तरपत हूं जैसे......२ अंतीम भाग

Submitted by jayantckulkarni on 24 May, 2012 - 23:15

त्यांच्या तोंडातून ते गाणे येणे माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते. नकळत माझ्या मनात “तो म्हातारा” चे “ते आजोबा” झाले. मी पटकन पुढे झालो आणि त्यांना सावरले. त्यांच्या आवाजात कंप जरूर होता पण स्वरात जादू होती. मला क्षणात जाणवले ते म्हणजे गाणे आणि सूर ह्रदयातून येत होते. नुसते टेक्निकल गाणे नव्हते ते...मी त्यांना सावरल्यावर मी सहजच तीच तान गुणगुणलो. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले आणि म्हणाले...अरे व्वा ! छान...गाण्याची आवड हाय वाटतं”
“हो काका आणि तुम्हीही चांगले गाता”.
“हंऽऽऽऽऽऽ“ त्यांनी एक सुस्कारा सोडला. “एक सिगारेट देतोस का ?”
मी तत्परतेने एक सिगारेट काढून त्यांच्या ओठात ठेवली आणि ती पेटवत नैसर्गिकपणे विचारले “गोल्ड फ्लेक आहे चालेल ना ?
“आता मला बिडीही चालते....आता ५५५ परवडत नाही बाबा....ही शेवटची ग्लेनफिडिश....हे हॉटेल आहे ना हेही माझेच....”
मला वाटले या आजोबांना आता बहुदा चांगलीच चढलेली दिसते. यांना घरी सोडलेले बरे....
“इथेच थांबा मी गाडी घेऊन येतो, सोडतो तुम्हाला....”
“माझ्याकडे पैसे नाहीत आता तुझा पगार करायला...” असे बरळत असतानाच त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले.
त्यांना तसेच तेथे टाकून मी गाडीकडे पळालो, गाडी सुरू करून ते पडले होते तेथे आणले, डावीकडचा दरवाजा उघडून त्यांना कसेबसे आत टाकले. माझी जागा घेतली आणि स्टार्टर मारला.... पुढे काय... जायचे कोठे.. काय करावे काही सुचेना. नशीब माझे म्हातार्‍याने डोळे उघडले. हे सगळे अंगलट तर येणार नाही ना असा एक स्वार्थी विचारही मनात येऊन गेला पण मनात ते स्वर गुंजत होते... म्हटलं चला काय होईल ते होईल हे प्रकरण तडीस नेऊया.

गाडी तशीच पुढे दामटली. जरा वारा लागल्यावर आमच्या दोघांचीही धुंदी जरा उतरली.
“काका, कुठे सोडू तुम्हाला ? बघा पहाटेचे ४ वाजले. पटकन सांगा मलाही घरी जायचे आहे.”
“इथेच सोड मला मी जाईन चालत”
“नको ! त्यापेक्षा पटकन सांगा” मी वैतागून म्हणालो.
“लातूर रोड...” मी तिकडे गाडी वळवली. गावाबाहेर ५/६ मैल आल्यावर एकदम त्या ओसाड जमिनीवर, जेथे एकही झाड आत्तापर्यंत दिसले नव्हते, तेथे एक झाडांचे बेट दिसले. आजुबाजुला एकही घर नव्हते. मी त्यांना उठवत म्हणालो “काका उठा जरा बघा..येथे तर काहीही दिसत नाही. चुकलो तर नाही आपण ?”
त्यांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि एकदम म्हणाले “ अरे थांब! अरे थांब येथेच राहतो मी !”
“इथे ? विश्वास न बसून मी विचारले.
“हो इथच रे बाबा इथच ! दिसत नाय का तुला ?” त्यांनी जवळजवळ जमिनीवर सपाट झालेल्या दगडांच्या ढिगांकडे बोट दाखवले.
“येतोस का आत ? थोडी आहे शिल्लक अजून..”
“नको आता जातो. उशीर झाला.”
“अरे ये ! नाय म्हणू नको. चल तुला अशी गोष्ट दावतो की तू इथेच गटांगळ्या खायला पाहिजे”
मी चमकून त्यांच्याकडे बघितले ’हा हा ते गाण्यात गटांगळ्या म्हणत असावेत’ मी मनाशी म्हणालो.
“ बर चला पण आता ड्रिंक्स नाही. कबूल ?”
“बर राहिलं चल तर खरं !”
त्यांच्या हाताला धरून मी त्यांना घेऊन जायला लागलो तर म्हातार्‍याने माझा हात झटकला. चायला स्वत:च्या गल्लीत आल्यावर....

