अबोली (फोटोसहीत)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2012 - 01:46

अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटत. तस पाहील तर ह्या फुलांना गंध नसतो तरीपण न बोलता मनाच्या कोपर्‍यात ही फुले कुठेतरी घर करून बसतातच त्याला कारण आहे त्यांच गोंडस रुपड, सणासमारंभात असलेल ह्या फुलांच स्थान.

अबोलीचे बॉटनिकल नाव Crossandra infundibuliformis असुन ती Acanthaceae (Ruellia family) कुळातील आहे. अबोलीची झाड साधारण ३ ते ४ फुटा पर्यंत वाढतं.

अबोली मध्ये ३ ते ४ जाती आहेत.

ही लाल अबोली ह्याची देठे नाजूक असतात. ही फुले फिक्कट अबोली पेक्षा लवकर कोमेजतात. पाकळ्याही एकदम पातळ असतात.

शेंदरी अबोली. हिची फुले सहसा पुर्ण उमलत नाहीत. कळ्यांप्रमाणेच असतात.

अजुन पिवळी अबोली आणि छोटी गोलाकार अबोली रंगाची अबोली असते. आत्ता माझ्याकडे फोटो नाहीत.

ही पुर्वापार दिसत आलेली फिक्कट अबोली. पण हिच फुले गजर्‍यात ३ ते ४ दिवस चांगली राहतात. ह्याचे देठ कडक असते त्यामुळे वेणीही सुंदर होते ह्या अबोलीची.

माझ्या बालपणी आबोलीची लागवड पुढील पद्धतीने होत.

मे महिना आला की शेताची ठेपळ चांगली सुकून त्यांना भेगा पडतात. मग अशी ठेपळ पारईने पटापट निघतात. नविन अबोली लावायच्या जागी अशी ठेपळ एक एक करुन किंवा घमेलात २-३ आणून अबोलीच्या लागवडीच्या जागी ठेवावी लागत. मग ही ठेपळ फोडून त्याचा मोठा वाफा करून ठेवत. पावसाच्या सरींना सुरुवात झाली की ठेपळ सरींच्या पाण्याने नरम पडत. अबोलीच्या बियांची पेरणी पण मजेदार असते. वरील जाड देठाच्या अबोलीची बोंडे सुकली की त्यात बी तयार होते.

ही बोंडे तोडून कागदात बांधून ठेवायची. बी पेरायच्या दिवशी ही बोंडे एका पाणी भरलेल्या बालदीत टाकायची आणि पटकन बालदीवर झाकण द्यायचे आणि आवाज घ्यायचा हा मला पुर्वी छंद होता. झाकण लावताच बालदीतून राइला फोडणी दिल्याप्रमाणे तड तड आवाज येतो. ह्या बोंडांमध्ये भातकणांप्रमाणे थोडे आकाराने मोठे असे आवरण असते व त्या आवरणात अबोलीचे बी असते. पाण्यात टाकताच ते आवरण फुटते व त्यातून बी पाण्यात पडते. थोड्या वेळाने झाकण काढायचे मग बोंडे वर आणि बी खाली साचलेले दिसते. मग हे तळाचे बी पाण्यासकट नरम झालेल्या ठेपळांच्या वाफ्यावर एका कोपर्‍यात टाकुन त्यावर अलगद मातीचा हात फिरवायचा. ७-८ दिवसांत अबोलीची रोपे वर आलेली दिसतात. १०-१५ सेमिंची ही रोपे झाली की मग रोपांची एक एक करून पुर्ण वाफ्यावर लागवड करायची.

आमच्या घरीही अबोली खुप फुलत असे. पण आम्ही वरील बी पेरणीची प्रक्रिया करत नव्हतो. ठेपळ मात्र आणून ठेवावी लागत. आवड म्हणून आई अबोलीच्या जुन्या रोपांखाली पावसात उगवलेली रोपे त्या ठेपळांच्या वाफ्यावर लावत असे. लाल अबोलीची लागवड मात्र पावसाळ्यात फांद्या तोडूनच करावी लागे कारण लाल अबोलीच्या बोंडात बी धरत नाही.

कुठल्याही झाडाला कळ्या लागलेल्या पाहण्यासाठी मी अधीर असे. हिवाळा संपत आला की लग्नसराईच्या काळात अबोलीचा सिझन चालू होत असे. मग अशा वेळी माझी अबोलीच्या कोवळ्या कोंबावर नेहमी फिरत असे. अबोलीला पहिला कोंब पहाणेही फार सुखद असे. अजुनही माझा हा छंद आहे.

हळू हळू त्यातुन नजूक लालसर कळ्या बाहेर पडतात.

आणि त्या कळ्यांचे रुपांतर फुलात होते तेंव्हा आनंदी आनंद गडे.

