अगदी खरं सांगायचं म्हणजे या पुस्तकाबद्दल काहीही माहीती नसताना अचानकपणे हातात पडलेलं पुस्तक, आनंद यादवांची इतर काही पुस्तकं या आधी वाचली असल्यानं थोडीफार कल्पना मनात आधीच तयार झालेली. परंतु, त्या सर्व कल्पनांना उभा आडवा छेद देत पुस्तकाची पानं उलटत जातात. 'गोतावळा' म्हणजे काय हे आजपर्यंत आपल्याला समजलेलंच नव्हतं अशी स्पष्ट जाणीव करुन देत हे पुस्तक संपतं. सुरुवातीपासून सुरुवात करायची तर सुरुवात अशी काही नाहीच. तेच ते रहाटगाडगं वर्षानुवर्ष चालू असतं. चालू राहणार अशी आपल्याला खात्री असते. पण एक दिवशी अचानक त्याला खीळ बसणार आहे किंवा ते आचके देत थांबणार आहे असं आपल्याला समजलं तर? तर त्यांच प्रत्येक आवर्तन मनावर कातण फिरवत जातं. हे अव्याहत वाटणारं चक्र थांबल्यावर ते कधी काळी इतकं अविरत चालू असल्याच्या खुणा मागे सोडत ते आपला वेग मंदावतं आणि खरोखरीच थांबतं.
पुस्तकाचा नायक गेली वीस वर्षं मालकाच्या मळ्याची राखण करत तिथल्याच खोपटात एकटा राहतोय. ही वीस वर्ष त्याच्या आयुष्याच्या जडणघडणीची. पाच ते पंचवीस. कल्पनाशक्तीला, निरीक्षणशक्तीला, जाणीवांना आव्हान देणारी ही सारी वर्ष तो अगदी एकटा काढतो. हे एकटेपणच मग त्याची ताकद बनून त्याला सोबत करतं. कोणत्याही अडचणीला शरण न जाणारा निसर्ग त्याचा सोबती होतो आणि मालकाचा मळा सोन्यासारखा पिकवणारी गुरं त्याचं गणगोत. उभी वीस वर्ष त्याचा पाय काळ्या मातीत रुतलेला आणि हात गाईबैलाच्या तोंडाशी वैरण धरलेला. दोन शब्द बोलायला ज्याला माणूस नाही त्याचं भावविश्व कसं असेल? आपण कल्पनाही करु शकणार नाही असं अफाट मनोराज्य आपल्यासमोर विस्तारत जातं. पहाटे कोंबडा आरवला की दिवस सुरु होणार तो पहिल्यांदा गोठ्यात चारा टाकूनच. शेतीची मशागत करण्यासाठी घ्यावे लागणारे अपार कष्ट, त्यासाठी कमीत कमी खर्चाच जनावरांकडून जास्तीत जास्त राबता करुन घेण्याचा मालकाचा व्यवहारी दृष्टीकोन आणि जनावरांसाठी तीळ तीळ तुटणारं नायकाचं काळीज. तट्स्थ वृत्तीनं पाहिले तर जे ते आपल्या जागी बरोबर. पण भावनिक पातळीवर विचार करता नायकाची बाजू जास्त बरोबर.
'अगंबाई अरेच्चा!' हा सिनेमा जिथं संपतो - म्हणजे जेव्हा नायकाला प्राण्यांचे आपापसातले संवाद समजायला लागतात - तिथं हे पुस्तक सुरु होतं ही एका वाक्यात सांगाता येईल अशी मेख आहे. पण ज्या कौशल्यानं यादवांनी प्राण्यांच मनोज्ञ भावविश्व रेखाटलं आहे त्याला तोड नाही. या ठिकाणी संदर्भ द्यायचा झाला तर तो श्री.दा. पानवलकरांच्या झक्कूचा किंवा सुंदर चा देता येईल. परंतु ही संपूर्ण कादंबरी एका विशिष्ट प्राणीवर्गापुरती मर्यादित न राहता, खेडेगावात रोजच्या शेतीच्या कामांमध्ये, ऋतुबदलाप्रमाणे सान्निध्यात येणार्या एकूणच प्राणी, पक्षी, झाडं वेली, मातीलाही बोलकं करते. मग त्यात कोंबडा, कोंबडी, पिल्लं, गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळी, बकरे, करडू, कुत्रा, कासव, मांजर, घोडा, ससा, तित्तर, धामीण, मोर, लांडोर, कावळे, खंड्या, घुबड्, मधमाश्या, कोल्हे, गाढवं, खेकडे, पैसा, गांडूळं, डोंगळे अशी मोठी फौज येते. या सर्व प्राण्यांचे मनोविश्व हळूच उलगडत पाहताना नायक आपले माणूसपण विसरत नाही कधीकधी तर त्याला चक्क खंतही वाटते स्वतःच्या माणूस असण्याची!. माणसाच्या संदर्भातून प्राण्यांच्या व्यवहारांचे अर्थ लावण्याची त्याची धडपड मनोमन कौतुकास्पद वाटते, इथे खरंतर ती केविलवाणी किंवा क्वचित हास्यास्पदही ठरण्याची शक्यता होती. परंतु यादवांनी संयत आणि मोजक्या शब्दांचा वापर या एका आधारावर हा संपूर्ण मनोरा आपला रांगडा पोत सांभाळत उभा केला आहे. त्यामुळेच वाचकाच्या विचारशक्तीला वाव देणार्या काही पुस्तकांपैकी हे एक म्हणावे लागेल.