समोर बघितले तर त्या भल्या मोठ्या वाड्याचा वरचा सगळा भाग पडून गेला होता आणि तळघरात जायचा दरवाजा जोत्याच्या थोडासा वर आला होता. अच्छा म्हणून मगाशी काही दिसले नव्हते तर. त्या नक्षिकाम असलेल्या दरवाजाला ना होते कुलप ना कडी. सागवानी असणार तो. मोठ्या कष्टाने त्यांनी तो ढकलला आणि भयपटात दाखवतात तसा आवाज करत तो उघडत जाऊन भिंतीवर आपटला. त्याबरोबर तो आवाज घुमला आणि मी दचकलो.
“ये ये आत ये !” त्यांच्या मागे जात मी ते तळघर न्याहाळू लागलो. जमिनीवर सगळीकडे दगड, खडी पसरली होती. छतात मोठमोठ्या भेगा पडून त्यातून माती मिश्रित चूना गळत होता. भिंतीवर असलेल्या ओलीचा कुबटवास सगळीकडे पसरला होता. हा म्हातारा एकटा येथे रहात असेल तर कठीण आहे.एका छताला असलेल्या कवाडातून पहाटेचा कोवळा प्रकाश आत झिरपत होता आणि त्याच्या तिरप्या किरणांमधे धुळीचे असंख्य कण आत बाहेर करत होते. तेवढीच काय ती हालचाल होती त्या तेथे. मी त्यांच्या मागे जात कशाला तरी आडखळलो, बघतो तर एका पिआनोचा पाय होता तो. त्या पिआनोची अवस्थाही अशी झाली होती की एखादी शुल्लक पेटी असावी. तेवढ्यात डावीकडे असलेल्या दरवाजाची कडी काढल्याचा आवाज झाला आणि आम्ही एका मोठ्या खोलीत प्रवेश केला. येथेही धुळीचे साम्राज्य होतेच पण येथे जरा वावर दिसत होता. आता किती वेळ जाणार आहे कोणास ठाउक असे मी मनाशी म्हणणार तेवढ्यात त्यांनी त्या पलंगापाशी जमिनीवर बसकण मारली आणि ते पलंगाखाली असलेल्या वस्तूशी झटापट करू लागले. त्यांना मदत करायला मी उठणार तेवढ्यात ते ओरडले “जपून खाली बघ...पाय देशील.” मी बघितले तर एक लाकडाची सुंदर नक्षिकाम केलेली पेटी तेथे पडलेली. एखादे किमती वाद्य असणार तेथे.