फुले भरपुर येऊ लागली की मला त्याचे गजरे करायला खुप आवडत. जास्त असले की आई आजुबाजूलाही गजरे द्यायची. आई व मी कदंबा करत असू. . मग त्यात कधी जुईची तर कधी मोगर्‍याची, कागड्याची फुले घालून आम्ही दुरंगी कदंबे विणत. मी गुंफलेला गजराही शिकले पण मला कदंबाच सुटसुटीत आवडतो अजुनही

हा मी हल्ली केलेला अबोलीचा कदंबा (कदंबा म्हणजे हातावर गाठ मारून केलेला गजरा.)

हे बाजारातील गुंफलेले लाल अबोलीचे गजरे.

खास व्यवसाय करण्यासाठीही ही अबोली काही बागायतदारांकडे लावली जाते. माझ्या शालेय जीवनापर्यंत दारावर येणार्‍या गिर्‍हाइकांसाठी १ रु. ला १०० फुले मोजून देत असत बागायतदार. तसेच बाजारातही १०० फुलांचे वाटे ठेवलेले असत.

माझ्या मावस बहीण अबोलीची फुले विकत असे. तिच्याकडे गेल्यावर कधी कधी खेळता खेळता फुले मोजायचे काम मी करत असे. तेंव्हा मला नेहमी प्रश्न पडे बाजारात एवढ्या प्रमाणात फुले येतात ती फुलवाले कशी मोजून घेत असतील ? किती वेळ लागत असेल त्यांना ? पण ते घाऊक दरात विकतात हा व्यवहार समजण्याइतपत मी तेंव्हा सुज्ञ नव्हते.

लग्नसराईच्या काळात अबोलीला महत्वाचे स्थान असते. पुर्वी अबोलीची वेणी नवरीसाठी सक्तीचे असे ती पण खास करून माहेरची. त्यामुळे सुवाशिणींना अबोली पाहताच माहेरची आठवण ओली होत असणार तसेच प्रत्येक नववधूच्या नणंदेच्या तोंडावर हे गाण येतच असणार. "चंपा,चमेली, जाई, अबोली पहा माझी वहीनी अशी ही."

तसे अबोली हे फुल इतर पांढर्‍या फुलांपेक्षा सगळ्यात स्वस्त. पण लग्नसराईच्या काळात अबोलीच्या वेणीचा भाव उच्चांक गाठतो. गजर्‍याच्या तिप्पट भाव वेणीचा लावतात. अबोलीची वेणीही कलाकुसर करुन विविधप्रकारे फुलवाले करतात. पेचक, हिरवा पाला, रिबिण, हल्ली तर कापडी छोटी गुलाबाची फुलेही मध्ये मध्ये घालतात.

सासरी मी अबोली आणून लावली आहे. जुना आनंद अजुनही थोड्या-फार प्रमाणात घेते. भरपूर फुलते पण क्वचीतच कधीतरी मी फुले काढते कोणी आल तर गजरा करून देते तर क्वचीत कधी स्वतः माळते, जास्तकरून झाडावर तशीच ठेवते. कारण वेळेनुसार आणि वयानुसार ही अबोली झाडावर जास्त खुलून दिसते ह्याच आकलन होऊ लागल आहे. अबोली अगदी दारासमोरच आहे. ह्या झाडांना अजुनही तशीच न्याहाळते. पाणी घालते. बोंडे सुकलेली असतील तर हल्ली झाडावरच पाणी घालताना ती फुटतात आणि तड तड आवाज येतो. तो मुलीला ऐकवते. संध्याकाळी ऑफीसमधून घरी गेले की पहिला पायर्‍यांवर बसते. समोरची फुले न्याहाळते. तेवढाच ह्या अबोलीचा सहवास.

*****************************************************************************************************************

फुलझाडांवरील इतर लेखन
सुरंगी - http://www.maayboli.com/node/24503
हिरवा चाफा - http://www.maayboli.com/node/26242
अनंत - http://www.maayboli.com/node/27080
आली माझ्या घरी ही दिवाळी (ब्रह्मकमळ फोटो) - http://www.maayboli.com/node/27731
चाफा - http://www.maayboli.com/node/27357
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया - http://www.maayboli.com/node/32841
मदनबाण - http://www.maayboli.com/node/34478

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर फोटो आणि लेख.
अबोलीचा रंग, फुले सुकल्यावरही तसाच राहतो, हि तिची खासियत.
गोव्याला केळ्याच्या सोपाचे धागे वापरून गजरा विणतात, त्याला वळेसार असे खास नाव आहे.

जागु, सगळेच फोटो अप्रतिम. डोळे सुखावले एकदम.