निमित्त होतं मालकाच्या डोक्यात बदलाची चक्रं फिरु लागण्याचं, तीन महिन्याच्या कामासाठी गुरांना वर्षभर सांभाळा, दाणा वैरण् करा, दुखलं खुपलं पहा, औषधपाणी करा त्यापेक्षा तेच काम ट्याक्टर कधी पण, कवा पण, किती पण आन शिवाय कमी पैशात करतोय तेव्हा औंदा गोठा रिकामा करायचाच - असा मालकाचा सरळ साधा हिशेब. जिथं मळ्याची राखण निगुतीनं, प्रामाणिकपणानं होणार नाही म्हणून मालकानं आपलं लगीन लावून दिलं नाही तिथं त्याला या मुक्या म्हातार्या जनावरांचा कुठून कळवळा यायला? तो पडला फक्त मळा अन गुरं राखणारा गडी. हुकुमाचे ताबेदार असणं म्हणजे काय ते समजतं - रोज आपल्याला जागं करणार्या, आपल्या अवतीभवती घुटमळणार्या कोंबडयावर नायकालाच जाळं टाकून मारायला लागतं आणि शिवाय इतर लोकांसोबत ह्यॅ: ह्यॅ: हसत खावंही लागतं - त्या झणझणीत प्रसंगातून. सकाळी उठल्यावर ती पिसं पाहून नायकाच्या पोटात कालवाकालव होते आणि कोंबड्यानं पोटातूनच खच्चून भांग दिल्याचा भास होतो तेव्ह अक्षरशः शहारे येतात. अशा अनेक ह्रद्य, तर कधी मनोरम प्रसंगांचे चित्रण म्हणजे गोतावळा. असून अडचण आणि नसून खोळ्ंबा म्हणजे गोतावळा.
निसर्ग रोज कणाकणानं बदलत असतो, कालचा देखावा आज नसतो हे यादवांनी अत्यंत अलगदपणे आपल्यापुढे मांडले आहे. १९७१ साली अशा स्वतंत्र् मर्यादित विषयावर कादंबरी लिहीणे हा एक धाडसी प्रयोग असेल. तो तेव्हा किती यशस्वी झाला माहीत नाही. पण एका अनोख्या मनोविश्वाचे दालन आपल्यासमोर उघडे करणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे यात शंका नाही. ग्रामीण भाषेच्या अजिबातच गंध नसलेल्या माझ्यासारख्या वाचकाला पहिली चार पाने जड जातीलही पण तरीही त्या रसाळ कथनात गुंगवून टाकणारा गोडवा आहे, शेताकडेला उभं राहून नजर खिळवून ठेवणारी दृश्य आहेत आणि ती ढोरमेहनत पाहून पीळ पाडणारे, मन हेलावणारे नाट्य आहे. रोजच्या आयुष्यात नावीन्य शोधायला लावणारी कल्पकता आहे., प्राणीविश्वापासून दुरावत चाललेल्या आपल्या आणि पुढेही येणार्या अनेक पिड्यांकरता जपून ठेवावा असा वारसा - गोतावळा.
ता. क - वाचनालयातून आणलेल्या १९७४ सालच्या आवृत्तीच्या या पुस्तकावरची छापील किंमत होती - रु. ९.५० ! हे पुस्तक जितके असेच जपून ठेवू तितकी या छापील किंमतीची किंमत वाढत जाईल नाही?