आजोबांनी पलंगा खालुन एक मोठी पेटी बाहेर ओढायचा प्रयत्न चालवला होता अर्थात त्यांना एकट्याला ते शक्यच नव्हते. शेवटी ती जड पेटी मी बाहेर काढली. हाशहुश करत ते म्हणाले
“हा ! उघड ती आता.”
मी ती उघडली आणि बघितले तर माझी छातीच दडपली. एवढ्या संख्येने काळ्या तबकड्या मी तरी पाहिल्या नव्हत्या. वरचीच मी घेतली कोलंबियाची अमीरखाँसाहेबांची...
“मग बरं झाल का नाय आत आलास ते !” आजोबा विचारत होते.
मी भानावर येत म्हणालो “ काका मी निघतो आता. उद्या संध्याकाळी येतो मग गप्पा मारू”
“ये ! ये ! पण....” कसे सांगावे ते त्यांच्या लक्षात येईना.
“आलं लक्षात. त्याची काळजी करू नका” मी म्हणालो आणि उठलो, त्यांचा निरोप घेऊन पळतच गाडी गाठली आणि घर गाठले.
उठलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते.
१ जानेवारीला तसेच काही काम होत नाही. मी कामाला गेलो पण कामात लक्षच नव्हते. डोळ्यासमोर सारखे त्या तबकड्या आणि तो वाडा येत होता. कशीबशी चार पर्यंत कळ काढली आणि लातूर रोड पकडला. जाताना व्हिस्कीच्या दोन बाटल्या आणि सोड्याच्या सहा बाटल्या घेतल्या आणि ते झाडांचे बेट गाठले. धाकधूक होती म्हातारबा भेटतोय की नाही. पण नाही बाहेरच एका झाडाखाली परवाचाच फाटका, ठिकठिकाणी उसवलेला सूट घालून झोपले होते. बहुतेक त्यांच्याकडे घालण्यासारखे हेच कपडे असावेत. उठवावे का यांना का झोपू द्यावे काय करावे समजत नव्हते. अखेरीस धीर करून त्यांच्या खांद्याला स्पर्ष केला. त्यांनी हळूच डोळे उघडले व मला ओळखून त्यांनी स्मित केले.
“चला...” माझा आधार घेत ते म्हणाले.
खोलीत गेल्यावर बघितले तर ती पेटी तशीच उघडी पडली होती. वाद्याच्या पेटीतून एक सुंदर सारंगी डोकावत होती आणि शेजारी भेळेचे कागद पडले होते. ते सगळं साफ करत मी म्हणालो “हं सांगा कुठे बसायचे ?”
“इथेच आणि कुठे ? त्या कपाटात भोंगा आहे बघ तो काढ. त्याच्या सुयाही असतील त्याही काढ. तुला काय ऐकायचे आहे ?”
“काका मला सांगा ही सारंगी कोण वाजवत होतं ?”
“मीच दुसरे कोण......
“मग आज आपण जमेल तेवढी सारंगीच ऐकू”
“ही सारंगी साधी सुधी नाही माझ्या वडिलांना बुंदूखाँसाहेबांनी बक्षीस दिली आहे. बघ केवढीशी आहे ती. पण गळ्याशी हीच गळा लावते बघ.....”
१ जानेवारीला संध्याकाळी जी मैफिल आम्ही जमवली तशी मी माझ्या आयुष्यात कधीही जमविली नव्हती आणि जमवीन असे वाटत नाही. म्हातार्‍याने सारंगी कशी ऐकायची हे शिकवले त्या दिवशी. अर्थात एक व्हिस्कीची बाटली संपली आणि रात्रीचे दोन वाजले.
उद्या परत यायचे ठरवून त्यांचा निरोप घेणार तेवढ्यात ते म्हणाले “ ती दुसरी बाटली घेऊन जा, उद्या परत आण.”
“उद्या आपण रेकॉर्डस ऐकू” मी म्हटले.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नेहमीचे सामान व खाण्याचे चांगले पदार्थ घेऊन मी आपला परत बेटावर हजर. आजचा दिवस तर कधीही न विसरता येण्यासारखा. ऐकावे तेवढे अचाट... रात्रीचे २ वाजल्यावर मी म्हटले “काका तरपत हूं जैसे जलबीन मीन” म्हणाना.
“नको ते नको. ते तू ऐकले आहेस. हे ऐक ! हे मला एका भिकार्‍याने शिकवले” असे म्हणून त्यांनी त्यांच्या कापत्या आवाजात एक साधे गाणे म्हणून दाखवले.

देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...
देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...

आजवरी कधीना मनी
वैर कुणाचे धरिले
परी त्याचे विपरीत हे
फल का रे दिधियले
देवा देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना...

काय असे पाप घडे
शाप पडे त्याचा हा...
पळभर ना शांती मिळे..
धीर धरू कैसा हा....
देवा देवा बाळ मी तुझे ना तु रे कसाई नाही ना..

गाणे म्हणताना आमच्या डोळ्यातून केव्हा पाणी वहायला लागले तेच कळले नाही. हे सगळे झाल्यावर माझ्या हातून एक फार मोठी चूक झाली.. घोडचूक म्हणायला हवी.... न राहवून मी एकदम म्हणालो
“काका तुमच्यानंतर हा ठेवा मला द्याल का ?”
झाले म्हातारा बिथरला आणि माझ्या अंगावर धावून आला. हातातला ग्लास, बाटली काय हाती लागेल ते त्याने भिरकावयला चालू केले. चायला मरायचा हा ! नसती भानगड व्हायची म्हणून मी तेथून पळालो. दरवाजात मला गाठून तो ओरडला “ याद राख इथे परत आलास तर. पोलीसात कंप्लेंट करेन. तंगड्या तोडीन तुझ्या.”
त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन मी गाडी गाठली आणि स्वत:च्या हावरटपणाला शिव्या घालत गाडी स्टार्ट केली.

आठवडा झाला या प्रसंगाला. जावे का नको, जावे का नको असा विचार करत मी संध्याकाळी बेटावर पोहोचलो. सगळीकडे अंधार पसरला होता. माझा काही धीर झाला नाही आत जायचा. तसाच परत आलो. नंतर कामानिमीत्त पुण्याला गेलो तो दोन आठवड्याने परतलो. ताराबाई अजून आल्या नव्हत्या त्यामुळे पारिजातवर गेलो. रात्री बाहेर पडलो तर एक मित्र म्हणाला” अरे यार चल तुला एक गाणे ऐकवतो” थोडे दूर चालत गेलो तर एका खांबापाशी हा म्हातारा रस्त्यावर झोपला होता. त्याच्या हातात १० रुपायाची नोट कोंबत आम्ही परतलो. मला त्याच्याकडे जायचे होते पण त्याच्या प्रकृतीला आणि पोलिसाच्या धमकीला मी घाबरलो. हळू हळू ही मनाला लागलेली बोच मागे पडायला लागली आणि शेवटी निर्ढवलेल्या मनाने मी माझ्या वागणुकीचे समर्थनही करायला लागलो. पण त्या नंतर एक असा प्रसंग घडला की मी आयुष्यभर स्वत:ला कधीच माफ करू शकलो नाही.....