बी पेरायच्या दिवशी ही बोंडे एका पाणी भरलेल्या बालदीत टाकायची आणि पटकन बालदीवर झाकण द्यायचे >>>> ही टीप एकदम सही. मी इतक्यावेळा कुठुन कुठुन सुकलेली बोंडं आण॑ली पण ती कधी रुजलीच नाहीत. बिया बहुतेक आधीच उडुन गेल्या असाव्यात आणि मी पोकळ बोंडं लावत होते. Happy

mast

किती सुंदर लिहिलंस जागू - सगळं डोळ्यासमोर उभं रहातं - फोटोही सुरेखच......

आमच्याही दारात अबोली आहे -त्याला पाणी घालताना मी ही त्या फटाक्यासारख्या आवाजाची वाट पहातो.........

जागु, छान झालाय लेख.
बालपणात फिरवून आणलस तू मला. मी पण तूझ्यासारखीच खूप गजरे करायची.माझ्या अंगणात देखिल जवळजवळ सर्व फूलझाडे होती.
आता एक लेख कोरांटिवर पण येऊ देत, प्लीज.

. बी पेरायच्या दिवशी ही बोंडे एका पाणी भरलेल्या बालदीत टाकायची आणि पटकन बालदीवर झाकण द्यायचे आणि आवाज घ्यायचा हा मला पुर्वी छंद होता. झाकण लावताच बालदीतून राइला फोडणी दिल्याप्रमाणे तड तड आवाज येतो. >>>>>>>>>>>>
हा छंद मलाही होता .

जागुले.........काय मस्त लिहिलंस! मन प्रसन्न झालं बघ! मला लहानपणी याच्या रंगाचा इतका मोह पडायचा, मी मोगरा आणि अबोली असा मिक्स गजरा करून केसात माळायची.

जुना आनंद अजुनही थोड्या-फार प्रमाणात घेते. भरपूर फुलते पण क्वचीतच कधीतरी मी फुले काढते कोणी आल तर गजरा करून देते तर क्वचीत कधी स्वतः माळते, जास्तकरून झाडावर तशीच ठेवते. कारण वेळेनुसार आणि वयानुसार ही अबोली झाडावर जास्त खुलून दिसते ह्याच आकलन होऊ लागल आहे. अबोली अगदी दारासमोरच आहे. ह्या झाडांना अजुनही तशीच न्याहाळते. पाणी घालते. बोंडे सुकलेली असतील तर हल्ली झाडावरच पाणी घालताना ती फुटतात आणि तड तड आवाज येतो. तो मुलीला ऐकवते. संध्याकाळी ऑफीसमधून घरी गेले की पहिला पायर्‍यांवर बसते. समोरची फुले न्याहाळते. तेवढाच ह्या अबोलीचा सहवास.

अबोली सोबत शब्दांची गुंफण सुद्धा मस्त झालीय. Happy

स्मितू, पद्मजा, दिनेशदा, मनिमाऊ, मुक्तेश्वर कुलकर्णी, शशांक, माधव, उजू, मानुषी, मल्लीनाथ धन्यवाद.

अबोलीचा वळेसार नि अबोलीबद्दलच सगळच छान लिहिलं आहे. अबोलीचा रंग कुणास आवडणार नाहि अशी व्यक्तीच विरळी.. अबोलीचं फुल कोणत्याहि सफेद रंगाच्या फुलाबरोबर खुलुन दिसतं..
<<आता एक लेख कोरांटिवर पण येऊ देत, प्लीज. >> अगदि अगदि.. येवुदेच लेख.. कोरांटिच्या फुलांचे तर कितितरी रंग.
जागु छान लिहितेस.. कोणत्याहि विषयावर अगदि सुसंगत अन मनाला भिडणारे. Happy

Happy Happy Happy

जांभळी अबोली सुध्दा असते. पण या लाल शेंदरी फुलांची सर त्याला नाही. ती फिकट असतात आणि यांच्या ईतकी संख्येने फुलत नाहीत. मी पाहिलेली आहेत. पण फोटो नाहीये.

भावना धन्यवाद. कोरांटीवरील लेखन नक्कीच करेन पण वेळ लागेल. आत्ताच फुले येऊन गेली आता एक वर्ष वाट पहावी लागेल.

इंद्रा, उमेश, शोभा, सुहास्य धन्यवाद.

जागुले __/\__
कित्ती गोडमिट्टं लिहिलंयस!!!!
आणी फोटो तर आँखोंकी ठंडक!!!!

जागू, अबोलीचा कदंबा, वेणी फार मस्त प्रकार आहेत गं! आमच्या आजीला यायचे करता हे प्रकार... मला शिकायचे होते पण राहूनच गेले!

इनमिनतीन, वेका, वर्षू, स्निग्धा, अरुंधती, योगिता धन्यवाद.

मेधा तिला खुप आवड आहे. घातला होता तिने दोन वेळा.

Pages