ह्या पुस्तकाविषयी प्रथमच
ह्या पुस्तकाविषयी प्रथमच वाचलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचायला हवं.
परीचय उत्तम करुन दिला आहात.
सुंदर परिचय. खूप आवडला
सुंदर परिचय. खूप आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(अवांतर - 'भांग'चं 'बांग' करणार का?)
खूप आवडला पुस्तक परिचय !
खूप आवडला पुस्तक परिचय !
आवडला परिचय मस्त लिहिलं आहे
आवडला परिचय
मस्त लिहिलं आहे
आशूडी कित्येक वर्षापूर्वी
आशूडी
कित्येक वर्षापूर्वी वाचलं होतं आणि प्रचंड आवडलं होतं!
..माणसाला बघून त्येच्या
..माणसाला बघून त्येच्या वार्याला कोणचंबी पाखरू थरकत न्हाई. एखाद्या वक्ती पाखराजवळ पाखरं बसतील, जनावरांच्या पाठीवर बसतील; पर माणसाच्या जवळसुदिक यायची न्हाईत.. माणसांचा घाण वासबी एखाद्या वक्ती येत असंल त्यांस्नी..!
--
पुस्तकाबद्दल आणखी काही लिहायची गरजच राहिली नाही इतका सुंदर परिचय करून दिला आहेस. काहीतरी छोट्यामोठ्या स्वार्थापोटीच एकत्र येणार्या माणसांच्या गोतावळ्यापेक्षा हिरव्या माळावरचा असंख्य प्राण्यांचा हा निरागस गोतावळा पानोपानी आपल्याला मोहवून टाकतो. नुसतंच चारा खाणं, मोट आणि नांगर ओढणं, दुध देणं याच्याही पलीकडचं त्यांचं मनोज्ञ विश्व आनंद यादवांनी ज्या ताकदीने रेखाटलं आहे, त्याला तोड नाही. कोंबडी मेल्यानंतर पिल्लांची जबाबदारी अवचित अंगावर पडलेला पण मादी नसल्याने बेभान-आक्रमक होणारा कोंबडा, पाडीसाठी भांडणारी सोन्या-चाण्ण्या ही तरणी बैलजोडी आणि, आयुष्य जगून अनुभवून अंतर्मुख झालेला म्हातारा म्हालिंग्या बैल, काहीच कळत नसल्याने गुमान बाजारची वाट चालणारे रेडे- यासारखी वर्णने करताना यादवांची शैली सर्वोच्च पातळी तर गाठतेच; पण साध्या- जनावरांच्या वैरण खाण्यातून, कामं करण्यातून, स्वामीनिष्ठा व्यक्त करण्यातून, एकमेकांबद्दल प्रेम-आस्था-आकर्षण दाखवण्यातूनही त्यांची ही शैली ज्या पद्धतीने जनावरांना व्यक्त करते- ती महान आहे. पानापानांतून सहज येणार्या शब्द आणि भाषेच्या प्रयोगांपाशी आपली नजर रेंगाळत राहते. कोंबड्याचं, चंपी आणि नाम्या या कुत्र्यांचं, घोड्याचं, म्हालिंग्याचं मरण आपल्याला चटका लावून जातं, हलवून जातं. एकेक जनावर मालकाची गरज संपेल तशी बाजाराची आणि उरलेली जनावर मरणाची वाट धरू लागतात तसं या सार्या गोतावळ्याशी नाळ राखून असलेल्या सडाफटिंग नायकाचं विश्व हळूहळू उध्वस्त होत जातं आणि तोही नाईलाजाने जनावरांसारखीच बाहेरची (की मरणाची?) वाट धरताना घायाळ होऊन म्हणतो- 'जिवाला बरं नसल्यागत मळा दिसत हुता.. सबंध माळावर कुठं झाड, डगरी, वारूळ.. कायबी दिसत नव्हतं.. आता या माळावर ढोरं कशाला येतील नि पोरं तरी कशाला येतील? ...चला, रग्गड झालं आता. आता नगंच र्हायाला.. समदा गोतावळा घेऊन असंच माळानं माळ हुडकत जाऊ. मळा हुडकत जाऊ. हितं आता कोण हाय आपलं?'