फेब्रूवारीच्या शेवटाला अखेरीस ताराबाई आल्या आणि आमचा आरामदायी जिवनक्रम परत चालू झाला. एकदा अशाच संध्याकाळच्या पार्टीत गाणी म्हणायचा कार्यक्रम चालला होता. मला आग्रह झाल्यावर माझ्या तोंडून तान बाहेर पडली देऽऽऽऽऽवा बाळ मी तुझे नाऽऽऽऽ तू रे कसाई नाही ना.....त्या दिवशी माझा आवाजही चांगला तापला होता.... तेवढ्यात मित्र काही खुणेने सांगतोय हे माझ्या लक्षात आले. मी गाणे थांबवून बघितले तर ताराबाईंनी हातातल्या ताटासहीत खाली बसकण मारली होती आणि त्या चक्क ढसाढसा रडत होत्या. आम्ही सगळेजण त्यांच्याभोवती जमा झालो. कोणी पाणी आणले कोणी साखर आणली..... सावरल्यावर ताराबाईंनी विचारले “ साहेब हे गाणे कुठे ऐकले तुम्ही ?”
“का हो ? तुम्हाला माहिती आहे का हे गाणे ?”
“माझ्या सासर्‍याची रेकॉर्ड आहे ती. मी जाते आता, उद्या येते.” असे म्हणून त्या तडकाफडकी निघून गेल्या.
आमचाही मुड गेलाच होता. पार्टी आवरती घेत सगळ्यांनी पळ काढला आणि मीही बिछान्याला पाठ टेकवली.

दुसर्‍या दिवशी सकाळी ताराबाईंनी आल्या आल्या माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली...

“वाट बघितली. बाळा, म्हातार्‍याला जरा समजून घेतले असतेस तर बरं झालं असतं. जे काही संगीत आहे ते तुला दिले आहे. जपून ठेव.

सरदार साळूंके”.

मला रडताही येईना. घुसमट म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळाले.
मी प्रश्नार्थक नजरेन ताराबाईंकडे बघितले.
“चला साहेब आपल्याला ते सामान गोळा करायला जायला पाहिजे आता.”
“अहो पण झाले तरी काय ? मी विचारले.
“काय होणार दारूपायी... गेला तो उमदा माणूस...” मरायच्या अगोदर आम्ही घरी आणला होता. पांढर्‍या फियाटवाल्या साहेबाला हे सगळे द्यायचे वचन घेतले आहे त्याने आमच्याकडून. आता मला वो काय माहीत तुम्हीच ते नाहीतर त्यांची गाठ घालून दिली असती.”

खाली मान घालून त्या तळघरात शिरलो आणि सगळे सामान गोळा केले.

आजही माझ्याकडे पुण्यात माझ्या बंगल्यात ती सारंगी, त्या तबकड्या, तो भोंगा, तो मोडका पियानो... आणि ग्लेनफिडिशची माझी बाटली जी ताराबाईंनी त्यांच्या सासर्‍याला दिली होती या वस्तू मी जपून ठेवल्या आहेत. बायको अनेक वेळा म्हणाली “फेकून द्या हो ही बाटली”.

शेवटी मी शांतपणे ती उचलली आणि माझ्या ऑफिसमधे नेऊन ठेवली.

समाप्त.
जयंत कुलकर्णी.

गुलमोहर: 

खरेच वेगळीच कथा... पहिल्या भागात काहीच अंदाज येत नव्हता.. पण या भागात मात्र कथानकाला वेगळ्याच उंचीवर नेलेत.. सुंदर.. Happy

आवडली,

पण ताराबाईंन्ची कोणती गोष्ट खटकाली होती त्याचा खूलासा नाही केला शिवाय

ताराबाई तुम्हाला इंग्रजी येते ? मी विचारले.
“जावदेत सांगन मी तुमाला कधितरी”... ताराबाई म्हणाल्या.>>> याचाही खूलासा नाही झाला.

पण ताराबाईंन्ची कोणती गोष्ट खटकाली होती त्याचा खूलासा नाही केला शिवाय

ताराबाई तुम्हाला इंग्रजी येते ? मी विचारले.
“जावदेत सांगन मी तुमाला कधितरी”... ताराबाई म्हणाल्या.>>> याचाही खूलासा नाही झाला.

+१