिये रेसिपी'
करुन पाहिन

Pages