--
१९६० नंतरचा दहा-बारा वर्षांचा काळ हा मराठी कादंबरीसाठी महत्वाचा काळ होता. खोट्या अवास्तव चौकटींत अडकून पडलेल्या कादंबर्या धाडसाने वास्तव मांडू लागल्या त्या याच काळात. जगणं अधिक ठोस, धाडसी पद्धतीने मांडणार्या या लेखकांवर साग्रसंगीत आणि कंपूबाज टीकाही झाली. पण सामान्य मध्यमवर्गाला कधीही खरी न होणारी स्वप्ने जशी आवडतात, तसंच त्याचं जगणं, त्याचे छोटे मोठे चटके, त्याची कधीच सांगता न येणारी आणि आजवर फारशी किंमत न मिळालेली सुखदु:खं अधिक सच्च्या पद्धतीने मांडणार्या इथल्या मातीतलं लिखाणही आवडतं, हे सिद्ध झालं. या नवीन प्रवाहाचे पहिले मानकरी म्हणून धग, इंधन, माणूस, टारफुला, किडे, वैतागवाडी, वासूनाका, चक्र, रथचक्र, माणदेशी माणसं, कोसला, सात सक्कं त्रेचाळीस, अग्रेसर, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर यांची नावं घेता येतील. 'गोतावळा' हे या यादीतलं मानाचं नाव म्हणावं लागेल.
भांग चे बांग >> अगं, संपूर्ण
भांग चे बांग >> अगं, संपूर्ण पुस्तकात ते ग्रामीण भाषेत 'भांग'च लिहिले असल्याने तसेच लिहिले आहे. (मी वरती लिहिताना ते अवतरणचिन्हात टाकायला हवं होतं.)
काहीतरी स्वार्थापोटी.... मोहवून टाकतो. >> अगदीच! जीवाला जीव लावणारा हा गोतावळा.
(अवांतर- वरच्या पोस्टीतली काही पुस्तकांची नावं म्हणजे निव्वळ पुस्तकं नसून अंजन आहेत खरं. 'टारफुला'बद्दल स्वतंत्रपणे लिहिलं गेलं आहेच. त्या यादीतल्या, नुकत्याच वाचलेल्या 'वैतागवाडी'बद्दल लिहायचा आता मोह होतो आहे. 'वैतागवाडी'म्हणजे महानगरीय धबडग्यात पायाखालची जमीन आणि डोक्यावरचे छप्पर टिकवून ठेवण्यासाठी एका सामान्य पांढरपेशा नोकरदाराला कराव्या लागणार्या यातायातीचा श्वासागणिक मांडलेला हिशोब आहे. सामाजिक दबाव बनून औद्योगीकरणात मध्यमवर्गीय आयुष्यात होत गेलेले बदल, त्यांचे परिणाम म्हणून नातेसंबंधात वाढते तणाव आणि त्यातून उत्पन्न होणारे मनोविकार, किडत चाललेली मूल्यव्यवस्था भाऊ पाध्ये ज्या तपशीलात मांडतात तितके खरे प्रामाणिक लिखाण क्वचितच झाले असेल. त्यामुळेच सामान्य वाचकाला भाऊ पाध्ये खरंतर आपलेसे वाटायला हवे होते; मात्र बेगडी स्वप्नांच्या चकाचक बाजारात वास्तव अंग चोरून उभे राहते तशातली गत झाली हे आपले दुर्दैव!)
आनंद यादवांची ग्रामिण साहित्य
आनंद यादवांची ग्रामिण साहित्य विश्वातील हि एक अप्रतिम कादंबरी आहे.... ही कादंबरी मी अभ्यासली आहे बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला असताना....
छान पुस्तक परिचय. इथे
छान पुस्तक परिचय.
इथे अमेरिकेत आहे का कुणाकडे हे पुस्तक ? असल्यास उधार मिळेल काय ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आनंद यादवांनी लिहलेली
आनंद यादवांनी लिहलेली प्रत्येक कादंबरी हा प्रयोग म्हणावा असे वाटते. काही वेळा हा अंगाशी आला तर नटरंगच्या रुपाने लोकांनी डोक्यावरही घेतला. अर्थात नटरंगचे मुळचे लेखक म्हनुन आनंद यादव किती जणांच्या स्मरणात असावेत याबाबत शंका आहे.
पुस्तक परिचय उत्तम लिहल आहे.
मस्त परिचय आशूडी..
मस्त परिचय आशूडी..